January 29, 2023
prayog-parivar-founder-agriculture-scientist-shripad-dabholkar
Home » कृषी वैज्ञानिक दाभोळकरांचा प्रयोग परिवार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी वैज्ञानिक दाभोळकरांचा प्रयोग परिवार

कृषिक्षेत्रातील खर्च कमी करून उत्पादकता वाढवायला दाभोळकरांनी दाखवलेला प्रयोग परिवाराचा मार्ग नक्कीच उपुयक्त आहे. ‘केल्याने होत आहे रे’, ‘विपुलाच सृष्टी’, ‘आपला हात जगन्नाथ’ इत्यादी त्यांच्या पुस्तकांच्या मार्गाने हे ज्ञान आजही उपलब्ध आहे.

दिलीप हेर्लेकर

‘प्रयोग परिवार’चे जनक तसेच द्राक्ष, ऊस, आंबा इत्यादी अनेक पिकांमध्ये हुकमी व विक्रमी पीक मिळवणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांचे मार्गदर्शक आणि खरे प्रयोगवीर असलेले श्रीपाद अच्युत दाभोळकर गणित विषयात एम. एस्सी. झाले होते. त्यांनी गणिताचे अध्यापन गारगोटीच्या मौनी विद्यापीठात केले. पण तेथे तंटा उद्भवल्यावर कर्मचारीवर्गाच्या बाजूने त्यांनी तीन वर्षे प्रखर लढा दिला. यासाठी त्यांनी असा लढा देण्याच्या महात्मा गांधींच्या कार्यपद्धतीचा विशेष अभ्यास केला. एखाद्या क्षेत्रात काम करायचे म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने त्याच्या मुळापर्यंत जाऊन खास अभ्यास केला पाहिजे, अशी दाभोळकरांची विचारसरणी होती. बऱ्याच सामाजिक प्रश्‍नांवर त्यांनी अशाच पद्धतीने अभ्यास केला आणि प्रयोग केले. हे करत असताना, त्यांच्या घराच्या परसात त्यांचे शेतीवरील प्रयोग सुरू झाले होते.

१९७९ साली वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी शिक्षण क्षेत्रातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. ‘प्रयोग परिवार’ ही संकल्पना त्यांच्या डोक्यात होती. गणिताचा वापर करून नाना प्रकारच्या व्यवहाराची प्रारूपे (मॉडेल्स) बनवता येतात. अशी अनेक प्रारूपे प्रा. दाभोळकर बनवत गेले. प्रयोग परिवाराचे हे काम गोफ विणण्या सारखे करायची कल्पना त्यांच्या मनात होती.

तासगावच्या एका शेतकऱ्याच्या द्राक्षाच्या शेतावर दाभोळकरांनी प्रयोग करून यश मिळवले. दुसरा शेतकरी आला, तर त्याला त्यांनी तासगावच्या त्या शेतकऱ्याकडे पाठवले. त्याने काय प्रयोग केले ते समजून घे, तसे आपल्या शेतावर कर, अडचण आल्यास तासगावच्या शेतकऱ्याला शेतावर बोलव, त्याचे मार्गदर्शन घे, अशी पद्धत वाढीला लावली. सर्वांनी दाभोळकरांचा सल्ला घ्यायची गरज नाही, असे प्रतिपादन केले. त्यामुळे प्रयोग परिवारात द्राक्षाचा गट, उसाचा गट, आंब्याचा गट असे प्रयोगशील शेतकऱ्यांचे पिकानुरूप गट विकसित होत गेले.

विज्ञान याचा अर्थ विशेष ज्ञान. प्रयोग याचा अर्थ पुढे जाण्याची युक्ती, जिज्ञासा हा गुरू, प्रयोग हीच पाठशाळा आणि प्रचिती हीच परीक्षा, ही त्यांच्या विचारांची दिशा होती. आपल्याकडे असणाऱ्या साधनांबद्दल आपण साक्षर असायला हवे, अशी त्यांची धारणा होती. ही साधनसाक्षरता येण्यासाठी निसर्गनियमांची चांगली ओळख असायला हवी, असे अनेक मूलगामी विचार त्यांनी मांडले.

एका चौरस मीटरवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशापैकी एक ते दीड टक्के सूर्यप्रकाशच आजची वनस्पती उचलू शकते, असे विज्ञानाने दाखवले आहे. तरीही एक दशांश चौरस मीटर जागेत कलिंगडाचा वेल शंभर दिवसांत तीन किलो कलिंगडे देतो. तेवढ्याच काळात द्राक्षाचा वेल ४०० ते ६०० ग्रॅम वजनाचा घड बनवू शकतो. केळी तेवढ्याच जागेत वर्षभरात पाऊण ते एक किलो वजनाची फळे देऊ शकतात, तर उसाचे वर्षभरातील वजन अडीच ते तीन किलो होते.

