February 19, 2025
Beware! Microplastic particles in rice in India
Home » सावधान ! भारतामधील तांदळामध्ये सूक्ष्मप्लास्टिकचे कण
संशोधन आणि तंत्रज्ञान

सावधान ! भारतामधील तांदळामध्ये सूक्ष्मप्लास्टिकचे कण

भारतामधील तांदळामध्ये सूक्ष्मप्लास्टिकचे कण असल्याचे डॉ. अनिल गोरे आणि सहकाऱ्यांच्या संशोधनाने उघडक

भारतामध्ये तांदळाच्या विविध नमुन्यांत सूक्ष्मप्लास्टिक कण आढळत असल्याचे महत्त्वपूर्ण संशोधन प्रा. डॉ. अनिल ह. गोरे, प्रा. गोविंद भ. कोळेकर, कुमारी पिनल भावसार (PhD संशोधक विद्यार्थिनी), आणि त्यांच्या सहकार्यांनी उघडकीस आणले आहे. प्रा. डॉ. अनिल ह. गोरे हे शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून, मुळचे माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर गावचे रहिवासी आहेत. सध्या ते उका तरसादिया विद्यापीठ, तरसादिया इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल सायन्सेस (TICS), सुरत येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपले शैक्षणिक जीवन आपल्या गावातून सुरू केले असून, दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित संस्थेत त्यांनी पोस्टडॉक्टरल संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या संशोधन कारकिर्दीत त्यांना भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून तरुण वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या संशोधनामध्ये भारतभरातील विविध तांदळाच्या नमुन्यांचे सूक्ष्मप्लास्टिक प्रदूषणासाठी विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासात १०० ग्रॅम तांदळामध्ये सरासरी ३०.८ ± ८.६१ कण सूक्ष्मप्लास्टिक आढळले. हे कण मुख्यतः पारदर्शक फायबर स्वरूपाचे असून, १००-२०० मायक्रोमीटर इतक्या आकाराचे होते. संशोधनाने असे दाखवून दिले की, पॉलीएथिलीन (PE) आणि पॉलीएथिलीन टेरेफ्थेलेट (PET) या प्रकारचे सूक्ष्मप्लास्टिक कण तांदळामध्ये प्रमुख प्रमाणात आढळतात.

हे संशोधन जर्नल ऑफ ह्याझार्डस मटेरिअल्स (Journal of Hazardous Materials) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या अभ्यासाद्वारे तांदळातील सूक्ष्मप्लास्टिक प्रदूषणाच्या ओळखीचा आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. गोरे यांनी नमूद केले की, सूक्ष्मप्लास्टिक हे अत्यंत घातक दूषित घटक आहेत, जे मानव आणि पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण करतात.

संशोधनात आढळले की, बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या तांदळाच्या विविध ब्रॅण्ड्समध्ये सूक्ष्मप्लास्टिक कणांचे प्रमाण आढळते, ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या जसे की कर्करोग, श्वसन विकार, आणि पचनाशी संबंधित विकार उद्भवण्याचा धोका आहे. विशेषतः महिलांचे सूक्ष्मप्लास्टिक सेवन पुरुष आणि मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले, ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

डॉ. गोरे यांनी सूक्ष्मप्लास्टिक कमी करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना तांदळाच्या लागवडीसाठी आणि साठवणुकीसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, दररोजच्या वापरामध्ये तांदूळ व्यवस्थित पाण्याने किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुण्याने त्यातील सूक्ष्मप्लास्टिक कणांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे ते म्हणाले.

या संशोधनामध्ये कुमारी पिनल भावसार (PhD विद्यार्थी), प्रा. यासुहितो शिमाडा (मिई युनिव्हर्सिटी जपान), प्रा. गोविंद कोळेकर (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापू), प्रा. शशिकांत पटोले (खलीफा विद्यापीठ, यूएई), डॉ. सुमित कांबळे (CSMCRI, भावनगर), आणि मंदीप सोलंकी यांचे मोलाचे सहकार्य आणि योगदान लाभले आहे.

सूक्ष्मप्लास्टिक प्रदूषणाच्या ओळखीत भारताला महत्त्वपूर्ण यश मिळवून देणाऱ्या या संशोधनामुळे तांदूळ उत्पादन व आरोग्यासाठी सुरक्षिततेचे नवीन मार्ग उघडले गेले आहेत. पर्यावरणपूरक उपाययोजना आणि शाश्वत जीवनशैली अंगीकारल्यास हा धोका कमी करता येऊ शकतो, असे डॉ. अनिल गोरे यांनी सांगितले.

असे येते तांदळात प्लास्टिक
तांदळात प्लास्टिक येथे कोठून ? हा प्रश्न निश्चितच आपणास पडला असणार. याबद्दल बोलताना प्रा. गोविंद कोळेकर म्हणाले, तांदळाला पॉलिश करण्याच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा यात प्लास्टिक मिसळते. प्रक्रियेमध्ये गरमपणा वाढल्याने प्लास्टिक विरघळते व त्यातून ते तांदळला चिकटून राहाते. हे सहसा पटकण आपल्या लक्षात येत नाही. तसेच सध्या तागाच्या पोत्यात किंवा सुतळ्याच्या पोत्यात (गोण्या) तांदुळ साठवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याऐवजी प्लास्टिक बॅगचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यातूनही प्लास्टिक तांदळात येते. यासाठीच संशोधनासाठी बाजारात उपलब्ध तांदळाचा वापर केला आहे अन् त्यातील प्लास्टिकचे प्रमाण तपासले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading