May 30, 2024
World Honey Bee Day Special Article by J D Pradkar
Home » कणकण मधाचा…!
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कणकण मधाचा…!

स्लोवेनिया देशाने जागतिक मधमाशीपालक संघटना (एपिमोन्डीया), अन्न व कृषि संघटना (एफएओ) यांच्या मदतीने संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला, यानुसार २० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून २०१८ पासून साजरा केला जावु लागला आहे. या निमित्ताने…

-जे . डी . पराडकर

jdparadkar@gmail.com

मधु मागशी माझ्या सख्या परी ……! मधुघटची रिकामे पडती घरी …….!! या गीताचे बोल ऐकले की आठवतात ते मधुघट. टंच भरलेले मधुघट पाहणे म्हणजे खरी समृध्दी . मधुघट रिकामे होणे हे नक्कीच आनंददायी नाही. साक्षात् परमेश्वरालाही जो पसंत आहे असा मधु म्हणजे मध….. आरोग्यदायी समजला जातो. कणाकणाच्या मधासाठी मणामणाएवढे कष्ट करणाऱ्या मधमाशा आपल्या पिल्लांच्या भविष्यासाठी हा मध गोळा करत असतात. एवढा गोड मध साठवणाऱ्या माशांचा डंख एवढा जहाल कसा ? मधामध्ये आपली सोंड बुडवूनही मधमाशी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विषाचा डंख मारतेच. स्वतःच्या स्वार्थासाठी माणूस मधमाशांची पोवळी शोधून काढतो आणि माशांना जाळून किंवा उडवून लावून यातील मध काढून घेतो.

अत्यंत क्रूरपणाचे कृत्य करताना मानव त्यांचे कष्ट विसरून जातो हे दुर्दैवीच म्हणावे लागेल. मधमाशी ! केवढा छोटासा कीटक, पण याची कष्टांची किमया खूप मोठी आहे. असंख्य फुलांवर बसून मधाचा कण कण वेचून तो आपल्या घरट्यात आणून मधुघट भरण्याचे मधमाशांचे प्रयत्न दिशादर्शक आहेत. या मधुघटांचा गंध परिसरात असा काही पसरतो की मधुघटाच्या खजिन्याची जाणीव मानवासहित यांच्या असंख्य शत्रूंना सहजगत्या मिळते. मधुघट उभारणीचे काम उंच झाडावर आणि त्यातही आडव्या फांदीला टोकावर करण्याचा प्रयत्न मधमाशांकडून होतो. तरीही मानवाचे स्वार्थी हात तेथपर्यंत पोहचतातच. प्रत्येक फुलाचा जसा गंध वेगवेगळा आहे तसेच त्याच्यातील मधाची चव , गोडी , घट्ट आणि पातळपणा हा भिन्न स्वरूपाचा आहे. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात कोवळी सूर्यकिरणे फाकली की मधमाशादेखील आपल्या कामात व्यस्त होतात. निसर्गाचा बहरण्याचा हंगाम हाच मधुघट ओतप्रोत भरण्याचा कालावधी असतो. निसर्गाने स्वत: मधील काही गोष्टी मानवाव्यतिरिक्त निसर्गात असणाऱ्या अन्य घटकांना बहाल केल्या आहेत.

दुर्दैवाने निसर्गावर देखील घाला घालणारा मानव याच्या प्रत्येक घटकावर आपलीच मालकी असल्यासारखा वागू लागलाय. वसंत ऋतू म्हणजे निसर्गाला बहार येण्याचा कालावधी. ‘ ऋतू वसंत आणि साऱ्यांना पसंत ‘. असे म्हटले जाते ते काही उगाच नाही. गळून पडता पानांचा बहर….. वृक्षांना येते फुलायची लहर ! एक ना अनेक वृक्ष कात टाकून स्वतःचे सौंदर्य खुले करण्याच्या प्रयत्नात असतात. जागोजागी पिवळी , केशरी , गुलाबी , लाल , जांभळी अशी एक ना अनेक प्रकारची फुले फांद्या भाराने ओथंबतील अशी बहरलेली असतात. वरून पाहिले तर वृक्षाचे खोड देखील दृष्टीस पडत नाही एवढा फुलांचा विस्तार झालेला असतो. निसर्गाचा हा बहर म्हणावा की कहर ? हेच कधीकधी कळत नाही.

निसर्गाला होणारा मनमुराद आनंद म्हणजे हा फुलांचा बहर ! या आनंदाच्या भरात निसर्ग फुलांसाठी काहीतरी खाऊ देतंच असतो, तो म्हणजे हा मध. बहुतेक फुलांमध्ये मध हा असतोच. फरक एवढाच असतो की त्याचे प्रमाण कमी जास्त असते. वसंत ऋतूत निसर्ग प्रेमींनी जर निरीक्षण केले तर त्यांच्या लक्षात येईल की फुलांनी बहरलेल्या प्रत्येक झाडाजवळ गुंजारव ऐकू आला म्हणजे समजून जायचे मधमाशांचे जथ्थे येथे आपले मधुघट भरण्यासाठी दाखल झालेत. मधमाशांच्या पंखांचा आवाज निसर्गाच्या त्या शांततेचा भंग करत असतो. हा गुंजारव देखील ताल धरलेल्या एखाद्या गीता सारखा भासतो ……मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला…..या गीतातही हेच वर्णन सापडते,. फुलातील मधुघट रिकामा करताना कृतज्ञता म्हणून हा गुंजारव ऐकवला जात नसेल ना ? फुलांकडूनही मोफत काही मिळवायचे नाही ही शिकवण या कीटकाला कोणी दिली असेल, निसर्ग देवतेनेच ना ? फुलाला आपला मधुघट रिता करताना वेदना होत असतील की कृतज्ञता वाटत असेल ? जीवो जीवस्य जीवनं ! हे निसर्गातील सूत्र येथेही अवलंबले जात असते. आपण तर काही काळानंतर कोमेजून धरतीवर कोसळणारच आहोत. मग आपल्यातील मधुघट जर वेळीच रिता झाला तर आपल्यावरील भार कमी होईल या भावनेने फुलं मधमाशा त्यांच्या अंगाखांद्यावर खेळू लागल्यानंतर त्यांच्या पुढे लीन होत असतील. फुलांचा त्याग या अन्न साखळीत किती महत्वपूर्ण आहे याची प्रचीती यातून नक्कीच येते.

