खरेच यश म्हणजे काय ? आपली अपेक्षापूर्ती ? अपेक्षा आपल्याकडून जरूर असाव्याच कारण त्याशिवाय आपण कष्ट करत नाही. पण पूर्ण झाल्या नाहीत तर इतके दुःखी होण्याचे पण कारण नाही. शेवटी यश हे गुणावर नाही तर जे काय करू त्यात यशस्वी होण्यात आहे. जे तुमच्या मानण्यावर आहे.
सौ. सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी
बारावीचा रिझल्ट लागला होता. आमच्या समोरचा राजेश छान 92 टक्के गुण मिळवून पास झाला. मी त्याचे अभिनंदन केले तर म्हणाला मला 95 टक्क्यांची अपेक्षा होती. मेरीटमध्ये येईन असे वाटले होते. त्यामुळे नाखुश होता. घरातले सगळे पण तसे नाराज होते. मी म्हटले अरे छान गुण मिळाले. शिवाय तुझा. पुढचा प्रवेश तर स्पर्धा परीक्षेवरच अवलंबून आहे ना ? पण त्याचा मुड काही येईना. नंतर दुपारी माझ्या मामेबहिणीचा मुलगा पेढे घेऊन आला. मावशी हे घ्या पेढे मला 70 टक्के गुण मिळाले. आता सायन्स साईडला प्रवेश निश्चित मिळेल. मला तर 60 टक्के मिळाले तरी ठीक वाटत होते. तो खुश होताच पण घरचेही खुश होते. ते गेले पण.
नंतर स्पर्धा परीक्षेत राजेशला पाहिजे तसे गुण मिळून त्याला हवी तिथे अॅडमिशन मिळाली सुध्दा.. तेव्हा पुन्हा अभिनंदन केले. मनात विचार आला. खरेच यश म्हणजे काय ? आपली अपेक्षापूर्ती ? अपेक्षा आपल्याकडून जरूर असाव्याच कारण त्याशिवाय आपण कष्ट करत नाही. पण पूर्ण झाल्या नाहीत तर इतके दुःखी होण्याचे पण कारण नाही. शेवटी यश हे गुणावर नाही तर जे काय करू त्यात यशस्वी होण्यात आहे. जे तुमच्या मानण्यावर आहे.
यश आणि सुख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखाद्या गरीब माणसाला पंचपक्वान्नाचे जेवण म्हणजे सुख वाटते. त्याला दोन वेळा जेवण मिळण्याची काळजी असते. तर श्रीमंत माणसाला शेतात जाऊन मस्त चुलीवरचे पिठले भाकरी खाणे म्हणजे सुख वाटते. गरीबाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते. त्याला वाटते श्रीमंत माणूस सुखी असणार.. पण श्रीमंताला चोरीची तसेच खूप काम करण्यामुळे दोन घास खायलाही वेळ नसतो. व्यायाम करायचा तर वेळ नाही मग व्याधी जडतात. आणि सगळे असून खाता येत नाही.
कमावलेला पैसा उपभोगता यायला सुध्दा वेळ नसतो. इतकेच काय घरातल्या लोकांसोबत बसायला बोलायला पण वेळ नसतो. पर्यायाने सगळे असून तो सुखी असतोच असे नाही. त्यामुळे वरवर नवीन कपडे दागिने घालून आपण किती मजेत जगतोय हे भासविण्याचा खुपदा तो प्रयत्न असतो. एकुणच जे आहे त्यापेक्षा जे नाही त्याकडे आपण लक्ष देतो आणि दुःखी होत असतो. शिवाय दुसर्याकडे ते आहे म्हणून अजुनच खंत वाटत असते शेवटी यश काय किंवा सुख काय हे मानण्यावर अवलंबून आहे. आणि समर्थ रामदासांनी सांगून ठेवले आहेच की जगी सर्व सुखी असा कोण आहे ?
ज्या दिवशी मीच आहे असे उत्तर कुणाकडून येईल तो सुदिन. अर्थात ते मानण्यावर आहे. खरे तर सुखी माणसाचा सदरा हा आपलाच असतो. पण आपल्याला ते कळत नसते. फक्त घालतांना आपण म्हणायचे असते हाच तो सुखी माणसाचा सदरा. पण प्रत्येकाला समोरच्या माणसाचा सदरा सुखी माणसाचा सदरा वाटत असतो. आहे की नाही गंमत. आणि शेवटी यश किंवा सुख म्हणजे आपल्या मनाचे समाधान हेच खरे.आणि मनाला तुम्ही जशी सवय लावाल तशी लागते. अर्थात याचा अर्थ तुम्ही अल्पसंतुष्ट असावे असा मुळीच नाही. अजून काही करण्याचा प्रयत्न कराच. पण दुसर्याच्या नजरेतून किंवा तुलना करून आपल्या यशाचे किंवा सुखाचे मोजमाप करू नका. बघा पटतेय का ? मानो या न मानो… तुमची मर्जी..
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.