February 15, 2025
Ash from Burned bad habits use to lighten Spirituality
Home » विकारांच्या होळीत निर्माण झालेल्या राखेने मिळवा आत्मज्ञानाची चकाकी
विश्वाचे आर्त

विकारांच्या होळीत निर्माण झालेल्या राखेने मिळवा आत्मज्ञानाची चकाकी

सदगुरुंच्या आत्मज्ञानाच्या प्रकाशात साधकाने स्वतःच्या आत्म्याची शुद्धी करुन घेऊन आत्मज्ञानाची चकाकी वाढवायला हवी. या चकाकीतून येणाऱ्या अनुभुतीतून आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायचा आहे. यासाठीच मन परिवर्तन हे गरजेचे आहे. मनातील दुष्ट, वासना, मोह, माया या षडविकारांची होळी करून परिवर्तन घडवायला हवे. सदविचाऱ्यांच्या अनुभुतीतून आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायचा आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

जेणें पाहालिये पाहाटे । भेदांची चोरळी फिटे ।
रिघती आत्मानुभववाटे । पांथिक योगी ।।७।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – ज्या गुरुरुपी सूर्याने प्रकाशलेल्या पहाटेच्यावेळी, भेदांची चोरवेळ नाहीशी होते व प्रवास करणारे (आत्मप्राप्तीचा मुक्काम गाठण्याकरिता ध्यानादिक अभ्यास करणारे) साधक आत्मानुभवाच्या वाटेने निघतात.

नैसर्गिक प्रकाश देणारे सूर्य, चंद्र हेच पूर्वजांचे साथी होते. विजेच्या शोधानंतर सूर्य, चंद्राचे पृथ्वीवरील महत्त्व कमी झाले. रात्री आवश्यक वाटणारा चंद्र याचे अस्त्तित्वच आता जाणवत नाही. इतका मनुष्य आज कृत्रिमतेच्या आहारी गेला आहे. सूर्याची उर्जा साठवून रात्रीच्यावेळी प्रकाश पाडला जात आहे. त्याचा उपयोग केला जात आहे. पण हा उपयोग काही कालावधीपुरताच उपयुक्त ठरतो. पुन्हा सुर्याची गरज उर्जा साठवण्यासाठी करावी लागते. आत्मज्ञानाच्या अभ्यासात ठराविक कालावधीपुरते आत्मज्ञान प्राप्त होते. पण तेथे सुद्धा सद्गुरुंची उर्जा लागते. कारण सद्गुरुरुपी सेवा ही सद्गुरुरुपी सूर्य होऊनच पूर्ण होऊ शकते. काही ठराविक अनुभुती आली म्हणजे आपण आत्मज्ञानी झालो असे होत नाही. यासाठी सौरउर्जेचे उपकरण होण्याऐवजी सूर्यच होण्याचा प्रयत्न करायला हवा. भौतिक विकास आणि नैसर्गिक विकास यातील फरक यासाठीच समजून घ्यायला हवा. कर्मकांडातून ठराविक कालावधीपूरते आत्मज्ञान होत असेल पण ते नैसर्गिक नाही याचा विचार करून नैसर्गिक आत्मज्ञानाचा विकास करण्याचा नित्य प्रयत्न करायला हवा. म्हणजे आपण कर्मकांडात गुंतणारच नाही.

भौतिक विकासामुळे मानवाला नैसर्गिक गोष्टींचे महत्त्व कमी वाटू लागले. भौतिक विकास, विज्ञानाने प्रगती जरूर झाली. मानवाच्या वाढत्या गरजा विचारात घेता हा विकास, प्रगती म्हणायचे का हा मोठा प्रश्न आहे. पण बदलत्या काळात काळानुसार गती पकडणे तितकेच गरजेचे आहे. अन्यथा आपण पारतंत्र्यात ढकलले जाऊ हेही तितकेच खरे आहे. पण हे करताना या विकासात पर्यावरणाचा विचार तितक्यात ताकतीने होणे गरजेचे आहे. तो विचार व्यवस्थापनात नसल्याने आज कचऱ्याचे ढिग साचल्याचे पाहायला मिळते आहे. इतक्या मोठ्या विश्वात या छोट्याशा कचऱ्याने काय होते असे म्हणून दुर्लक्ष झाले अन् आज त्याचे डोंगर उभे राहीले आहेत. म्हणजेच विकास करताना सर्वांगिण विचार होणे तितकेच गरजेचे असते. सर्व पैलूवर विचार व्हावा लागतो.

पूर्वीच्याकाळी राजदरबारात आत्मज्ञानी संत, पंडित यांना स्थान होते. राज्यकारभारात राजाला ते काही सुचना करत असत. सर्वांगिण विचार करताना राजाकडून एखादी गोष्ट राहून गेली तर त्याची जाणीव या संताकडून, पंडिताकडून केली जात असे. म्हणजेच सत्तेच्या दरबारात सर्वांगिण विचाराला अधिक महत्त्व होते. त्याची प्रचितीही तत्त्कालिन व्यवस्थापनात, विकासात दिसूनही येते. आत्ताच्या राजवटीत आत्मज्ञानी संतांना दरबारात स्थानच नाही. राजे, राजवाडे खालसा झाली अन् साहजिकच हा विचार मागे पडला. भौतिक विकासाच्या मागे धावताना सदविचारांची जोडच तुटली. अशाने झालेल्या विकासात अनेक त्रृटी राहील्या याचेच परिणाम आज भोगावे लागत आहेत.

गुरुरुपी सूर्याचे यासाठीच महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या प्रकाशात सत्तेतील चोर आपोआपच नष्ट होतात. येथे चोर विचाराने पकडायचा आहे अन् तो विचारानेच मारायचा आहे. म्हणजेच अशा व्यक्तीचे परिवर्तन घडवायचे आहे. परिवर्तनाने सर्व दुष्ट, दुःख नाहीसे करून सुखाचा वर्षाव करायचा आहे. या दुष्ट विचारांची होळी करायची आहे. होळीमध्ये तयार झालेल्या राखेने भांडी घासली तर ती चकाकतात. होळीची राख स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरते. दुष्ट विचाऱ्यांच्या होळीत तयार झालेल्या राखेतून देहरुपी भांड्यातील मनाची स्वच्छता करायची आहे. या मनाला तेजस्वी करायचे आहे. आत्मरुपी मनाच्या शुद्धीतून आत्मज्ञानाची अनुभुती येते.

सदगुरुंच्या आत्मज्ञानाच्या प्रकाशात साधकाने स्वतःच्या आत्म्याची शुद्धी करुन घेऊन आत्मज्ञानाची चकाकी वाढवायला हवी. या चकाकीतून येणाऱ्या अनुभुतीतून आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायचा आहे. यासाठीच मन परिवर्तन हे गरजेचे आहे. मनातील दुष्ट, वासना, मोह, माया या षडविकारांची होळी करून परिवर्तन घडवायला हवे. सदविचाऱ्यांच्या अनुभुतीतून आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायचा आहे. सूर्यासारखे स्वतः प्रकाशमान व्हायचे आहे. सौर उपरकरण न होता स्वतः सूर्य होण्याचा प्रयत्न करायचा आहे. सौर उपकरणाचा जन्म होतो त्याचा मृत्यूही होतो. काही कालावधीनंतर ते नष्ट होते. म्हणजे ते जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलेले आहे. यासाठी सौर उपकरण व्हायचे नाही तर सूर्यच व्हायचे आहे. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे. सूर्यरुपी सदगुरु व्हायचे आहे. सदगुरुंच्या सारखे आत्मज्ञानी व्हायचे आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading