July 27, 2024
Interview with Rural Novel Writer Krushant Khot
Home » कृष्णात खोत म्हणाले, माझ्या कादंबरीतील वाक्ये लहान आहेत, पण हे कादंबरीत आले कोठून….
गप्पा-टप्पा

कृष्णात खोत म्हणाले, माझ्या कादंबरीतील वाक्ये लहान आहेत, पण हे कादंबरीत आले कोठून….

शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने लेखकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ग्रामीण कादंबरीकार कृष्णात खोत यांच्याशी प्रा. रणधीर शिंदे आणि प्रा. गोमटेश्वर पाटील यांनी संवाद साधला. कृष्णात खोत यांच्या बालपणापासून ते लेखक कसा घडला याचा प्रवास यामध्ये उलघडण्यात आला. त्यांना हे विषय कसे सुचले. यासाठी त्यांनी कोणती मेहनत घेतली. यावर विस्तृत चर्चा झाली. त्याचा हा संपादित अंश व व्हिडिओ…

ग्रामीण कथा लेखक कृष्णात खोत यांच्याशी संवाद

रणधीर शिंदे/गोमटेश्वर पाटील – अनेक नामवंत कादंबऱ्याचे लेखन करणारे कृष्णात खोत यांच्या लिखाणात असणारे वेगळेपण कोठून आले ? आपले बालपण कसे होते ? शिक्षण कोठे झाले ? त्याचा आपल्या लिखाणावर परिणाम झाला का ? लिखाणाची प्रेरणा आपणास कोठून मिळाली ?

कृष्णात खोत – मी ज्या गावात शिकत होतो तेव्हा चौथी पर्यंतच शाळा होती. विशेष म्हणजे एकाच वर्गात चारही इयत्तेचे वर्ग भरत असत. खूपच मनोरंजक असे ते वर्गातील वातावरण असायचे. गावात कोणत्या घराला कुलूप लावलेले आम्ही कधी बालपणी पाहीले नाही. घरात नेण्यासारखे असे काही नसायचे त्यामुळे कुलूप लावायचा प्रश्नच नव्हता. पन्हाळागडाच्या पायथ्याशी गाव असल्याने विशेष दळणवळणाची सुविधा गावामध्ये नव्हती. एसटी म्हणाल तर मी नववी दहावीला आल्यानंतर पाहिली.

पुढील शिक्षण पन्हाळा हायस्कुलमध्ये झाले. आम्ही गडाच्या खालून येत होतो. साहजिकच येताना आमचे पांढरे कपडे मळकटलेले पिवळे पडलेले असत अन् गडावरील मुले चकचकीत पांढऱ्या शुभ्र कपड्यात असायची. त्यामुळे गडावरील अन् गडाखालील मुलांमधील फरक पटकण लक्षात यायचा. आम्ही त्यांच्यामध्ये उठून दिसत होतो. पण शाळेतील ग्रंथालयातील पुस्तके वाचायला फक्त या पांढऱ्या चकचकीत कपड्यातील मुलांना सांगितले जायचे. पण आम्हाला सांगितली नाही म्हणून काहीही बिघडले नाही. पण आज आमच्या शाळेचे ग्रंथालय समृद्ध आहे. सर्व प्रकारची पुस्तके तिथे उपलब्ध आहेत. सगळे वेदपुराण, सगळे रामायणाचे खंड तिथे आहेत. बंगाली लेखकांची अनुवादीत पुस्तके तिथे होती. या सर्वाचा परिणाम माझ्यावर झाला. ही ९३-९४ ची गोष्ट आहे. हे सर्व वाचल्यानंतर आपणही काही लिहू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. कोल्हापूरपासून २० ते २५ किलोमीटवर असणारा आमचा गाव पण तेथे आजही गवतच उगवते. ही डोंगर कपारीत असणारी गावे मागास होती. जिल्हा समृद्ध आहे पण आमचा गाव मागास होता. पण या डोंगरकपारीतून फिरताना आणि वाचन जसे वाढत गेले तसे समजू लागले की आपल्याकडे ऐवज आहे. वाचयला लागल्यानंतर लक्षात आले की आपल्याकडे समृद्ध असा ऐवज आहे. तो आपण अतिशय योग्य पद्धतीने मांडू शकतो. हे लक्षात आले. पहिले ते दहावीपर्यंत व्याकरणाचा तास असतो हे आम्हाला माहीतच नव्हते. आणि आमच्या शिक्षकांनी सांगितलेले कवितेचे अर्थ आज समजून येतात. कारण त्यांनी त्यावेळी वेगळेच अर्थ सांगितले होते. पण एक गोष्ट आहे त्या शिक्षकांच्यामध्ये शिकवण्याची एक तळमळ होती. त्यामुळे मुले शिकली. ही तळमळ आजच्या शिक्षकांमध्ये दिसत नाही. ऐकायच दुसऱ्याच असतं ही कल्पनाच आपल्याकडे संपलेली पाहायला मिळते. माझंच ऐकायचं असतं. हीच कल्पना आता रुजलेली आहे.

