November 8, 2025
डॉ. श्रीनिवास नाटेकर यांच्या ‘त्याचं असं झालं’ या पुस्तकातून त्यांच्या जीवनातील संस्मरणीय भेटी, अनुभव आणि नामवंत व्यक्तींशी झालेला सहवास शब्दरूपात उलगडतो.
Home » ‘ त्याचं असं झालं ‘…….झालं ते चांगलंच झालं !
मुक्त संवाद

‘ त्याचं असं झालं ‘…….झालं ते चांगलंच झालं !

घरी दूरदर्शन संच नाही असे एकही घर आता नसेल. एखाद्या खुर्चीवर किंवा आराम खुर्चीत बसून हातामध्ये रिमोट कंट्रोलर घेऊन टीव्ही सुरू करावा, एका मागे एक चॅनेल बदलत जावे आणि प्रत्येक चॅनेलवर आपल्या पसंतीचा कार्यक्रम पाहावा हे किती सुखकारक, आनंददायक आहे याचा अनुभव आपण सर्वजण  घेत असतोच. असाच अनुभव एखाद्या पुस्तकातून मिळाला तर ? होय, असाच आनंद  एका  पुस्तकाच्या वाचनातून मिळतो. ते पुस्तक म्हणजे ‘  त्याचं असं झालं ‘ . या पुस्तकातील कोणतेही प्रकरण उघडावं आणि ते वाचायला सुरुवात करावी. कुठल्याही एका प्रकरणाचा दुसऱ्या प्रकरणाशी संबंध नाही. परंतु प्रत्येक प्रकरणातून, प्रत्येक लेखातून मिळणारा आनंद हा शब्दांच्या पलीकडचा असाच म्हणावा लागेल.

सुहास रघुनाथ पंडित, सांगली
९४२१२२५४९१

सांगली येथील प्रसिद्ध डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांनी लिहिलेले ‘त्याचं असं झालं’  हे पुस्तक नुकतच वाचून झाल. ते वाचून झाल्यानंतर आपण एखादा चलत् चित्रपट तर पहात नव्हतो ना किंवा दूरदर्शनवरील विविध चॅनेल्स एकामागून एक पुढे सरकवत नव्हतो ना असेच वाटले. हे आत्मचरित्र नाही. आत्मसंवादही नाही. हा आहे निव्वळ आत्मानुभव. मग असे काय आहे या पुस्तकात ?

डॉ. नाटेकर हे सांगली येथील प्रसिद्ध रेडियॉलॉजिस्ट. आजपर्यंतच्या त्यांच्या जीवनात त्यांना ज्या ज्या व्यक्ती भेटल्या त्या त्या व्यक्तींच्या सहवासातील सुखदुःखांचे क्षण आणि त्याबरोबरच आपल्या व्यवसायातील काही अनुभव कथन करणारे हे पुस्तक म्हणजे लेखकाने प्रत्येक वाचकाशी साधलेला संवाद आहे असेच वाटते. लेखक आपल्यासमोर बसून चहा पीत पीत आपल्याला त्या आठवणी व्यवस्थितपणे सांगत आहे आणि आपणही त्याचा एक भाग बनून अत्यंत तन्मयतेने त्या ऐकत आहोत असे वातावरण निर्माण करण्याची ताकद या पुस्तकामध्ये आहे. डॉक्टरांच्या प्रदीर्घ व्यावसायिक वाटचालीमध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्या अंगी असलेल्या संगीत प्रेम, बॅडमिंटन आणि वक्तृत्व या अंगभूत कलागुणांमुळे त्यांना असामान्य व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभला, भेटी झाल्या. त्या कशा होत गेल्या, त्यातून कोणकोणते प्रसंग संस्मरणीय झाले, व्यवसायामध्ये आलेले अनुभव कसे चिरकाल स्मरणात राहतात, हे सर्व त्यांनी कथन केलेले आहे.

आपण ज्यांना ‘सेलिब्रिटी ‘ म्हणतो अशा सुप्रसिद्ध व्यक्तींपैकी एखादी व्यक्ती जर आपल्या जीवनात आली तर आपल्याला अप्रूप वाटते. इथे तर डॉक्टरांच्या जीवनात एकाहून एक अशी भारदस्त व्यक्तिमत्वं  भेटून गेली आहेत. त्यांच्याशी झालेल्या गप्पा, कोणत्या प्रसंगातून त्यांच्या ओळखी झाल्या, काहींच्या भेटी होता होता कशा चुकल्या, काही ठिकाणी कसे सुखद अनुभव आले, काही ठिकाणी कशी फजिती झाली तर काही ठिकाणी सुरुवातीला दडपण, भीती पण त्या प्रसंगाचा शेवट मात्र अतिशय गोड कसा झाला हे सर्व त्यांनी अत्यंत खुमासदार शब्दांमध्ये सांगितलेले आहे. आता आपल्याला वाटेल असं कोण बरं यांना भेटलं असेल ? या ठिकाणी सर्वच्या सर्व नावे सांगितली नाही तरी काही नावे सांगितली व आपण ती वाचली की लक्षात येईल की हा माणूस किती भाग्यवान आहे .

