February 5, 2023
Increase water conservation in soil article by rajendra ghorpade
Home » जमिनीची जलसंधारण क्षमता वाढवण्यासाठी…
विश्वाचे आर्त शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जमिनीची जलसंधारण क्षमता वाढवण्यासाठी…

मोठे डेरेदार वृक्ष किंवा निलगिरीसारखे वृक्ष पाणथळ जमिनीत लावल्यास जमिनी क्षारपड होण्याचा धोका टळू शकतो. या संदर्भात अधिक संशोधन होण्याची गरज आहे. निलगिरीऐवजी डेरेदार वृक्ष लागवड करूनही क्षारपडता कमी करता येते का? हे पाहणे गरजेचे आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

पातलेया झाडाचें मूळ । मागुतें सरो नेणेचि जळ ।
जिरालें कां केवळ । तयाचांचि आंगीं ।। 174 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा

ओवीचा अर्थ – झाडाच्या मुळाशी पोचल्यावर मग पाणी जसे मागें सरणें जाणतच नाही. तर केवळ त्याच्याच ठिकाणी जिरते.

पावसाळ्याव्यतिरिक्त इतर ऋतूमध्ये पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची गरज असते. हा भूजलसाठा उन्हाळ्यात उपयोगी ठरतो. पण सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे भूजल पातळी घटत आहे. पाण्याचे प्रदूषणही वाढले आहे. उपलब्ध पाणी पिण्यायोग्य राहत नाही. काविळीसारखे आजार वाढत आहेत. हे प्रदूषण रोखण्यासाठी भूजलपातळीत वाढ ही गरजेची आहे. पडीक जमिनीत पावसाचे पाणी पटकन मुरत नाही. बरेचसे पाणी वाहून जाते. पण वृक्षांच्या परिसरात पाणी जमिनीत लगेच मुरते. झाडामुळे जमिनीची जलसंधारण क्षमता वाढते. मुळामुळे जमिनीत पोकळी निर्माण होते. या पोकळीमुळे जमिनीत पाणी पटकन मुरते. पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरावे यासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे. अधिक वृक्ष असलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा जलद होतो. बरेचसे पाणी वृक्षच शोषून घेतात. हे विचारात घेऊन पाणथळ जमिनी क्षारपड होऊ नयेत यासाठी वृक्ष लागवड केली जाते.

निलगिरीची झाडे भूगर्भातील पाणी वेगाने शोषून घेतात. यासाठी पाणथळ जमिनीच्या बांधावर निलगिरीचे वृक्ष लावण्याची पद्धत आहे. असे केल्यास जमिनी पाणथळ, क्षारपड होण्याचा धोका टळतो. निलगिरी वृक्ष झपाट्याने पाणी शोषून घेत असल्याने पाण्याचा निचरा होतो. पाणथळ जमिनीत पाण्याद्वारे क्षार जमिनीच्या वरच्या थरात येण्याचा धोका अधिक असतो. जमिनीचा वरचा थर क्षारपड होण्याचा धोका असतो. पाणी साचून राहिल्यास व त्याच कालावधीत तापमान वाढल्यास झपाट्याने पाण्याचे बाष्पीभवन होते. या पाण्याबरोबर जमिनीतील क्षार वर येतात व जमिन क्षारपड होते. पाणथळ जमिनीत बाष्पीभवन रोखण्यासाठी व पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाय योजले जातात. जर अशा जमिनीत वृक्षांची लागवड केल्यास दोन्हीही रोखता येणे शक्य आहे.

मोठे डेरेदार वृक्ष किंवा निलगिरीसारखे वृक्ष पाणथळ जमिनीत लावल्यास जमिनी क्षारपड होण्याचा धोका टळू शकतो. या संदर्भात अधिक संशोधन होण्याची गरज आहे. निलगिरीऐवजी डेरेदार वृक्ष लागवड करूनही क्षारपडता कमी करता येते का? हे पाहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनीच आता असे प्रयोग करून पाहण्याची गरज आहे. पूर्वीच्या शेतकऱ्यांत संशोधकवृत्ती होती. शेतकरी विविध प्रयोग करून शेतीमध्ये सुधारणा करत होते. आता नव्या पिढीच्या शेतकऱ्यांनीही हाच मंत्र जोपासायला हवा. शेतकऱ्यांनीच संशोधक संस्था उभ्या करायला हव्यात. नवे तंत्र आत्मसात करण्यासाठी व त्याच्या प्रसारासाठी तसेच नवे तंत्र शोधण्यासाठी याची गरज आहे. हे झाले तरच शेतीमध्ये मोठी प्रगती होईल.

आता या ओवीतील अध्यात्म जाणून घेऊया. आत्माच्या ठिकाणी मन स्थिर झाल्यानंतर मन पुन्हा मागे हटत नाही. ते त्याच्यातच गुंतते त्याच ठिकाणी ते जिरते. आत्मज्ञानाच्या ठिकाणीच मन स्थिर होते. एकदा आत्मज्ञानी झाल्यानंतर पुन्हा मागे हटणे नाही. म्हणजेच एकदा दह्याच ताक झाले तर पुन्हा त्याचे दही होत नाही. पण एक लक्षात घ्या दह्याचे ताक होण्यासाठी ताकाचे विरजण मात्र लागते. म्हणजेच सदगुरु झाल्यानंतर सदगुरू हे विरजण लावण्याचे काम करतात म्हणजेच ते बिज रोवण्याचे काम करतात. आत्मस्वरूप झाल्यानंतर मागे हटणे नाही. त्यातच मग जिरत राहाणे अन् अध्यात्मिक वटवृक्षाची वाढ करत राहाणे.

Related posts

विठ्ठल भक्त सावळाराम…

मसूराच्या एमएसपीत 500 तर मोहरीत 400 रुपयांची वाढ

आत्मरुपी गणेश…

Leave a Comment