गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या आय.सी.आर.ई. डिप्लोमा कॉलेजमधील अत्यंत प्रामाणिक सेवक यशवंत शंकर मोरे नुकतेच आपल्यातून निघून गेले. मोरे कुटूंबीय अत्यंत प्रेमळ.डॉ. जे. पी. नाईक, चित्राताई नाईक यांना प्रेमाची चुलीवरची भाजी भाकर आग्रहाने देणारी ही माणसं. त्यांच्या आठवणी सांगणारा हा लेख…
संजय खोचारे
गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या आय.सी.आर.ई. डिप्लोमा कॉलेजमधील अत्यंत प्रामाणिक सेवक यशवंत शंकर मोरे नुकतेच आपल्यातून निघून गेले. निमित्त केवळ दोन दिवस आलेला ताप. हा ताप त्यांना जीवघेणा ठरला. यशवंत मोरे माझे सख्खे काका. माझ्या दोन नंबरच्या मावशीचे मिस्टर. स्वभाव अत्यंत शांत. सरकारी नोकरी असली तरी चेहऱ्यावर गर्व नाही. अत्यंत साधी रहाणी. ड्रेस म्हणाल तर बहुतेक वेळा खाकीच पँट. सतत हसमुख चेहरा.कितीही रागाने बोला, त्यांना राग येणारच नाही.
माझे जास्तीत जास्त बालपण यरनाळे गल्लीत मोरेंच्या घरीच गेले. गारगोटीत काका माझ्यासाठी मोठा आधार होते. माणूस किती साधा राहू शकतो याचे उदाहरण म्हणजे यशवंत मोरे. काका तुम्हाला पगार किती ? म्हणून विचारले तर ते केवळ हसायचे. कधीच सांगायचे नाहीत. त्यांच्या सवयी अत्यत चांगल्या. कधी आरबट चरबट खाणे नाही. कोणतेही व्यसन नाही. कुणाशी इर्षा नाही. त्यांचे घर बांधण्याचे जे स्वप्न होते त्या स्वप्नासमोर शेकडो वादळं आली. पहिला प्लॉट घेतला. पण त्यात त्यांची फसवणूक झाली. दुसरा प्लॉट घेतला. स्वतःच्या हक्काचे घर बांधून पूर्ण केले आणि कोर्ट कज्जा सुरु झाला, तरीही त्यांचा संयम कायम होता. पुन्हा तिसरा प्लॉट घेतला. स्वतःच्या स्वप्नातला आर.सी.सी.भव्य बंगला पूर्ण झाला. मात्र नियतीच्या मनात वेगळाच डाव होता. वास्तूशांती झाली आणि केवळ दहा महिन्यात ते आमच्यातून गेले.
काकांची रहाणी अत्यंत साधी होती. त्यांना नवा बिछाना करुया म्हणून, एक दिवस माझी मावस बहिण योगिता हिचा मला फोन आला. पिंपळगाव येथून बिछाना आणण्याचे ठरले. मी आणि योगिता दोघांनी पिंपळगाव येथे जाऊन बिछान्याचे डिझाईन ठरवले. बिछान्याचे सगळे पैसे योगिताने स्वतः दिले. बिछाना आणल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर खूप समाधान वाटले. मी विचारले काका, बेड कसा वाटला ? ते फक्त समाधानाने हसले. आमचे आण्णा खूप साधे रहातात. आम्ही आग्रह केला नाही तर ते आयुष्यभर जमिनीवर झोपतील पण स्वतः बिछाना घेणार नाहीत. हे ओळखून त्यांच्या मुलीने त्यांना बिछाना घेण्यास भाग पाडले.
असे अनेक काकांचे साधेपणाचे किस्से सांगता येतील. कधी कधी मी मावशीला आमच्या गावी घेऊन जायचा आग्रह करायचो. तर लगेच ते म्हणायचे, मग आमच्या जेवणाचे काय ? मी म्हणायचो, काका जावा की दोन दिवस खानावळीत. तर ते फक्त हसायचे आणि नकारार्थी मान हलवायचे. कानोली (ता.आजरा) ही काकांची सासुरवाडी म्हणजे आमचे आजोळ. आमच्या लहानपणी काका गावी गेले की सगळे सासुरवाडीचे लोक काकांच्या साध्या रहाणीचे कौतुक करायचे.
मोरे कुटूंबीय अत्यंत प्रेमळ. डॉ. जे. पी. नाईक, चित्राताई नाईक यांना प्रेमाची चुलीवरची भाजी भाकर आग्रहाने देणारी ही माणसं. मोरे गुरुजींना एकदा जे. पी. नाईक यांचे पाच हजाराचे बंडल मौनी विद्यापीठात सापडले होते. ते त्यांनी प्रामाणिकपणे परत केले. चित्राताई जेव्हा शेवटच्या गारगोटीला आल्या, तेव्हा म्हणाल्या मला पांडू मोरेंच्या हातचा चहा हवाय. मी तरी गारगोटीत गेल्यावर मोरेंच्या घरचा चहा, जेवण झाले नाही असे कधी घडलेच नाही. म्हादूमामा, नाना, पांडूमामा, मोरे गुरुजी, विठूतात्या, जानुतात्या, यशवंत काका, माझा वर्गमित्र दिनेश सगळीच माणसं फणसाच्या गरासारखी गोड. सुमारे २० वर्षापूर्वी कधीही गेलात तर एका पाहुण्याचे जेवण कायम तयार. या मोरेंच्या कडून शिकण्यासारखी बाब म्हणजे दुःखद प्रसंगी सगळी मदतीला धाऊन येणारी मायाळू माणसं. या मोरे कुटूंबीयांचा जिव्हाळा सांगावा तितका थोडाच आहे.
बारा मे रोजी सकाळी बरोबर साडे नऊ वाजता मला योगिताचा फोन आला आणि योगिताच्या रडण्याच्या आवाजाने माझ्या पायाखालची वाळू घसरली. काहीतरी वाईट घडल्याची जाणीव झाली. तसाच तडक उठलो. दुचाकी गारगोटीच्या दिशेने धावू लागली. दिनेश मोरे यांच्या दुकानाजवळ पोहचलो असेन आणि शववाहिका वैकुंठभूमीकडे निघाली. तसाच थेट स्मशानभुमीकडे वळलो. काकांना अखेरचा सलाम केला आणि जड पावलांनी पुन्हा यरनाळे गल्ली जवळ केली. असा देवमाणूस पुन्हा आयुष्यात येणे नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
भावपूर्ण श्रद्धांजली