October 10, 2024
A unique experiment of educational books in Marathi language
Home » Privacy Policy » शिक्षण विषयक पुस्तकांचा मराठी भाषेतील अनोखा प्रयोग
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शिक्षण विषयक पुस्तकांचा मराठी भाषेतील अनोखा प्रयोग

  • शिक्षण विषयक पुस्तकांचा मराठी भाषेतील अनोखा प्रयोग
  • एक लेखक,एक विषय आणि एकच प्रकाशक

चपराक प्रकाशनाच्या वतीने संदीप वाकचौरे यांच्या पुस्तकविषयक मालिकेतील आठ पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्या पुस्तकांना वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्या पुस्तकात वाकचौरे यांनी केलेली मांडणी केवळ तात्विक नाही तर अनुभव आणि शिक्षण तत्वज्ञान यांचा सुरेख संगम करत अत्यंत उत्तम विवेचनाची मांडणी या सर्वच पुस्तकात वाचकांना वाचायला मिळते.

घनश्याम पाटील

समरसून घेतलेला अध्ययन- अध्यापनाचा अनुभव, विद्यार्थी -शिक्षक-पालक-पर्यवेक्षकीय यंत्रणेशी असणारा सुसंवाद, प्रचंड वाचन , जाणीवपूर्वक जोपासलेला श्रवणाचा छंद,स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी अव्याहतपणे वृद्धिंगत होत जाणारा व्यासंग यामुळे संदीप वाकचौरे यांनी गेल्या दीड दशकापासून राज्यपातळीवरील तज्ज्ञ म्हणून संधी मिळत गेली आहे. त्यामधून त्यांच्या शिक्षकत्वाचा परीघ छोट्याशा खेड्यातील शाळेपासून राज्य पातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शकापर्यंत विस्तारत गेला आहे.

पत्रकारितेच्या प्रांगणात विकसित झालेला घटना प्रसंगाकडे पाहण्याचा वस्तुनिष्ठ दृष्टीकोन आणि परखडपणे मत व्यक्त करण्याची वृत्ती यामुळे त्यांच्या विवेचनाला वास्तवाचे परिमाण लाभले आहे. शिक्षण, साहित्य , समाजकारण, पत्रकारिता अशा विषयांवरील त्यांचे प्रासंगिक लेखन आणि व्याख्याने देखील विचार करायला भाग पाडतात. विविध कार्यक्रम,चर्चासत्रात विविध विषयांवर तात्विक विचार मांडण्याची संधी ही त्यांच्या व्यापक व्यासंगाची आणि शैलीदार वक्तृत्वाची द्योतक आहे. त्यामुळे वाकचौरे यांचे नाव शिक्षण क्षेत्राच्या विशाल परिघाच्याही बाहेर महाराष्ट्रभर पोहचले आहे. त्यामुळे त्यांची सर्वच शिक्षण विषयी पुस्तके समग्र चिंतनाची दिशा दाखवते. चपराक प्रकाशनाच्या वतीने त्यांची आठ पुस्तके एकाच विषयावरील प्रकाशित झाली आहेत. तर लवकरच आणखी चार पुस्तके प्रकाशित होत आहेत.

परीवर्तनाची वाट या पुस्तकात विविध अनुभवाची मांडणी करणाऱ्या लेखाचे दर्शन होते. आपल्याकडे सातत्याने प्रकल्प, कार्यक्रम, चळवळी, मोहिमा येतात. त्यामागील भूमिका समाजमनात पेरण्याचे व घडवण्याची काम वाकचौरे यांनी केले आहे. पुस्तकात अशा कार्यक्रमाची ओळख, त्यामागील भूमिका आणि त्याचा परिणाम यासारख्या महत्वाच्या घटकांवर चर्चा करून वाचकांना शिक्षणातील विविधतेचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण केंद्राने जाहीर केले आहे. त्या धोरणांचा प्रासंगिक लेखांचे लेखन करताना गरजेप्रमाणे अनुषंगिक संदर्भ देत वाचकांना बरे वाईटाचे दर्शनही ते घडत जाते. त्यामुळे वाचकांना नवे काय आणि त्याचा काय परिणाम होणार याचा अंदाज येण्यास मदत होते. माहिती तंत्रज्ञानाचा विचार शिक्षणात रूजवण्याचा प्रयत्न केला जातो. लोकांना शिक्षण स्मार्ट हवे आहे. . पण ते करताना शिक्षणाच्या मूलभूत हेतू आणि ध्येयापासून आपण विचलित तर होत नाही ना ? असा प्रश्नही ते उपस्थिती करतात. माहिती तंत्रज्ञानाचा विचार शिक्षणात काळाबरोबर चालताना कदाचित आवश्यक असेल. पण त्याचा धोकाही ते अधोरेखित करतात.