भुईमूग शंभर दिवसांत ६० ग्रॅम, भात किंवा ज्वारी अर्ध्या ते एक चौरस मीटरच्या जागेत १२० दिवसांत एक ते दीड किलो उत्पादन देते, अशी उत्पादनाची ठोस आकडेवारी दाभोळकरांनीच प्रथम मांडली. त्याला त्यांच्या गणिताच्या अभ्यासाची आणि त्यांनी प्रयोगांनी सिद्ध केलेल्या पद्धतीची जोड होती. म्हणून हिरव्या पानांची प्रकाश-संश्‍लेषण-क्षमता एका टक्क्यापासून विज्ञानाच्या साहाय्याने सहजी ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो, अशी उमेद त्यांना होती.

एवढेच नव्हे, तर घराच्या परसात त्यांनी सर्व प्रकारचा जैविक कचरा वापरून टोमॅटोच्या एका रोपापासून ६ किलो उत्पादन घेऊन दाखविले. त्याच धर्तीवर आंब्याच्या दर १०० पानांमागे एक फळ मिळालेच पाहिजे, ज्वारीचा अभ्यास करून एका ताटाला १०० दाणे, तसेच एका हेक्टरामागे १०० क्विंटल, असे हुकमी पीक येऊ शकते, हे ते अनुभवाने सांगत. अशी उत्पादनक्षमता इस्रायलने विकसित केली आहे, तर आपल्याला का नाही साध्य करता येणार? एका किलोत बरोबर सहा-सहा आंबे मिळवण्याची किमया इस्रायलमध्ये घडली, तो काही चमत्कार नाही; तेच तर विज्ञान आहे, अशी दाभोळकरांची विचारसरणी होती.

एका फांदीला चार-पाच पेरू लागले आणि त्याचा पर्णसंभार लहान असेल, तर लहान असतानाच त्यांतील तीन पेरू खुडून टाका म्हणजे पाच लहान पेरूं ऐवजी मोठे दोन पेरू तुम्हांला मिळतील, हे विचारही त्यांनी प्रयोगांती मांडले. कृषिविज्ञानात द्राक्षाचे विज्ञान अधिक क्लिष्ट, गुंतागुंतीचे मानले जायचे, त्यामध्येही दाभोलकरांनी प्रयोग करून चांगली यशस्विता मिळवली. हे प्रयोगाचे निष्कर्ष त्यांनी १९७४ साली मेक्सिकोला आणि १९७८ साली जर्मनीला कासेल विद्यापीठात मांडले. महाराष्ट्राबरोबर भारतभरही त्यांनी मार्गदर्शन केले.

दाभोळकरांनी सभागृह भाड्याने घेऊन, सात-सात दिवसांची शिबिरे घेऊन ४०० ते १००० शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याला प्रत्येकी एकेक हजार रुपये शुल्क ठेवले. तरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित असत, हीच त्यांच्या ज्ञानाच्या उपयुक्ततेची पावती होती. त्यांचा दहा गुंठ्याचा प्रयोग खूप गाजला. पाऊस आपल्याला देयक (बिल) पाठवत नाही म्हणून आपण पाण्याचा बेसुमार वापर करतो, पाणी झाडाला घालायचे की बाष्पीभवनाला याचा विचार करा, सूर्यप्रकाश त्याच दिवशी गोळा करायला हवा-म्हणजे झाडापासून अन्न तयार करायला वापरायला हवा, हे त्यांचे मूलभूत विचार लक्षात ठेवण्यासारखे आहेत.

कृषिक्षेत्रातील खर्च कमी करून उत्पादकता वाढवायला दाभोळकरांनी दाखवलेला प्रयोग परिवाराचा मार्ग नक्कीच उपुयक्त आहे. ‘केल्याने होत आहे रे’, ‘विपुलाच सृष्टी’, ‘आपला हात जगन्नाथ’ इत्यादी त्यांच्या पुस्तकांच्या मार्गाने हे ज्ञान आजही उपलब्ध आहे.

त्यांच्या या कामगिरीकरिता मराठी विज्ञान परिषदेने त्यांना दिलेले सन्मानपत्र, परिषदेच्या १९९२ सालच्या संमेलनाचे अध्यक्षपद, १९८८ सालचा वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानचा पुरस्कार आणि ग्रमीण विकासासाठी विज्ञानाचा वापर केल्यामुळे १९९० साली त्यांना मिळालेला जमनालाल बजाज पुरस्कार, हे उल्लेखनीय आहेत.

Related posts

साखर निर्यातीत 291 टक्क्यांनी वाढ

प्रुनिंग झाडांसाठी आवश्यक आहे का ?…

भू संपादन कायद्यातील दुरुस्ती शेतकरी हिताची ?

Leave a Comment