रणधीर शिंदे/ गोमटेश्वर पाटील – लेखक म्हणून घडत असताना तुमच्याकडे प्रेरणा कोणत्या होत्या? या लेखनाकडे आपण कसे काय वळला ?

कृष्णात खोत – मी ज्या महाविद्यालयात आज शिकवत आहे त्या महाविद्यालयाचे ग्रंथालय अतिशय समृद्ध आहे. त्यामुळे वाचनाची सवय लागली. वाचन हा लेखकाच रियाज असतो. लेखकाला स्वतःचे काही सापडण्यासाठी वाचन हे असावे लागते. देशोदेशीचे जेव्हा आपण वाचतो तेंव्हा आपल्या लक्षात येऊ लागते की आपल्याकडेही अशाच पद्धतीचे असेच काहीतरी आहे. हे सर्व वाचल्यानंतर लक्षात येऊ लागले की आपण लिहू शकतो. आपल्याकडे असणारे कौशल्य आपण मांडू शकतो. कादंबरी कशी लिहायची हे कुणीही सांगितले नव्हते. याबाबत सर्व अज्ञान होते. पण कधीकधी हे अज्ञानच फायदेशीर ठरते. लिहीलेले लिखाण कोणाकडे वाचायला द्यायचे हे सुद्धा माहीत नव्हते. कादंबरी कशी लिहायची असते याचे कोणतेही तंत्र माहीत नसताना लिहीली. तिला कादंबरी लोक कादंबरी म्हणयला लागल्यानंतर समजलं ही कादंबरी असते. एक याचा फायदा झाला की माझ्या लिखाणाला कुणाचाही दबाव नव्हता. त्यामुळे लेखन करताना मी कोणताही दबाव घेत नाही. आपण लिहीतो ते केवळ आपल्या समाधानासाठी लिहीतो. जे काही समोर दिसते ते लिहीतो. दुसऱ्याला पटो न पटो मला जे वाटते आहे मला ज्या शब्दात व्यक्त व्हावे वाटते तसे मी लिहीत गेलो.

रणधीर शिंदे/ गोमटेश्वर पाटील – एखादा लेखक हा विशिष्ट पद्धतीची कादंबरी लिहीतो आणि पुढे तो तशाच पद्धतीचे लिखाण लिहीत राहातो. पण खोत सर तुमच्या कादंबरीमध्ये प्रत्येकवेळी एक वेगळा विषय पाहायला मिळतो. आपल्या गावठाण, झडझिंबड, रवंदळा, रिंगण अशा या पाचही कादंबऱ्या वेगळ्या विषयाच्या आहेत. प्रत्येक कादंबरीत वेगळी समस्या मांडलेली पाहायला मिळते. पण आता ग्रामीण भाग बदलला आहे. तेव्हा नव्या पिढीकडे तुम्ही कसे पाहाता.

कृष्णात खोत – भौतिक दृष्टीने आता विकास झाला आहे. आज ब्रॅंडेड कपडे, वस्तू आल्या आहेत. पण त्या वस्तू दोनशे रुपयांना मिळतात आणि विस हजारांनाही मिळतात. पण ह्या एकाच बँडच्या वस्तू आहेत. दोघेही म्हणतात मी त्या अमूक एक बँडची वस्तू खरेदी केली आहे. किंमत दोघांचीही वेगळी असेल पण बँड एकच आहे. म्हणजे आता ती वस्तू राहीली नाही तर त्या वस्तूने माणसांची देखील वस्तू केली आहे. माणूस देखील एक वस्तू झाला आहे. वस्तू मी विकत घेतो तेव्हा आपणही विकले जातो. म्हणजे आपल्याकडे माणूस म्हणून बघण्याची जी वृत्ती होती ती आता संपायला लागली आहे. एक नैतिक अधिष्ठान होते ते आता संपत चालले आहे. त्यामुळे आजचा समाज हा एका व्यक्तीचा समाज झाला आहे. मला दोन माणसे चालत नाहीत. मी आणि मीच हा समाज आहे. हा समाज आता खेड्यात आणि शहरात वेगळा राहीला नाही. पण आज सोशल मिडीयामुळे नेतृत्त्व करणे अगदी सोपे वाटायला लागले आहे. गावचा सरपंच व्हा असे पूर्वी चारचौंघांनी सांगायला लागयचे. त्यामुळे ते पद एक जबाबदारीचे पद आहे असे त्याला वाटायचे. पण आता नुकतेच अठरा वर्षे पूर्ण झालेल्या मुलाला वाटते आपण सरपंच व्हायला हवे आणि ते होणे आता काही अवघड वाटत नाही. म्हणजे देशाचा, राज्याचा, गावचा प्रमुख होण्याला आता कोणतीही पात्रता राहीलेली नाही. ही पात्रता आता लागत नसल्याने या गोष्टीचे आता गांभिर्यच राहीलेले नाही. त्यामुळे ही गोष्ट अतिशय धोकादायक आहे. तो त्या पदाला न्याय देऊ शकणार नाही आणि त्या पदाची जबाबदारी पेलवण्याची ताकद नसल्याने हे पद केवळ मिरवण्याचे आहे असे त्याला वाटते. कामा पेक्षा आता मिरवण्याची च पद्धत अधिक दिसत आहे. पूर्वी श्रीमंतीचे प्रदर्शन लोक करत नव्हते. पण आता प्रत्येक गोष्टीचे प्रदर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे एका व्यक्तीचा समाज आता झाला आहे. हे सगळ पकडण आजच्या साहित्यामध्ये आव्हानात्मक आहे. कारण हा डेटा आता विविध पद्धतीचा आहे. हा गोळा करता करता आणि तो एकत्र करून मांडणे हे आव्हानात्मक तर आहेत. पण आवाक्याच्या बाहेरची ही गोष्ट झाली आहे. जागतिक साहित्य हे तुमच्या आसपासचेच आहे. पण ते इतरांपेक्षा वेगळे असते. जगाकडे जे नाही ते तुमच्याकडे असेल तर ते जागतिक साहित्य. जगाकडे आहे जे तुमच्याकडे असेल तर ते जागतिक होऊ शकत नाही. त्याला जागतिक कसे काय म्हणतात हे मला आत्तापर्यंत समजलेले नाही. जगाकडे जे नाही हे तुमच्याजवळ असू शकते, विशेष म्हणजे प्रत्येक माणसाकडे ते असते फक्त ते सापडण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. प्रत्येक लेखक हा ज्याच्यात्याच्यापरिने याचा शोध घेतो.

रणधीर शिंदे/ गोमटेश्वर पाटील – लेखकाचा शोध कसा असतो ? रिंगाण, झिडझिंबाड कादंबरी लिहिण्यासाठी कशा प्रकारे शोध घेतला ?

कृष्णात खोत यांची रिंगाण कादंबरी खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा https://amzn.to/49Yauqs

कृष्णात खोत – ही कादंबरी ही विस्तापितांच्यावर आहे. पण आज आपणच विस्तापित आहोत. चुलीवरच जेवण मिळेल म्हणजे आता आपण गॅसवर जेवण करत आहोत. म्हणजे चुलीवरच्या जेवणाची जागा गॅसने घेतली आहे. म्हणजे आपले चुलीकडून गॅसकडे विस्तापन झाले आहे.

म्हैस रानटी आहे. रानटी म्हैस पाळीव झाली आहे. पण ही पाळीव म्हैसही आता पुन्हा रानटी झाली आहे. 1600 वर्षापूर्वी म्हैस हा प्राणी आपल्याकडे आला. आपल्याकडे आपल्या मेंदूमध्ये अशी एक व्यवस्था आहे जी आपणाला रानटी बनवते. आपल्या असणाऱ्या उत्क्रांतीचा नवउत्क्रातीकडे होणारा प्रवास आहे. म्हणजे आपण पुन्हा त्याकडे जातो. रानटी होतो अन् पुन्हा रानटी होण्याकडे आपला प्रवास सुरु आहे. निसर्गाबद्दल म्हणाल तर झडझिंबडच्यावेळी, रिंगाणवेळी मी चांदोलीच्या अभयारण्यात खूप फिरलो आहे. लेखकाच्यादृष्टीने कोणतीही गोष्ट वाया जात नाही. फिरताना आपण जे टिपतो त्याचा वापर आपण योग्यवेळ आल्यावर करतो. फिरताना एक माणूस म्हणाला या पाळीव म्हैशी आता रानटी झाल्या आहेत. भाषेमध्ये एवढेच तो बोलला पण ते माझ्या मनात इतके पक्के बसले की हा शब्द वर्तुळासारखा माझ्या डोक्यात फिरू लागला. हे रानटी होणे याचा शोध आपणाला घेता आला पाहीजे. त्यानंतर मी धरणग्रस्त वसाहतींना भेटी दिल्या. त्यांच्याशी गप्पा मारल्या. तिथे फिरल्यानंतर इथला पाळीव प्राणी जसा रानटी झाला आहे तसा इथला माणूस सुद्धा आता रानटी होणार आहे. त्यादृष्टीने आता त्याची वाटचाल सुरु आहे. म्हणजे माझ्या कादंबरीत आलेले हे विषय, त्याचे अर्थ हे तिथल्या लोकांनी माझ्या लक्षात आणून दिले आहेत. हे लेखकाच्या हातून सहज घडून जाते. हे काही ठरवून होत नसते.

कृष्णात खोत यांची गावठाण आणि धुळमाती कादंबरी खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://amzn.to/3xV9KFB

रणधीर शिंदे/ गोमटेश्वर पाटील – झिडझिंबाडमध्ये पावसाचे इतके रौद्र रुप आपणास पाहायला मिळते. हा पाऊस रोमँटिक कधी वाटणारच नाही. इतके भयान रुप कृष्णात खोत यांनी मांडला आहे. याबद्दल काय सांगाल…

कृष्णात खोत – मी शेतकरी कुटुंबातील, कष्टकरी कुटुंबातील असल्याने मला या मातीतले, पावसातले कष्टच अधिक भावतात. यातील रोमँटिकपणा मला कधी वाटला नाही. शेतकरी उद्धस्थ होण्यासाठीही पाऊस कारणीभूत आहे आणि तो उभा राहाण्यासाठीही पाऊस कारणीभूत आहे. एकाच महाराष्ट्रात तो वेगवेगळा जाणवतो. कोठे अधिक पडतो तर कोठे पडतच नाही. महाराष्ट्राचे हे प्रश्न समजून घेणे हे लेखकासाठी एक आव्हान असते. भारतात वन नेशन्स हे गप्पा मारायला चांगले वाटते. पण प्रत्यक्षात एक सुरुपणा, एक सारखेपणा एखाद्या गोष्टीत आला की ते बेचव वाटू लागते. जगण्यातही आपणाला निसरपणा वाटू लागतो. यासाठी प्रत्येक ठिकाणचे वेगळेपण टिपता यावला हवे. प्रत्येक गावातला, प्रत्येक खेड्यातला पाऊस हा वेगळा असतो. हे समजून घेता यायला हवे. एकसारखा पाऊस असतोच कसा ? एकसारखेपणा त्यात नसतो. हे पावसाचे अक्राळविक्राळ रूप रोमँटिक कसे वाटेल. निसर्ग काय करू शकतो हे आपणाला बऱ्याचवेळा त्याने दाखवले आहे. यासाठी ते शहाणपण, ही समज जसा तरी यायला हवी. बाल्यावस्थेतून बाहेर यायला हवे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मनमंदिरात तेवणारा काव्यरुपी नंदादीप

सावधान ! बायजुसकडून होत आहे फसवणूक

वटवृक्षास बॅनयन ट्री नाव कसे पडले ? जाणून घ्या…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading