वक्तृत्व ही केवळ बोलण्याची कला नसून समाजमन जिंकण्याची शक्ती आहे. या शक्तीचा अभ्यास, उगम, व्याप्ती आणि व्यावहारिक पैलू यांची सखोल चिकित्सा करणारे डॉ. बी. एम. हिर्डेकर यांचे ‘वक्तृत्व’ हे पुस्तक विद्यार्थ्यांपासून व्याख्याते, प्रशासक, राजकारणी, समाजसेवक अशा सर्वांना मार्गदर्शक ठरते.
डॉ. गिरीश मोरे
बोलण्याची कृती
आपण प्राणी नाही आहोत हे सिद्ध करणारी अतिशय महत्त्वाची कृती म्हणजे बोलणे. बोलणे ही लिहिण्यापेक्षा सोपी कृती आहे. स्वभाषेतून बोलण्यासाठी शिकण्याची गरज नसते, लिहिण्यासाठी मात्र शिकावे लागते. लिहिणाऱ्यांच्या तुलनेने बोलणारे अधिक असतात; नव्हे बोलणारे सगळेच असतात. असे असले तरी ‘बोलून दाखव’ असे म्हटले की बोलणारा थांबतो, लाजतो, घाबरतो, गोंधळतो, त त प प करतो. फक्त बोलण्यासाठी नव्हे तर बोलणे ‘समृद्ध’ करण्यासाठी उपयुक्त ठरणारे डॉ. बी. एम. हिर्डेकर यांचे ‘वक्तृत्व’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
समाजव्यवहार करण्यासाठी बोलणे आणि चारचौघात बोलणे यामध्ये जमीन-आसमानचा फरक असतो. चारचौघात बोलणाऱ्यास वक्ता म्हणतात आणि त्याच्या बोलण्यास वक्तृत्व म्हणतात हे स्पष्ट करणारे पुस्तक म्हणजे ‘वक्तृत्व’. वक्तृत्व ही केवळ बोलण्याची कला नसून समाजमन जिंकण्याची शक्ती आहे. या शक्तीचा अभ्यास, उगम, व्याप्ती आणि व्यावहारिक पैलू यांची सखोल चिकित्सा करणारे डॉ. बी. एम. हिर्डेकर यांचे ‘वक्तृत्व’ हे पुस्तक विद्यार्थ्यांपासून व्याख्याते, प्रशासक, राजकारणी, समाजसेवक अशा सर्वांना मार्गदर्शक ठरते.
डॉ. बी. एम. हिर्डेकर
डॉ. बी. एम. हिर्डेकर हे एक शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, विद्यापीठाचे कुलसचिव, परीक्षा नियंत्रक अशा विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. समाज, शिक्षण, साहित्य आणि प्रशासन या क्षेत्रांतील विषयांवर त्यांनी दोन हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. सुस्पष्ट, सूत्रबद्ध, शास्त्रीय, विषय सुसंगत, दृष्टांत-दाखल्यासह, वेळेचे भान बाळगत आणि प्रभावी भाषेत विषयाची मांडणी करणारे वक्ते म्हणून ते परिचित आहेत. त्याच अनुभवातून आणि अधिकारवाणीतून त्यांचे ‘वक्तृत्व’ हे पुस्तक आकारास आले आहे. डॉ. हिर्डेकर सर हे इंग्रजीचे प्राध्यापक. त्यामुळे या पुस्तकात इंग्रजी भाषेतील अनेक शब्द मराठी शब्दांसाठी पर्यायी म्हणून दिले आहेत. त्यामुळे वाचकांचे भाषिक ज्ञान वाढू शकते.
अकरा प्रकरणांतून
या पुस्तकाची रचना ही ११ प्रकरणांमधून केली आहे. ‘वक्तृत्व कलेचा इतिहास’, ‘वक्तृत्व म्हणजे काय?’, ‘वक्तृत्वासाठी आवश्यक गोष्टी’, ‘वक्ता जडणघडण’, ‘वक्तृत्वाचे फायदे’, ‘भाषण आणि समाजमाध्यमे : डिजिटल मीडिया’, ‘जगप्रसिद्ध वक्ते’, ‘माझे वक्तृत्व : एक प्रवास, एक शोध’, ‘कथा वक्त्यांच्या; व्यथा श्रोत्यांच्या’, ‘समारंभ कार्यक्रम भाषण : संयोजन, नियोजन’ आणि ‘सराव : अभ्यास यासाठी’ या अकरा प्रकरणांतून वक्तृत्व विकासाची एक स्पष्ट वाटचाल लक्षात येते.
जगप्रसिद्ध वक्त्यांची माहिती
या पुस्तकात डॉ. हिर्डेकर यांनी जगप्रसिद्ध वक्त्यांविषयी उद्बोधक माहिती दिली आहे . त्यामुळे डेल कार्नेजी, अब्राहम लिंकन, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जॉर्ज बर्नार्ड शॉ, मार्टिन ल्यूथर किंग, सुभाषचंद्र बोस, केमल पाशा, फिडेल कॅस्ट्रा, पु. ल. देशपांडे, स्वामी विवेकानंद, भगतसिंग आणि शिवाजीराव भोसले यांची वक्तृत्व कला समजते. याशिवाय बराक ओबामा, मलाला, नेल्सन मंडेला, सुसान बी ॲंथोनी, एडमंड बर्क, विन्स्टन चर्चिल यांच्यासह गोपाळ कृष्ण गोखले, ओशो, प्र. के. अत्रे, अटलबिहारी वाजपेयी या महनीयांचे वक्तृत्व गुण स्पष्ट केले आहेत.
वैशिष्ट्ये व उपयोगिता
पुस्तकाची भाषा सोप्या आणि प्रभावी शैलीत आहे, त्यामुळे वाचक लगेच विषयाशी जोडला जातो. थिमॅटिक प्रगती स्पष्ट आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत वक्तृत्वशास्त्राच्या वैचारिक व व्यावहारिक पायऱ्या पद्धतशीर उलगडल्या आहेत. स्वानुभवावर आधारित आठवे प्रकरण पुस्तकाला वैयक्तिक आणि प्रेरणादायक स्वरूप देते. विद्यार्थ्यांसाठी तसेच स्पर्धा परीक्षा, व्याख्यान स्पर्धा, सादरीकरण अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. डिजिटल माध्यमातील बदलांचे विश्लेषण हे आजच्या काळातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
प्रकाशकीय कामगिरी
वाचनकट्टा प्रकाशन, कोल्हापूर ही संस्था दर्जेदार पुस्तकांचे निर्माण करीत आहे. ‘वक्तृत्व’ हे पुस्तक अनेक अंगांनी परिणामकारक करण्याचा प्रयत्न प्रकाशकाने केल्याचे जाणवते. मुखपृष्ठावर ध्वनिक्षेपक किंवा माईकचे चित्र न दाखवता खुद्द डॉ. बी. एम. हिर्डेकर यांचे आधुनिक पोशाखातील नितळ हास्यमुद्रेचे छायाचित्र छापले आहे. मलपृष्ठावर इंद्रजित देशमुख, गिरीश कुलकर्णी आणि रवींद्र ओबेरॉय या तीन मान्यवरांनी या पुस्तकाविषयी मांडलेल्या तीन तीन ओळी छापलेल्या आहेत. प्रत्येक प्रकरणात येणारे कळीचे मुद्दे अधूनमधून रिव्हर्समध्ये छापले आहेत. काही प्रकरणातील मजकूर तक्त्यात छापला आहे. त्यामुळे परिणाम करणाऱ्या मजकुरांकडे वाचकांचे लक्ष जाते.
निष्कर्ष
‘वक्तृत्व’ हे केवळ एक पुस्तक नसून, प्रभावी व्यक्तिमत्त्व निर्माण करणारे आणि बोलणे समृद्ध करणारे साधन आहे. डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी सैद्धांतिक चर्चा, वैयक्तिक अनुभव, आणि तांत्रिक बाबींचा सुरेख मिलाफ साधला आहे. हे पुस्तक शब्दांच्या पलीकडील परिणामांचा अभ्यास घडवते आणि वाचकाला बोलकं बनवते. आपले बोलणे समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक आत्मसात केले पाहिजे.
पुस्तकाचे नाव – ‘ वक्तृत्व ‘
लेखक : डॉ. बी. एम. हिर्डेकर
प्रकाशक – वाचनकट्टा, कोल्हापूर, २०२५
पृष्ठे : १७२, किंमत : ₹ २९०/-
पुस्तकासाठी संपर्क – 8975292626
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
