October 16, 2024
water revolution article by Dr Pravin Mahajan
Home » Privacy Policy » जलक्रांती केव्हा…?
मुक्त संवाद

जलक्रांती केव्हा…?

पाण्याबाबतची जलक्रांती केव्हा होणार अन् कशी होणार हा मुख्य प्रश्न उभा आहे. पाणी आणि इतर नैसर्गिक संपदांबाबत मात्र आपली सर्वांचीच भूमिका अगदीच प्राथमिक स्तरावर रेंगाळली आहे.

 डॉ. प्रवीण महाजन

प्रचंड नैसर्गिक संपदा असलेल्या आपल्या देशाने कायम विपदांचा सामना केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात या कॄषीप्रधान देशाने अन्न धान्याच्या तुटवड्याची समस्या अनुभवली. तेच पाण्याचं, तेच वीजेचं, तेच इतर सुविधांचं झालं. पण नंतरच्या काळात सरकार मधील दॄष्टी असलेल्या नेत्यांच्या कल्पकतेतून हरीत क्रांती घडविता आली, हरीत क्रांतीच्या माध्यमातून आपण कॄषी क्षेत्रात सक्षम झालो. स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात जी अन्न धान्याची आयात करावी लागायची ती परिस्थिती बदलून आपण निर्यातीसाठी सज्ज आहोत. आपण नुसतेच स्वंयपूर्ण नसून भरभक्कम निर्यात करीत आहोत. 

श्र्वेतक्रांती मुळे भारत आज दुध व दुग्धजन्य पदार्थामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. नाहीतर भुकटीवर म्हणजे पावडरवर आपण अवलंबून होतो ते आज नाही. आज संगणक क्षेत्रात भारत अग्रेसर राहीला तो रंगविहीन क्रांतीमुळे. साधन, संसाधन आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीतही मागील कालावधीत आम्ही केलेली प्रगती नेत्रदीपक अशीच आहे. 

पण पाण्याचे क्षेत्रात आपण मागे आहोत. पाणी किती उपलब्ध आहे ह्यापेक्षा त्याचे व्यवस्थापन किती उत्कृष्ट आहे ह्यावर समाजाचा विकास अंवलबून असतो. या करीता पाण्याबाबतची जलक्रांती केव्हा होणार अन् कशी होणार हा मुख्य प्रश्न उभा आहे. पाणी आणि इतर नैसर्गिक संपदांबाबत मात्र आपली सर्वांचीच भूमिका अगदीच प्राथमिक स्तरावर रेंगाळली आहे. खरंतर आपली समाजव्यवस्था पाण्याच्या अवतीभवती केंद्रीत राहिली आहे. फार पूर्वी पासून आपली गावं, वस्त्या पाण्याच्या स्त्रोतांभोवती वसल्या आहेत. बव्हतांशी त्या नदी, नाले, तलावांच्या जवळ वसवल्या गेल्या आहेत. आधी पाण्याची सोय, मग इतर सुविधांचा विचार, असाच आमच्या पूर्वजांचा प्राधान्य क्रम राहिला. आता अनेकाच्या कामात आणि विचारांत एक प्रमुख धागा पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपण्याचा राहिला आहे. समाज मात्र जे जे निसर्गाने अमाप दिले आहे, त्याबाबत बेफिकीर झाला आहे. म्हणूनच यासर्वाना या विषयी साक्षर करण्यापासून तर मग पुढे प्रत्यक्ष जलसंवर्धनापर्यंत  घेऊन जावे लागणार आहे. 

महात्मा गांधी यांच्या संदर्भातील एक प्रसंग आहे. एकदा अलाहाबाद येथे असताना एक दिवस सकाळी आंघोळ आटोपल्यावर गांधीजी खूप अस्वस्थ झाले होते. कोणी तरी त्यांना विचारले की काय झाले? इतके अस्वस्थ का दिसताहात? गांधीजी म्हणाले, गड्या आज माझ्या हातून एक चूक घडली. मी आंघोळ करताना वाजवीपेक्षा जास्त पाणी वापरले. सोबतची व्यक्ती खळाळून हसली. म्हणाली, बापू काय बोलता? अहो जिथे गंगा यमुना दुथडी भरून वाहतात अशा अलाहाबादमध्ये आहोत आपण, आणि तुम्ही बादलीभर पाणी,  जास्त वापरलं म्हणून इतके अस्वस्थ झाला आहात? यावर गांधीजी गांभीर्याने म्हणाले, इथल्या गंगा यमुना काही माझ्या एकट्यासाठी वाहात नाहीत. संपूर्ण समाजाचा त्यावर अधिकार आहे. ते काही नाही, मी आज बेजबाबदारपणे लागलो आहे…. गांधीजींच्या या विचारांपासून प्रत्येकाने धडा घेतला तर जलसाक्षरतेचे काम सोपे होईल. 

कायम संगणक आणि मोबाईल फोन भोवती रमणाऱ्या समाजाला पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी झाडं लावणे आवश्यक आहे, पावसाच्या पाण्याचे पूर्नभरण करा. पुढील पीढीच्या भविष्यासाठी पाणी वाचवा, वारेमाप वापर करू नका हे समजावून सांगावे लागते, हे चित्र ही बदलावे लागेल. 

पाणीक्षेत्रात काम करणे फार सोपे नाही. कधी कधी काम करतांना असे वाटते कि आपण वेड्याच्या कारखान्यांत काम करीत आहे एवढं कठीन आहे हे सर्व. पाण्याला किंमत नाही म्हणून समाज बेफिकीर आहे हे चित्र योग्य नाही. आजही महाराष्ट्रातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सिंचन सुविधांच्या अभावामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची संख्या पुरोगामी महाराष्ट्रात दखलपात्र ठरण्याइतकी मोठी असावी हे चित्र काही भूषणावह नाही.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading