April 1, 2023
Arjyreia sharadchadraji new plant discoved by vinod shimple
Home » ‘अर्जिया शरदचंद्रजी’ चा शोध लावणाऱ्या संशोधकांचा गौरव
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘अर्जिया शरदचंद्रजी’ चा शोध लावणाऱ्या संशोधकांचा गौरव

कोल्हापुरातील न्यू कॉलेजमधील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांनी सह्याद्री पर्वत रांगेत नव्या वनस्पतीचा शोध लावला आहे. या वनस्पतीला या संशोधकांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नावे समर्पित केले आहे. या नव्या वनस्पतीचे ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ (Arjyreia sharadchandrajii ) असे त्याचे नामकरण केले आहे. पवार यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबाबत हे समर्पण असल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे. या संशोधकांनी श्री. पवार यांची भेट घेऊन त्यांना एक सुंदर पोर्टेट भेट दिले.

सध्या या वनस्पतीच्या वैद्यकीय गुणधर्मांबाबत शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. प्रशांत अनभुले काम करीत आहेत. याबद्दल श्री पवार यांनी डॉ शिंपले व डॉ अनभुले यांचा गौरव केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, मंत्री हसन मुश्रीफ, प्रवीण गायकवाड, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही एम पाटील, डॉ सागर डेळेकर, निलेश पवार, देऊ भांगे, संजय मिस्किन आदी उपस्थित होते.

गारवेल कुळातील ही वनस्पती असून डॉ. विनोद शिंपले हे गेली वीस वर्षे या कुळातील वनस्पतीचे संशोधक म्हणून जगविख्यात आहेत. आजपर्यंत त्यांनी या गारवेल कुळातील पाच नव्या प्रजातींचा शोध लावला असून जगभरात या संशोधनाला मान्यता मिळाली आहे. ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ या नव्या वनस्पतीचे संशोधन कालिकत विद्यापीठातून प्रकाशित होणाऱ्या ‘रिडीया’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान ग्रंथातून प्रकाशित झाले आहे.

सह्याद्री पर्वताच्या ‘आलमप्रभू देवराई’त या वनस्पतीचा शोध लागला. ही वनस्पती २०१६ मध्ये सर्वप्रथम शोधण्यात आली. त्यावर तीन वर्षे संशोधन केल्यानंतर जगाच्या कोणत्याही भागात असे साधर्म्य व वैशिष्ट्य असलेली वनस्पती अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. संशोधकांना त्यांच्या नावीन्यपूर्ण शोधाला नाव देण्याचा अधिकार मिळतो. जगभरातील वनस्पतितज्ज्ञ या संशोधनाचा सर्वंकष अभ्यास करून संशोधकाने सुचवलेले नाव अंतिम करतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विज्ञान ग्रंथातून हे संशोधन प्रकाशित होते व संबंधित नव्या वनस्पतीला संशोधकाने सुचवलेले नाव बहाल करण्यात येते. हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार केल्यानंतर आता शरद पवार यांना समर्पित केलेल्या ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ या वनस्पतीच्या नव्या प्रजातीला मान्यता मिळाली आहे. या संशोधनास श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे अध्यक्ष के. जी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव यांचे सहकार्य लाभले.

अशी आहे नवी प्रजाती

डॉ. शिंपले व डॉ. लावंड यांनी शरद पवार यांना समर्पित केलेल्या नव्या संशोधित वनस्पतीला जुलै ते सप्टेंबर दरम्यान फुले येतात. तर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान फळे येतात. ही वनस्पती वेलवर्गीय आहे. इतर वेलवर्गीय प्रजातीच्या तुलनेत या वनस्पतीला फळे मोठी येतात. त्यांचा रंग पिवळा असतो. जगभरात या पोटजातीच्या वनस्पती मुख्यत्वे अशिया खंडात सापडतात.

‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ वनस्पतीचे फक्त शंभर वेल आलमप्रभू देवराईत अस्तित्वात असल्याने त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. या वनस्पतीबाबत स्थानिक जनतेत जागृती करून संवर्धन शक्य आहे. या वनस्पतीच्या बियांचे संवर्धन करून त्या इतर भागात रुजविणे काळाची गरज आहे.

डॉ. प्रमोद लावंड

‘अर्जेरिया शरदचंद्रजी’या वनस्पतीच्या गुणधर्मावर संशोधन सुरु आहे. यामध्ये काही औषधी गुणधर्म असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भातील सखोल संशोधन सुरु असून लवकरच याबद्दल काही ठोस मते मांडण्यात येणार आहेत.

– डॉ. प्रशांत अनभुले

Related posts

नर्सरी आणलेली रोपे जगत नाहीत ? यावर उपाय…

बीज संवर्धन, संरक्षणाचे महत्त्व

ताजी भाजी ओळखायची कशी ?

Leave a Comment