कला -साहित्य भूषण’ या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट आदी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास तीस व्यक्तिमत्वांविषयी या ग्रंथातून माहिती दिली आहे. ही फक्त माहितीच नाही तर त्या व्यक्तीच्या जन्मापासून त्याच्या जडणघडणीपर्यंतचा प्रवास या ग्रंथात अधोरेखित केलेला आहे.
विनोद कांबळे, कोल्हापूर
“मी का लिहितो, माझ्या लिखाणाचे स्वरूप काय आहे, माझ्या लिखाणाचा वाचकांना, समाजाला काय उपयोग आहे, मुळात काही उपयोग आहे का? याचा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा मला असे जाणवते की, ज्या परिस्थितीत माझे बालपण, तारुण्य गेले आहे, त्या सर्व परिस्थितीचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. बिकट आर्थिक, कौटुंबिक, भावनिक परिस्थितीचा जीवनावर पडत गेलेला परिणाम, नैराश्याचे, वैफल्याचे भोगावे लागलेले असंख्य क्षण माझ्या मनात कायमचे रुतून बसले आहेत. या स्वानुभवातून माझे स्वतःचे असे तत्त्वज्ञान तयार झाले की, माणसाच्या परिस्थितीपेक्षा त्याची मनःस्थिती महत्त्वाची असते. म्हणूनच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या आणि इतकेच नव्हे तर इतरांनाही यशस्वी होण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींच्या प्रेरणादायी जीवन कथा मी लिहीत असतो.”
देवेंद्र भुजबळ
अशी भूमिका घेऊन देवेंद्र भुजबळ यांनी ‘कला- साहित्य भूषण’ या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. ते विविध विषयावर सातत्याने लेख लिहीत असतात. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक असून न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक म्हणून प्रसार माध्यमात गेली चाळीस वर्षे काम करणारे ते एक माध्यमकर्मी आहेत. आतापर्यंत त्यांची नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तर अकरा पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे.’
कला -साहित्य भूषण’ या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट आदी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास तीस व्यक्तिमत्वांविषयी या ग्रंथातून माहिती दिली आहे. ही फक्त माहितीच नाही तर त्या व्यक्तीच्या जन्मापासून त्याच्या जडणघडणीपर्यंतचा प्रवास या ग्रंथात अधोरेखित केलेला आहे. त्यामुळे साध्या व सहज भाषेत या व्यक्तिमत्त्वांचा परिचय आपणाला होतो. यामध्ये भीमराव पांचाळे, गणेश चंदनशिवे, बंडा जोशी, हमीद सय्यद, विसुभाऊ बापट, अशोक राणे, प्रतिभा सराफ अशी नामवंत व्यक्तिमत्वे आहेत. यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सन्मित्र बंधू आलोक जत्राटकर यांच्याविषयी लेख आहे. या लेखांमध्ये देवेंद्र भुजबळ यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध कसा घेतलेला आहे त्याविषयीची ही माहिती…
देवेंद्र भुजबळ संपादित ‘कला-साहित्य भूषण’ या ग्रंथातील डॉ. आलोक जत्राटकर यांचा लेख त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि प्रशासकीय वाटचालीची बहुआयामी ओळख करून देतो. त्यांचे मूळ गाव निपाणी परिसरातील असून सांगली-कोल्हापूर-कागल या सीमाभागातील सामाजिक वास्तवाशी त्यांचे घट्ट नाते आहे. सीमाप्रदेशातील अनुबंध त्यांच्या लेखनातून येतो. प्रशासकीय अडचणी, सांस्कृतिक संघर्ष आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची जाणीव त्यांच्या लेखनातून स्पष्टपणे दिसून येते.
शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी रसायनशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली असून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्धता त्यांच्या विचारांमध्ये प्रकर्षाने जाणवते. पुढे पत्रकारिता, माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील अनुभवामुळे त्यांची अभिव्यक्ती अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख झाली. दैनिक सकाळसारख्या माध्यमांशी असलेले नाते त्यांना समाजाच्या नाडीवर हात ठेवणारे बनवते.
मंत्रालयीन सेवेत कार्यरत असताना “मी मंत्रालयात काम करतो” या वाक्यामागील मानसिकता ते चिकित्सक नजरेने तपासतात. मंत्रालयीन पद म्हणजे मिरवण्याची गोष्ट न ठरता ती लोकसेवेची संधी असावी, हा त्यांचा ठाम आग्रह आहे. मंत्रालयातील सभासंस्कृती, अधिकारकेंद्रित वृत्ती आणि आकर्षणाच्या चौकटीतून बाहेर पडणे किती कठीण आहे, हे त्यांनी अनुभवाच्या आधारे मांडले आहे.
डॉ. जत्राटकर काम न करता पगार घेण्याच्या प्रवृत्तीवर स्पष्ट टीका करतात. अशा वृत्तीमुळे प्रशासनावरचा जनतेचा विश्वास कमी होतो, असे ते ठामपणे सांगतात. ‘रेड टेप’ म्हणजे अडथळे निर्माण करणारी नोकरशाही कमी करून ‘रेड कार्पेट’ म्हणजे नागरिकांना सन्मानाने सेवा देणारी प्रशासनपद्धती रुजवली पाहिजे, हा त्यांचा विचार महत्त्वाचा ठरतो.
२००२ पासून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहाय्यक संचालक, माहिती अधिकारी (राजपत्रित) म्हणून काम करताना त्यांनी विविध प्रशासकीय पातळ्यांवर जबाबदारी पार पाडली. २०१२ मध्ये रायगड-अलिबाग येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करताना लोकसंपर्क, जनजागृती आणि प्रशासन-जनता संवाद अधिक प्रभावी करण्यावर त्यांनी भर दिला.जुलै २०१२ पासून ते शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांनी शिवसंदेश, शिववार्ता या ब्लॉगची आणि युट्युबची वाहिनीची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर प्रियदर्शन या नावाने ते लेखन करतात.
आलोकशाही हा त्यांचा युट्युब चॅनेल आहे. त्याद्वारे त्यांनी विविध मुलाखती घेतलेल्या आहेत.
एकूणच डॉ. आलोक जत्राटकर हे केवळ प्रशासकीय अधिकारी नसून लोकशाही मूल्यांची जाणीव ठेवणारे, लोकसेवेचा अर्थ स्पष्ट करणारे आणि प्रशासन अधिक संवेदनशील व्हावे यासाठी विचार मांडणारे व्यक्तिमत्त्व आहेत.
सन्मित्र म्हणूनच नव्हे, तर एक संवेदनशील प्रशासकीय अधिकारी म्हणून आलोक जत्राटकर यांना जवळून पाहताना त्यांच्या विचारांची प्रामाणिकता अधिक जाणवते.’ कला-साहित्य भूषण’मधील त्यांचा लेख प्रशासन, समाज आणि व्यक्ती यांच्या नातेसंबंधांचा सखोल वेध घेणारा ठरतो.
पुस्तकाचे नाव – कला- साहित्य भूषण
लेखक – देवेंद्र भुजबळ
प्रकाशक : न्यूज स्टोरी टुडे
पृष्ठे – १४७, किंमत – रुपये ४००
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
