December 5, 2022
Durganchya Deshatun Dipawali ank by sandeep tapkir
Home » ‘दुर्गांच्या देशातून…’ भटकंती करणाऱ्यांचे अनुभवकथन
पर्यटन

‘दुर्गांच्या देशातून…’ भटकंती करणाऱ्यांचे अनुभवकथन

दरवर्षी नवे लेखक नवी माहिती असे वैशिष्ट्य असणारा ‘दुर्गांच्या देशातून…’ चा दिवाळी अंक येतोय. या दिवाळी अंकात काय काय वाचायला मिळणार. यंदाच्या अंकाची वैशिष्ट्ये काय आहेत. या लेखकांचा परिचय तसेच दुर्गसंवर्धनावर नवी माहिती कोणती माहिती अंकात असणार याबद्दल जाणून घ्या या अंकाचे संपादक संदीप तापकीर यांच्या या लेखातून…

संदीप भानुदास तापकीर
9850179421 / 9921948541

‘81व्या वर्षी 81 किल्ले’ असा संकल्पच मुळात रोमांचकारी आहे, तरुणांना प्रेरणादायी आहे. ज्येष्ठ ट्रेकर रवींद्र अभ्यंकरांकडून जेव्हा या संकल्पाविषयी आणि ते करणाऱ्या अरविंद दीक्षितांविषयी समजले, तेव्हाच हा आपल्या अंकाचा पहिला, हटका लेख असणार, हे नकी झाले होते. 30 ऑक्टोंबरला दीक्षित आपला हा संकल्प पूर्ण करणार आहेत. हे करताना त्यांनी केवळ 8 महिन्यांत 80 किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. वेगळ्या पद्धतीने सहस्रचंद्रदर्शन साजरा करणाऱ्या दीक्षितांना विनम्र मानाचा मुजरा. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन केंद्र शासनामध्ये वरिष्ठ पदावर नोकरी केली, तरीही भटकंतीची नि लेखनाची आवड त्यांनी मनसोक्तपणे जोपासली आहे. त्यांनी एकांकिका, नाटके, कांदबरी लिहिली, गाजलेली पुस्तके अनुवादित केली, इंग्रजी भाषांतर केले, नाटकांचे परीक्षण लिहिले. राज्य शासनाच्या पुरस्कारासोबतच अनेक पुरस्कार मिळवलेल्या दीक्षितांच्या या लेखातून प्रत्येक वाचकाला आपणही असेच काहीतरी वेगळे, भव्यदिव्य करावे, असे वाटल्यावाचून राहणार नाही. त्यांचा हा ‘अष्टदशकातला भीमपराक्रम’ समजल्यानंतर, वाचल्यानंतर आपण थरारून जातो.

वयाच्या केवळ 32व्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे विश्वास पाटील हे मराठी साहित्यविश्वातील अग्रगण्य साहित्यिक आहेत. ‘झाडाझडती’, ‘पानिपत’, ‘संभाजी’, ‘महानायक’, ‘चंद्रमुखी’ अशा लोकप्रिय कादंबऱ्या लिहिणाऱ्या या लेखकाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांचा अनुवाद इतर भाषांमध्येही झाला आहे. नुकताच त्यांचा ‘महासम्राट’ या बृहद्कादंबरीचा पहिला खंडही प्रकाशित झालेला आहे. वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या विश्वास पाटील यांनी शिवरायांनी केलेल्या बसरूर मोहिमेचा अभ्यास करण्यासाठी स्वतः त्या स्थळाला भेट दिल्यानंतर आलेला अनुभव आपल्यासमोर अत्यंत नेमकेपणाने आपल्या खास शैलीतून मांडला आहे. त्यामुळे आपल्याला शिवचरित्रातील या अज्ञात पैलूकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते.

‘शिवछत्रपतींचे शिलेदार’ या पुस्तकाचे लेखक हातकणंगलेचे डॉ. सचिन पोवार हे व्यवसायाने होमिओपॅथिक डॉक्टर असले, तरी इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. त्यांनी आपल्या लेखातून बाजी पासलकर, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, फिरंगोजी नरसाळा, मुरारबाजी देशपांडे व सूर्यराव काकडे या शूर मावळ्यांनी किल्ल्यांवरून केलेला पराक्रम आपल्यासमोर उलगडला आहे. तो वाचून आपला ज्वलंत इतिहास विस्ताराने समजून घेण्याची इच्छा आपल्याला निश्चित होईल.

औसा येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालयात इतिहासाचे विभागप्रमुख असणाऱ्या डॉ. सुनील पुरी यांनी आपल्या लेखातून कंधार किल्ल्याचे स्थलदर्शन व शाहजहाँनच्या काळातील इतिहास आपल्यासमोर ठेवला आहे. पुरी सर 2011 ते 2015 या काळात शासनाच्या दार्शनिका विभागाचे संपादक होते. लातूर जिल्हा गॅझेटियरमध्ये त्यांनी लेखन केले आहे. लातूरमधील गढ्यांवर त्यांनी लघुशोध प्रबंध लिहिला आहे, तसेच लातूर पर्यटन पुस्तिकेचे ते एक संपादक आहेत. 12वीच्या उपयोजित इतिहास पुस्तकाचे लेखक असणाऱ्या पुरी सरांचे राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांमधून 33 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कंधारवरील लेखातून मोगलांचा किल्ल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजतो.

गोवा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य असणाऱ्या डॉ. विनय मडगांवकर यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संतसाहित्य, लोकसाहित्य, नाटक हे त्यांच्या अभ्यासाचे मुख्य विषय आहेत. गोमंतकीय मराठी साहित्यिकांचे व्हिडीओ डॉक्युमेंटेशन त्यांनी केले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत, नेट-सेटचे मार्गदर्शक, कवी भूषणाचे व छत्रपती संभाजी महाराजांच्या गोव्यातील शिलालेखांचे अभ्यासक असणाऱ्या मडगांवकर सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या कोलवाळ किल्ल्याचा इतिहास आपल्यासमोर ठेवला आहे.

विवेक वैद्य हे बहुभाषिक लेखक, कवी व नाटककार आहेत. पेशाने ते मॅनेजमेंट कन्सल्टंट असून, फॉस्ट अँड सलिव्हन या जगप्रसिद्ध कंपनीत असोशिएट पार्टनर आहेत. बीबीसी, ब्लूमबर्ग इ. चॅनेलवर, तसेच अनेक जागतिक परिषदामधून ते नियमित दिसत असतात. सिंगापूरला वास्तव्यास असणारे वैद्य उत्कृष्ट गिर्यारोहक आहेत. एव्हरेस्ट बेस कॅम्प, माऊंट फुजी, माऊंट ब्लॅकसह सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांची त्यांनी भटकंती केली आहे. इंजिनिअरिंग, एमबीएचे शिक्षण घेतलेल्या वैद्यांनी माऊंट किनाबालूची रोमहर्षक सफर आपल्याला घडवून आणली आहे.

गो. नी. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर यांच्या समवेत फिरलेले, 200पेक्षा अधिक किल्ले पाहिलेले डॉ दत्तात्रय ऊर्फ गोटू देशपांडे यांनी हिमालयातही भ्रमंती केलेली आहे. ‘छोटा दोस्त’ या साप्ताहिकातून त्यांचे 150 किल्ल्यांवरचे लेख प्रकाशित झाले आहेत. व्यंगचित्र काढणे, स्लाईड शो दाखवणे, चित्रकला, रांगोळी, सतारवादन, नाटकात अभिनय करणे अशा बहुविध गुणांनी संपन्न असलेले डॉ. देशपांडे हे फलटण शहर डॉक्टर्स असोशिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. फलटणमधील रक्तपेढीचे संस्थापक सदस्य असलेल्या डॉक्टरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. किल्ल्यांवर त्यांची पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी आपल्या लेखातून त्यांच्या अंगणात असलेले वारूगड व संतोषगड समोर ठेवले आहेत.

छत्रपती शिवरायांचे सेनापती हंबीरराव मोहिते व महाराणी ताराराणी यांचे वंशज असलेले विक्रमसिंह मोहिते हे आंतरराष्ट्रीय लॉजिस्ट्निस व्यवस्थापनाचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. 32 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सन्मान त्यांना मिळाले. एका जागतिक कंपनीचे कार्याध्यक्ष असणारे मोहिते बॅडमिंटन, हॉकी इत्यादी खेळही महाराष्ट्राकडून खेळले आहेत. मराठ्यांच्या इतिहासाचे अभ्यासक, वक्ते असणाऱ्या मोहितेंनी आपल्या
लेखातून वसंतगड उलगडला आहे.

पवईच्या आय.आय.टी.मधून बी.टेक. (मेकॅनिकल) झालेल्या वसंत लिमयेंनी स्कॉटलंडमधून टीचर्स डिप्लोमा इन आऊटडोअर एज्युकेशनचे शिक्षण घेतले. ते आय.एस.आय.एस.डी., ‘सुमेधस’चे प्रोडक्शनल मेंबर व फेलो ऑफ रॉयल जिओग्राफिकल सोसायटी लंडनचे सदस्य आहेत. अभिनय, छायाचित्रणाबरोबरच त्यांनी गिर्यारोहणातही मोठा ठसा उमटवला आहे. पहिल्या यशस्वी कोकणकडा मोहिमेच्या नेतृत्वाबरोबरच युरोपातील ट्रेकिंग व रॉक क्लाइंबिंगचा प्रचंड अनुभव असलेल्या लिमयेंनी ‘रानफूल’ या संस्थेची व ‘हायप्लेसेस’ या कंपनीची स्थापना केली. मॅक संस्थेचे संस्थापक असलेल्या लिमयेंनी कथा, कादंबरी, लेखसंग्रह, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रणपर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना मानसन्मान मिळाले आहेत. ज्येष्ठ गिर्यारोहक असलेल्या लिमयेंनी ‘अपघात’ या अतिशय महत्त्वाच्या विषयाचा ऊहापोह आपल्या लेखातून केला आहे. भटकंती करणाऱ्यांनी जर हा लेख वाचून योग्य ती काळजी घेतली, तर पुढे अनेक अपघात टाळता येतील.

पुणे विद्यापीठातून पदवी मिळवलेल्या अभिषेक जाधवांचा स्वतःचा व्यवसाय आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठान’चे सचिव असणारे जाधव गेली 22-23 वर्षे ‘जाणता राजा’ या महानाट्यात मुख्य शाहिराची भूमिका करतात. या महानाट्याच्या आयोजनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या जाधवांनी या महानाट्याच्या रायगड, पाचाड, आग्रा इत्यादी ठिकाणी झालेल्या प्रयोगाच्या आठवणी आपल्यासमोर मांडल्या आहेत. त्यामुळे पडद्यामागच्या अनेक गोष्टी आपल्याला समजतात.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कार्यकारी अधिकारीअसणाऱ्या प्रवीण हरपळेंनी सूक्ष्मजीवशास्त्रातून पदवी घेतली आहे. इतिहासाच्या आवडीतून त्यांनी 100पेक्षा जास्त किल्ले व 125पेक्षा अधिक गढ्या पाहिल्या आहेत. गढ्यांच्या वास्तुरचनेचे अभ्यासक असणारे हरपळे भोसरीतील ‘सागरमाथा गिर्यारोहण संस्थे’चे अध्यक्ष आहेत. या संस्थेमार्फत त्यांनी अनेक सुळके, कातळभिंती सर केल्या आहेत. लातूरमधील अनेक उपेक्षित गढ्यांची माहिती त्यांनी आपल्या लेखात लिहिली आहे. हा लेख वाचून या दुर्लक्षित गढ्यांकडे निश्चितच आपले लक्ष जाईल, ही आशा आहे.

अभिनव कला महाविद्यालयातून चित्रकलेची पदवी, कलाशिक्षक पदविका मिळवलेले हरेश पैठणकर आबासाहेब अत्रे दिन प्रशालेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निसर्गचित्रणात हातखंडा असणाऱ्या पैठणकरांनी त्यानुषंगाने अनेक चित्रे काढून प्रदर्शने भरवली आहेत. 120पेक्षा अधिक किल्ले पाहणाऱ्या पैठणकरांनी अनेक किल्ल्यांवर चित्रे काढून त्यांची बालगंधर्व, जहांगीर आर्ट गॅलरी येथे प्रदर्शने भरवली आहेत. त्याला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे आज ते किल्ल्यांचे चित्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी चित्रे काढतानाचा अनुभव आपल्या लेखातून व्यक्त केला आहे.

28 वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. लता मुळे-पाडेकर यांनी ज्ञानदेवांच्या हरिपाठावर पीएच.डी. केली आहे. पाच पुस्तकांच्या लेखनाबरोबर त्यांचे तीन संशोधन लेखही प्रकाशित झाले आहेत. इंग्रजी व मराठीत एम.ए., एम.एड. केलेल्या, संतसाहित्याच्या अभ्यासिका असणाऱ्या पाडेकर यांनी आकाशवाणी, बालचित्रवाणीसाठी श्रुतिका व संहिता लेखन केले आहे. वर्तनमानपत्रांतून लेखन, गौरवग्रंथ-स्मरणिकांचे संपादन, मानपत्र लेखन, सूर्यनमस्कार कार्यशाळा, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, व्नतृत्व-नाट्यवाचन-कथाकथन-कवी संमेलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कोरोनाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेले अभिनव शिक्षणाचे प्रयोग कौतुकाचा विषय ठरले. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या पाडेकर यांनी आपल्यासमोर ज्ञानेश्वरीतील ‘दुर्ग’दर्शन ठेवले आहे. हा लेख वाचून या विषयाकडे पाहण्याची नवी दृष्टी आपल्याला मिळते.

300पेक्षा अधिक किल्ल्यांना भेटी देणाऱ्या ओंकार ओक यांनी त्यानुषंगाने विविध वर्तमानपत्रांतून 500 लेख लिहिले आहेत. लोकप्रिय ब्लॉगर असणारे ओक फिल्ड एक्सपर्ट म्हणून सुपरिचित आहेत. लॉकडाऊन काळात त्यांनी गिर्यारोहण, जंगल भटकंती, फोटोग्राफी, शिल्पकला आदी विषयांतील अनेक दिग्गजांच्या ऑनलाईन मुलाखती घेतल्या. पुणे भटकंती कट्टाचे प्रमुख संचालक, मॅक मॅनेजिंग कमिटी मेंबर, रेसक्यु ऑपरेशन समन्वयक, वक्ते, दुर्गअभ्यासक असणाऱ्या ओक यांना मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रसिद्ध रॉक क्लाइंबर असलेल्या गणेश गीध यांचे कर्तृत्व त्यांनी आपल्यासमोर लेखातून मांडले आहे.

साई सुधीर कवडे हा केवळ आठवीत शिकणारा बालगिर्यारोहक आहे. त्याने 100पेक्षा अधिक किल्ले पाहिले आहेत. 10 व्या वर्षी आफ्रिका व युरोपमधील सर्वोच्च शिखरावरील चढाई, 13व्या वर्षी एव्हरेस्ट मॅरेथॉन पूर्ण केलेल्या साईची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड व हायरेंज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. भारतीय सैन्यात पॅराकमांडो होण्याचे ध्येय बाळणाऱ्या साईने स्वतःचे मोजके अनुभव लेखातून आपल्यासमोर ठेवले आहेत. त्यापासून अनेकांना, विशेषतः शालेय-महाविद्यालयीन युवकांना निश्चितच प्रेरणा मिळेल.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेले अशोक इंदलकर यांनी इतिहास विषयाची पदवी मिळवली आहे, तसेच एल.एल.बी., सायबर डिप्लोमाही केलेला आहे. 23 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक ठिकाणी सेवा करताना गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणले, तसेच अनेक खतरनाक गुन्हेगारांना कैद केल्याबद्दल त्यांना 90पेक्षा जास्त बक्षिसे मिळाली आहेत. त्यांचे वर्तमानपत्रांत अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी सीआयडी मॅन्युअलचे भाषांतर केले आहे. त्यांच्या नावावर पाच पुस्तके आहेत. विशेष म्हणजे ते पुस्तकांची रॉयल्टी आदिवासी आश्रमशाळा, अंधशाळेला देतात. हिरोजी इंदलकरांचे वंशज असणाऱ्या इंदलकर यांनी आपल्या लेखातून त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला आहे. त्यातून स्थापत्यकार हिरोजींचे अनेक पैलू उलगडतात.

महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी असणारे कृष्णा घाडगे समुद्रातील गस्ती पथकात कार्यरत आहेत. इतिहासाचे अभ्यासक असणारे घाडगे 15 वर्षांपासून अनेक सामाजिक संघटनांसोबत कार्य करतात. ग्रामीण भागातील लोकांना, विशेषतः शेतकऱ्यांना व आदिवासींना शासकीय योजना समजावून सांगण्यात पुढाकार घेणाऱ्या घाडगेंनी किल्ला पाहण्याचे शास्त्र अनेक उदाहरणांतून आपल्यासमोर उलगडले आहे. त्यांच्या लेखातील पुरंदरच्या लढाईचे सविस्तर वर्णन वाचून आपण भारावून जातो.

कृषी पदवीचे शिक्षण घेतलेल्या नीलेश जेजुरकर यांनी कबड्डीमध्ये राज्यपातळीवर यश मिळवले आहे. इतिहासाची आवड असणारे जेजुरकर शिवनेरी येथे गार्डन डेव्हलपमेंटचे काम करतात. सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या, मोहिमांच्या नियोजनातील ते एक प्रमुख व्यक्ती आहेत. 30 मार्च 2014 रोजी 306 किल्ल्यांवर मोहीम राबविण्यात त्यांचा पुढाकार होता. कोरोनाकाळात रक्तदान शिबिरांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. आपल्या लेखातून सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसंवर्धन कार्याचा त्यांनी आढावा घेतला आहे.

व्यावसायिक असणाऱ्या संजय करपे यांना सायकलिंगची व ट्रेकिंगची आवड आहे. 1983मध्ये माऊंट अबू, 1985मध्ये दिल्ली, 1986-87मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी (5000 किलोमीटर), अष्टविनायक, गोवा अशा अनेक सायकल सफरी त्यांनी केल्या आहेत. कोरोनाकाळात त्यांनी 60 दिवस अन्नदान व अन्नधान्य वाटपाचे विधायक काम केले आहे. बा रायगड परिवाराचे ते संस्थापक असून, संस्थेमार्फत ज्या 10-12 किल्ल्यांवर दुर्गसंवर्धनाचे काम चालते, त्याची सविस्तर माहिती त्यांनी लेखातून मांडली आहे. त्यामुळे बा रायगड परिवाराची आपल्याला ओळख होते.

अमोल ढोबळे हे आयटीआय केल्यानंतर नोकरीसाठी स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया कंपनीत रुजू झाले. त्यांनी 150पेक्षा अधिक किल्ले पाहिले आहेत. संस्थेतील सहकाऱ्यांना किल्ले दाखवता दाखवता त्यांनी ‘मरहट्टे सह्याद्रीचे दुर्गसंवर्धन संस्था’ स्थापन केली. कॉर्पोरेट कंपनीतील या संस्थेने हडसरवर प्रचंड काम केले. त्यामुळे हडसरचे रूपच पूर्णतः पालटले. संस्थेच्या या अनमोल कार्याचा आढावा ढोबळेंनी आपल्यासमोर ठेवला आहे.

वसईच्या कुणाल किणींना बुलेट राइड्स व ड्रायव्हिंगची प्रचंड आवड आहे. 2007मध्ये सार्क देशात (भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका) 31 दिवसांत 8000 किलोमीटर, 2008 मध्ये भारतात 72 दिवसांत 10,000 किलोमीटर फेरारी टूर्स त्यांनी केली आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या किणींनी 50पेक्षा अधिक किल्ले अभ्यासू पद्धतीने पाहिले व त्यावर श्रमदान केले आहे. त्यांनी आपल्या लेखातून डॉ. श्रीदत्त राऊत यांच्या मार्गदर्शनाने सुरू केलेल्या गडमाची ट्रेकर्स या संस्थेने केलेल्या दुर्गसंवर्धनाचा लेखाजोखा मांडला आहे.

कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनचे शिक्षण घेतलेल्या प्रशांत सातवी यांनी अनेक सामाजिक संस्थांमध्ये सहभाग घेतला आहे. दुर्गमित्र, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते असणारे सातवी पालघरच्या युवाशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, या संस्थेने सामाजिक जाणिवेतून राबवलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी आपल्या लेखातून आपल्यासमोर ठेवली आहे. मूर्तिकार असलेले दीपक पोळ ‘प्रवास कलेचा, ध्यास दुर्गसंवर्धनाचा – दुर्गपर्यावरण व संवर्धन जनजागृती अभियाना’चे सचिव आहेत. फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत असणारे पोळ हे पदवीधर असून, त्यांनी कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचा डिल्पोमाही केला आहे. दुर्गसंवर्धन करणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र, कलाकारांकडून कसे संवर्धन केले जाऊ शकते, यासाठी हा वेगळा प्रयोग आहे. अभियानातर्फे ते काय काय करणार आहेत, याची माहिती त्यांनी लेखातून दिली आहे.

विद्या केसकर यांनी संस्कृतमधून एम. ए. केले आहे. त्यात त्यांनी 1966मध्ये गोल्डमेडल मिळवले होते. विविध मान्यवरांच्या मुलाखती, भक्तीकोशात लेखनसाहाय्य, वर्तमानपत्रांतून लेखन, अनेक पुस्तकांचे संपादन व अनुवाद अशी मुशाफिरी करणाऱ्या केसकरांनी लेखक व इतिहास अभ्यासक संदीप भानुदास तापकीर यांच्या ‘महाराष्ट्राची दुर्गपंढरी ः नाशिक जिल्ह्यातील किल्ले’ या पुस्तकाचे परीक्षण लिहिले आहे. हे परीक्षण वाचून निश्चितच आपल्याला मूळ पुस्तक वाचावेसे वाटेल.

दुर्गांच्या देशातून… दिवाळी अंक २०२२
फक्त ट्रेकिंग या विषयाला वाहिलेला महाराष्ट्रातील पहिला दिवाळी अंक
संपादक : संदीप भानुदास तापकीर
संपर्क क्रमांक : ९८५०१७९४२१/९९२१९४८५४१
मूल्य : ३००/- रुपये फक्त

Related posts

कोकणी जैवविविधेतेचे दर्शन घडवणारे हटके पर्यटन…

Photos And Videos : गगनबावडा अन् बावडेकर वाडा…

Photos And Video : सामानगडावरील ऐतिहासिक सातकमान विहीर…

Leave a Comment