मानव धर्माच्या रक्षणासाठी हे युद्ध आहे. सध्या हे युद्ध अनेक पातळ्यावर सुरू आहे. दुरदृष्टीचा विचार करून मानवाच्या रक्षणासाठी हे युद्ध लढायचे आहे. मग हे युद्ध प्रदुषणाविरुद्ध असेल, जागतिक तापमानवाढी विरुद्धही असेल, रोगराईच्या संकटाविरुद्धही असेल, एकंदरीत मानवाला संकटात टाकणाऱ्या प्रत्येक गोष्टी विरुद्ध हे युद्ध असेल.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
म्हणोनि ये गोठी । विचारू न करीं किरीटी ।
आतां धनुष्य घेऊनि उठी । झुंजे वेगी ।। २२१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा
ओवीचा अर्थ – एवढ्याकरितां अर्जुना, या गोष्टींचा विचार करीत बसू नकोस, आता हे धनुष्य घेऊन ऊठ आणि लवकर युद्धाला आरंभ कर.
धर्माच्या रक्षणासाठी युद्ध कर असे भगवंत वारंवार अर्जुनाला सांगत आहेत. त्याची समजूत काढत आहेत. पण येथे धर्म म्हणजे काय हे प्रथम समजून घ्यायला हवे. सरकारी कागदपत्रावर आपल्या धर्माची, जातीची नोंद केली जाते. कोण हिंदू, तर कोण मुस्लिम, कोण ख्रिश्चन तर कोण अन्य धर्माचा. ही नोंद म्हणजे आपला धर्म आहे का ? पूर्वीच्या काळी कर्मानुसार आपली नोंद एखाद्या जातीत झालेली आहे. ही जात म्हणजे आपला धर्म आहे का ? अध्यात्मदृष्ट्या ह्या सरकारी नोंदी म्हणजे आपला धर्म नाही. हे लक्षात घ्यायला हवे. पृथ्वीतलावर असे अनेक धर्म अस्तित्त्वात आहेत. पण येथे हा धर्म अपेक्षित नाही. तसा अर्थही येथे नाही. प्रत्येक धर्माची वेगवेगळी परंपरा असते. नमस्कार करण्याची पद्धतीही वेगळी असते. धार्मिक स्थळांचीही रचना वेगळी आहे. काहींना मुर्तीपुजा पसंत आहे तर काहींचा मुर्तीपुजेला विरोध आहे. हा धर्माचा अर्थ येथे अपेक्षित नाही. धर्माच्या प्रसारासाठी अन् प्रचारासाठी मग जबरदस्तीही केली जाते. काहींचे धर्मांतरही करण्यात येते. जबरदस्तीने धर्मांतर करून कधी धर्म वाढत नसतो. अन् अशाने दुसरा धर्मही नष्ट होत नसतो. असे हे धर्माचे विविध अर्थ अन् पैलु येथे अपेक्षित नाहीत.
मग धर्म म्हणजे काय ? अध्यात्मातील धर्माचा अर्थ हा पृथ्वीतलावरील सर्व मानवांना लागू आहे. तो सर्वांसाठी सारखाच आहे. असा हा मानवधर्म आहे. माणुसकिचा हा धर्म मानव जातीच्या अन् वंशाच्या अस्तित्वासाठी आहे. कारण माणुसकी राहीली नाही तर ती संकटात येईल अन् मनुष्यही संकटात येतो. अर्थात मानवधर्मावर संकट ओढवते. या संकटाविरूद्ध मानव धर्माच्या रक्षणासाठी हे युद्ध आहे. सध्या हे युद्ध अनेक पातळ्यावर सुरू आहे. दुरदृष्टीचा विचार करून मानवाच्या रक्षणासाठी हे युद्ध लढायचे आहे. मग हे युद्ध प्रदुषणाविरुद्ध असेल, जागतिक तापमानवाढी विरुद्धही असेल, रोगराईच्या संकटाविरुद्धही असेल, एकंदरीत मानवाला संकटात टाकणाऱ्या प्रत्येक गोष्टी विरुद्ध हे युद्ध असेल. यासाठी या युद्धाला आपणाला तयार व्हायचे आहे. मानवधर्माच्या रक्षणासाठी हे युद्ध लढायचे आहे.
मानवाच्या रक्षणासाठी मानवधर्म याचा अभ्यास करायला हवा. तो करताना स्वतःपासून सुरवात करायला हवी. स्वतः कोण आहोत याचा शोध घ्यायला हवा. ते जाणून घ्यायला हवे. त्याची अनुभुती जेंव्हा होईल तेंव्हाच मानवधर्माची खरी ओळख होईल. यासाठी स्वतःमध्ये बदल घडवायला हवेत. स्वतःतील मीपणा, अहंकार नष्ट करायला हवा. अन् मी ची ओळख करून घेऊन आत्मज्ञानी व्हायला हवे. या आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा विस्तार सर्वत्र करायला हवा. याची ओळख समस्त मानवाला करून द्यायला हवी. यातच मानवधर्माचा विकास आहे. मानवाला मानवाची ओळख झाली तरच खऱ्या अर्थाने मानवधर्माचे रक्षण होईल. यासाठीच हे युद्ध लढायचे आहे. हे युद्ध स्वतःपासून सुरू होते हे मात्र लक्षात घ्यायला हवे. स्वतः आत्मज्ञानी होऊन इतरांना त्याची अनुभुती देऊन आत्मज्ञान करणे हेच त्याचे ध्येय आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.