November 21, 2024
use of Jaggery in biological control of Insects
Home » जैविक नियंत्रणामध्ये गुळाचा वापर
विश्वाचे आर्त

जैविक नियंत्रणामध्ये गुळाचा वापर

गुळासंदर्भातील ज्ञानेश्वरीतील ओवीमुळे त्याकाळात गुळाचा वापर जैविक नियंत्रणामध्ये केला जात असावा हे स्पष्ट होते. अशा पद्धतीचे तंत्रज्ञान त्या काळात अवगत असावे. आता पुन्हा एकदा शेतकरी रासायनिककडून सेंद्रिय शेतीकडे वळत आहे. अनेक थोर संशोधकही आता सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करताना दिसत आहेत. यासाठी पुन्हा एकदा पोथ्या पुराणात सांगितलेले हे तंत्रज्ञान शोधण्याची गरज भासत आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

पैं आघविया जगा जें विख । तें विख कीडिया पीयूख ।
आणि जगा गुळ तें देख । मरण तया ।। 930 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ – सगळ्या जगाला जे विष ते विष किड्यांना अमृत (जीवन) असते. आणि सगळ्या जगाला गूळ जो गोड तो त्या विषातील किड्यांना मारक असतो.

कीड आणि रोग हे पिकाचे सर्वांत मोठे शत्रू आहेत. याचा परिणाम उत्पादनवाढीवर होत असल्याने याचे नियंत्रण हे गरजेचेच आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कीड व रोगांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यांचे जीवनचक्र आदीचा अभ्यास हा शेतकऱ्यांनी करायलाच हवा. पिकाच्या कोणत्या भागाला कीड इजा करते. किडीची कोणती अवस्था नुकसान करते हे माहीत असणे आवश्यक आहे. याचा अभ्यास असेल तर किडीवर सहज नियंत्रण मिळवता येते. जगभरात जवळपास 10 कोटी 17 लाख 18 प्रकारचे कीटक आहेत. या सर्वच किडी शेतकऱ्यांचे शत्रू आहेत असेही नाही. काही कीटक इतर कीटकांना खाऊन जगतात. सर्वच कीटक हे मांसाहारी आहेत असेही नाही. प्रत्येक पिकांवर आढळणारे कीटक हेसुद्धा वेगवेगळे आहेत.

कपाशीमध्ये रस शोषणाऱ्या मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण या किडी व अमेरिकन, ठिपक्यांची, शेंदरी आदी बोंड अळी यांचा प्रादुर्भाव होतो. उसामध्ये मावा, हुमणी यांचा प्रादुर्भाव होतो. सोयाबीन पिकास पाने खाणाऱ्या अळ्या, खोडमाशी यांचा प्रादुर्भाव होतो. हरभऱ्यामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव होतो. पिकानुसार नुकसान करणारे कीटकही विविध आहेत. याचे नियंत्रण करण्यासाठी किडनाशकांच्या फवारण्या केल्या जातात. पण सध्या हा फवारणीचा खर्च वाढला आहे. साहजिकच उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. अशानेच आज शेती परवडेनाशी झाली आहे. यासाठी वाढता उत्पादन खर्च कसा कमी करता येईल व उत्पादनही उत्तम प्रतीचे कसे घेता येईल यावर अधिक भर देण्याची गरज आहे.

किडनाशकांचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. किडनाशकांचे अंश मानवाच्या रक्तांमध्ये आढळले आहेत. प्रमाणाबाहेर फवारण्या केल्या जात असल्याने हा परिणाम होत आहे. पिकांवरील कीड व रोग हे काही आत्ताच शोधले गेले आहेत असे नाही. पूर्वी ऋषीमुनींनी याचा शोध लावला होता. तेसुद्धा याचा बंदोबस्त करत होते. पण त्या काळी वापरात असलेल्या तंत्रज्ञानावर अभ्यासच झाला नाही. कश्यप ऋषी हे हृदयरोग तज्ज्ञ होते. पोपईच्या पानाच्या देठाने ते हृदयाचे ठोके मोजायचे. इतके प्रगत तंत्र भारतात अस्तित्वात होते. शेतीमध्येही प्रगत तंत्रज्ञान होते. पण काळाच्या ओघात ते मागे पडले. आता त्या काळात वापरण्यात येणाऱ्या तंत्राचा शोध घेण्याची गरज आहे.

संत ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात ज्ञानेश्वरीमध्ये जीवसृष्टीतील कीटकांचे गुणधर्म सांगितले आहेत. ते तत्त्वज्ञान आजही उपयुक्त आहे. इतरांसाठी जे विष आहे ते कीटकांचे खाद्य आहे असे ज्ञानदेव म्हणाले. यावर शास्त्रातील अनेक उदाहरणे सांगता येतील. सेंट जॉन्स वर्थ किंवा कलमथ नावाचे तण जनावरांनी खाल्ले तर जनावरे दगावतात. पण या तणावर बिटल तसेच अनेक प्रकारच्या अळ्या, फुलपाखरे, मॉथ, लिफ मायनर आदी कीटक जगतात. ज्या झाडाचे पान, खोड जनावरांसाठी विषारी आहे त्यावरच तर हे कीटक वाढतात. तेच त्यांचे खाद्य आहे. कलमथ तण खाल्ल्याने मेंढ्यांची लोकर गळते. दुग्ध जनावरांची दूध उत्पादनाची क्षमता कमी होते. जनावरांचे वजन झपाट्याने घडते. 1944 मध्ये या तणाचा 30 देशांमध्ये प्रादुर्भाव झाला होता. जवळपास दहा लाख एकरावर हे तण आढळले होते. ऑस्ट्रेलियामध्ये या तणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 1929 पासून संशोधन सुरू होते. त्यांनी या झाडावर आढळणारे कीटक शोधले. या कीटकांचे उत्पादन करून हे तण नियंत्रणात आणण्याचा प्रयोग केला. 1945-46 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये यावर वाढणाऱ्या बिटलच्या पाच हजार वसाहती सोडल्या. याला यश आल्यानंतर 1950 मध्ये जवळपास तीन हजार बिटल्स गोळा करून सोडण्यात आले. अशा प्रकारे या तणावर जैविक पद्धतीने नियंत्रण मिळविण्यात आले. आता हे तण कॅलिफोर्नियात रस्त्याच्या कडेला पाहायला मिळते. पण ते नियंत्रणात आहे. या तणावर नियंत्रण मिळविल्यानंतर त्या जमिनींचे भाव झपाट्याने वाढले.

जैविक तण नियंत्रणाचा उपाय भारतात पूर्वीपासून केला जात असावा. त्यावर ऋषीमुनींनी संशोधनही केले असावे; पण काळाच्या ओघात यात आपण मागे पडलो. भारतीयांची संशोधक वृत्तीच कमी झाली आहे. गाजर गवतही असेच एक तण होते. पडीक जमिनीवर भारतात मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यावर जैविक तण नियंत्रणाचे उपाय करून तेही अशाच पद्धतीने नियंत्रणात आणले. तणांच्या बंदोबस्तासाठी जसा किडींचा वापर केला जातो तसा किडींच्या नियंत्रणासाठी विविध विषाणूंचा वापरही केला जातो. हा विषाणू कीटकाच्या अळीने खाल्ला तर ती अळी मरते. पण ही अळी हा विषाणू खाणार कशी? तिला हा विषाणू खाण्यास भाग पाडणे गरजेचे असते. ही विषाणूजन्य बुरशी अळीने खावी यासाठी अळीला गुळाचे आमिष दाखविले जाते. विषाणूजन्य बुरशीची फवारणी करताना प्रत्येक पंपाला 50 ग्रॅम गुळाचे पाणी यासाठीच त्यामध्ये टाकले जाते. याचे दोन फायदे आहेत. बुरशीला अळी, कीटक जरी मिळाले नाही तरी बुरशी मरत नाही. गुळातील अन्नद्रव्यामुळे ही बुरशी जिवंत राहते. त्या विषांणूची उपासमार होत नाही. दुसरा फायदा म्हणजे गुळामुळे, गोडामुळे कीटकांची अळी आकर्षित होते. साहजिकच गुळाला चिकटलेले विषाणू त्या अळीच्या पोटात जातात. विषाणू अळीच्या पोटात गेल्यानंतर ते झपाट्याने वाढतात. गुळामुळे अळीची भूक अधिक वाढते. अळी जास्तीत जास्त विषाणूजन्य पदार्थ खाते. विषाणूमुळे अळी रोगग्रस्त होते व मरते.

हरभरा पिकावरील घाटे अळी, सोयाबीनवरील पाने खाणारी अळी, लष्करी अळी, गोगलगाय आदीच्या नियंत्रणासाठी या न्यूक्लिअर पॉलिहैड्रॉसिस व्हायरस हा वापरला जातो. घाटे अळी (हेलिकोव्हरपा) ज्वारी, हरभरा, तूर, कपाशी, सूर्यफूल, मका, टोमॅटो, करडई या पिकांचे नुकसान करते. ही अळी रंगाने हिरवट, पिवळसर, तांबूस तपकिरी किंवा काळपट असते. मुख्यतः अळी अवस्था पिकाचे मोठे नुकसान करते. हाती आलेले उत्पन्न जाण्याची शक्यता असते. सध्या या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे या किडीमध्ये कीटकनाशक प्रतिकारक्षमता निर्माण होते. त्यावेळी ही अळी कीटनाशकास दाद देत नाही. अशामुळे आता या अळीस न्यूक्लिअर पॉलिहैड्रॉसिस या विषाणूमुळे मारणे गरजेचे आहे. गुळासोबत हा विषाणू फवारून नियंत्रणाची गरज आहे.

गुळाचे अनेक फायदे आहेत. काही बियाण्यांच्या बीज प्रक्रियेतही गुळाचा वापर केला जातो. हरभऱ्याच्या बीजास बीज प्रक्रिया करतानाही गूळ वापरला जातो. हरभऱ्यात पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास दोन ग्रँंम थायरम, दोन ग्रॅम बावीस्टीन किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया केली जाते. यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम प्रति 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळले जाते. हे बियाणे तासभर सावलीत सुकविले जाते. या प्रक्रियेमुळे पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होते. मुळावर नत्राच्या गाठी वाढतात. पिकाची चांगली वाढ होते. गुळामुळे बियाण्यास रायझोबियम कल्चर चिकटण्यास मदत होते. तसेच या जिवाणूंची कार्यक्षमता वाढते. जिवाणूंचीही वाढ झपाट्याने होते. याचा फायदा पिकास होतो. यासाठीच बीजप्रक्रियेमध्ये गुळाचा वापर केला जातो.

गुळासंदर्भातील ज्ञानेश्वरीतील ओवीमुळे त्याकाळात गुळाचा वापर जैविक नियंत्रणामध्ये केला जात असावा हे स्पष्ट होते. अशा पद्धतीचे तंत्रज्ञान त्या काळात अवगत असावे. आता पुन्हा एकदा शेतकरी रासायनिककडून सेंद्रिय शेतीकडे वळत आहे. अनेक थोर संशोधकही आता सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करताना दिसत आहेत. यासाठी पुन्हा एकदा पोथ्या पुराणात सांगितलेले हे तंत्रज्ञान शोधण्याची गरज भासत आहे. आरोग्य उत्तम राखणारे हे तंत्रज्ञानावर संशोधन व्हावे. आरोग्यास लाभदायक अशी उत्पादने शेतीतून घेतली जावीत. यासाठी आता जनजागृतीचीही गरज आहे. अशा तंत्रज्ञानावर कृषि विद्यापीठांनी भर द्यावा. यावर संशोधन व्हावे. मानवी आरोग्यास पोषक अशी कृषि उत्पादने होण्याची गरज आहे. हव्यासापोटी केली जात असलेली उत्पादने घातक ठरत आहेत. शेतकऱ्यांनीही स्वतःच्या कुटुंबाचा विचार करून तरी आरोग्यास घातक अशी उत्पादने करू नयेत. तसे तंत्रज्ञान वापरू नये. अन्न हे पूर्णब्रह्म आहे. शेतकरी हे पूर्णब्रह्म उत्पादित करतो. ते अन्न विषमुक्त असावे. पण उत्पादित होणारे फळच विषयुक्त असेल तर ते पूर्णब्रह्म कसे ठरेल. शेतकऱ्यांनी याचा विचार करूनच आता शेती करायला हवी. आता शासनाने सुद्धा अशा उत्पादनाबाबत निकष निश्चित करण्याची गरज भासू लागली आहे. अशा या नव्या समस्या समस्त मानव जातीसच घातक आहेत. सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देऊन आता या घातक समस्येवर मात करावी लागणार आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading