डॉ. मारुतीराव गोविंदराव माळी (डॉ. मा. गो. माळी ) सरांनी आपल्या विश्वव्यापी अनुभवांना ग्रंथरुप दिले. त्यांचा हातून सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक तसेच शैक्षणिक मिळूण २८ ग्रंथांची निर्मिती झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक गुरु – मौनी महाराज हे पुस्तक त्यातीलच एक. या पुस्तकाने मौनी महाराज आणि शिवाजी महाराज यांचा इतिहास जागृत ठेवला. त्यांच्या ग्रंथसंपदेला राज्य देश-विदेशात अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे.
राजन कोनवडेकर
मोबाईल – ९८२२२२६४५८
दरवर्षी आम्ही गारगोटी येथील अक्षर सागर साहित्य मंचच्यावतीने तालुक्यातील एका ज्येष्ठ लेखकाला साहित्य भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करतो. यावर्षी डॉ. मा. गो. माळी यांना देण्याचे निश्चित झाले होते. २८ फेब्रुवारीला मडिलगे खुर्द येथे यंदा ग्रामीण साहित्य संमेलन भरवून त्यामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार होते. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यातच लॉकडाऊन पुढे वाढतच गेले. त्यामुळे संमेलन पुढे ढकलण्यात आले. पण वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संमेलन होण्याची चिन्हे आता धुसरच होत गेले. साहित्य मंचच्या सर्व सदस्यांनी हा पुरस्कार माळीसरांच्या घरी जाऊन देण्याचे ठरवले होते. तसे त्यांना कळवण्यात आले होते. पण माळीसर आजारी असल्याने यात अडथळा आला. त्यांचा आजार बरा होईल अशी आशा आम्हाला होती. पण अनपेक्षितपणे शुक्रवारी (ता.२८) माळीसर गेल्याचे वृत्त समजले आणि आमचा पुरस्कार न स्विकारताच सर गेले. आभाळ दाटून आले जीव पुटपुटला एक वाहती कळ अंगभर झिरपत गेली…आणि ओल्या नजरेसमोर माळीसरांच्या चरित्र आणि चारित्र्याचा एकएक प्रसंग उलघडत राहिला…
आजही मला आठवतयं…आमच्या लहानपणी गावागावात माळीसर एका छोट्या पेटीतून लहान लहान पुस्तके घेऊन यायचे. ही पुस्तके शाळेतील मुलांना द्यायचे व पुढच्या आठवड्यात दुसरी नवी पुस्तके देऊन पहीली दिलेली पुस्तके घेऊन जायचे. तो काळ असा होता आम्हाला पुस्तके घेण्याची ऐपतही नव्हती तसेच तशी जाणिवही आमच्यात नव्हती. तेव्हा माळीसर असे गावोगावी ज्ञान वाटत फिरायचे. तसेच मौनी विद्यापीठातील बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांसाठी काखेत झोळी अडकवून भिक्षा दे हे ही करायचे. या पुस्तकांनी ग्रामीण भागातील आम्हा मुलांना अभ्यासाची गोडी लावली. लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग अशा थोर व्यक्तींची, क्रांतीकारकांची चरित्रे तसेच रामायण, महाभारतासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या पराक्रमाची पुस्तके आम्हाला बालवयात त्यांच्यामुळे वाचायला मिळाली. माळीसर जर गावोगावी असे ज्ञान वाटत फिरले नसते तर आज भुदरगड तालुक्यांतील गावागावात झालेली शैक्षणिक जागृती दिसलीही नसती असे म्हटलेतर चुक ठरणार नाही. माळीसरांनी भुदरगडाच्या मातीच्या कणावर आणि माणसांच्या मनावर आपले नाव कोरले, शेती भातीत राबणाऱ्या मुलांच्या हातात लेखणी दिली. मागास रानवस्त्यातील झोपडी झोपडीत ज्ञानाचे दिप प्रज्वलीत केलेत. इथल्या अघोरीकृत्यांना कवटाळणाऱ्या कर्मट परंपरा नष्ट करण्यासाठी आयुष्याचे अर्ध्य दिले.
माळीसरांनी सामाजिक क्षेत्रातील अवकाशाला गवसणी घातली होती. तथापी शैक्षणिक क्षेत्रात अभिनव प्रयोग राबवले. निवर्ग शाळा, एक शिक्षकी शाळा, ऊसतोड मजूरांच्या मुलांसाठी साखर शाळा, हॉटेल कामगार विटभट्टी कामगार, उपेक्षित महिलांसाठी रात्रशाळा, मुक्त माध्यमिक विद्यालय, गरीब मुलांसाठी निरंतर शिक्षणाचा प्रयोग…ही सारी माळीसरांच्या कल्पकतेची देणगी आहे.
माळीसरांनी आपल्या विश्वव्यापी अनुभवांना ग्रंथरुप दिले. त्यांचा हातून सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक तसेच शैक्षणिक मिळूण २८ ग्रंथांची निर्मिती झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक गुरु – मौनी महाराज हे पुस्तक त्यातीलच एक. या पुस्तकाने मौनी महाराज आणि शिवाजी महाराज यांचा इतिहास जागृत ठेवला. त्यांच्या ग्रंथसंपदेला राज्य देश-विदेशात अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. शोध निबंधांच्या निमित्ताने त्यांनी नैरोबी (केनिया), आफ्रिका, मलेशिया, टोबॅगो अशा परदेश वाऱ्यातून त्यांनी मराठीची पताका फडकवली.
त्यांच्या भरीव कार्याची काळालाही घ्यावी लागली. त्यांच्याकडे अनेकपदे चालुन आली. शिवाजी विद्यापीठाचे ते कार्यकारिनी सदस्य होते. विद्याशाखा सदस्य, अभ्यास मंडळाचे चेअरमन, माध्यमिक अभ्यास मंडळ सदस्य, महाराष्ट्र विद्याशाखा व संशोधन मंडळ सदस्य, मौनी विद्यापीठ संचालक, शिक्षणशास्त्र विद्यालयाचे प्राचार्य असे अनेक तुरे माळीसरांच्या शिरपेचात विराजमान झाले. माळीसरांच्या ज्ञानयज्ञातून अनेक विद्यार्थ्यांची आयुष्ये घडली आहेत. महाराष्ट्राचा असा एकही कोपरा नसेल की जिथे सरांचा विद्यार्थ्यी सापडणार नाही. खऱ्याअर्थाने माळीसर नावाप्रमाणे जीवनबाग फुलवणारे कुशल माळी होते. शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक, व्ही. टी. पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकत सर भुदरगड तालुक्यात आले आणि एका प्रकाशमान युगारंभाचे दूर झालेत…
ज्या आयुष्याला जगाने गौरविले त्याचा आम्हाला आमच्या अक्षरसागरच्या घरकुलात सन्मान करायचा होता. करंबळी ते भुदरगड अशा दैदिप्यमान प्रवासाचा सन्मान. १९३२ ते आजपर्यंतच्या प्रकाशमान कालखंडाचा सन्मान आमच्या मानपत्राच बिल्वदल माळीसरांच्या पायावर व्हायचं होत पण…सर आम्हाला सोडून गेले आणि आमचे स्वप्न अधुरे राहीले. ही कळ, ही चुटपुट आम्हाला आयुष्यभर कोसत राहील.. तेच तेवढे आमचे धन…