भारतरत्न लता मंगेशकर व भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, सुधीर फडके, परविन सुलताना, पंडित जसराज, माजी राज्यपाल वसंतदादा पाटील, ओ. पी. मेहरा व आय. एच. लतिफ, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, पु. ल. देशपांडे, वसंत बापट, ना. ग. गोरे, बेबी शकुंतला, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंग, एकनाथ सोलकर, मंगेश पाडगावकर, उषाकिरण, सदाशिव अमरापुरकर, स्नेहल भाटकर, दिलीप प्रभावळकर,  सी. रामचंद्र, ओ. पी. नय्यर  इत्यादी इत्यादी…अशी ही नावे किंवा यातील प्रत्येक नाव आपल्याला भुरळ पाडणारे असेच आहे. विविध  क्षेत्रातील अशा व्यक्तिमत्त्वांचा काही ना काही कारणाने संपर्क होणे आणि त्यांच्या सहवासात काही तास, एखादा दिवस घालवणे हे किती भाग्याचे आहे याची कल्पना आपण करू शकतो. याशिवाय व्यवसायामध्ये आलेले अनुभव त्यांनी कथन केलेले आहेत. हे सर्व करत असताना या व्यक्तिमत्त्वांच्या अत्यंत सुंदर अशा व्यक्तिरेखा त्यांनी आपल्या शब्दातून उभ्या केल्या आहेत. एवढेच नव्हे तर आजुबाजूचा परिसर, एखादी इमारत, एखाद्या हॉटेल मधील फर्निचर, निसर्ग या गोष्टींचेही त्यांनी अचूक वर्णन केलेले आहे. त्यामुळे या आठवणी म्हणजे फक्त आठवणींच ‘गाठोडे’ नव्हे तर एक ललितरम्य लेखमाला झालेली आहे.

एखाद्या व्यक्तीचे वर्णन करताना त्याचा पोशाख, त्याचे रंग, रूप याबरोबरच त्याची देहबोली याचेही त्यांनी अचूक टिप्पण केलेले आहे. उदाहरणार्थ  संगीतकार मदन मोहन, जय किशन, चौधरी चरण सिंग यांचे वर्णन वाचून ते चेहरे त्या व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या राहतात.  ‘वालाची उसळ’ या लेखातून त्यांनी जो प्रसंग कथन केला आहे तो वाचल्यानंतर डॉक्टर हे फक्त वैद्यकीय सल्ला देणारे नसून शरीरामध्ये नसलेल्या अवयवापर्यंत म्हणजे  पेशंटच्या मनापर्यंत जाऊन भिडणारे डॉक्टर आहेत हे दिसून येते. ‘स्कूटरची किक’ या लेखातूनही त्यांनी आपल्या व्यवसायातील अत्यंत थरारक असा अनुभव कथन केला आहे.

वैद्यकीय व्यवसायात माणसांशी सतत येणारा संबंध आणि ते संबंध डोळसपणे अनुभवण्याची वृत्ती, तसेच बॅडमिंटन सारख्या खेळातील प्राविण्य, चित्रपट गीतऐकण्याचा छंद व त्यावरील प्रेम आणि या सर्वांच्या जोडीला आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेण्याच स्वभाव यामुळे डॉक्टरांनी जी माणसे मिळवली ती त्यांच्या स्मृती मध्ये कायमची कोरून ठेवली गेली आहेत. त्याचा त्यांनी जो आनंद उपभोगला तो आपल्यालाही या पुस्तकामुळे उपभोगायला मिळत आहे.

आयुष्याच्या अल्बममध्ये जतन करुन ठेवावेत असे फोटो खूप कमी असतात. पण इथे अल्बम भरुन जावा इतके फोटो डॉक्टरांजवळ आहेत. आज लेखक आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहेत तेथून मागे वळून पाहताना त्यांच्या तोंडून, त्यांच्या एका लेखाच्या शिर्षकाप्रमाणे ‘कृतार्थ मी’ असेच उद्गार बाहेर पडत असतील.डॉक्टरानीच एका लेखात म्हटले आहे ” परमेश्वर किंवा आदिशक्ती असेल मला माहित नाही ; पण प्रत्येकाच्या नियतीत ज्या घटना घडतात, त्या त्यांनी योजिलेल्या असतात, असं समजलं जातं. ” ” विविध क्षेत्रातील इतकी मंडळी माझ्या जीवनात का डोकावली यांचे माझ्याकडे समर्पक, पटेल असे उत्तर नाही. ही परमेश्वराची कृपा असावी, माझ्या नियतीतील महद्भाग्य असावे. किंवा माझ्या बाबतीतील निव्वळ योगायोग असावा अशी माझी प्रामाणिक समजूत आहे.”

काहीही असो, जे झालं हे आम्हा वाचकांसाठी चांगलंच झालं.!

पुस्तकाचे नाव : त्याचं असं झालं…..
लेखक : डॉ. श्रीनिवास नाटेकर ९४२३२६७०२०
प्रकाशक : चतुरंग प्रकाशन, सांगली.
मूल्य : रु. २७५/-


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading