May 26, 2024
Meditatin
Home » सोन्याचा डोंगर, प्रेमाचा डोंगर ( एकतरी ओवी अनुभवावी)
विश्वाचे आर्त

सोन्याचा डोंगर, प्रेमाचा डोंगर ( एकतरी ओवी अनुभवावी)

सोन्याचा डोंगर, प्रेमाचा डोंगर ( एकतरी ओवी अनुभवावी) 

प्रेमाने दिलेल्या भेटवस्तूंचा स्वीकार करणे हा धर्म आहे. या भेटवस्तूचे काय करायचे? मला याची गरज तरी काय ? असे म्हणून त्याचा त्याग केला तर देणाऱ्याला दुःख होणार. दुसऱ्याला सुखी करणे, समाधानी करणे. हा धर्म आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरू ।

ऐसे म्हणो नि अव्हेरू । करणें घडे ।। 625 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ ः एखाद्या मनुष्यास सोन्याचा डोंगर प्राप्त झाला असता हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर आपल्याला घेता येत नाही असे म्हणून सोन्याच्या डोंगराचा त्याग करणे घडेल काय ?

आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टींची प्राप्ती होत असते.  कधी ती धनाच्या स्वरुपात असते तर कधी स्थावर मालमत्तेच्या स्वरुपात असते. फुकट मिळालेल्या गोष्टीचे मोल आपणाला फारसे नसते. पण योग्यवेळी एखाद्या गोष्टीचा लाभ झाला तर ती गोष्ट आपणासाठी अनमोल ठरते. या वस्तू आपणास भेट स्वरुपात मिळतात. कोणी प्रेमाने देतात. तर कोणी मदत म्हणून देत असतात. त्यातही त्याची आपल्याबद्दल आपुलकी असते. आई वडील मुलांना त्यांच्या वाढदिवसादिवशी भेटवस्तू देतात. सद्गुरु सुद्धा प्रेमाने शिष्याला अशा भेट वस्तू देत असतात. मित्र मैत्रिणीसुद्धा आपणास प्रेमाने भेट वस्तू देत असतात. आपण या भेट वस्तू स्वीकारतो. कारण आपले प्रेम असते. एक मैत्रीचे, जिव्हाळ्याचे भावनिक नाते असते. प्रेमापोटी आपण या वस्तू स्वीकारतो. याचा त्याग केला तर देणाऱ्याला याचे निश्चितच दुःख होईल. विश्वरुप दर्शनात तर भगवंत अर्जुनाला संपूर्ण राज्य तुझ्याकडे चालुन आले आहे. असे सांगत आहेत. याचा त्याग करून चालणार नाही ते शोभणारही नाही. याचा त्याग करून युद्धभुमी सोडून गेलास तर अर्जुन आम्हाला भिऊन पळून गेला असे शत्रू म्हणतील. यासाठी याचा त्याग करणे अयोग्य आहे. असे भगवंत अर्जुनाला समजावून सांगत आहेत. कारण मिळाले आहे त्याचा स्वीकार करणे हाच धर्म आहे.  

प्रेमाने दिलेल्या भेटवस्तूंचा स्वीकार करणे हा धर्म आहे. या भेटवस्तूचे काय करायचे? मला याची गरज तरी काय ? असे म्हणून त्याचा त्याग केला तर देणाऱ्याला दुःख होणार. दुसऱ्याला सुखी करणे, समाधानी करणे. हा धर्म आहे.  प्रेमाचा अनादर करणे हे धर्माला शोभणारे नाही. सद्गुरु सुद्धा इच्छा नसतानाही भक्तांच्या प्रेमापोटी त्यांनी दिलेल्या वस्तूंचा स्वीकार करत असतात. उपयोग नाही म्हणून त्याचा त्याग करत नाहीत. प्रेमाने अनेक गोष्टी साध्य होतात. चार प्रेमाचे शब्दही जीवनात मोठा बदल घडवू शकतात. मग प्रेमाने दिलेली भेट वस्तू तुमचे जीवन का बदलवू शकणार नाही ? दुष्टाच्या मनातील दुष्टपणाही प्रेमाने नष्ट करता येतो. दुरावलेल्यांना प्रेमाने जवळ करता येते. यासाठी बोलण्यात, वागण्यात प्रेमाचे चार शब्द असावेत. 

प्रेम ही भक्तीची महत्त्वाची पायरी आहे. अध्यात्मिक विकासातही त्याला महत्त्व आहे. साधनेमध्ये मन स्थिर ठेवण्यास प्रेमाची मोठी मदत होते. प्रेमामुळे मनाचा उत्साह कायम राहातो. सद्गुरुंच्याजवळ तर प्रेमाचा सागरच असतो. या सागरात आपण डुंबायला शिकले पाहीजे. प्रेमाने आंघोळ करून मन स्वच्छ करायला हवे. मनाची स्वच्छता ही अध्यात्मिक विकासासाठी गरजेची आहे. साधना करताना भक्ताला अनेक अनुभव येतात. प्रेमाने सद्गुरु हे शिष्याला शिकवत असतात. साधनेतून आत्मज्ञानाचा लाभ झाला तर त्याचा त्याग करून कसे जालेल. 

एखादी गोष्ट आपणास त्रास देत असेल. कटकटीची असेल तर ती आपण सोडून दिली पाहीजे असे वाटते. पण त्याचा त्याग केला तर ती कटकट कायमची मिटते असे होत नाही. ती कटकट कधी ना कधी त्रासदायक ठरते. यासाठी त्याग न करता आहे त्याचा स्वीकार करून त्यातून मार्ग काढणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. यासाठी त्याग कशाचा करायचा या अभ्यास करायला हवा. त्याग केल्याने समस्या सुटतात असे होत नाही. त्या बळावतात. यासाठी ती समस्या सोडवण्याकडे आपला कल असायला हवा. सोन्याचा डोंगर मिळाला. कदाचित हा त्रासदायकही ठरू शकतो. यातून सोने काढता येणे शक्यही नाही. मग हा घेऊन आपण काय करायचे असे म्हणून आपण त्याचा त्याग केला तर आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार आहे. जे मिळाले आहे त्याचा स्वीकार करून त्यातून विकास करायला शिकले पाहीजे. अध्यात्मिक प्रगती ही टप्प्याने होत असते. सोन्याचा डोंगर मिळाला म्हणजे सर्व काही मिळाले असे होत नाही. आत्मज्ञान झाले तरी त्याचा वापर कसा करायचा याचे ज्ञान असायला हवे. यासाठी मिळाले आहे त्याचा स्वीकार करून वाटचाल करायला हवी. 

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Related posts

समाधी अवस्था म्हणजे काय ?

ज्ञानरुपी तलवारीने छेदा अज्ञान

चांगले विचार हे पेरावे लागतात

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406