कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्याचा आज झालेला प्रयत्न फायरवॉलमुळे असफल ठरला आहे. विद्यापीठाची वेबसाईट सुरक्षित आहे, असे संगणक केंद्राचे संचालक अभिजीत रेडेकर यांनी कळविले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, गुगल सर्च इंजिनद्वारे शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट शोधणाऱ्या व्यक्तींना ‘ही साईट हॅक झाली असण्याची शक्यता आहे,’ अशा स्वरुपाचा संदेश आज दुपारपासून दिसत होता. बिंग, डकडकगो आदी अन्य सर्च इंजिनवर असा संदेश दिसत नव्हता. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून संगणक केंद्रामार्फत फायरवॉल सुरक्षेची तपासणी केली असता काही पृष्ठे हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. या पृष्ठांबाबत खबरदारी घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुगल सर्च इंजिनला ही बाब कळविण्यात आली आहे.
अशा प्रकारे हॅकिंग करण्याचे प्रयत्न जगभरातील हॅकर्सकडून सातत्याने होत असतात. त्यांचे विद्यापीठ संगणक केंद्राकडून सतत मॉनिटरिंग होत असते आणि फायरवॉलद्वारे ते हल्ले परतवूनही लावले जात असतात. त्यातूनही एखादे पृष्ठ प्रभावित झाल्यास अशा प्रकारचा संदेश दिसण्याची शक्यता असते, असेही श्री. रेडेकर यांनी सांगितले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.