नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्यावतीने बाळासाहेब लबडे यांच्या “शेवटची लाओग्राफिया” पुस्तकाला केशवसूत साहित्य पुरस्कार जाहीर
खरे -ढेरे- भोसले महाविद्यालय ,गुहागर. जि. रत्नागिरी. येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या “शेवटची लाओग्राफिया”या कादंबरीस नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्यावतीने मानाचा “केशवसूत साहित्य पुरस्कार जाहीर” करण्यात आला आहे. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी कविवर्य केशवसुत स्मारक समिती यांच्या वतीने कविता अभिवादन सोहळा २९ जानेवारी रोजी मालगुंड केशवसुत स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सोहळ्याचे उद्घाटक प्रा . डॉ . श्रीपाल सबनीस (माजीअध्यक्ष , अ . भा . मराठी सा . संमेलन , पिंपरी अध्यक्ष ) हे असून प्रमुख अतिथी व्यंग्यकवी , पटकथा लेखक , चित्रपट निर्माते ,दिग्दर्शक कविवर्य रामदास फुटाणे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मालगुंडच्या सरपंच श्वेता शेखर खेऊर, ज्येष्ठ कविवर्य अरुण म्हात्रे, केशवसुत स्मारक अध्यक्ष गजानन ( आबा ) पाटील अध्यक्ष , राजेंद्र वाघ हे उपस्थित राहाणार आहेत.
मराठी कादंबरीला नवा आयाम प्राप्त करून देणारी कादंबरी म्हणजे “शेवटची लाओग्राफिया” ही कादंबरी असे ज्येष्ठ समीक्षक मधु मंगेश कर्णिक , पद्मश्री नामदेव कांबळे, डॉ संजय नगरकर ,अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख , भारत सासणे ,ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार बाबाराव मुसळे, चंद्रकांत पालवे, प्राचार्य साईनाथ पाचारणे, धनाजी घोरपडे आदी अनेक मान्यवर समीक्षकांनी शिक्का मोर्तब केला आहे. ही बाळासाहेब लबडे यांची दुसरी नवकादंबरी आहे. या कादंबरीस प्राप्त झालेला हा दुसरा पुरस्कार आहे. जळगाव येथील अथर्व प्रकाशनने ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे.
जादुई वास्तववादाला त्या पलीकडे जात त्याला ऐब्सरडिस्ट फिक्शनची जोड देणारी आणि कादंबरी लेखनाच्या साऱ्या प्रचलित धारणांना छेद देणारी व वाचताना अक्षरशः चक्रावून सोडणारी अपूर्व कादंबरी म्हणजे ‘शेवटची लाओग्राफिया’ कादंबरी होय. बाळासाहेब लबडे यांनी ‘पिपिलिका मुक्तीधाम’ या त्यांच्या पहिल्या प्रयोगशील कादंबरीच्या कितीतरी पुढचा टप्पा येथे गाठला आहे. पारंपरिक लोककथा या सुगम असतात पण जीवनाची विसंगती विविध अंगाने टिपत लोककथेला जादुई वास्तववादात बुडवत न-नाट्य अथवा अधिक नेमकेपणानं सांगायचं झालं तर विसंगत (एब्सर्ड) नाट्यमय रूप देत ती नॉनलिनीयर रीतीने कथन करीत लेखकाने ही कादंबरी लिहिली आहे. स्वप्नात वारंवार येणारा पंख असलेला घोडा, आगंतुक ही निवेदकाचा अल्टर इगो झालेली व विविध रूपात चित्रित झालेली व्यक्तिरेखा, स्मशान, भूत-प्रेताची अघोरी दुनिया, वास्तव जगातला संघर्ष विसरण्यासाठी ग्रीक मिथकाच्या दुनियेत पलायन करीत रमणे… असं काहीसं कथानक, छे- कथानक कसं म्हणायचं एवढी मनाची स्वैर, कधी प्रश्न विचारणाऱ्या तर कधी अंतरंगाचा तळ ढवळून काढणाऱ्या भटकंतीचं या कादंबरीत लेखक गतिमान शैलीत चित्रण करतो. जादुई वास्तव आणि एब्सर्ड फिक्शनच्या एकदम वेगळ्या, अंगावर येणाऱ्या प्रतिमांनी, कथानक व व्यक्तिचित्रणापेक्षा अभिनव कथनशैलीने नटलेली ही कादंबरी बौद्धिक रंजन करून वास्तवाला उजागर करणारी आहे. हा किमान मराठी साहित्यात तरी पहिलाच मस्त जमून आलेला एक नवा प्रयोग आहे. प्रस्तुतची कादंबरी वाचकांच्या बौद्धिक क्षमतेची आणि कलात्मक अभिरुचीची परीक्षा पहाते पण वाचताना आपल्या हाती जीवनाचं महत्वाचं काही एक आकलन होतंय असं वाटलं की मग त्यानंतर ही कादंबरी वाचकांना आपल्या पूर्ण कह्यात घेऊन माणसाच्या निरर्थक जगण्याचे जे तत्वज्ञान उलगडते, ते भन्नाट आहे. मन आणि विचारांवर गारुड करणारे आहे.
– लक्ष्मीकांत देशमुख अ. भा. मराठी साहित्य माजी संमेलनाध्यक्ष