अभयारण्यात येणाऱ्या लोकांना प्लॅस्टिक वापरण्यास पूर्ण मज्जाव करायला हवा. याउलट सरकारी अतिथीगृहातच प्लॅस्टिक वस्तू दिमाखात वावरत असतात. मानवाने स्वत: निसर्गावर अतिक्रमण केले. हस्तक्षेप केला. तेवढ्यावर न थांबता तेथे प्लॅस्टिकचा कचरा तेथेच टाकून आपल्या पाऊलखूणा ठेवायला लागला. तो सुखाने, आनंदात निघून जातो. पर्यटनाला गेल्यानंतर आनंद लुटणे जितके आवश्यक आहे, त्यापेक्षा त्याठिकाणी पूर्वीपासून राहणाऱ्या सर्व जीवांचे राहणे दुस्वर होणार नाही, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
ज्यांनी जग बदलले, अशा महत्त्वाच्या आठ शोधातील, पाचवा महत्त्वाचा शोध मानला जातो, तो प्लॅस्टिकचा ! सर्वप्रथम अलेक्झांडर पार्क यांने १८५५ मध्ये प्लॅस्टिकचा शोधले. त्याला प्रथम पार्कसाईन आणि नंतर सेल्युलीड म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर लिओ बेकलँड या अमेरिकन संशोधकाने १८६३ मध्ये विद्युतरोधक प्लॅस्टिक शोधले. प्लॅस्टिकचा टिकाऊपणा आणि उपयुक्तता लक्षात आल्यानंतर प्लॅस्टिक संशोधनाला गती मिळाली. प्लॅस्टिकच्या शोधाने जगाच्या पॅकेजिंगच्या संकल्पना बदलल्या. कापडी पिशवीत, कापडाच्या गाठोड्यातून येणाऱ्या वस्तूही प्लॅस्टिकमध्ये येऊ लागल्या. प्लॅस्टिक जीवनाचा अपरिहार्य घटक बनले. प्लॅस्टिकची एकही वस्तू नाही, असे घर शोधूनही सापडणार नाही. प्लॅस्टिक लवकर कुजत नसल्याने त्याचा कचरा पृथ्वीवर वाढू लागला. कित्येक वर्ष तो तसाच राहात असला, तरी त्याचे हळूहळू विघटन होते. त्याचा काही अंश पाण्यात उतरतो. त्यातून प्लॅस्टिक अंश अन्न, पाणी आणि मीठातून पोटात जातात. प्लॅस्टिक थेट खाल्ल्याने अनेक जनावरे मृत्यूमुखी पडल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. याचे गांभिर्य लक्षात आल्यानंतर अनेक देशांनी प्लॅस्टिक वापरावर बंदी घातली. कायदे केले. तरीही प्लॅस्टिक वापर काही थांबला नाही. समुद्रात आणि मानवी शरीरात प्लॅस्टिकचे अंश सापडल्याचे २०२२ मध्ये संशोधकांनी शोधले आणि सावधानतेचा इशारा दिला.
प्लॅस्टिकचा विचार करण्याचे कारण म्हणजे जागतिक वारसा स्थळ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या लोणार सरोवरातील पाण्यात प्लॅस्टिकचे अंश असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या पाण्यात सोळा प्रकारचे प्लॅस्टिक असल्याचा दावा संशोधक सचिन गोसावी आणि समाधान फुगे यांनी केला. लोणार सरोवर सुमारे पाच लाख वर्षापूर्वी झालेल्या उल्कापातातून तयार झाले असल्याचे मानले जाते. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे यात दुर्मिळ अनेक सूक्ष्मजीव, शैवाल आहेत. हा भाग आणि पाणी पर्यावरण, जीवशास्त्रज्ञांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र तेथील पाणीही प्लॅस्टिक कणांनी प्रदूषीत झाले आहे. हीच चिंतेची बाब आहे. जगात जसे प्लॅस्टिक नसलेले घर सापडत नाही, तसेच जगातील कोणताही भाग प्लॅस्टिकविना राहिलेला नाही.

मानवाची गरज म्हणून त्याने प्लॅस्टिक आपलेसे केले. त्याचे अनिर्बंध उत्पादन आणि वापर सुरू केला. तेल, दुध, तुप, असे सर्व द्रवपदार्थ उत्पादनांचे पॅकिंग आणि विक्री प्लॅस्टिकमधून सुरू झाली. कापडी किंवा सुतळी पिशव्यांऐवजी धान्यही प्लॅस्टिकच्या पिशव्यातून उपलब्ध होऊ लागले. प्लॅस्टिकच्या सहाय्याने वस्तू हवाबंद पद्धतीने पॅक करता येते. त्यामुळेच बडीशेपच्या पुड्या तयार करून विकण्याचा व्यवसाय करण्यास मानव उद्युक्त झाला. पुढे शीतपेयांचा व्यवसाय सुरू झाला. त्यासाठी काचेच्या बाटल्या वापरण्यात येत. शुद्ध पाण्याची उपलब्धता ही लोकांची गरज बनली. त्यासाठीही प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरल्या जाऊ लागल्या. औषधेही प्लॅस्टिकच्या आवरणातून, बाटल्यातून उपलब्ध होऊ लागली. मात्र लहानमोठ्या पदार्थांच्या पॅकिंगसाठी वापरले जाणारे, वापरून झालेले, उपयुक्त नसणारे प्लॅस्टिक पुनर्प्रक्रियेसाठी न पाठवता, गरज संपताच कोठेही फेकून द्यायला सुरुवात झाली.
अशा वापरलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट कशी लावावी ? याचे ज्ञान लोकांना देण्यापूर्वी, जनसामान्यांना याचे भान येण्यापूर्वीच प्लॅस्टिकचा अनिर्बंध वापर सुरू झाला. या प्लॅस्टिकचे पुढे काय होणार याची सर्वसामान्यांना कल्पनाच नव्हती. दुसरे असे की, प्रत्येकाला आपल्याजवळ कचरा नको असतो. त्यामुळे तो निसर्गात कोठेही फेकून दिला जाऊ लागला. या प्लॅस्टिकचे दिर्घकाळ विघटन होत जाते. संशोधकांनी प्लॅस्टिकचे विघटन करण्यासाठी तंत्रज्ञान शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र अद्याप यश मिळालेले नाही. हळूहळू ते विघटीत होत असताना त्याचे अंश मातीत आणि पाण्यात मिसळत जातात. त्यातून पिकामध्ये, अन्नधान्यांमध्ये, दुधात उतरू लागले. त्यातून मानवी शरीरात येते. याची जाणीव मागील दोन वर्षांत संशोधकांना होऊ लागली.
प्लॅस्टिक निसर्गात सर्वदूर पोहोचण्यास कारण ठरले ते पर्यटन. आज पर्यटन हा व्यवसाय झाला. ‘शहाणपणासाठी पर्यटन’ ही संकल्पना मागे पडली. मनोरंजन, विश्रांती आणि उद्योग व्यवसायानिमित्त लोकांचा प्रवास वाढला. प्रवासादरम्यान आवश्यक गोष्टींची खरेदी करण्यात येऊ लागली. या वस्तू प्लॅस्टिकच्या आवरणातून उपलब्ध होऊ लागल्या. वस्तूंचा वापर झाल्यानंतर प्लॅस्टिक आवरणे तेथेच फेकून देण्यात येऊ लागली. चारचाकीतून प्रवास करताना पाणी पिल्यानंतर, रिकामी बाटली लोक रस्त्यावर फेकतानाचे चित्र नित्य दिसू लागले. शहरातील मंडळीसाठी कृषी पर्यटन केंद्रे तयार झाली. हुरडा पार्ट्या, जंगल सफारी, विविध अभयारण्ये येथे लोकांचा वावर वाढला. लोकांचा प्लॅस्टिक वापराबाबतचा दृष्टीकोन निष्काळजीपणाचा असल्याने, रस्ते आणि पर्यटन स्थळे प्लॅस्टिक कचऱ्याची आगार बनली.
लोणार सरोवरातील पाण्यात प्लॅस्टिकचे अंश आढळण्यास पर्यटनच कारणीभूत आहे. त्यामुळेच केरळमधील अब्दूल करीमची आठवण झाली. त्यांनी केवळ बालपणीच्या झाडांच्या आठवणी आणि पत्नीचे माहेर झाडांनी झाकलेले पाहून ३२ एकरात जंगल फुलवले. त्यामध्ये घर बांधले. मात्र मुलांनी तेथे राहायला नकार दिला. ते पत्नीसह तेथे राहू लागले. मोठ्या घराचा उपयोग पर्यटनासाठी सुरू केला. मात्र त्यांनी तेथे येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या प्रवेशद्वारावरच लावण्याची सक्ती केली आहे. संपूर्ण साहित्याची तपासणी करून प्रत्येक प्लॅस्टिकची वस्तू गाडीतच ठेवायला लावतात. गेटपासून घरापर्यंत चालत जावे लागते. जंगलात फिरताना फुले, फांद्या तोडता येत नाहीत. चालताना रस्त्यावरील वाळलेली पानेही बाजूला करता येत नाहीत. पर्यटनाचा व्यवसाय सांभाळताना निसर्गाला धक्का न लागू देण्याची पूर्ण काळजी करीमजी घेतात. परिणामी हे जंगल पूर्ण संरक्षीत आणि सुरक्षीत आहे. या ठिकाणी निसर्ग अभ्यासासाठी देश विदेशातील अनेक विद्यापीठे आपल्या विद्यार्थ्यांना पाठवतात. त्यांनी जंगलाला प्लॅस्टिकपासून पूर्ण मुक्त ठेवले आहे.
निदान सरकारी पर्यटन स्थळांना असे प्लॅस्टिकपासून संरक्षण देण्याची गरज आहे. अभयारण्यात येणाऱ्या लोकांना प्लॅस्टिक वापरण्यास पूर्ण मज्जाव करायला हवा. याउलट सरकारी अतिथीगृहातच प्लॅस्टिक वस्तू दिमाखात वावरत असतात. मानवाने स्वत: निसर्गावर अतिक्रमण केले. हस्तक्षेप केला. तेवढ्यावर न थांबता तेथे प्लॅस्टिकचा कचरा तेथेच टाकून आपल्या पाऊलखूणा ठेवायला लागला. तो सुखाने, आनंदात निघून जातो. पर्यटनाला गेल्यानंतर आनंद लुटणे जितके आवश्यक आहे, त्यापेक्षा त्याठिकाणी पूर्वीपासून राहणाऱ्या सर्व जीवांचे राहणे दुस्वर होणार नाही, याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. निसर्गातील कोणताही भाग अस्वच्छ करण्याचा आपल्याला हक्क नाही. आपण जन्माला आलो तेव्हा पृथ्वी जितकी सुंदर होती, किमान तितकीच सुंदर आपण जाताना असायला हवी, याचे भान ठेवायला हवे. एवढे जरी केले तरी अलेक्झांडर पार्क यांना आपण प्लॅस्टिक शोधल्याबद्दल पश्चाताप होणार नाही.