January 2, 2026
Cover of Marathi novel Inshallah by Abhiram Bhadkamkar depicting a young man in darkness with rays of hope symbolizing social reform and faith
Home » इन्शाअल्लाह ( एक आस्वादन)
मुक्त संवाद

इन्शाअल्लाह ( एक आस्वादन)

मुखपृष्ठाच्या वरच्या बाजूला उजवीकडे खिडकी आहे. मुस्लीम वास्तुशैलीचे ते प्रतिक आहे. दर्गाह, मशीद आशा ठिकाणी या प्रकारच्या खिडक्या असतात. इथे असे सुचवले आहे की या खिडकीतून अल्लाहच्या मार्फत एक प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तो ओळखा. आयुष्यातील अज्ञानरूपी अंधार नाहीसा करा. खिडकी वर आहे. सुटकेचा मार्ग दाखवला आहे. पण तिथपर्यंतचा प्रवास तुम्हालाच करायचा आहे. मुखपृष्ठावरील व्यक्ती त्या मार्गाचं माध्यम बनू शकते.

उज्ज्वला केळकर

अलीकडेच एक नवीन चांगले पुस्तक वाचनात आले. इन्शाअल्लाह. लेखक अभिराम भडकमकर. सर्वसामान्य म्हणण्यापेक्षा, तळा- गाळातले म्हणता येईल, अशा मुस्लीम समाजातील लोकांच्या स्थिती-गतीचे, दु:ख-दैन्याचे दर्शन यात घडते. अल्लाह, महजब, कुराण आणि शरीयत या चौकटीत हा समाज बंदिस्त आहे. शरीयतचे कायदे, कयामतचा (अंतीम न्याय-निवाड्याचा दिवस), त्यानंतर मिळणार्‍या जन्नतचे( स्वर्ग) स्वप्न किंवा दोजख (नरक) या पलीकडे त्यांच्या विचाराची धाव जात नाही. किंबहुना, तशी ती जाऊच नये असा समाजातील काही कट्टर मूलतत्ववाद्यांचा प्रयत्न आहे. अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा यांनी त्यांचं आयुष्य जखडून ठेवलय. जन्नतची कल्पना करता करता आपलं सध्याचं वास्तव आयुष्यच दोजख होऊन गेलय, याची त्यांना गंधवार्ताही नाही. स्त्रियांची परिस्थिती तर त्याहूनही करूणाजनक. त्या बुरख्यात कैद. ना विद्या. ना सन्मानाने जगण्याची संधी. ती खतावन म्हणजे बाई जात. सतत पुरुषी वर्चस्वाखाली तिने राहायचं. तीन तलाकाची डोक्यावर टांगती तलवार सदाचीच. पोटगी नाही. स्त्री म्हणजे मुलं जन्माला घालणारं आणि मरद जातीसाठी राबणारं मशीन अशीच समाजाची धारणा आहे.

या कादंबरीतील मुमताजचं चित्रण हे सर्वसामान्य मुस्लीम स्त्रीचं प्रातिनिधिक चित्रण आहे, असे म्हणता येईल. मुमताजचा नवरा उस्मान मुमताजच्याच घरात काही काम-धंदा न करता राहतो आहे. दारू, पत्ते यात वेळ घालवतो आहे आणि नवरा म्हणून मुमताजवर आराडा-ओरडा करतो आहे. तिला मारहाण करतो आहे, पण त्याला तलाक देण्याचा तिला अधिकार नाही. पुरुष मात्र कधीही मनात आलं की तलाक देऊ शकतो. यात नसीमा मॅम सारखी शिकलेली स्त्री आहे. जी प्राध्यापिका आहे. कॉलेजमध्ये शिकवते आहे. तिच्या पगारावरच घर चालतं आहे, पण तिलाही घरात संन्मानाने वागवलं जात नाही. पण टी यथाशक्ती ‘फतेह संस्थेचे काम करते आहे.

वरील परिस्थिती बदलली पाहीजे. शिक्षणाची कास धरली पाहिजे. समान नागरी कायदा झाला पाहिजे, असं म्हणणारी रफिकसारखी सुधारणावादी तरुण मंडळी यात आहेत. हजारो वर्षापूर्वी लिहीलेल्या कायद्याचा आज उपयोग नाही. मी अल्लाह, मजहब, कुराण, शरीयत, काही मानत नाही. मी अल्लाहची पैदाश नसून निसर्गाची पैदाईश आहे, असं म्हणणारा रफिक मुसलमानांच्या दृष्टीने काफीरच आहे पण तो आणि त्याची ‘फतेह’ संस्था मुस्लीम समाजाच्या उन्नतीसाठी तळमळीने कार्य करते आहे. त्याच्या विचाराने झुल्फीसारखे अनेक तरुण भारलेले आहेत. त्यांनाही सुधारणा व्हाव्यात असं वाटतय, पण त्या धर्माच्या चौकटीत राहून व्हाव्यात, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना विरोध करणारे कट्टर मुसलमान यात आहेत. मुसलमानांचा हक्क आणि अधिकार याविषयी जागरूक असणारी उदारमतवादी सेक्युलर हिंदू मंडळी यात आहेत. हिंदूंच्या अंधश्रद्धेवर टीका करणार्‍या, पण मुसलमानांच्या अंधश्रद्धेबाबत ब्रही न काढणार्‍या या सेक्युलर मंडळींची कुचेष्टा करणारी कडवी हिंदुत्ववादी मंडळी आहेत. मुसलमानांनी आपला वेगळेपणा न राखता मुख्य प्रवाहात सामावून जायला हवं, असं मनापासून वाटणारी मोकळ्या मनाचे तरुण हिंदू युवक यात आहेत.

रहीमनगरच्या वस्तीत ही कथा घडते. रहीमनगर ही कोल्हापुरातली तळा-गाळातल्या मुस्लीमांची वस्ती. या वस्तीचं चित्रण हे प्रातिनिधिक म्हणायला हरकत नाही. वस्तीतला तरुण मुलगा जुनैब गायब असतो. पोलीस त्याला पकडण्यासाठी येतात. बॉँबस्फोट घडवून स्टेशन उडवून लावण्याच्या कटात तो सामील असल्याचा पोलिसांना संशय आहे. आपला साधा सरळ मुलगा असलं वाईट काम कधीच करणार नाही, याची त्याच्या अम्मीला म्हणजे जमिलाला खात्री आहे. जुनैब सापडत नाही, पण वस्तीतल्या काही तरुण मुलांना पोलीस घेऊन जातात. त्यांना सोडवण्यासाठी मोमीन वकिलांना बोलावलं जातं. मोमीन सल्ला देतो, की पोलिसांविरुद्ध तक्रार करायची, की गेले सहा महीने, मोहल्याची जागा बिल्डरला लिहून द्या, असं पोलीस धमकावताहेत.

अल्लाहाच्या नावाने टाहो फोडणारे, अल्लाहला खोटं चालत नाही म्हणणारे, मूलतत्ववादी मोमीनचं म्हणणं मान्य करतात. सगळा मोहल्ला त्याच्या बाजुने होतो. एकटी जमीला कणखरपणे नकार देत म्हणते, ‘ऐसा कुछ हुयाच नही. क्या ऐसा सच अल्लाह कबूल करेगा?’ ‘छोरवांदों को छुडाना है तो ऐसा करनाच पडेगा’ ते म्हणतात. ती तक्रार अर्जावर सही करायला नकार देते. मोर्चा निघतो. तक्रार अर्ज दिला जातो. पण कादंबरीच्या शेवटापर्यंत जुनैदचा शोध लागत नाही की मुलं सुटत नाहीत. मुलांना सोडवण्यासाठी मोमीन किंवा आमदार त्यासाठी काहीच करत नाही. मोमीनला योगी वेळी म्हणजे निवडणुका लागल्या की हे प्रकरण उकरून काढायचय. आमदार गुळगुळीतपणे ‘शोध चालू आहे’, असं म्हणताहेत, कारण त्यांच्या पक्षाला सध्या हे प्रकरण बाहेर पडायला नको आहे. मुलं तशीच तुरुंगात खितपत पडलीत. त्यांच्यावर धड खटला चालवला जात नाही, की त्यांची सुतकाही होत नाही.

या घटनेकडे वेगवेगळ्या संघटना कसं बघतात, एकाच घटनेचे वेगवेगळे अर्थ कसे लावले जातात, याची छान मांडणी पुस्तकात केली आहे. मोहल्ल्यातील पुढारी म्हणतात, हा अल्पसंख्य मुस्लिमांच्या विरूद्धचा कट आहे. उन्मेषसारख्या हिंदुत्ववादी लोकांचे म्हणणे असे की जुनैद अतिरेकीच आहे. खरं तर त्याच्याविरूद्धचा गुन्हा अद्याप शाबीत व्हायचा आहे, तरीही त्यांची खात्री आहे, तो कटात सामील असणारच.

कादंबरीत प्रसंग कमी आहेत. त्या त्या प्रसंगाच्या निमित्ताने झालेली वैचारिक घुसळण खूप आहे. मूलतत्ववाद्यांच्या विचारसरणीच्या संदर्भात रफिकसारख्या सुधारणावाद्याला वाटतं, हा धार्मिक उन्माद आहे आणि धर्माच्या ठेकेदारांची ही गरज आहे, नव्हे त्यांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे म्हणून मग धर्माच्या नावाखाली ते तरुणांची माथी भडकवतात. स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे, कडव्या हिंदूंच्या दृष्टीने मुस्लिमधार्जिणे आहेत. कारण त्यांना फक्त हिंदूंच्या अंधश्रद्धा दिसतात. मुसलमानांच्या दिसत नाहीत. नीना जुनैदचं वकीलपत्र घेते, तेव्हा हिंदू असूनही तिने ते घ्यावं, याबद्दल कडव्या हिंदुत्ववादी संघटना नाराज आहेत, तसेच तिच्या घरचेदेखील नाराज आहेत कारण त्याचा त्यांच्या धंद्यावर परिणाम होणार आहे. वस्तीतील पुढार्‍यांनाही ते नको आहे, कारण ती खतावन. एका बाईचं आम्ही ऐकायचं? उदार मतवादी मात्र खूश आहेत, सभेत तिच्या अभिनंदनाचा ठराव करायचा, असं त्यांचे सर्वेसर्वा शिखरे म्हणताहेत.

या अशा वेगवेगळ्या विचारांची मांडणी लेखकाने अतिशय उत्तम तर्‍हेने केली आहे. लेखकाची मीडियावर चांगली पकड असल्याने त्यातले विचार, वाद-विवाद आपण प्रत्यक्ष त्या त्या टोळक्यात जाऊन, तिथे बसूनच ऐकतो आहोत, असं वाटतं. तसेच झुल्फी, जमिला, मुमताज, रफिक फिदा आणि त्यांची पत्नी शिखरे या सारख्या सार्‍याच व्यक्तिरेखाही प्रत्यक्षदर्शी झाल्या आहेत.

राहीमनगरच्या वस्तीत झुल्फी सुधारणा घडवण्याचा प्रयत्न करतो. साचलेल्या पाण्याच्या डबक्यासारखी झालेली लोकांची मने आणि मेंदू. त्याला वाट काढून प्रवाहीत करण्याचा तो प्रयत्न करतो. रक्तदान शिबीर, गप्पा-संवाद-चर्चा यासारखे कार्यक्रम, उपक्रम तो सातत्याने राबवतो. वस्तीतील लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, त्यांनी विचार केला पाहिजे, यासाठी तो प्रयत्नशील आहे. धर्माच्या चौकटीत राहून तो हे करतोय, त्यामुळे त्याला वस्तीतल्या सामान्य लोकांचा पाठींबाही आहे. कोल्हापुरात होणार्‍या साहित्य संमेलनासाठी तो वस्तीत कार्यालय सुरू करतो. साहित्य संमेलनाची चर्चा चालू असतानाच रफिक मरतो. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या असतात. तो आपला देह दान करतो. मुसलमानांपुढे एक तरी असं उदाहरण असावं, हे त्याचं म्हणणं. संमेलनाच्या निमित्ताने, रफिक भाईंच्या विचारांवर आधारित चित्ररथ काढायचा ठरवतो. असे अनेक उपक्रम तो आयोजित करतो. त्या निमित्ताने चर्चा होते. लोकं विचार करू लागतात. आपली मतं मांडू लागतात.

कादंबरीच्या शेवटी चित्ररथात अडथळे आणणारी कडवी मुस्लीम मंडळी आश्रफ, शब्बीर व त्यांनी आणलेले चार गुंड चित्ररथाला विरोध करतात. शब्बीरच्या मारामुळे झुल्फी रक्तबाबबाळ होऊन खाली पडतो. जमीला त्याचं डोकं मांडीवर घेते. आपल्या पदराने त्याच्या डोक्याचे रक्त पुसते. ती आपल्या जुनैबच्या जागी झुल्फीला पहात असते. या वस्तीत झुलफीने जे पेरलं होतं, ते आता उगवून आलय. कट्टर मुसलमानांचा विरोध असूनही, त्यांनी अडथळे आणूनही वस्तीतील सगळे तरुण, बायका, चित्ररथ पुढे नेतात. बायका-मुलींनी बुरखा काढलेला आहे. चित्ररथ पुढे नेताना घोषणा दिल्या जाताहेत,
‘नये दौरा के साथ चलींगे
इन्शाअल्लाह ( अल्लाहची हीच मर्जी आहे.)
हम जिहादी आमनके
इन्शाअल्लाह
सब पढींगे सब बढींगे
इन्शाअल्लाह’
चित्ररथ पुढे जातो. कादंबरी संपते. झुल्फीची आणि सामान्य मुस्लीम समाजाची ही कहाणी सफल संपूर्ण झालेली नसली, तरी चित्ररथाबरोबर सफलतेच्या दिशेने पुढे निघाली आहे. विचारप्रधान, वास्तववादी अशी ही सामाजिक कादंबरी आहे. कादंबरीमधे संवादासाठी कोल्हापुरात बोलली जाणारी बगवानी बोली वापरली आहे, ती खूप परिणामकारक वाटते. आशयाशी ती अगदी एकरस झाली आहे.

कादंबरीचे मुखपृष्ठ अर्थवाही आणि मार्मिक आहे. मुखपृष्ठावरील तरुण काहीशा भांबावलेल्या अवस्थेत वर बघतो आहे. त्याच्या भोवतीनं बराचसा अंधार आहे. पण सागळाच अंधार नाही. कुठे कुठे धूसरता आहे. ती त्याच्या मनातील विचारांचे प्रतीक वाटते. त्याच्यावर खिडकीतून येणार्‍या प्रकाशाची तिरीप आहे. आणखी कुठे कुठे किंचितसा प्रकाश आहे. तो त्याच्या मनातील आशेचं प्रतिक वाटतो. मुखपृष्ठाच्या वरच्या बाजूला उजवीकडे खिडकी आहे. मुस्लीम वास्तुशैलीचे ते प्रतिक आहे. दर्गाह, मशीद आशा ठिकाणी या प्रकारच्या खिडक्या असतात. इथे असे सुचवले आहे की या खिडकीतून अल्लाहच्या मार्फत एक प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तो ओळखा. आयुष्यातील अज्ञानरूपी अंधार नाहीसा करा. खिडकी वर आहे. सुटकेचा मार्ग दाखवला आहे. पण तिथपर्यंतचा प्रवास तुम्हालाच करायचा आहे. मुखपृष्ठावरील व्यक्ती त्या मार्गाचं माध्यम बनू शकते.

कादंबरी वाचून मन अतिशय अस्वस्थ होतं. तरीही सध्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी कादंबरी वाचावीच असं मी म्हणेन.

पुस्तकाचे नाव – इन्शाअल्लाह
लेखक – अभिराम भडकमकर
प्रकाशन – राजहंस प्रकाशन
पृष्ठे – 325
किंमत – 265 रु.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

शिकायला शिकवणारे : आर.एन. पाटील सर

प्रेरणादायी कथांचे पुस्तक – एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ

ज्ञानी होण्यासाठी अज्ञानाची ओळख असणे गरजेचे

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading