January 20, 2026
Pet dog waste on urban streets highlighting public health and civic responsibility issues in Indian cities
Home » कुत्र्यांच्या विष्ठेबद्दल बोलण्याची वेळ आली आहे
मुक्त संवाद

कुत्र्यांच्या विष्ठेबद्दल बोलण्याची वेळ आली आहे

श्वान प्रेमाच्या नावाखाली समाजात वाढत चाललेली बेफिकीरी, दादागिरी आणि नागरिक जबाबदारीचा अभाव याबाबत नागरिकांमध्ये याच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती व शहराच्या स्वच्छतेबाबत आंतरिक इच्छा निर्माण झाल्याशिवाय या समस्येवर मात करणे कठीण दिसते.

प्रा.डॉ. संजय त्रिंबकराव खडक्कार,
मोबाईल क्रमांक: 7276614260

श्वानप्रेमींची संख्या दिवसेंदिवस प्रामुख्याने शहरांमध्ये वाढताना दिसत आहे. नागरिक त्यांच्या श्वानांना सकाळी आणि संध्याकाळी नैसर्गिक विधीसाठी रस्त्यावर फिरायला नेतात. त्यामुळे ही कुत्री रस्त्यावरच विष्ठा व मूत्र विसर्जन करतात. पाळीव प्राण्यांची विष्ठा ही संबंधित मालकाने उचलणे अथवा त्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. परंतु ती जबाबदारी आपली नाहीच या तोऱ्यात श्वान मालक दिसतात.त्यात वैशिष्ट्य असे की आपले घर सोडून दुसऱ्यांच्या घरासमोर नैसर्गिक विधीसाठी श्वानाला नेले जाते. ही निर्लज्ज मानसिकताच म्हणावी लागेल. त्यामुळे दुसऱ्याच्या घरासमोर विष्ठा तशीच पडून राहते. कोणी त्यासाठी टोकले तर “कुत्र्याला काय समजते?”, “रस्ता काय तुमचा आहे का?”,असे दादागिरीच्या स्वरात निर्लज्जपणे उत्तर दिले जाते. त्याबद्दल कोठेही अपराधाची भावना श्वानमालकांच्या चेहऱ्यावर दिसत नाही.कुत्र्यांची विष्ठा खेळाच्या मैदानांमध्ये देखील आढळते. कुत्र्यांच्या शौचालयांसाठी मोकळ्या जागेचा गैरवापर सर्रास होताना दिसतो.

कुत्र्यांच्या मालकांच्या रस्त्यावरून कुत्र्यांची विष्ठा न काढण्याच्या सवयीमुळे शहरी भागात कुत्र्यांच्या विष्ठेची उपस्थिती स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्यासाठी समस्या निर्माण करतात. कुत्र्यांच्या विष्ठेत अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असू शकतात जे मानवांसाठी संभाव्यतः रोगजनक असू शकतात. आतड्यांसंबंधी मार्गासाठी रोगजनक असलेले आणि अतिसाराचे कारण बनणारे हे जीवाणू असतात.सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना त्या गोष्टीमुळे त्रास सहन करावा लागतो व त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर बनू शकतो.

कुत्र्यांची विष्ठा ही केवळ अस्वच्छतेची बाब नसून गंभीर आजारांना निमंत्रण देणारी सांडपाण्यासदृश्य समस्या देखील आहे,जी रोगराई पसरवू शकते. त्यात राउंडवर्म्स, व्हिपवर्म्स, टेपवर्म्स, हुकवर्म्स, फेकल कोलिफॉर्म, जिआर्डिया, साल्मोनेला, ई. कोलाय, कॅम्पिलोबॅक्टेरिओसिस, सायक्लोस्पोरा आणि पार्व्होव्हायरस यासारखे रोगजनक जीव असतात. कुत्र्यांची विष्ठा केलेल्या जागेवर काही काळानंतर विष्ठा दिसत नसली तरी,यापैकी बरेच रोगजनक दिवस,आठवडे,महिने किंवा कधीकधी वर्षानुवर्षे माती आणि पाण्यात यजमानाची वाट पाहत राहू शकतात,व आजारपण पसरवू शकतात.

अनवाणी चालताना, खेळताना, बागकाम करताना,या कुत्र्यांच्या विष्ठेत आढळणाऱ्या रोगजनकांच्या संपर्कात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलांसाठी हे सर्वात जास्त संवेदनशील आहे कारण ते अनेकदा मातीत खेळतात आणि त्यांच्या तोंडात किंवा डोळ्यांत वस्तू घालतात. पाळीव प्राण्यांच्या विष्ठेमधील जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गामुळे मानवांमध्ये ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, उलट्या आणि अतिसार होऊ शकतो.

परदेशातील काही नगरपालिकांनी पाळीव प्राण्यांच्या विष्ठेसाठी भांडे आणि बॅग डिस्पेंसर बसवले आहेत. अमेरिकेत कुत्र्यांच्या विष्ठेचे कायदे राज्य आणि शहरानुसार बदलतात, परंतु जवळजवळ सर्व अमेरिकन नगरपालिकांमध्ये पाळीव प्राण्यांच्या मालकांना सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कुत्र्यांच्या नैसर्गिक विधी नंतर ती जागा स्वच्छ करण्याची सक्ती आहे आणि बहुतेकदा खाजगी ठिकाणी देखील. अन्यथा त्यांना मोठ्या प्रमाणात दंड, सामान्यतः ५० ते ते ५०० डॉलर्स पर्यंत,लागू शकतो. नियमांचे पालन करण्यासाठी आणि दंड टाळण्यासाठी कचऱ्याच्या पिशव्या नेहमी जवळ ठेवणे काही शहरे अनिवार्य करतात.

यूकेमधील बहुतांश कुत्र्यांचे मालक त्यांच्या कुत्र्यांची विष्ठा गोळा करतात. स्पेनमध्ये दोषी आढळल्यास १,५०० डॉलर एवढा मोठा दंड भरावा लागू शकतो किंवा पर्यायी रस्त्यावरील सफाई कामगार म्हणून काम पण करावे लागू शकते.

या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्रात काही महानगर पालिकेने दंड आकारणीचा नियम केला आहे.पण तो लावला जातो का? परंतु दंड भरून ‘येरे माझ्या मागल्या’ प्रमाणे श्वान मालकांची सवय काही कमी होताना दिसेल का?नुसता दंड करून या समस्येवर मात करता येईल का?तर याचे उत्तर निश्चितच नाही असे आहे.

श्वान प्रेमाच्या नावाखाली समाजात वाढत चाललेली बेफिकीरी, दादागिरी आणि नागरिक जबाबदारीचा अभाव याबाबत नागरिकांमध्ये याच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती व शहराच्या स्वच्छतेबाबत आंतरिक इच्छा निर्माण झाल्याशिवाय या समस्येवर मात करणे कठीण दिसते.

काही दिवसांपूर्वी, सुप्रीम कोर्टाने देशभरात वाढत असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिलं आहे. राज्यांनी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती सादर करावी आणि या समस्येचं कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाच्या स्वरूपात ठोस प्रस्ताव मांडावेत, असे निर्देश राज्यांना दिलेत. या धोरणात, राज्य सरकारांनी शहरी संस्कृती सुसंस्कृत होण्यासाठी पाळीव कुत्र्यांच्या विष्ठेसंबंधीच्या व्यवस्थापनाचे कडक नियम यात जोडावे, ही अपेक्षा.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

सूर्यभान काव्यसंग्रहात समाजाला भान देणारी कविता

लोकशाहीला बळ देणारे छपाई यंत्र !

घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा  ‘२६ नोव्हेंबर’ चित्रपट

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading