November 12, 2024
Introduction of Bhudargad Taluka Culture article by Ravindra Gurav
Home » कवा बी येवा भुदरगड आपलाच हाय की…
मुक्त संवाद

कवा बी येवा भुदरगड आपलाच हाय की…

तालुक्यानं ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे‌. भजन, सोंगी भजन, संगीत भजन लोकगीतं, गौरी गीतं, लेझीम, हलगी, कैचाळ, ढोल, ताशा, पिपाणी, झांजपथक, पोवाडा, कीर्तन, प्रवचन, नाटक, एकांकिका…..अशा माध्यमातून कला, संगीत संस्कृतीचा वारसा सुरू ठेवलेला हमखास दिसतो.

रवींद्र शिवाजी गुरव

पाचवडे.
९८२२२५४०४७.

माझा भुदरगड तालुका म्हणजे राधानगरी, कागल, आजरा या तालुक्यांसह कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खोबणीत बसलेलं आणि सत्यात उतरलेलं स्वप्न होय. ते नीट बघायचं म्हणजे तसं दिव्यच. ते बघायला, धरायला धजलं की पुढं पुढं सरकत जातं गावतच नाही. फटवीतच जातं. मग पुन्हा त्याचा पाठलाग करत राहावं लागतंं. त्याचं बाहेरचं रूप जसं देखणंपान नटलेलं तसंच काळीज अंतरंगही. त्याच्यात रंग भरला आहे. साहित्य, क्रीडा, शैक्षणिक, ग्रामीण, निमशहरी, शहरी, धार्मिक, संगीत, कला, खाद्य, राजकीय, सांस्कृतिक अशा बहुआयामी अंगांनी. त्यातूनच ते अधिक खुलत गेलं आणि तालुकावासीयांसह ये-जा करणाऱ्या प्रत्येकाला खुणावत राहिलं. मलाही ते सतत खुणावतं. हे स्वप्न नजरे पल्याड जातच नाही. सतत घिरट्या घालतं. अवती – भवतीनं. मग त्याला अंजारण्यासाठी ..गोंजारण्यासाठी रूप जवळून पुन्हा – पुन्हा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी माझी मजल-दरमजल सुरू होते.

क्रांतीज्योत सदैव प्रेरणादायी

अगदी आतनं मनानं मनापासून केलेली ही भटकंती…’कवा बी येवा ..’ अशी हाक मारणारी मनातल्या नयनरम्य तालुक्याची मनानं उलगडलेली ही आतली भ्रमंती. ही मनातली भटकंती नेमकी कुठून सुरू करावी हा प्रश्न सतावत राहातो.. मग वाटतं ती तालुक्याच्या गावातनं …हां जुन्या बसस्थानका जवळच्या कचेरीच्या दारातनं म्हणजेच क्रांतीज्योतीला नमन करून १९४२च्या चळवळीत गारगोटी कचेरीवरच्या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या सेनापती कापशीचे करवीरय्या सिद्धय्या स्वामी, शंकरराव कृष्णाजी इंगळे, नानीबाई चिखलीचे मल्लाप्पा बाबाजी चौगले, कलनाकवाडीचे नारायण दाजी वारके, मुरगूडचे तुकाराम रामजी भारमल, खडकलाटचे परशुराम कृष्णा साळोखे आणि जत्राटचे बळवंत कृष्णा जबडे या सात हुतात्म्यांना‌ अभिवादन करून जड अंतकरणानं पुढं व्हावं लागतं. ही क्रांतिज्योत सदैव प्रेरणा देते.

विद्येचं माहेर

इथं नांदणारं विद्येचं माहेर म्हणजे मनामनाचं असं‌ माझं मौनी विद्यापीठ तर ज्ञानवृक्षच. कर्मवीर हिरे महाविद्यालय, रा. वि. परूळेकर ग्रंथालय, इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग (आयसीआरई), ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र अशा असंख्य शाखांमधून सदैव छाया देणारा. त्याच्या कुशीतलं विस्तीर्ण मैदान शेती-भाती तिथंही रमलो ते नतमस्तक होऊनच. त्यानच ज्ञान अमृताचं घट सदैव दिले. ते आजघडीलाही तसंच ज्ञानदातं आहे. शिक्षणतज्ञ कै. जे. पी. नाईक, व्ही. टी. पाटील, भाऊसाहेब हिरे अशा विभुतींना नमन करूनच पुढची वाट धरली.

नयनरम्य भुदरगड

विविधांगी सुंदर नयनरम्य रूप अनुभवायला बाहेर पडलो खरं कुठून हिंडणं सुरू करावं हा प्रश्न डोक्यात घिरट्या घालू लागला. त्याला बगल देत ढकलत सुरूवात तर झाली; पण या भटकंतीला अंत नाही. ही लळा लावणारी भटकंती सबंध तालुका पालथी घालणं, तुडवणं, हिंडणं आपल्या पायाच्यान काय नेटणार नाहीच; तरीही मनाचा हिय्या केला आणि निघालं माझं मलाच घेऊन पळवत हिकडं-तिकडं सैरभैर होऊन. परत कुठनं जाऊ नि कुठनं राहू असच झाल्यालं…गडाला जावावं आधी नि तिथं छत्रपती शिवरायांना वंदन करून भैरीच्या समोर तोफेजवळ उभं राहून छातीची ढाल नि हाताची तलवार करीत ‘जय महाराष्ट्र’ गर्जावं की विजयपथाला वंदन करीत निलगिरीच्या निसर्गरम्य झाडीतून वेदगंगा ओलांडीत त्यांचा अखेरचा गारवा, दाट सावलीची कमान बघत पुढं सरकावं? तशी मनाची द्विधाच. गडावरचं दुधाळ तळंही तहान भागवत मनात रूतलेलं. पालीची ऱ्हाईही तशी जवळच. शेंडा आणि बुडकाच नाही भटकंतीला..हं व्हय फिरण्याला, हिंडण्यालाच की..

१८७६ च्या लायब्ररीला नमन

हा विविधतेनं नटलेला माझा तालुका बघताना काय बघू नि काय ठेवू असं झालं. अधीर झालेलं मन ओ समदा तालुका पुन्हा बघण्यासाठी. कित्येकदा बघूनही हावऱ्यागत करीत. इथलं पाणी, दगड, मातीही लळा लावणारं. ते मनात भरून समृद्ध होताना टंगळामंगळ करून नाही चालणार; मग जरा दमानं चालाय लागलो. पावलं मोजीत मातीला नमन करीत. तीही घुटमळाय लागली पायात आणि मी तिच्यात. लालबुंद माती, काळी माती, पांढरी माती, पाचवड्यातली काऊ माती, फणसवाडीची शाडू माती अशी तिची रूपं घेतली हातात. पाचवडे, मुदाळ करीत आदमापूर ..वाघापूरच्या धनगरी ओव्या ऐकत पाटगावकडं वळण्या आधी. तालुक्याचं गाव सोडून पुढं होतानाच १८७६ च्या लायब्ररीला म्हणजे आताच्या श्री शाहू वाचनालयाच्या ग्रंथ संपदेला मनोभावे जपत. मन बारा वाटा पळून खेळायला लागलं. या ग्रंथालयातलं अध्यक्ष म्हणून माजी आमदार आनंदराव देसाई हां.. आबाजींचं कार्य स्मरणीय.

सड्याव व्हय भोंगिऱ्याव आलो

पळणारं मन बांधून घातलं ते गडानच. तालुक्याची ओळख आहे तोच हाच गड तिथं जाणं झालं छत्रपती शिवरायांना वंदन केलं. ‘हर हर महादेव …छत्रपती शिवाजी महाराज की जय’ची घोषणा निनादनारा तो मावळतीच्या कोपऱ्यातला प्रतिध्वनी ऐकला. कानात गर्जना साठवत दुधाळ तळ्याचं पाणी चाखलं. पालीच्या ऱ्हाईतनं पुढं झालो. कूरचा ब्रिटिशकालीन पूल अनुभवत कोनवडयातनं कविवर्य गोविंद पाटील, राजन कोनवडेकर या साहित्य गुरूंचा सहवास घेऊन नाधवडेचं शिवार न्याहाळत नानांच्या संगीताचे सूर आळवत..अशोकदाच्या चौंडक्याचं, कथा गाण्याचं घुमणारं सूर गोळा करीत…जे टिक्केवाडीकर तीन वर्षांतून एकदा ‘गुळं काढणे’ (कोकणात गावपळण) परंपरा पाळतात. त्याच तिथनं बसुदेव, भुजाईचा डोंगर चढून सड्याव व्हय भोंगिऱ्याव आलो. हां याक सांगायचं राहिलं की कूरचा ब्रिटिशकालीन पूल उडवण्याचा कट त्यावेळी फसला त्याच पुलावयनं हा सुखरूप प्रवास झाला. तो प्रवास आजही सर्वांचाच सुखमय असा होतोय. सड्यावरची नीरव शांतता आणि पठारावरून मावळतीचा राधानगरी परिसर पूर्वेचा नयनरम्य परिसर सभोवतालच डोळ्यांचं पारणं फेडतो. बसुदेवाचा धनगरवाडा मायेन जवळ घेतो. तर मिणचे खोऱ्यातलं बॉक्साईड डोळे लाल करून टाकतं.

Introduction of Bhudargad Taluka Culture article by Ravindra Gurav
Introduction of Bhudargad Taluka Culture article by Ravindra Gurav

यात्रा – जत्रा, म्हाया

वाघापूरची नागपंचमी, पाचवडेची महाशिवरात्र, कडगावची लक्ष्मी, तांब्याच्या वाडीतली सिद्ध सातेरीदेवी, खानापूरची तळेमाऊली आदी देव – देवींच्या यात्रा – जत्रा, म्हाया, उरुस, नाधवडेचा चैत आणि म्हसव्याची ईसाळी…तो बघून तर थंडी पिसाळलीच म्हणूनच समजा. अशा जत्रातून होणाऱ्या कुस्त्या, गावा गावातील तालमी लयच भारी. चिखली गुट्ठा, बैलगाडी, घोडागाडी शर्यतींवर बंदी असली तरी हौसेखातर कुठेतरी ती नजरेला पडतेच. पाचवड्यातली कबड्डी, न्हाव्याच्या पांडू आण्णाचा दांडपट्टा, शिवरात्रीतली साखर आणि जागर सारंच गोडी वाटणारं. संगीताचा वारसा जपणाऱ्या कै. अनंत कुलकर्णी …होय नानांच्या घरापाठोपाठ आकुर्डेतील अरण्यवाचक आणि कथा सांगायच्या बाबतीत ज्यांनी झेंडा रोवला त्या गुरूवर्य व्ही. डी. पाटील आणि नानांचा संगीत वारसा पुढे नेणारा युवा संगीतकार शिवराज पाटील यांच्याही… तिथनं पुढे सरकलो ते भेटीची आस लावून घेतच..नंतर थेट गाठलं ते पाटगाव.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु मौनी महाराज यांची समाधी पाटगाव

मधाळ भाषेचं धन

तिथला मौनी महाराजांचा मठ, भव्य प्रवेशद्वार, शेजारी असलेला समाधीस्थ असा कित्येक शतकांचा वाटेकरी वड, श्री भद्रकाली मंदिर, तिथला भव्य तबेला, घंटानाद मनात निनादत राहतो. पाटगावचा मौनीसागर जलाशय, त्याच्या मागचा उलटा वाहणारा हां…अंगावर तुषार सोडणारा तो सिडीची पाझ, शिवाजी माची, हणमंते घाट अंतिवडे खोऱ्यातला स्वर्ग सुख देणारा धबधबा. समोरचा रांगणा त्याला साक्ष देणारा. नाईकवाडी धबधबा, सिद्धाच्या गुहा. रांगण्याला तर तिथून पश्चिमेचा सिंधुदुर्ग दर्याच्या साक्षीनं साद घालतो. चिकोत्रा धरण असंच नजरेत साठवत राहतो. पाटगाव, भटवाडी, तांबाळे परिसरातील माणसं तर कोकणशी नाळ जोडणारी. मधुमक्षिका पालन करीत तितकच मधाळ भाषेचं धन घेऊन वावरणारी. कौलारू घरं आणि बोलीभाषेतला गोडवा, मातीनं लाल झालेले पाय, माखलेली काया जणू त्यातूनच त्यांची ओळख कोकणी अशीच. इथली देवळंही कोकणीपण जपणारी. घोडगे-सोनवडे घाट रस्ता कोकणला जोडणारा दुवा ठरत आहे. या भागातली भाताची रोप लावण भर पावसात चिंब होत बघण्यासारखी. शेतकरी बाया-बापड्यांची गीतं ऐकत एक वेगळीच पर्वणी देणारी. हे सुख साठवतच काढता पाय घ्यायचा ..हं आल्या पावली माघारी फिरायचं म्हणजे भलतच जड वाटलं.

साहित्य शारदेसाठी झटणारी मंडळी

अजून आपण कुठं, काय बघितलय? असं म्हणत….
धूळवाफ भात पेरणी, टोकणणी पूर्व भागातच प्रामुख्यानं नदरं पडणारी. ऊस, नाचणी, भात, भुईमूग अशी मुख्य पिकं सर्वत्र सळसळणारी. येताना जरा मार्ग बदलला आणि कडगाव, ममदापूरला वळसा घालत त्या अंगानं पुढं सरकलो ते गडाच्या पायथ्यानच. याच तालुक्यात गुरूवर्य डॉ. विजय निंबाळकर, डॉ. राजन गवस, भटकंती करीत शीळ घालत मनामनात घुमणारे कवीवर्य गोविंद पाटील, प्राध्यापक एकनाथ पाटील पिंपळगावकर, बालसाहित्यिक डाॅ. एम. जी. गुरव (वाघापूर), रवींद्र गुरव (कोनवडे), सुनील पाटील (मडिलगे), सुनील देसाई (मिणचे खुर्द), संजय खोचारे (मुरूक्टे), दत्ता मोरसे (पारधेवाडी), बा. स. जठार (वाघापूर), कपिल पाटील (कोनवडे), अनिरूद्ध गुरव (टिक्केवाडी) अशी ही साहित्य शारदेसाठी झटणारी मंडळी पदोपदी भेटली. त्यांची गाठ घेतल्याशिवाय पुढं होणं अशक्यच. तिथंही घुटमळत राहिलो ते गाठी-भेटीसाठी.

ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न

तालुक्यानं ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे‌. भजन, सोंगी भजन, संगीत भजन लोकगीतं, गौरी गीतं, लेझीम, हलगी, कैचाळ, ढोल, ताशा, पिपाणी, झांजपथक, पोवाडा, कीर्तन, प्रवचन, नाटक, एकांकिका…..अशा माध्यमातून कला, संगीत संस्कृतीचा वारसा सुरू ठेवलेला हमखास दिसतो. कथाकथनकार चित्रकार व्ही.डी. पाटील, वसंत शिंदे, प्रा.सुधीर गुरव, डी. सुतार यांच्यासारखे चित्रकार कलेची साधना करीत आहेत. हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकार तालुक्याला छायाचित्रात बांधून ठेवत आहे.

औद्योगिकीकरण पण प्रदुषणापासून अलिप्त

गंगापूर गाव तर पैलवानांची ओळख सांगत उभं आहे. आकुर्डे, महालवाडी इथं कबड्डी नांदताना दिसत आहे. मीठ विकणारं गाव मुदाळ आज ट्रकचं गाव म्हणून ओळखलं जात आहे. नाधवडे, वाघापूर भाजीपाल्याला समृद्ध करीत आहे. कूर, कोनवडे, कडगाव, दारवाड अशी गावं बाजारांची गाव म्हणून ओळखली जाताना दिसली. आकुर्ड्याचा भुतोबा वृक्ष संपदा जपत उभा आहे. राबत्या हाताला रोजगार देणारे इथं दोन साखर कारखाने, एक सूत गिरणी इतक वाटंला दिसलं. अजून औद्योगिक विकास होऊ घातलेला.‌ त्यामुळं वरकरणी तरी सध्या प्रदूषणापासून अलिप्त दिसतो हा बिचारा. भुदरगड, कागल आणि आजरा यांच्या तिहेरी सीमेवर वसलेला धामण्या-बामण्या जवळचा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना लिमिटेड बेलेवाडी काळम्मा/धामणे हा आणि तांबाळेचा आशिया खंडातला पहिला महिला सहकारी साखर कारखाना, मुदाळची हुतात्मा स्वामी वारके सूतगिरणी या माध्यमातनं हातांना काम मिळतं आहे. तर शेळोली येथे तयार केलेल्या शाडू मातीच्या वेगवेगळ्या आकाराच्या गोट्या म्हणं परदेशात पोहोचल्या आहेत.

पीक पाण्यानं सुजलाम सुफलाम्

खाद्यसंस्कृती वेगळेपण राखून आहे ती गोडी माही, खारी माही अशी विभागणी करीत‌. खवय्यांच्या सोयीनं पुरणपोळी, तांबडा-पांढरा रस्सा, वडापाव, मिसळ पाव, मटन, चिकन अशी वैविध्यही जिभेचे चोचले पुरवतातच. वेदगंगा, चिकोत्रा नदी, पालीचा घाट, घोडगे- सोनवडे घाट आणि अनेक धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. गावा-गावातली वाचनालयं वाचन संस्कृती रुजवताना दिसतात. अशावेळी नव्यानं लिहिती, वाचती, बोलती पीढी भूषण ठरत आहे. खूप समाधान वाटलं या साहित्य शारदेच्या सेवेबद्दल. रतांबे, आंबा, फणस, केळी, काजू आदी फळपिकांना वाव दिला आहे. जांभळ, करवंदं, आळू, तोरणं, बिब्या, सजुगऱ्या असा रानमेवा घेऊन मिरवतानाही दिसतो. 1972 चा महादुष्काळ पोटाला चिमटा देत कटू आठवणीतून सोसतो. 2005 हूनही २०१९ मध्ये महाभयंकर महापूर येऊनही नेटान उभा राहतो. सर्वदूर पोहोचलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यागत सुख अडवून धरत दुःख वाहतं ठेवलं आहे. कोरोनालाही पूरून उरलाय हा माझा खमक्या तालुका… खूप शिकण्यासारखा आहे याच्याकडनं. मात्र एक काही अपवाद वगळता तसा पीक पाण्यानं सुजलाम सुफलाम् नि खाऊन पिऊन सुखी आहे.

कवा आलासा …गेलासा…आलाव‌…

हे सारं वैभव असलेल्या तालुक्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व धर्मातील, जातीतील लोक मिळून-मिसळून राहतात. एकीनं नांदणाऱ्या तालुक्यात अलिकडं कधी मोठी धार्मिक किंवा जातीय दंगल होऊन जीव गमवावे लागलेत असं कधी झाल्याचं आठवत नाही. इतका एकोपा बघावा तो इथंच.
आरे ला… का रे… करीत शिवी शिवाय पाणी न पिणारी ही आपली माणसं ….येवा.. जावा …ऱ्हावा …खावा… पिवा..जावा अशी आगरेव करणारी.
“ये लेका ..” अशी एकाची हाक आली तर
“बोल माझ्या बाबा..”त्येच्याच वारगीच्याची गमतुळी ओ… आजूबाजूला ऐकू येते‌. कवा आलासा …गेलासा…आलाव‌…
गेलाव…करतासा …. ऱ्हातासा…. करतंस …ऱ्हातस…जातस करीत एक एकाला कोलीवणारी ….आंबं पाडणारी..किती ख्यात ख्यात केलं तरी मनाजोगाच कंडका पाडणारी…
याक काय दोन ..! बारा बचाक राव…आणि एक तुमास्नी म्हणून सांगतो ‘ये भावा…’ ही हायब्रीड हवा तशी अलिकडच निपाजलीया…..व्हावाय लागलीया‌.‌.हे सांगून लिहून न सपणारंच..इथली माणसं जरी वरून कडक भासली तरी आतून गोडच आहेत. फणस, आंबा ही त्याचीच रूपं. इतकी ही मायाळू माणसं इथंच हमखास गाठ पडलीच पायजेत.. या माणसांची ही भुदरगडी कोकणी भाषाही तितकीच प्रेमळ अशीच. शेकडो वाड्या-वस्त्यांचा विस्तीर्ण पसारा असलेला हा तालुका. इथले डंगे धनगर इथनंच कुठनंरी हाकारे घालताना दिसतात. हे एकाचवेळी मांडणं अशक्य. एकादमात हिंडणं तर‌ त्याहून जिकीरीचं.

‘माझा वर्ग माझी ओळख’ भुदरगड पॅटर्न

तालुक्यानं शिक्षणाच्या प्रांतात ही नावं कमवलं आहे. भुदरगड प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची पायाभरणी करीत आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी मित्र दीपक मेंगाणे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘माझा वर्ग माझी ओळख’ हा शिक्षणाचा भुदरगड पॅटर्नही जिल्हा परिषदेनं स्वीकारला आहे.

संस्कृतीचे विविध रंग

हे सगळं बघताना माझ्या पायांच्या खुट्यानी खुट्या मोडल्या की ओ राव तरी वड्या-वताडातनं, कडे-कपारीतनं, पायवाटेनं, रस्त्यानं, नदी-नाले, लहान-मोठे धबधबे यांच्या सहवासात गाव वस्तीतनं हिंडणं झालं. बंगले, झोपड्या यातलं सुख-दुःख अनुभवलं. त्यावर फुंकर घालत भटकतच राहिलो. इथेच चुकारीचा एखादा हत्ती, गवा, भेकर, डुक्कर, ससा, मोर, लांडोर यांचं दर्शन घडलं. पुरता दमलो हिंडून तालुक्याचं सर्वांगीण संपन्न रूप न्ह्याळून. जीवाची पेसाटी झाली; खरं हिंडायची हौस काय भागली नाही. नवा हुरूप आला हे संस्कृतीचे विविध रंग बघून. माझ्याच तालुक्याचा हा नयनरम्य पसारा बघून भारीच वाटलं राव. थांबतो.. परत हायच की ..सवडीनं हिंडायला येतो. आणि व्हय ‘कवा बी येवा भुदरगड आपलाच हाय की…’ गाईड व्हवून मीच सांगतो, दाखिवतो समदं मुलुख नि मुलुख पालथी घालून ..जग बघायची इच्छा असणाऱ्या मनानं‌ हिंडावच एकदा माझ्यातनं सह्याद्रीच्या या एका अंगाच्या उंच उंच कुशीतनं…असं म्हणतोय. तेला सोडून पुढं पायच उचलत नाही. पाय जड झाल्यात. ते हिंडण्यापेक्षा लांब जाण्याचा मोठा डोंगर‌ कोसळलाय म्हणून..तवा याच भुदरगडाच्या मायेपोटी पुन्हा भेटूच…
तवर बाबा तालुक्यासकट समद्यानी द्या मला रजा…
येतो ..
राम राम….


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading