पर्यावरण संवर्धनाचा विचार, शुद्धतेचा विचार, जगा व जगू द्या असा मानवतेचा विचार ज्ञानेश्वरीत सांगितला आहे. हे ज्ञानेश्वरांनी केलेले प्रबोधन आचरणात आणून त्याचा प्रसार करायला हवा. तरच खऱ्या अर्थाने आपण विश्वाचा विकास साधू शकू.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
की श्लोक सर्वतीर्थ संघातु । आला श्रीगीतासागर तरंग ।
जे अर्जुन सिंहस्थु । जाला म्हणौनि ।। १६७५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – अर्जुन हा सिंहस्थ झाला. म्हणून हा श्लोकरुपी सर्व तीर्थाचा समुदाय श्री गीतारुपी गंगेत आला.
विज्ञानावर आधारित आपली भारतीय आध्यात्मिक संस्कृती आहे. पण जसा त्याचा अर्थ लावाल तसा त्याचा अर्थ निघतो अशी आपली मराठी भाषा आहे. यामुळेच येथेच गडबड होते. यासाठीच अध्यात्म हे विज्ञानाच्या विचारातून पाहायला हवे. पण तसे होताना दिसत नाही. शब्दशा अर्थ लावून वेगळेच आचरण केले जाते, यातून हाती काहीच लागत नाही. विशेष म्हणजे या आचरणाचा गर्वही केला जातो. पर्यावरण संवर्धनाचा विचार, शुद्धतेचा विचार, जगा व जगू द्या असा मानवतेचा विचार ज्ञानेश्वरीत सांगितला आहे. हे ज्ञानेश्वरांनी केलेले प्रबोधन आचरणात आणून त्याचा प्रसार करायला हवा. तरच खऱ्या अर्थाने आपण विश्वाचा विकास साधू शकू. विश्वाला आदर्श देणारी आपली संस्कृती आहे त्याचे संवर्धन आपण योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.
गंगा स्नानाने पुण्य मिळते. म्हणून लोक गंगेत आंघोळ करायला जातात. कुंभमेळ्यात कुंडात स्नान करतात. पण यातील पाणी अशुद्ध होते. याचे भानही त्यांना नसते. स्नानाने शुद्धी मिळण्याऐवजी अशुद्धी अधिक होते याचा विचारही मनात डोकावत नाही. यासाठी कोणत्या गंगेत स्नान करायला हवे. कोणत्या कुंभात डुंबायला हवे हे लक्षात घ्यायला हवे. तेंव्हाच आपणास त्याचा खरा आनंद प्राप्त होईल. ज्ञानेश्वरांनी गीतारुपी गंगेत स्नान करण्याचा बहुमोल सल्ला दिला आहे. भावी काळात नद्यांचे पावित्र्य जपायचे असेल तर हा ज्ञानेश्वरांचा सल्ला निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. नद्यांचे वाढते प्रदुषण रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात. मग त्यासाठी आपले अध्यात्म शास्त्र, संस्कृतीचा अभ्यास योग्य प्रकारे करायला नको का ? शुद्धतेचा, पावित्र्याचा विचार सांगणारी संस्कृती प्रदुषणाचे समर्थन कसे करेल हे विचारात घ्यायला नको का ?
सिंहस्थ म्हणजे सिंह राशीमध्ये गुरू ग्रहाचा प्रवेश. हा कालावधी १२ वर्षातून एकदाच येतो. हे झाले पंचांगानुसार. महत्त्वाचे म्हणजे सिंहामध्ये गुरुचा प्रवेश आहे. अध्यात्मातील याचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. सध्या आपण शिकण्यासाठी शाळेत जातो. अर्थात शिकण्यासाठी आपण गुरूजवळ जातो. पण अध्यात्मात उलटे आहे. येथे ज्ञानदानासाठी गुरूच शिष्याजवळ जातो. शिष्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी गुरूच शिष्याचा शोध घेतो अन् त्याला त्याच्याजवळ असणाऱ्या गुणांची अनुभुती देतो. शिष्याच्या आयुष्यात गुरुचा प्रवेश आहे. हे सिंहस्थ पर्वच आहे. याचे महत्त्व जाणून घ्यायला हवे.
गुरु-शिष्य परंपरा अखंड ठेवण्यासाठी गुरुलाच शिष्याचा शोध घ्यावा लागतो. ज्ञानदानासाठी योग्य शिष्य असणे आवश्यक आहे. संघातील खेळाडू घडविण्यासाठी खेळाडूंच्या गुणांची चाचपणी संघ व्यवस्थापकांना, प्रशिक्षकांना अर्थात गुरुंना करावी लागते. पात्र खेळाडूलाच संधी द्यावी लागते. अशा खेळाडूंचा शोध हा गुरूला घ्यावा लागतो तरच खऱ्या अर्थाने यशस्वी संघ उभा राहातो. शिष्याच्या आयुष्यात जेंव्हा अशा गुरूचा प्रवेश होतो तेंव्हा त्या शिष्याचे आयुष्यच बदलून जाते. यासाठीच सिंहस्थ पर्वाचे महत्त्व आहे. या पर्वात गुरु शिष्यावर श्लोकरुपी तीर्थांचा वर्षाव करतात. गीतारुपी गंगेत शिष्याला स्नान घडवतात. तेंव्हाच तो शिष्य मग शुद्ध अन् पवित्र होतो. त्याच्यातील सुप्तावस्थेतेतील गुण जागृत होऊन तो आत्मज्ञानी होतो. गुरू शिष्य परंपरा पुढे नेण्यासाठी तो योग्य होतो. अशा या गीतारुपी गंगेत स्नान करून, पवित्र होऊन गंगा प्रदुषणमुक्त ठेवून गंगेची शुद्धता जपायला हवी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.