उन्हाळा आला की हिरव्या चाऱ्याची टंचाई भासू लागते. यासाठी हिरवा चारा जास्तीत जास्त कसा साठविता येऊ शकतो याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. खरीप आणि रब्बी हंगामातच हिरवा चारा उपलब्ध होतो. तो कसा साठवून ठेवायचा याची शास्त्रोक्त पद्धती जाणून घेण्यासाठी हा लेख…
संपर्क- डॉ. बाबासाहेब घुमरे, मो.नं. ७७०९५११७४१
डॉ. विकास कारंडे, मो.नं. ९४२००८०३२३
क्रांतिसिंहनानापाटील, पशुवैदयकियमहाविदयाल,शिरवळ,
ता.खंडाळा जि.सातारा
अशी करा चाऱ्याची साठवण व टिकवण
जनावरांना हिरवा चारा वर्षभर देता आला तर उत्तमच आहे. परंतु ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी खरीप किंवा रब्बी हंगामातच हिरवा चारा उपलब्ध होतो. रब्बी हंगामातही ओलीताच्या जमिनीतच हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे जानेवारी पासून पुढे तो जून पर्यंत जनावरांना हिरवा चारा नसतो. चारा साठवून ठेवण्याची एकच पद्धत आहे व ती म्हणजे चारा वाळवून तो गंजीत रचून ठेवणे परंतु आधुनिक शास्त्रात चारा साठवण्याच्या काही चांगल्या पद्धती आहेत. त्यामुळे चाऱ्याचे पोषण गुण वाळलेल्या चाऱ्या पेक्षा चांगले राहून जनावरेही तो चारा आवडीने खातात. पावसाळ्यात सर्व प्रकारची गवते भरपूर असतात त्यावेळी त्यांचा वापर नसल्याने ते वाया जातात तेच जर आपण सुकवून हिरवी सुकी वैरण किंवा मुरघास तयार करून तो चारा टंचाई असताना वापरू शकतो.
चारा साठवीण्याच्या दोन पद्धती आहेत.
- चारा वाळवून सकस वैरण तयार करणे
- मुरघास बनविणे
१.सुकी वैरण बनविणे:-
हिरवा चारा योग्य वेळी व योग्य प्रकारे वाळवून सुकी वैरण तयार करता येते . अशा प्रकारे सुकीविलेल्या चारा खाण्यास योग्य असतो. सुक्या वैरणीचे दोन प्रकार आहेत.
अ. द्विदल चाऱ्याची सुकी वैरण :-
या प्रकारच्या वैरणी मध्ये प्रथिने, खनिजे व जीवनसत्वे जास्त असतात तसेच हा चारा खाण्यास रुचकर असतो. द्विदल सुकी वैरण बनविण्यासाठी लुसर्न, बरसीम, सोयाबीन, गवार, चवळी इत्यादी पिकांचा वापर करतात.
ब. इतर चाऱ्यापासून सुकी वैरण बनविणे:-
या वैरणीमध्ये द्विदल सुक्या वैरणीच्या तुलनेत प्रथिने , खनिजे व कॅरोटीन चे प्रमाण कमी असते. शिवाय असा चारा कमी रुचकर असतो. या प्रकारात कुरणातील वळलेले गवत, बाजरी, ज्वारी इत्यादी पिकांचा समावेश होतो. परंतु मकाच्या चाऱ्यापासून प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे द्विदल चाऱ्या इतकीच मिळतात.
१. सुकी वैरण बनविण्याची पद्धत :-
हिरवा चारा सुकवून त्यातील पोषक द्रव्ये, खनिजे व जीवनसत्वे टिकविता येतात. उत्तम प्रतिची सुकी वैरण बनविण्याचे यश हे चाऱ्याची कापण्याची वेळ, त्याची वाढ, ऋतुमान व चारा वाळविण्याची पद्धत इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते. चारा फुलोऱ्यात असताना कापल्यास त्यातील पोषक द्रवे जास्तीत जास्त प्रमाणात टिकतात. अशा प्रकारचा चारा बनवतांना त्या चाऱ्यांच्या पानांचा हिरवा रंग जास्तीत जास्त प्रमाणात टिकेल याची काळजी घ्यावी. याशिवाय गवतास बुरशी नसावी व खराब वास ही नसावा. सर्वसाधारण पणे चाऱ्या मध्ये ६५.८५ % पाण्याचे प्रमाण असते. परंतु सुकी वैरण बनवितांना चाऱ्या मध्ये पाण्याचे प्रमाण १५ % च असावे. चारा सुकवीतांनाचारा कापून शेतात पसरून ठेवतात किंवा खांबावर बांधून वाळवितात. चारा वाळवीतांना पाऊस आल्यास जास्त नुकसान होते. म्हणून अशा प्रकारचा चारा सावलीमध्ये वाळवावा.
कृत्रिम पद्धतीने चारा वाळविणे:-
हिरवा चारा कापल्यानंतर वाळवून सुकी वैरण बनवितांना प्रतिकूल हवामानामुळे बऱ्याच अडचणी येतात या करिता यंत्राच्या सहाय्याने हिरवा चारा वाळवून सुकी वैरण बनवितात.अशा प्रकारे चारा सुकवीतांना त्यामधील पाण्याचे प्रमाण १० ते १२ % ठेवतात. यंत्राच्या सहाय्याने हिरवा चारा कोणत्याही हवामानात सुकविता येतो.
मुरघास बनविणे:-
मुरघास म्हणजे हवा विरहीत जागेत फर्मेंटेशन करून साठविलेला चारा होय. या मध्ये हिरव्या चाऱ्यातील सर्व पोषण मुल्ये आहे त्याच प्रमाणात टिकविली जातात. मुरघास बनविण्यासाठी योग्य चारा व योग्य कापणीची वेळ असावी. चारा लवकरात लवकर फुलोऱ्यात येणारा असावा. त्यात पिष्टमय पदार्थ अधिक असावेत. मुरघास बनविण्यासाठी मका या पिकाचा वापर करत असताना मक्याच्या झाडाची खालची एक दोन पाने वळायला लागतात आणि कणसातील पाण्यात चिक तयार होतो तेंव्हा कापणी करावी. बरसीम व लुसर्न ही चारा पिके फुलावर आल्यावर कापणी करावी.
मुरघासाचे खड्डे व त्यांची रचना :–
मुरघासाकरिता खड्ड्यांची रचना , त्यांचा आकार व बांधनीची रचना ही त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती, जमिनीतील पाण्याची पातळी व जनावारंची संख्या इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते. खाड्याच्या भिंती गुळगुळीत असाव्यात. भीतीनं भेगा किंव्हा छिद्रे नसावीत. खाड्याची खोली ही त्या भागातील जमिनीतील पाण्याच्या पातळीवर अवलंबून असते. जेथे पाण्याची पातळी वर असते तेथे जमिनीवर मनोरे बांधावेत. साधारणत: १ घन मीटर म्हणजे १ मीटर लांब ,१ मीटर रुंद व १ मीटर खोल इतक्या आकाराच्या खड्ड्यात १ टन चारा साठवता येतो. जमिनीत खड्डा खोदताना त्याची लांबी ३५ ते १०० मीटर , रुंदी ५ ते ९ मीटर आणि खोली ३ ते ९ मीटर पर्यंत ठेवता येते.
जमिनीवर मनोरा बांधताना त्याची उंची १२ ते ३५ मीटर , व्यास ४ ते ६ मीटर पर्यंत ठेवावा. काही शेतकरी जमिनीवर सिमेंटच्या गोल पाईप उभा करून त्यात चारा साठवू शकतात परंतु त्यात हवा शिरणार नाही याची संपूर्ण काळजी घ्यावी. उथळ खड्डे किंवा चर, खंदकासारखे लांबट खड्डे बनविता येतात. अशा खड्ड्यांची लांबी व रुंदी प्रत्येकी २.४ मीटर ठेवावी. याला ट्रेनच सायलो म्हणतात.
मुरघास खड्डे भरतांना घ्यावयाची काळजी:
चाऱ्याचे पिके फुलोऱ्यात असताना किंवा दाणे भरण्यास सुरुवात होत असतांना पिकांची कापणी करावी व चारा एक दिवस उन्हात वाळू द्यावा.कडबा कुट्टी मशीनच्या साह्याने चाऱ्याचे बारीक १.५ ते २.५ से.मी. एवडे तुकडे करा. मुरघासाचा साफ करून घ्या. तसेच तळाशी आणि बाजूंच्या भिंती यावर पसरले जाईल असे काळ्या रंगाचे प्लास्टिक पसरावे. खड्ड्यांच्या आकारमानापेक्षा हे प्लास्टिक मोठे असावे कारण मुरघास खड्ड्यात चारा भरतांना जमिण्याच्या वर ते १ ते १.५ मीटर पर्यंत भरावा लागतो आणि त्यानंतर त्यावर बाहेर सोडलेले प्लास्टिक अवरानासारखे पसरावे लागते. कुट्टी केलेले तुकडे टाका व प्रत्येक ठार चांगला चोपून घ्या त्यामुळे त्यातील हवा बाहेर निघून जाईल. चाऱ्याचा थर जमिन्याच्या वर १ ते १.५ फुट आल्यावर त्यावर वाळलेले गवत, ऊसाचे पाचट, गव्हाचे काड किंवा पोलीथीन टाकावे व त्यावर शेण मातीचा थर द्यावा त्यामुळे खड्डा पूर्णपणे बंध होईल. हा चारा वाळलेल्या चाऱ्या पेक्षा जास्त पोष्टिक असतो. हिरव्या चाऱ्यातील ८५ % उर्जा या चाऱ्यात असते तर ६० ते ७० % उर्जा वाळलेल्या चाऱ्यात शिल्लक असते. चारा पिक हे दोन महिन्यात कापण्यात येत असल्यामुळे त्या जमिनीवर जास्त पिके घेता येतात. मुरघासाला वाळलेल्या चाऱ्यापेक्षा साठवणूकिला कमी जागा लागते.गवत, टन इत्यादी पासूनही मुरघास बनविता येतो. मुरघास जनावरे आवडे चारा खातात.हा चारा जास्त दिवसापर्यंत टिकवता येतो. कॅरोटीन व प्रथिने ही वाळलेल्या चाऱ्या पेक्षा जास्त असतात.ज्वारी, मका, गजराज व ऊसाचे वाढे इत्यादी पिकांचा मुरघास चांगला बनतो. हिरव्या चारा टंचाई च्या काळात मुरघास हा हिरवा चारा म्हणून जनावरांना खाऊ घालता येतो. जनावरांचे आरोग्य चांगले राहते.
मुरघासाचे तोटे:-
- हिरव्या चाऱ्याचा वाहतूक खर्च हा वाळलेल्या चाऱ्या पेक्षा जास्त होतो.
- मुरघासाच्या खड्ड्यावर व त्याच्या बांधकामावर खर्च जास्त होतो.
- जीवनसत्व “डी” चे प्रमाण कमी होते.
- छोट्या प्रमाणात मुरघास बनवल्यास तो जास्त वाया जातो.
- खराब मुरघास बनल्यास त्यास उग्र येतो.
या पद्धतीचा अवलंब करून आपल्याकडील हिरवा चारा साठवून चांगल्या अवस्थेत जास्त दिवस टिकविता येतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.