शिक्षणाने जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न

ऐसपैस शिक्षण या पुस्तकात शिक्षणाने जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न झाला आहे. एका अर्थी शिक्षण हे ‘अर्थपूर्ण’ असावे. आजच्या शिक्षणाचा विचार करताना शिक्षणातून ‘अर्थ’ कमावण्याकडे अनेक संस्थांचा कल आहे. लाखो रुपये फी भरून पाल्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून धडपडणारे पालक एकीकडे आणि मुलाच्या शाळेच्या साहित्यासाठी ही पैसा नसणारे असे पालक दुसरीकडे. घेतलेले शिक्षण तरी प्रत्यक्षात जगण्याच्या प्रक्रियेत उपयोगी पडेल का ? प्रश्न उपस्थित करतात. ‘अर्थपूर्ण ते कडून अर्थ पूर्णतेकडे केव्हा?’ यात मौलिक असा विचार मांडला आहे. शिक्षणात मूलभूत विचार स्मार्ट होण्याऐवजी शिक्षणाचे बाह्यांग स्मार्ट झाले आहेत. पालक ही आपल्या पाल्याच्या गुणवत्ता विकासासाठी काय उपक्रम राबविते यापेक्षा सुविधाला पालक प्राधान्य देतात. हजारो पुस्तकांचे ग्रंथालयांतील पुस्तक विद्यार्थ्यांना दिली नाहीत तर त्या हजारो पुस्तकांचा विद्यार्थ्यांना काय उपयोग ? शिक्षण म्हणजे केवळ सुविधा नाही तर त्या सुविधांचे शिक्षण प्रक्रियेतील शैक्षणिक दृष्टया केले जाणारे उपयोजन म्हणजे शिक्षण. बालकाला जी शिकण्याची ठिकाणे आवडतील तीच खरी शाळा असते बाकी सारी दुकानेच.

शिक्षण ही एक आनंददायी प्रक्रिया

खऱ्या शिक्षणाचा शोध या पुस्तकात कृष्णमूर्तीच्या विचारांचे विवेचन केले आहे. वाकचौरे यांनी स्वतःचे देखील भाष्य व्यक्त केले आहे. शिस्तीसंबंधीची कल्पना सांगताना ते म्हणतात, शिस्त म्हणजे विचार करण्याची प्रेरणा मारून टाकणे नव्हे. केवळ रूढी-परंपरांचे काटेकोरपणे पालन करणे म्हणजे शिस्त समजणे धोकादायक ठरते. शिक्षणाने आपणास काय घडवायचे आहे ? आपण सध्या विशिष्ट पद्धतीने वागणारी, विशिष्ट चाकोरीतून विचार करणारी यंत्रे तर निर्माण करीत नाहीत ना ? याचा गंभीरपणे विचार करायला हवा. शिक्षण जर केवळ यंत्रवत काम करणार असेल तर, त्यातून माणूस घडण्याची शक्यता अजिबात नाही. वास्तविक शिक्षण ही एक आनंददायी प्रक्रिया आहे. विशिष्ट नियमात बांधून चाकोरीतून विशिष्ट प्रकारच्या क्रिया निर्जीवपणे करून विद्यार्थ्यांचे शिक्षण होणार नाही. शिक्षणातून आनंद निर्माण करायचा असेल तर आनंद पेरण्याची गरज आहे. आनंद निर्माण करण्यासाठी ती समग्र व्यवस्थाच आनंददायी असण्याची गरज आहे . तिथे काम करणारी माणसं ही देखील आनंदी असायला हवीत त्यासाठी बरेच काही करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

कृष्णमूर्ती म्हणतात, सरकारला देखील खरी माणसे नको आहेत. त्यांना विशिष्ट कौशल्य प्राप्त केलेली यंत्रे हवी आहेत. संघटित धर्म व सरकार यांना खऱ्या माणसांचा अडथळा वाटत असतो.
‘विनोबांची शिक्षणछाया स !’ आपल्या श्रेष्ठतम परंपरेतील आचार्य विनोबाजींसारख्या महनीय व्यक्तिमत्त्वाचे विचार समजून घेणे अनिवार्य आहे. ही भक्ती, ही तपश्चर्या साधायची असेल आणि स्वतःबरोबर राष्ट्राच्याही विकासास हातभार लावायचा असेल तर जगणं समजून घेतलं पाहिजे. शाळेतून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणार्‍या माहितीलाच ज्ञान समजून आपण केवळ पोट भरायचा विचार करत आहोत. ही कुपमंडुकता सोडून ज्ञानाची साधना सुरू केली तर असे असंख्य ज्ञानवृक्ष तयार होतील.

आचार्य विनोबा भावे यांच्या शैक्षणिक विचारांच्या पैलूचा परामर्श घेताना संदीप वाकचौरे यांचं भाषिक सामर्थ्य दिसून येतं. आजच्या काळाशी सुसंगत मांडणी केली आहे. विनोबांचे विचार सामान्य वाचकाला समजून घेता येतील आणि प्रकांड पंडितांच्या क्षितिजांचाही आणखी विस्तार करतील. विनोबाजींना अपेक्षित ज्ञानशक्ती आणि प्राणशक्तिचा सुंदर मिलाफ या पुस्तकात घडला आहे. आपल्या नावामागे किती पदव्या आहेत ? आपल्याला किती गलेलठ्ठ पगार मिळतो ?

त्यांना विनोबा सोप्या भाषेत विचारतात की, ‘‘तुझ्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या किती गोष्टींची निर्मिती तू करू शकतोस ? म्हणजे जे अन्न तू खातोस ते तू निर्माण करू शकतोस का? शेतीत पेरणीपासून ते धान्य काढण्यापर्यंत तुला काय करता येते? मशागत असू दे, किमान ते धान्य हाती आल्यावर तुला तुझा स्वयंपाक स्वतःला करता येतो का ? तू जे कपडे घालतोस त्याचा धागा तयार करता येतो की ते कपडे शिवता येतात? पायात चप्पल असेल तर ती तयार करता येते का? निदान ती तुटली तर त्याची दुरूस्ती तर करता येते का ?’’ शिक्षणाचा मूलभूत विचार या पुस्तकात वाचायला मिळतो.

जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठात भारत कोठे ?

पाटी पेन्सिल या पुस्तकात विविध अहवालांवर भाष्य करण्यात आले आहे. युनेस्कोचा शिक्षण विषयक अहवाल मांडताना देशात शिक्षणव्यवस्थेत पुरेसे मनुष्यबळ नसेल तर आपण गुणवत्तेचे स्वप्न कसे पाहू शकतो असा रोखठोक सवाल केला आहे. देशातील पाच कोटी मुलांना पायाभूत साक्षरता नसणे याचा अर्थ देशातील गरीबी उंचावणे अशी मांडणी करताना शिक्षणाचे मोल अधोरेखित केले आहे. शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता नाही. त्याचा संबंध दारिद्रयाशी असतो. गरीबी नष्ट करण्यासाठी योजना देऊन काही साध्य होणार नाही. शिक्षण किती मूलगामी आहे अधोरेखित केले आहे. भारतीय शिक्षणाचा विचार करताना जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठात आपले एकही विद्यापीठ नसणे अशा बाबी निदर्शनास आणून देत आपल्या पुढील आव्हाने दर्शित केले आहे.

‘ज्ञानेश्वरी’ हे एक विद्यापीठच

प्रत्येक विश्लेषणात सामाजिकभान आणि शिक्षण यांचा जोडण्यात आलेला संबंध महत्वाचा ठरतो.
शिक्षणाचे पसायदान -ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ हे खर्‍याअर्थी शाश्वत आहेत. विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे मराठीचे पंचप्राण आहेत. ‘अहंकाराचा वारा न लागो राजसा’ असं सांगत या परंपरेनं जो विचार दिला त्यात पुरूषार्थ सामावलेला आहे. ‘विटाळ तो परद्रव्य परनारी । त्यापासूनि दुरी तो सोवळा ॥’ अशी ‘सोवळे’पणाची जगद्गुरू संत तुकाराम महाराजाची व्य़ाख्या कधी समजून घेणार ?, ‘ ठकासी व्हावे ठक ’ हा संत रामदासस्वामींचा विचार आचरणात आणून आपला नेभळटपणा आपण कधी सोडणार ?, ‘दुरितांचे तिमिर जावो’ ही माउलींची विश्वात्मक अपेक्षा आपण कधी आणि कशी पूर्ण करणार ? संदीप वाकचौरे यांच्यातील शिक्षणातील कार्यकर्ता या सगळ्यांचा विचार करून अस्वस्थ होतो. तरूणाईचा वाटाड्या होत त्यांनी ज्ञानेश्वरीतील शिक्षणविचार सोप्या भाषेत आपल्यापुढं मांडला आहे. यातील प्रकरणांची शीर्षके बघितली तरी माउलींच्या व्यासंगापुढे मनोभावे नतमस्तक व्हावे वाटते. ज्ञानेश्वरीवर आजवर अनेकांनी यथायोग्य भाष्य केलेले असताना वाकचौरे त्यातील शिक्षणविचार शोधण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. खरंतर ‘ज्ञानेश्वरी’ हे एक विद्यापीठच आहे. त्यातील शब्द न शब्द आपल्याला शिकवत असतो, प्रेरणा देत असतो. त्यामुळें त्यातून काही ओव्या निवडणे आणि सुसंगतपणे पालक आणि पाल्य यांच्यासाठी अक्षरवाङ्मय निर्माण करणं हे अत्यंत जिकिरीचं काम आहे. वारकरी परंपरेचे पाईक असलेल्या आणि कायम ‘विद्यार्थीमय’ जीवन जगणार्‍या वाकचौरे यांनी हे शिवधनुष्य पूर्ण सामर्थ्यासह पेललं आहे.
शिक्षणाचे दिवास्वप्न हे पुस्तक संर्वासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय विचारवंत गिजूभाई बधेका यांनी बालमनाच्या अनुषंगाने सांगितलेले कवितेच्या ओळीतही मोठे शिक्षणाचे तत्वज्ञान सामावलेले आहे. त्या पुस्तका बालमानसशास्त्राचा विचार अत्यंत सुलभ स्वरूपात मांडण्यात आला आहे. पुस्तकात विविध स्वरूपातील उदाहरणे देऊन बालकांनी संवाद कसा करावा,बालकांना जाणून घेणे किती महत्त्वाचे आहे यासंदर्भाने केलेले विवेचन मोठयांना देखील दृष्टीप्रदान करणारे आहे. पुस्तकातील मानसशास्त्रीय विचाराची अमलबजावणी झाल्यास शिक्षणात मोठे परिवर्तन होईल यात शंका नाही.

शिक्षणातील समस्यावर उपाय

शिक्षणाचे प्रश्नोपनिषद- या पुस्तकात शिक्षणातील अनेक समस्यांवर भाष्य करण्यात आले आहे. मुळात शिक्षणात समस्या आहेत. त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न झाला तर शिक्षणाची गुणवत्ता उंचावू शकते यात शंका नाही. जग आज प्रचंड अशांततेचा अनुभव घेत आहे. जगात मोठ्या प्रमाणावर शस्त्र स्पर्धा आहे. जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था. उदारीकरणाने शिक्षणावर देखील परिणाम झाले आहे. शिक्षणाची गरज अधोरेखित करता गुणवत्तेची वाट चालण्याच्या दृष्टीने अनेक लेखात विविध स्वरूपाची उपायांचे दर्शन होते. गुणवत्ता उंचवायची असेल तर आपल्याला नेमके कोणत्या दिशेने प्रवास करण्याची गरज आहे याबददलही भूमिका प्रतिपादन केली आहे. ही सर्व पुस्तके केवळ शिक्षणातील समस्याचे दर्शन घडवत नाही तर ते उपाय सूचवतात. शिक्षण समस्यामुक्त करता येऊ शकेल असा विश्वास ही पुस्तके मिळून देतात.

त्यांच्या सर्व पुस्तकांची कमान चढती आहे. हा उंचावत गेलेला आलेख समाजाला आणि इथल्या ढिम्म व्यवस्थेलाही खाडकन जागे करणारा आहे. गिजुभाईंचा शिक्षण विचार, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे शिक्षणविषयक चिंतन, कोविडच्या काळातील शिक्षण, नवी शैक्षणिक धोरणे, पालक-बालक-शिक्षक यांची मानसिकता, वर्तमानातील शैक्षणिक आव्हाने, व्यवस्था परिवर्तनाच्या दृष्टिने मूलभूत विचार अशी त्यांची व्याप्ती आहे. ही सारी पुस्तके चपराक प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आली आहे. वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. याही पुढे शिक्षण मालेतील उर्वरीत पुस्तके लवकरच प्रकाशित केली जाणार आहेत. पुस्तके वाचून वाचक अत्यंत चांगला प्रतिसाद देत आहे. एक लेखक, एक प्रकाशक आणि एक विषय अशी प्रकारची मालिका प्रकाशित करण्याचा प्रादेशिक भाषेतील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

लेखक – संदीप वाकचौरे
प्रकाशक – चपराक प्रकाशन, पुणे
किंमत – प्रति पुस्तक 250 रूपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading