लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने तसेच आज राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी यानिमित्त लोकराजाला आदरांजली…
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
नगरेंचि रचावी । जळाशयें निर्मावी ।
महावने लावावीं । नानाविधें ।। २३३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा
ओवीचा अर्थ – शहरेंच वसवावीत, जलाशय वैगरे पाण्याचे साठे बांधावेत, नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेंत.
राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या कार्यकालात लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना सोडवत अनेक सुधारणावादी निर्णय घेतले. शहरे वसवली पण त्यांना लागणाऱ्या गरजा विचारात घेऊन तशी कार्ये केली. विकासासाठी पाण्याची गरज आहे हे विचारात घेऊन त्यांनी तलाव, धरणे बांधली. शेती, बागायतीच्या विकासासाठी प्रयत्न केले. चहाचे मळे उभारले जाऊ शकतील काय याचा विचार करून तसे प्रयोगही केले. एकंदरीत लोकांच्या गरजा विचारात घेऊन त्यानुसार सोयी-सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा त्यांचा राजस गुण नेहमीच भावीपिढीसाठी आजही मार्गदर्शक ठरत आहे.
राजांच्या विचारात केवळ हव्यास दिसत नाही. कोणतीही गोष्ट करताना दुरदृष्टी पाहायला मिळते. त्यांच्या कार्यकालात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी तलाव, विहिरी, धरणे बांधण्याचे जाहीरनामे काढले. पण त्याची अंमलबजावणी करता ही धरणे, हे तलाव दुषित होणार नाहीत याची काळजीही त्यांनी त्यावेळी घेतलेली पाहायला मिळते. वारंवार पडणाऱ्या दुष्काळाशी यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी शाहू महाराजांनी राज्यात सन १९०२ साली जलसिंचन धोरण जाहीर केले. त्यावेळी काढलेल्या जाहीरनाम्यातून त्यांची ही दुरदृष्टी स्पष्ट दिसून येते.
तलावाची निर्मिती करताना तसेच तो दिर्घकाळ टिकावा यासाठी त्यांनी योग्य ती काळजी धोरणात घेतल्याचे पाहायला मिळते. केवळ कागदोपत्री धोरण त्यांनी तयार केले नाही तर ते प्रत्यक्षात कृतीत सुद्धा केल्याचे दिसून येते. तलाव बांधताना त्यामध्ये कोठून आणि कशा पद्धतीने व कशा प्रकारचा गाळ त्यामध्ये साचेल याचा विचार करण्याचेही आदेश दिले. या गाळाने पाणी प्रदुषण होणार नाही किंवा त्या पाण्याचा जनतेवर दुष्परिणाम होणार नाही याचीही काळजी घेतल्याचे पाहायला मिळते. गाळ साचून तसेच खराब पाण्याचा साठा होणार नाही याचाही विचार त्यांनी केलेला पाहायला मिळतो. मुळात दुषित पाणी तलावात साचणार नाही याचा विचार त्यांच्या धोरणात होता.
आज या धोरणांना बासणात गुंडाळून ठेवलेले पाहायला मिळते. फक्त या जाहीरनाम्याची अंमलबजावणी आजच्या राजकर्त्यांनी केली असती तर त्यांनी बांधलेले तलाव आजही आपणास प्रदुषणमुक्त असल्याचे पाहायला मिळाले असते. पण तसे होताना दिसत नाही. त्यांनी काढलेल्या या आदेशाची अंमलबजावणी हीच त्यांना खरी आदरांजली ठरू शकेल. तलावात किंवा नदीच्या पाण्यात प्रदुषित सांडपाणी मिसळणार नाही याची काळजी घेण्यासाठी जलधोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी करावी. या धोरणाने त्यांनी बांधलेले तलाव, धरणातील पाणी साठे प्रदुषणमुक्त होतील आणि जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल. यासाठी त्यांना आदरांजली वाहताना त्यांच्या या जाहीरनाम्याचा जरूर विचार करावा.