मणामणाच्या कष्टाने मिळणारा कण कण मध आपल्या पोट पिशवीत भरून आपल्या मधुघटात नेऊन ओतणाऱ्या या मधमाशा अपार कष्टांचे फळ नेहमीच गोड असते असा संदेश देऊन जातात. असंख्य माशा मधाचा कण कण घटात भरून त्याला पूर्णत्व प्राप्त करतात. मधमाशा का भरतात हे मधुघट ? आपल्या पिल्लांसाठी त्यांचा हा सारा खटाटोप असतो. घरट्यातील अंड्यातून पिल्ले बाहेर पडली की त्यांचे अन्न म्हणून या मधाचा त्यांना उपयोग होत असतो. निसर्गाच्या या अन्नसाखळीचा विचार केला की निसर्गासारखा दुसरा जादूगार नाही याची खात्री पटते. पृथ्वीवर ज्या जीवांची निर्मिती केली गेली आहे त्यांचे आयुष्यमान कमीजास्त असेल, मात्र त्यांच्या अन्नसाखळीची व्यवस्था निसर्गाने करून ठेवली आहे. फक्त यासाठी ‘ शोधा म्हणजे सापडेल ‘. हे सूत्र अवलंबण्याची गरज असते. परमेश्वराला देखील मध अर्पण करावा असे शास्त्रात सांगितले आहे. यासाठीच पंचामृतात मधाला मोठे स्थान आहे. मधुमक्षिका पालन केंद्रातील मध पंचामृतात असेल तरच तो पावन होईल. माशांना जाळून किंवा उडवून लावून जबरदस्तीने मिळवलेला मध पंचामृतात चालू शकेल का ? असा प्रश्न पडतो खरा.

ज्यांनी अशा मधुघटातील मधाची चव चाखली आहे त्यांनाच त्यातील अस्सलता लक्षात राहील. मधाच्या नावाखाली काकवी विकण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो आणि याला सुशिक्षित लोकच अधिक बळी पडतात. कारण ग्रामीण भागातील माणसांना असली मधाची चांगली पारख असते. मोठमोठ्या बादल्यांमध्ये पकड्या टाकून त्यात गुळाची काकवी ओतली जाते. असली मध म्हणून दारोदार चारशे ते पाचशे रुपये किलोने विकला जातो. यामध्ये बदनामी मात्र असली मधाची होत असते. मध हा आरोग्यास अतिशय उपयुक्त असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. दररोज एक चमचा मध प्राशन करणे आरोग्यास लाभदायक असल्याचे सांगितले जाते. मधुमक्षिका पालन केंद्रातील मधाची एखादी छोटी बाटली तरी आपल्या घरी असावी. मधुघटाचे अस्तित्व त्याच्या जबरदस्त गंधाने सहजी लक्षात येते. हा गंधच या मधुघटांचा घात करतो. स्वार्थी वृत्तीची माणसे हे मधुघट काढून त्यातील मध वेगळा करून त्याची पकडी देखील खायची सोडत नाहीत. यामुळे असंख्य मधमाशा आणि त्यांची अंडी अथवा पिल्ले यामध्ये नष्ट होऊन निसर्गातील साखळीच खंडित होते.

मधू असेल तर, घटाचे महत्व आहे. मधू आणि घट अलग केले तर, रितेपणा शिवाय उरते काय ? पण हे लक्षात घेतो कोण ?अशी आजची स्थिती आहे. माणूस अहंकाराच्या आगीत धुमसत जाऊ लागला तर , आपल्या घटातील मधुचे अस्तित्व संपतेय हे देखील तो सोयीस्करपणे विसरून जातो. संसाराचे पण असेच आहे. आनंदी संसारात असणारा मधु आपल्या घटातून कधी रिता करायचा नाही हे ज्या स्त्रीला कळले तिच्या संसारात गोडवा कायम रहातो. मधमाशांच्या या कष्टातून खूप काही शिकण्यासारखे आहे. हा कीटक आहे किती छोटा, पण त्याच्या कष्टातून खूप मोठा संदेश मिळत असतो. वसंत ऋतूत भरलेले मधुघट त्यांच्या गंधातून अस्तित्वाची जाणीव करून देतात. याची चव सोडा, याचा गंधही अगदी काळजात घुसतो. याच्या गंधाने दीर्घकाळ एक सुखाची अनुभूती घेतल्याचा आनंद मिळून जातो. मधु मागशी माझ्या सख्या परी …….! मधुघटची रिकामे पडती घरी ……!! एकवेळ मधुचे घट घरात रिकामे असले तरी हरकत नाही. मात्र आनंदाचे घट घरात नेहमीच भरलेले असावेत. कारण सुखी संसाराचे हेच तर खरे सूत्र आहे.

Related posts

वानर माकडांचा खेळ !

माझं गाव …माझं घर…” गोकुळ “

साखरप्याची बाजारपेठ पुरमुक्त…!

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406