मैत्रिणींनो, या खोट्या सौंदर्याच्या कल्पनेतून आपण बाहेर पडायला हवं. ‘उठ वेड्या, तोड बेड्या’ म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य दिलं तरीही फुलांच्या माळा समजून या गुलामीच्या साखळदंडांना अंगावर सजवू लागलो तर आपल्याइतक्या मूर्ख कोणीही नसतील. आपण याच्यातून मुक्त होऊ या!
यशवंती शिंदे, कोल्हापूर
मो. ८८३०१७९१५७
काही दिवसांपूर्वी एका लग्नाला जाण्याचा प्रसंग आला. लग्नामध्ये निवेदक होता. मांडवात बऱ्याच पुरुषांच्या डोक्यावर फेटा दिसत होता. याबरोबरच जुन्या पिढीतील काही स्त्रियाही होत्या, ज्या नऊवारी साडी, कपाळावर कुंकू, डोक्यावर पदर अशा नेहमीच्याच पेहरावात होत्या. निवेदक स्त्रियांकडे पाहून म्हणाला, “पुरुषांना फेटा बांधलेले पाहून आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीची आठवण जागी झाली. कपाळावर लालभडक कुंकू लावलेल्या आणि डोक्यावर पदर घेतलेल्या स्त्रिया असायच्या. आताच्या मुलींना डोक्यावर पदर घ्यायला लाज वाटते. आपल्या संस्कृतीचा आदर म्हणून तरी बायांनो, डोक्यावर पदर घ्या.”
एकाही बाईने पदर डोक्यावर घेतला नाही ! त्याचं ऐकलं नाही म्हणून तो परत एकदा म्हणाला, “सगळ्या बाया माझं ऐकत आहेत, पण एकीलाही संस्कृतीची कदर नाही.”
हे सगळं ऐकत असताना मनात विचार तरळून गेला, बाईने पदर घेतला नाही म्हणजे बाईला संस्कृतीची कदर नाही ! हे कसे ठरले ? पुरुषांनी फेटा बांधला म्हणून बाईने पदर घ्यावा, असा हट्टाग्रह कसला ? भारतीय संस्कृती म्हटलं की, डोक्यावर पदर घेतलेली स्त्री का डोळ्यांसमोर येते ? हे चित्र कुणी निर्माण केले ?
कुणीतरी असे ऐकले किंवा पाहिले आहे का, एखादी स्त्री स्टेजवरून आपल्या संस्कृतीची आठवण करून देत समोर बसलेल्या समस्त पुरुषांवर आपली हुकूमत गाजवत पुरुषांना संस्कृतीची चाडच नाही असे उद्गारते ! मग का स्त्रियांच्या मागे हात धुवून लागता? का दहशत माजवता तुम्ही संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांवर? स्त्रीने साडी नेसली, पदर घेतला की सुसंस्कृत, टिकली लावली, मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या घातल्या की सुसंस्कृत नाहीतर ती असंस्कृत ? हे तुम्ही का ठरवता ?
कुठल्या तरी स्त्रीने पुरुषांविषयी असा धाक दाखविला आहे का ? मग स्त्रीला धाकात ठेवावे असे का वाटते ? काळ बदलला, साधने बदलली, तरीही पुरुषांना स्त्री आपल्या धाकातून बाहेर पडेल याची भीती का वाटते ? सदैव कोणता ना कोणता धाक दाखवून तिला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न का करता? की तुम्हाला तिच्या क्षमतांची भीती वाटते ? ती तुमच्या नियंत्रणातून बाहेर पडेल आणि आपल्यापेक्षा मोठी होऊन आपल्यावर सत्ता गाजवेल अशी धास्ती वाटते ? तसं जर नसेल तर मिळेल त्या माध्यमातून तुम्ही स्त्रियांना अशा आज्ञा का सोडत असता? सौभाग्य, संस्कृती, संस्कार, परंपरा, चालीरीती, रूढी यांचं नाव घेतलं की, ती दबते, घाबरते, म्हणून ?
सगळा कंट्रोल तर तुमच्याकडे असतो. सगळं ठरवता तुम्ही. ती दावणीला बांधलेल्या गायीसारखं तुमचं सगळं ऐकते, निमूटपणे आज्ञापालन करते. तरीही जाहीरपणे तिच्यावर अधिकार गाजविण्यात कसला मोठेपणा आहे ?
अशा प्रसंगांवर हसावं की दुःख व्यक्त करावं हेच कळत नाही. कधी सौभाग्याच्या नावाखाली, कधी घरंदाजपणाच्या नावाखाली, कधी परंपरेच्या नावाखाली सतत बंधने लादायची. टिकली लावावी की कुंकू ? ती कपाळाच्या मधोमध असावी की दोन भुवयांच्यामध्ये ? तिचा आकार कसा असावा ? रंग कसा असावा ? याला काही तर्कशास्त्र नाही ! तरीही स्त्रीच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचे आणि सुसंस्कृतपणाशी जोडले जाते.
तुम्ही कितीही शिक्षित असा, कुठल्याही पदावर असा, तुम्हाला कितीही पगार असू द्या, तुमच्या हाताखाली कितीही लोक काम करणारे असू द्या; तुम्ही गृहिणी असा, मजूर असा; तुम्ही एक स्त्री म्हणून ठरावीक चाकोरी पाळलीच पाहिजे. सणावारांना साडी नेसावी, कुंकू/टिकली लावावी, जोडवी घालावी, मंगळसूत्र घालावं, बांगड्या घालाव्या… हे खरं आहे, पण ही सक्ती स्त्रीलाच का?
काचेच्या बांगड्या घालताना खेड्यापाड्यातल्या बायांच्या हातांना जखमा होऊन हात रक्तबंबाळ होतात, तरीही बांगड्यांची सक्ती कमी होत नाही. या सक्तीने कधी सवयीचे रूप धारण केले, हे बाईला कळलेही नाही, इतकं तिच्या हे मनावर खोलवर रुजलेलं आहे.
दागिना म्हणून, हौस म्हणून, आवड म्हणून स्त्रीने कोणते आभूषण परिधान करावे हे ठरविण्याचा तिला हक्क आहे. मंगळसूत्राचा सौभाग्याशी, पतीच्या अस्तित्वाशी काहीही संबंध नाही. बाईच्या नवऱ्याला माहीत असते, ती त्याची बायको आहे आणि तो तिचा नवरा आहे; मग मंगळसूत्रासारख्या गोष्टींनी हे दाखवत फिरण्याची काय गरज आहे? मंगळसूत्र हादेखील इतर दागिन्यांसारखाच एक दागिना आहे, तो घालायचा की नाही, कधी घालायचा हे स्त्रीला ठरवू द्या ना! आणि स्त्रीला जर अशी सक्ती करत असाल तर तुम्ही विवाहित असल्याचं प्रतीक म्हणून काय परिधान करता?
खरे तर मला हा या पुरुषप्रधान व्यवस्थेचा डाव वाटतो, स्त्री विवाहित की अविवाहित ओळखण्याचा. थेट कसं विचारायचं ? म्हणून तिच्या पायात जोडवी, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू/टिकली यापैकी काही दिसलं की ती विवाहित. नाही दिसली की ती एकतर विधवा किंवा अविवाहित किंवा इतर जातिधर्माची. त्या दृष्टीने मग स्त्रीकडे बघण्याचा, तिच्याशी वागण्याचा दृष्टिकोन ठरवायचा.
पिढ्यान्पिढ्या असल्या खुळचट आणि स्त्रीला कसलीही उपयोगिता नसलेल्या गोष्टी, प्रथा, परंपरा, सुसंस्कृतपणा, घरंदाजपणा यांच्या नावावर स्त्रीवर लादल्या. मंगळसूत्र घालून गळ्याला चामखिळी उठलेल्या, घट्ट जोडवी घालून पायांच्या बोटांना घट्टे पडलेल्या, हवा खेळती न राहिल्यामुळे बोटांची त्वचा जखमी झालेल्या कित्येक स्त्रिया खेड्यापाड्यांमध्ये घराघरांत आपल्याला पाहायला मिळतील, ज्या ‘सौभाग्याच्या दहशती’ने पीडित आहेत. घट्ट जोडवी घालून बोट तुटेल इतका बोटाचा भाग बारीक बनतो, पण बाया जोडवी काढायला तयार होत नाहीत.
सुंदर दिसण्याच्या नावाखाली कानाला, नाकाला भोकं पाडताना पाहिले की गायी-म्हशी आणि बैलांच्या नाका-कानांत वेसण घालण्यासाठी भोकं पाडतानाचा प्रसंग आठवतो. त्यांना काबूत ठेवण्यासाठी अशी वेसण त्यांच्या नाकात छिद्रे पाडून घातली जाते. तसाच प्रकार बाईच्या नाकाला भोक पाडून केला गेला असेल का? पण आता सौंदर्याच्या नावाखाली आम्हाला तो इतका सवयीचा झाला आहे की, याचे दुःखच होत नाही. सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या दागिन्यांची ओझी वाहणाऱ्या, त्यापासून होणाऱ्या जखमा आयुष्यभर सांभाळत राहणाऱ्या कित्येक स्त्रिया डोळ्यांसमोर पाहते तेव्हा अंगावर काटा येतो की, बायका हे कसं सहन करत असतील ?
मैत्रिणींनो, या खोट्या सौंदर्याच्या कल्पनेतून आपण बाहेर पडायला हवं. ‘उठ वेड्या, तोड बेड्या’ म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य दिलं तरीही फुलांच्या माळा समजून या गुलामीच्या साखळदंडांना अंगावर सजवू लागलो तर आपल्याइतक्या मूर्ख कोणीही नसतील. आपण याच्यातून मुक्त होऊ या! आपण पुस्तके वाचू या, वैचारिक भाषणे ऐकू या, वैज्ञानिक कार्यक्रम पाहू या आणि आपले ज्ञान वर्धित करू या. विवेकाची आभूषणे परिधान करून विवेकवंत होऊ या, जी आपल्या स्वतःच्या उन्नतीबरोबरच कुटुंबाच्या आणि पर्यायाने समाजाच्या विकासासाठीही उपयोगी ठरतील. आपल्या मुलीसुनांना अशा सक्तींमधून बाहेर पडायला बळ देऊ या, त्यासाठी वाटा तयार करू या आणि आपल्याच पुढच्या भविष्याला उज्ज्वल बनवू या.
यशवंती शिंदे, कोल्हापूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.