June 19, 2024
The need for an anti-superstition movement
Home » अंधश्रद्धा विरोधी चळवळीची गरज
मुक्त संवाद

अंधश्रद्धा विरोधी चळवळीची गरज

भूत भविष्य कळों यावें वर्तमान । हें तों भाग्यहीन त्याची जोडी || १ ||
आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्तें । होणार ते होते प्रारब्धंची ॥२॥
जगरूढीसाठी घातले दुकान । जातो नारायण अंतरूनि ॥३॥
तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ती पीडा रिद्धि सिद्धी ॥४॥ (६३८)

तुकारामांनी भविष्यकथनाची गरज नसल्याचे प्रतिपादन केले आहे. भूतकाळाचे ज्ञान, वर्तमानकाळ जाणणे आणि भविष्यकाळाबद्दल उत्सुकता याबद्दलची ओढ ही निर्दैवी माणसाची जोड आहे असे ते म्हणतात. त्या गोष्टी अप्रत्यक्षपणे जाणून घेणे हा भाग्यहिनांच्या दृष्टीने लाभ होय. विष्णुदासांनी मनामध्ये देवाचेच ध्यान करायचे असते. भूत-भविष्य सांगणाऱ्या लोकांनी जगरूढीसाठी दुकान घातलेले आहे. बाजार मांडलेला आहे. त्यांच्या आहारी जाणे म्हणजे ईश्वरापासून दूर जाणे होय. तेव्हा भविष्य जाणून घेण्याचा अट्टाहास कशासाठी? जे काही व्हायचे ते प्रारब्धानुरूप होईल. बरे भविष्य जाणून घेतले तर सत्य ठरेल हे तरी कशावरून? तुकारामांना जी मंडळी भविष्य कथन करतात ती तरी कुठे ज्ञानी, अभ्यासू असतात? अशाही मतीतार्थाने या अभंगात विचार मांडला.

भविष्य सांगणाऱ्यांनी व्यवसाय सुरू केला. ज्योतिषी, भविष्यवाले, शुभाशुभाचा बोलबाला करणारे यांच्याकडे ज्ञानाची उणीव तर असतेच. पण समस्यांनी वेढलेल्या हवालदिल होऊन त्यांच्याकडे आलेल्यांचे ते भावनिक व आर्थिक शोषण करतात. स्वतःला कालत्रयाचे ज्ञाते समजतात. मात्र तसे नसतात. काही जण शकुनाचे ज्ञान बाळगतात. काहींचे भविष्यकथन करून ग्रहांची शांती, अंगठी आणि अन्य उपायही सुचवितात. परिणामी त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास तोकडा नि ज्ञानही अपुरे. परिणामी अंदाज, सावधगिरीने केलेले कथन, पूर्व माहिती घेणे व त्यावरून भूतकाळाबद्दल बोलून विश्वासार्हता मिळविणे आणि पैसे घेऊन भविष्याची व्यवहार्य अभ्यास व निरीक्षणातून माहिती देणे घडते. तुकारामांना त्यांचा कंटाळा तर आहेच. भविष्य कथन करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये. त्यांना डोळ्यांनी पाहण्याची देखील तुकारामांना इच्छा नाही.

भविष्य हा पोटार्थी धंदा आणि भविष्य सांगून सामान्य माणसांना दैववादी बनविण्याचा हा खोटारडा व्यवसाय तुकारामांना अमान्य आहे. त्यांनी या अभंगातून अगदी मोजक्या शब्दात आपला तिटकारा प्रभावी पद्धतीने व्यक्त करतात. लोकांनी भविष्य सांगणाऱ्यांकडे फिरकू नये. कारण ही मंडळी लोकांना फसवून पैसे उकळतात. तुकारामांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे हे अप्रत्यक्षपणे सुचविले. प्रपंच हा गुंतागुंतीचा व मोठा आहे. प्रपंचात समस्या येणारच. उद्या काय होईल याची चिंता वाटते. पण त्यासाठी भविष्य सांगणाऱ्याकडे जाण्याची गरज नाही.

रिद्धी-सिद्धीची पीडा नको याचा अर्थ समजून घ्यावा लागेल. कारण तुकारामांनी त्या नाकारल्या आहेत. रिद्धी-सिद्धी या विठ्ठलाच्या दासी आहेत. त्यांना काही कमी नाही. त्या बोलावले नसतानाही भक्तांना शोधत येतात. त्यांच्या घरी सेवा करतात, त्यांच्या दारात हात जोडून उभ्या राहतात. हाकलून दिले तरी जात नाहीत. त्या खरोखरच पीडादायक आहेत.

तुकारामांना रिद्धी-सिद्धीचे पंढरीमध्ये लोटांगण घालणे पसंत नाही. शिवाय मी रिद्धी-सिद्धीचा दास नाही, हे देवा तू काही जणांना रिद्धी-सिद्धी देऊन मुख्य ध्येयापासून चालवलेस. पण मी मात्र तशा प्रकारचा भिकारी नाही. कल्पतरू इच्छिलेले फळ देतो. पण अशा प्रकारच्या सिद्धीची इच्छा अभागी आणि दुर्बल लोकच करतात. तुकारामांना वाटते की विठ्ठल श्रेष्ठ त्याची भक्ती केल्याने सर्व समाधान प्राप्त होते. मग सिद्धीच्या मोहाला बळी पडण्याची काय गरज? खरा भक्त सिद्धीच्या मागे धावत नाही, असेही एका अभंगात सांगितले आहे. खरे तर पुरोगामी विचार आला, विचारवंत आणि सुधारक झाले व आहेत. सुधारणा होत आहेत. परिवर्तनाच्या चळवळीही चालू आहेत. मात्र त्या आज फार प्रभावी व सामान्यांच्या हृदयाची स्पंदने ठरत नाहीत असे चित्र आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळही कार्यरत आहेत. अंधश्रद्धा विरोधी चळवळीची गरज शिक्षणाच्या प्रसाराबरोबर वाढत आहे हे दुर्दैव होय. शासनाकडे अंधश्रद्धा विरोधी कायदा करण्याची मागणी ही समिती गेली काही वर्षे करीत आहे. पण धार्मिक भावना दुखवणार कोण? अशा तऱ्हेने याकडे पाहिले जाते. त्यामुळे अंधश्रद्धेचा भाग म्हणून भविष्य सांगणाऱ्यांना आणि समस्या निवारणासाठी मंत्र, यज्ञ, पूजा- शांती वगैरे उपाय सांगून लुटणे चालू आहे.

आजची दुर्दैवावस्था म्हणजे महाविद्यालयीन अभ्यासक्रमात ज्योतिष्य विज्ञानाचा समावेश करण्याचा डावपेच आखला गेला. ज्योतिर्विज्ञान असे ग्लोरिफाय करून त्या दृष्टीने प्रयत्न झाले. मात्र त्या निमित्ताने उलटसुलट चर्चा व विचारांचे मंथन झाले. केंद्र सरकारला हा निर्णय घ्यायचा होता त्यावेळी सत्ताधारी अशा शैक्षणिक धोरणास अनुकूल. ही स्थिती म्हणजे दैववाद, भविष्य कथनास महत्त्व आणि शास्त्र म्हणून ज्योतिष्य व्यवसायास प्रतिष्ठा देणे होय. अर्थात ऑप्शनल सब्जेक्ट हा विषय ऐच्छिक या सदरात टाकण्यात यावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा होणे हे दुर्दैव होय.

शैक्षणिक धोरण म्हणून ज्योतिष विषय अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याचा हा विचारच महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी व परिवर्तनवादी वैचारिक चळवळीस घातक ठरणारा आहे हे नक्कीच. म्हणून आजही तुकाराम अभ्यासणे, त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत प्रबोधनाची चळवळ म्हणून पोहोचविणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कार्यामध्ये तुकारामांच्या समाजातील ज्या गैरसमजुती आणि दुराचार होते व अजूनही आहेत त्यांच्यावर टीकाटिप्पणी करून समाजाला निखळ आणि शुद्धाचरणाची शिकवण दिली. स्वार्थी गुरूबाजी, भोंदू भविष्यकथनकार आणि ढोंगी, मांत्रिक मंडळींचे अधर्माचारण उजेडात आणणारे तुकाराम या चळवळीचे ‘आद्य प्रणेते आणि सदाचार व नीतीचा वागणूक करणे धर्माचरण याची शिकवण देणारे’ तेच वर्तन हे ज्योतिषी, गुरूबाजी करण्याकडे जाण्याची गरज नाहीशी करेल. म्हणून तुकारामांनी अधर्माचरण खंडन व पुरोगामी वर्तनाची शिकवण या अर्थाने समाजसुधारणा करणारे संतश्रेष्ठ तुकाराम पुरोगामी परिवर्तन चळवळीचे प्रेरणा स्थान आहेत.

डॉ. लीला पाटील, कोल्हापूर

Related posts

‘एका महामारीचा उत्तुंग दस्ताऐवज ठरणारी कादंबरी ‘लॉकडाऊन’

सतविचार अन् आचरण हाच विकारांवर उपाय

अनाथांची माय…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406