March 19, 2024
The mind should be strong like a sunflower tree
Home » आदित्याच्या झाडाप्रमाणे मन सामर्थ्यवान हवे
विश्वाचे आर्त

आदित्याच्या झाडाप्रमाणे मन सामर्थ्यवान हवे

मनात आले तर सर्व काही साध्य करता येते. मनात आले तर जगही जिंकता येते. यासाठी मनाची तशी तयारी करायला हवी. आत्मज्ञान प्राप्तीसाठीही मनाची तयारी असावी लागते. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

आदित्याचीं झाडें । सदा सन्मुख सूर्याकडे ।
तेवीं समोर शत्रूपुढें । होणें सदा ।।८६५।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सूर्याकडे सदा सन्मुख असतात, त्याप्रमाणें शत्रूपुढें नेहमी समोर होणें ( शत्रूला कधी पाठ न दाखविणें)

सुर्यपूल नेहमी सूर्याकडे तोंड करून उभे असते. सूर्याच्या धगीला ते घाबरत नाही. क्षत्रियाचे हे एक लक्षण आहे, पण सध्याच्या युगात हा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा. न भिता, न डगमगता, न घाबरता शत्रूचा सामना करायला हवा. नुसते ताठ उभे राहिले तरी शत्रूची पळता भुई थोडी होते, हे लक्षात घ्यावे. अंगात असा ताठर बाणा हवा.

घरात कुत्रा असेल तर त्या घरात जायला आपण घाबरतो. कुत्रे काहीही करत नाही तरीही भीती असते. ते अंगावर येईल का ? ते चावेल का ? ते भुंकेल का ? असे नाना विचार डोक्यात घोळत असतात. कुत्रे फक्त उभे राहिले तरी समोर जायला भीती वाटते. ते नुसते पाहात असते, पण समोर जाण्याचे धाडस होत नाही, इतकी दहशत कुत्रा निर्माण करतो. कुत्र्याचा ताठरपणा इतका प्रभावी असतो. त्याच्या या व्यक्तिविशेषामुळेच तो घरात पाळतात. घराचे संरक्षण तो करतो. चोरांच्या आहटाने कुत्रा भुंकतो. मालकाला जाग येते. चोरी होण्यापासून संरक्षण होते.

शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी भुजगावणे उभारतो. भुजगावण्यामुळे पक्षी दूर पळतात. धाटातील दाण्यांचे सरक्षण होते. पक्षी शेतात कोणी तरी उभे आहे असे समजून तेथे जात नाहीत. इतका या भुजगावण्याचा प्रभाव आहे. आजार हा माणसाचा शत्रू आहे. मग तो कोणताही असो. सध्याच्या युगात अनेक मानसिक आजार माणसाला जडले आहेत. आजारपणात धीर हेच मोठे औषध आहे. धीर खचला तर आजारपणातून बाहेर येणे कठीण होते. धीर खचता कामा नये. आजाराचा सामना खंबीरपणे करायला हवा, धैर्याने सामोरे जायला हवे.

जो घाबरला तो संपला. भीती मनात उत्पन्न होते. यासाठी मन खंबीर असायला हवे. मन खचू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मनावरच सगळे अवलंबून आहे. मनात आले तर सर्व काही साध्य करता येते. मनात आले तर जगही जिंकता येते. यासाठी मनाची तशी तयारी करायला हवी. आत्मज्ञान प्राप्तीसाठीही मनाची तयारी करावीलागते. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. मन स्थिर झाले की ने चुकत नाही. लक्ष्य साध्य होते. यासाठी मनावर नियंत्रण मिळवायला हवे. आदित्याच्या झाडाप्रमाणे मनालाही सामर्थवान केले पाहीजे.

Related posts

शेत जमीन मोजणी करायची आहे, मग हे वाचा…

आत्मज्ञान प्राप्तीसाठी हवे आत्मरूपी गुरूंचे स्मरण

शासकीय योजनांतून महिलांचे सक्षमीकरण

Leave a Comment