December 5, 2024
Among 5 International and 2 Indian Debut Directors for Silver Peacock Award at IFFFY 2024
Home » इफ्फी 2024 मध्ये रौप्य मयूर पुरस्कारासाठी 5 आंतरराष्ट्रीय आणि 2 भारतीय नवोदित दिग्दर्शकांमध्ये चुरस
मनोरंजन

इफ्फी 2024 मध्ये रौप्य मयूर पुरस्कारासाठी 5 आंतरराष्ट्रीय आणि 2 भारतीय नवोदित दिग्दर्शकांमध्ये चुरस

इफ्फी 2024 मध्ये रौप्य मयूर पुरस्कारासाठी 5 आंतरराष्ट्रीय आणि 2 भारतीय नवोदित दिग्दर्शकांमध्ये चुरस

गोवा – 55 व्या इफ्फीमध्ये म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काळजीपूर्वक निवडलेल्या 5 आंतरराष्ट्रीय आणि 2 भारतीय दिग्दर्शकांचे चित्रपट सादर होणार आहेत. चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पणातच असामान्य चित्रपट तयार करणाऱ्या जगभरातील निर्मात्यांना  ‘दिग्दर्शकाची पदार्पणातील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म’ हा पुरस्कार देऊन त्यांच्या प्रतिभेचा गौरव करुन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या श्रेणीतील विजेत्याला प्रतिष्ठित रौप्य मयूर, 10 लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल.

भारतीय चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली सिंगापुरचे दिग्दर्शक आणि पटकथाकार अँथनी चेन, अमेरिकन-ब्रिटीश चित्रपट निर्मात्या एलिझाबेथ कार्लसन, स्पॅनिश निर्माते फ्रान बोर्गिया तसेच ऑस्ट्रेलियाचे संकलक जिल बिलकॉक या ख्यातनाम मान्यवरांचे परीक्षक मंडळ पारितोषिक विजेत्याची निवड करणार आहे.

दर वर्षीप्रमाणेच या वर्षी देखील या पुरस्कारासाठी नामांकने मिळालेल्या चित्रपटांमधून, पदार्पणातच अत्युत्कृष्ट चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांची प्रतिभा दिसून येत असून चित्रपट निर्मात्यांची आगामी पिढी पडद्यावर त्यांच्या संकल्पना कशा पद्धतीने सादर करते याचे उदाहरण पाहायला मिळत आहे.

रौप्य मयूर पुरस्कारासाठी खालील चित्रपटांमध्ये चुरस असणार आहे:

1.  बेतानिया

दिग्दर्शक :मार्सेलो बोट्टा

ब्राझिलचे चित्रपट निर्माते आणि कथाकार मार्सेलो बोट्टा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये या चित्रपटाचा प्रीमियर दाखवण्यात आला.

हा चित्रपट म्हणजे पर्यावरण, समुदाय-जीवन आणि विलक्षणपणा यांच्या गुंतागुंतीच्या संकल्पनांच्या दस्तावेजीकरणासह ब्राझीलच्या वडिलोपार्जित वारशाला वाहिलेली कविता आहे. हा चित्रपट, वाळूच्या टेकडीवर वसलेल्या स्वतःच्या एकाकी गावामध्ये वीजपुरवठा आणण्यासाठी अनेक दशके संघर्ष करणाऱ्या मारिया दो सेल्सो या सामाजिक नेत्या महिलेच्या जीवनावर आधारित आहे.

2.  बाऊंड इन हेवन

दिग्दर्शक: हुओ शिन

चीनचे सुप्रसिद्ध पटकथाकार हुओ शिन यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटाने सॅन सबॅस्टियन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी एफआयपीआरईएससीआय हे ज्युरी पारितोषिक पटकावले आहे.

हा चित्रपट शैली-प्रेरित, प्रणय-गुन्हेगारी प्रकारचा चित्रपट असून यात हिंसा, मृत्यू आणि नातेसंबंध यांचे चित्रण पाहायला मिळते. हिंसक घटनांमध्ये फसलेली महिला आणि जीवघेणा आजार झालेला एक पुरुष अशी दोन एकाकी आयुष्ये योगायोगाने घडलेल्या एका घटनेने एकमेकांशी कशी घट्टपणे बांधली जातात याचे चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते. 

3.  ब्रिंग देम डाऊन

दिग्दर्शक: ख्रिस्तोफर अंड्र्यूज

युकेस्थित पटकथाकार आणि चित्रपट निर्माते ख्रिस्तोफर अंड्र्यूज यांचा पदार्पणातील हा फिचर चित्रपट म्हणजे ग्रामीण आयर्लंडमधील थरारक नाट्य आहे. बॅरी केओघन, ख्रिस्तोफर अॅबोट, पॉल रेडी आणि कोम मीनी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचा प्रीमियर टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झाला.

हा चित्रपट अशा एका आयरिश मेंढपाळ कुटुंबाभोवती फिरतो ज्यामध्ये अंतर्गत कलह, कुटुंबातील वैमनस्य तसेच दुसऱ्या एका शेतकऱ्यासोबत शत्रुत्व, यांसारख्या विविध आघाड्यांवर संघर्ष सुरु आहे. त्या कुटुंबाच्या या प्रवासात हा चित्रपट आयर्लंडच्या सांस्कृतिक लोलकातून वडीलकी, वारसा आणि पिढ्यांतील आघातांचे चक्र यांचे ठळक दर्शन घडवतो.

4. फॅमिलीयर टच

दिग्दर्शक: सारा फ्रेडलँड

अमेरिकन चित्रपट निर्मात्या, पटकथा लेखक, आणि नृत्यदिग्दर्शक सारा फ्रेडलँड यांच्या दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या या चित्रपटाने व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी दिला जाणारा लुईगी डी लॉरेन्टिस पुरस्कार, तसेच व्हेनिस होरायझन्स पुरस्कार: सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि व्हेनिस होरायझन्स पुरस्कार: सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यासह अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.

फॅमिलीयर टच हा वृद्धापकाळ दर्शवणारा चित्रपट आहे. हा चित्रपट एका 8 दशके पार केलेल्या वृद्ध स्त्रीच्या स्वावलंबी जीवनापासून इतरांच्या मदतीने आयुष्य जगण्यापर्यंतच्या संक्रमणाचे आणि या दरम्यान तिच्या बदलत्या स्मृती, वयाची ओळख आणि इच्छा यांच्या सोबतीने स्वतःशी आणि आपल्या काळजीवाहकांबरोबरच्या  तिच्या विवादित नातेसंबंधांचे दर्शन घडवतो.

5. टू अ लॅंड अननोन

दिग्दर्शक: महदी फ्लीफेल

हा चित्रपट निर्माते आणि व्हिज्युअल कलाकार महदी फ्लीफेल यांचा वैशिष्ट्यपूर्ण पदार्पण चित्रपट आहे, ज्याचे  कान चित्रपट महोत्सव 2024 मध्ये प्रदर्शन करण्यात आले होते. आपल्या चित्रकृतींमध्ये सामाजिक न्याय आणि निर्वासितांचे प्रश्न या संकल्पनांवर काम करण्यासाठी महदी फ्लीफेल ओळखले जातात.

रहस्य-नाट्य असणारे या चित्रपटाचे कथानक हे दोन विस्थापित, निर्वासित चुलत भावांबाबत आहे जे चांगले जीवन जगण्याच्या संधी शोधत आहेत.

6. जिप्सी

दिग्दर्शक : शशी चंद्रकांत खंदारे

मराठी चित्रपट निर्माते शशी चंद्रकांत खंदारे यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

विस्थापन, टंचाई आणि भूक या विषयांचे परीक्षण करणारा हा एक मार्मिक चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथानकातील भटके विमुक्त कुटुंब भटकंती करतच आपले दिवस घालवत आहे. त्यांच्या सोबत असणाऱ्या एका गरोदर मातेला या सततच्या भटकंतीत विश्रांतीसाठी झगडावे लागत आहे. तर दुसरीकडे, रोज भीक मागून निकृष्ट, शिळे अन्न खावे लागणारा ‘जोत्या’ हा लहान मुलगा ताज्या-गरम अन्नाच्या गंधाने मोहित  होतो. याच पदार्थाच्या गंधाचे  आकर्षण जेव्हा त्याला त्याचे जीवन बदलण्याची संधी देते तेव्हा चित्रपटाच्या कथानकाला एक नवीन वळण मिळते.

7. 35 चिन्ना कथा काडू

दिग्दर्शक: इमानी व्ही एस नंदा किशोर

तेलुगु फिक्शन  लेखक आणि चित्रपट निर्माते इमानी व्ही एस नंदा किशोर यांनी या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आहे.

हा चित्रपटात  तिरुपती मंदिराजवळील एका सामान्य घरात राहणारी 28 वर्षीय गृहिणी सरस्वती आणि बस कंडक्टर असणारा तिचा पती प्रसाद आणि त्यांची दोन मुले यांच्या भोवती फिरतो. 16 व्या वर्षी सरस्वतीने प्रसादच्या प्रेमापोटी शिक्षणाकडे दुर्लक्ष करून लग्नाचा पर्याय निवडला आहे. तिचे औपचारिक शालेय शिक्षण न घेणे एक आव्हान बनते जेव्हा तिचा दहा वर्षाचा मुलगा अरुण गणित शिकण्यासाठी झगडू लागतो. आपल्या मुलाला मदत करण्याचा निर्धार करून, सरस्वती स्वतः गणित शिकू लागते.  त्यांचा हा प्रवास चिकाटी, कौटुंबिक पाठबळ आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी समुदायाच्या मदतीची शक्ती अधोरेखित करतो.

या नवोदित दिग्दर्शकांनी उदयोन्मुख प्रतिभा , नवीन विचार आणि धाडसी दृष्टी यांनी नटलेले हे चित्रपट खासकरून इफ्फीच्या प्रतिनिधींसाठी आणले आहेत. हे चित्रपट, अवश्य सांगितल्या गेल्या पाहिजेत आणि ऐकल्या गेल्या पाहिजेत अशा कथा प्रेक्षकांसमोर मांडत आहेत. भारताच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उदयोन्मुख प्रतिभेचे प्रदर्शन तुमची वाट पाहत आहे.  या उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना आणि चित्रपटसृष्टीच्या अमर्याद क्षमतांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या महोत्सवात आमच्याबरोबर जल्लोष करत सामिल व्हा.

55 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत गोव्यातील पणजी येथे होणार आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading