June 19, 2024
Need of Meditation for self awareness
Home » साधनेची लढाई नेमकी कशासाठी ?
विश्वाचे आर्त

साधनेची लढाई नेमकी कशासाठी ?

आणि शरीरजात आघवें । हे नाशवंत स्वभावें ।
म्हणोनि तुवां झुंजावें । पंडुकुमरा ।। १३६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा

ओवीचा अर्थ – आणि शरीर म्हणून जेवढे आहे. तेवढे सगळे स्वभावतः नाशवंत आहे, म्हणून अर्जुना तूं लढावेंस, हे योग्य आहे.

आपली सध्याची सर्व लढाई ही स्वतःच्या शरीरासाठीच सुरू आहे. कितीही पैसा कमविला तरी तो शरीरासाठीच वापरला जातो. पोटापूरते खाऊन आपली गरज भागत नाही. समाधानही वाटत नाही. हाव आपणाला स्वस्थ बसू देत नाही. शरीरामुळे, देहामुळे आपणास ओळख आहे. असाच आपला समज होतो. देहाला मिळालेले नाव हीच आपली ओळख होऊन बसते. स्वतःची खरी ओळख आपण विसरतो. अन् मनामध्ये शरीराविषयी विशेष आकर्षण निर्माण होते. सर्व घडामोडी शरीराभोवतीच सुरू राहातात. पण हे शरीर नाशवंत आहे. ही जाणिवच आपल्या मनामध्ये राहात नाही. उतारवयात शरीर थकल्यानंतर मग विचार चक्र सुरू होते. आपण कोण आहोत याची ओळख करून घेण्याची इच्छा होते. साधनेची लढाई ही स्वतःला ओळखण्यासाठी आहे. स्वतःला जाणून घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. असे केल्यास या जगात सुख-शांती नांदेल.

साधनेतून स्वतःची ओळख करून घ्यायची असते अन् स्वतः आत्मज्ञानी व्हायचे असते. जीवन जगताना ही जाणिव सदैव राहावी यासाठी साधना आहे. अनुभुती घेऊन जीवन सुखकर करण्यासाठी साधना आहे. साधना ही यासाठी करायची आहे. साधना करताना ही अनुभुती येत असते पण मन त्यात गुंतत नाही. मन त्यामध्ये रमत नाही. मनाची स्थिरता साधण्यासाठी एकांतस्थळी साधना करावी. मंदिर किंवा एखाद्या मठामध्ये जाऊन साधना करावी. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो याच जागा साधनेसाठी का ? मन साधनेत रमण्यासाठी या जागा उत्तम आहेत. विशिष्ट अवस्था प्राप्त होण्यासाठी या जागांना महत्त्व आहे. सत्संग हा यासाठीच आहे.

घरात साधना करताना अनेक अडथळे येतात. आपणास काहीही काम नसले, कोणतीही घाई नसली तरीही मनाची स्थिरता साधत नाही. मन सतत इतरत्र भटकत राहाते. त्यातच घरातील अनेक गोष्टींनी आपले मन सतत विचलित होते. असे का होते ? साधनेसाठी वेळ असूनही असे होते. कारण घरातील छोट्या छोट्या गोष्टी, वस्तूही आपले मन विचलित करत असतात. साधनेपूर्वी सकाळी वाचनात आलेल्या वृत्तपत्रातील बातमीने किंवा टिव्ही सुरु असलेल्या एखाद्या घटनेचा परिणाम आपल्यावर होतो अन् साधनेत मन त्याच गोष्टीत गुतूंन राहाते. इतकेच काय घरात पडलेला पसाराही आपले मन विचलित करतो. एखादी जुनी वस्तू साधनेपूर्वी पाहीली असली तर तीच वस्तू साधनेत समोर येते अन् मग मन त्यातच गुंतते. घरातील भांड्याच्या आवाजाने किंवा जेवणाच्या वासानेही मन विचलित होते. कोणती वस्तू आपले मन विचलित करेल हे सांगता येत नाही. वेळ पाहण्यासाठी मोबाईल जवळ ठेवला असला तर आपले लक्ष वारंवार त्याकडे जाते. साधनेत लक्ष न राहाता मोबाईलमध्येच आपले मन गुंतते.

धकाधकीच्या या जीवनात घरात साधना करणे हे एक मोठे आव्हानच आहे. कारण मनाला नियंत्रित ठेवण्यासाठी आपणाला मोठी कसरत करावी लागते. यासाठीच घरात पसारा असणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आपले मन भरकटेल अशी कोणतीही वस्तू जवळ असू नये याची काळजी घ्यावी लागते. एकंदरीत विचार केला तर एकादृष्टीने साधना आपणास एक चांगले वळण लावते. विशेष म्हणजे आपल्या कामात त्यामुळे एक वेगळेपणा येतो. जागरूकता येते. मन विचलित झाले तरी त्या चिंतनाने यातून एखादी चांगली कल्पनाही सुचते. भेडसावणारे प्रश्न सुटतात. सकारात्मक विचार करण्याची वृत्ती वाढते. सत्संगाचीही सवय लागते.

हळूहळू मनाची एकाग्रता वाढते. मनाला साधनेची गोडी लागते. साधनेची ही लढाई जिंकण्यासाठी मात्र आपणास आपली खरी ओळख करून घ्यावी लागते. शरीर अन् आत्मा वेगळा आहे, याची अनुभुती येण्यासाठी अन् ही अनुभुती नित्य राहाण्यासाठी साधनेत एकाग्रता महत्त्वाची आहे. ही ओळख नित्य राहाणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे.

राजेंद्र जलादेवी कृष्णराव घोरपडे

Related posts

ब्रह्मांडाच्या ज्ञानासाठी आत्मज्ञानाचा विकास होणे गरजेचे

भोवतालच्या अस्वस्थेतून ‘पाडा’ ची निर्मिती

संस्कृती संवर्धनासाठी हवा माणूसकीचा वृक्ष

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406