December 4, 2022
Aswasth Kalratriche Durstant book review
Home » मानवतेच्या मूळ भूमीतून उफाळलेला लाव्हा ” अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त “
मुक्त संवाद

मानवतेच्या मूळ भूमीतून उफाळलेला लाव्हा ” अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त “

खरंतर “अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त ” हा काव्य संग्रह म्हणजे रमजान मुलांच्या काळजाची प्रतिकृती आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाल्यास – ती त्यांच्या अस्वस्थ हृदयाची छायांकित प्रत आहे. रमजान व त्यांच्यासारख्या – जिवंत हृदये बाळगणारानी भोगलेल्या असंख्य काळ रात्रिंचे हे दृश्यमान दस्तावेज आहेत.

विनय मिरासे यवतमाळ

काळजातून आलेल्या काळजातल्या कविता, काळजापासून सादर करून – हजारोंची काळीजं काबीज करणारा ‘रमजान मुल्ला’ नावाचा एक तपस्वी कवी – एव्हाना उभ्या महाराष्ट्राच्या काळजातला कवी झालाय. आपली भावभिनी , करुणरम्य, आशयगर्भ व गेयता संपन्न – कथा काव्ये, अत्यंत तन्मयतेने व गोड गळ्याने सादर करून लाखो रसिकांची मने जिंकणारा हा भावकवी कवितेशिवाय देखील लोकांची मने जिंकतो हे त्याच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या अनुभूतीला येते. अशा या शब्दलाघवी, सुरलाघवी, भावलाघवी, व अर्थलाघवी असलेल्या लाडक्या कवीचा “अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त” हा काव्यसंग्रह पुण्याच्या गोल्डन पेज पब्लिकेशनने प्रकाशित केलाय.

अवघ्या मराठी काव्य प्रांताला मिळालेली ही एक अनमोल वैचारिक देणगी आहे. रमजान मुल्ला सारखाच त्यांचा हा काव्यसंग्रह सुद्धा देखणा व लोभस आहे. निर्मळ व नितळ आहे. प्रांजळ व प्रखर आहे. लाघवी व प्रभावी आहे. एकाचवेळी तो भावसंपन्न व आशयसंपन्न आहे. वाचणारांची मने जिंकणारा आणि वाचणाराला आपल्याशी जोडून घेणारा असा तो हृदय मित्र आहे. खरंतर “अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त ” हा काव्य संग्रह म्हणजे रमजान मुलांच्या काळजाची प्रतिकृती आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाल्यास – ती रमजान मुल्ला यांच्या अस्वस्थ हृदयाची छायांकित प्रत आहे. रमजान मुल्ला व त्यांच्यासारख्या – जिवंत ह्रदये बाळगणारानी भोगलेल्या असंख्य काळ रात्रिंचे हे दृश्यमान दस्तावेज आहेत.

मानवता वादाविरुद्ध सुरू असलेल्या – भयावह व अनिष्ट प्रतीक्रांतीचे हे प्रत्ययकारी दृष्टांत म्हणजे – येणाऱ्या अती भयंकर काळाच्या नाद सूचक जागर घंटा आहेत. काळाची पावले न ओळखता – प्रवाह पतीत होणाऱ्या नादान युवांसाठी तो मनोवैज्ञानिक उपचार आहे. काळ रात्रीच्या विनाशा साठी आवश्यक असलेली – हा काव्य संग्रह म्हणजे- सावधानतेची स्मरण गाथा आहे.

रमजान मुल्ला यांचे नाव उच्चारताच – आपल्या मधुर स्वरानी, मोरपंखी शब्दांनी व भावमय सादरीकरणाने रसिकांची मने जिंकणारा एक युवा कवी डोळ्यासमोर उभा राहतो. रमजान मुल्लांचा काव्यसंग्रह माझ्या हाती आला. मी तो वाचला. अन् मी अक्षरश: आतून फाटलो. आतल्याआत रडलो. मनाच्या डोळ्यात जमा झालेले विषादाचे अश्रू आतल्याआत पिवून मी गप्पगार झालो… या देशातल्या प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या या अस्वस्थ काळरात्री – माझ्याही वाट्याला आल्या आहेत. त्या रात्रींचे मुल्लांनी मांडलेले दृष्टांत वाचून, स्मरून मी खोल खोल होत गेलो. या देशातल्या माणसांचे कसे व्हायचे? या चिंतेने मी पोखरला गेलो. दर क्षणी झिजत चाललेल्या माणुसकीने वा माणुसकीच्या क्लेश दायी रहासाने – हा देश तरी जाग्यावर राहील काय? या चिंता प्रश्नाला रमजान मुल्ला यांच्या काव्य संग्रहाने माझ्या मनात जन्माला घातले. मला कांहीं अंशी अपरिचित असलेलं अमानुषतेचे हे जग या संग्रहात बघायला मिळालं.

नित्से नावाच्या एका पाश्चात्य विचारवंताचे एक प्रसिद्ध व खोचक विधान आहे. तो म्हणतो ” माणसाची निर्मिती ही परमेश्वराने केलेली घोडचूक आहे.” मात्र त्याच्याच विधानाचा दुसरा भाग असा आहे की “परमेश्वर ही माणसाची घोडचूक आहे.” माणसांच्या अमानुषपणाच्या अनेक कारणांपैकी – परमेश्वर या शब्दाचा त्याने केलेला विपर्यास वा आपल्या स्वार्थासाठी त्याचा केलेला वापर हेही एक महत्त्वाचे कारण आहे. रमजान मुल्लानी उद्व्युक्त केलेल्या काळरात्री माणसांच्या अमानुषतेचे जे जे दृष्टांत दाखवले आहेत, त्यापैकी बहुतांश दृष्टांत हे – देवधर्म, सत्ता संपत्ती, विषय वासना, व स्वार्थ व भोगवाद ही निर्मिती बीजे बाळगून असलेले आहेत. या सर्व अनिष्ट दृश्टानताना रमजान मुल्ला यांचे पारदर्शक अर्थवाही, परिपृष्ट, चपखल, व भाव गर्भि शब्द लाभल्या मुळे हे दृष्टांत नुसते वाचनीय नव्हेत तर चिंतनीय झाले आहेत. अशा काळ रात्रीनी भय व्याकूळ झालेला हा कवी – मानव जातीवरच्या चाराचारावरील प्रेमाने पराकोटीचा अस्वस्थ झालाय.

” हे कोणते औदासीन्य भरून उरले आहे चराचरात” अशी काळीज खंत म्हणूनच तो व्यक्त करतो.” अस्वस्थपण का छळते आहे मन मेंदूला ” हा त्यांचा काळीज प्रश्न म्हणूनच, आपली ह्रदये चरचर कापत जातो.” भिजल्या सावलीचे दुःख उगाळून द्यावा म्हणतोय लेप सृष्टीला ” हा त्याचा अस्वस्थते वरचा उपाय त्यामुळेच मनाला स्पर्श करतो. केवळ समस्या मांडून व अगतिकता व्यक्त करून स्तब्ध बसणारा – रमजान मुल्ला हा क्लांत कवी नाही. हे या संग्रहातून ठसठशीतपणे लक्षात येते.” कुणाकुणाची काळजी घेणार मी ” असं आक्रंदून म्हणणारा हा शब्दप्रभू कवी – तेवढ्याच उन्मुक्तपने मानवतेची काळजी वाहताना दिसतो. त्याच्या प्रत्येक शब्दात मानवतेवरचं प्रेम, सुचारू व सुयोग्य जगण्या बद्दलची आस्था आणि अमानुष अत्याचाराबद्दल असलेला राग प्रत्ययाला येतो.” माती होई कसणुशी भिजे डोळ्याचं आभाळ ” या छंद बद्ध शब्दात आजच्या मानवी जीवनाचं वास्तव मांडणारा हा कवी माणूस आतून पार भिजला आहे. त्याच्या मनाचं आभाळ मानवते वरच्या प्रेम जलाने चिंब चिंब ओले झाले आहे. त्यामुळे रमजान मुल्लांची एकूण कविता म्हणजे मानवतेचे महद्ग गान आहे. रमजान मुलांची कविता वाचून मला प्रश्न पडला तो असा की रमजान ने कवितेला मोठं केलं की कवितेनं रमजान ला मोठं केलं.

अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत या काव्य संग्रहाच्या मनोगतात – कविश्रेष्ठ रमजान मुल्ला म्हणतात – ” माझ्यातला कवी मरण्या आधी लोक जागे व्हावेत म्हणून हा शब्द प्रपंच .” किंवा माझ्या खऱ्याखुऱ्या अस्सल जगण्याला अधिक धारधार करण्यासाठी हा हट्ट” या दोन्ही विधानातील – खरेखुरे अस्सल जगणे” व लोक जागे व्हावेत म्हणून हे दोन भावप्रयोग म्हणजे रमजान मुल्लालांच्या एकूण कवितेचे प्राणतत्व होय. ” तुम्ही कविता का लिहिता? असा प्रश्न रमजान मुल्ला यांना कोणी विचारला तर या वरील दोन भावप्रयोगात याचे उत्तर मिळते.

खरंतरं रमजान मुल्ला यांनी हे दोन शब्द समुच्च य वापरून समीक्षकांची वा अभासाकांची सोयच करून ठेवली आहे. यातल्या शब्दांना वैश्विक मूल्य आहे. विश्वातील तमाम महापुरुष , तमाम क्रांतिकारक, समाजसुधारक, विचारवंत, महाकवी यांच्या जगण्या भोगण्याच आणि अभिव्यक्त होण्याचं हेच प्रयोजन होतं. आणि असणारा ही. त्यामुळे या अर्थाने रमजान यांची कविता ही वैश्विक कविता ठरते. कारण तिला जग जागवण्याचा व अस्सल जीवन अधिक धारधार करण्याचा ध्यास आहे. हेच तिच्या वैश्र्विक तेचं प्रमाणसूत्र आहे. या कवितेला चळवळीच्या ऱ्हासाची चिंता आहे मानवतेच्या ढासळणाऱ्या बुरुजांची काळजी आहे. ”

चळवळीच्या चालत्या पायात असा कोण ठोकतो खिळा” असा प्रश्न म्हणूनच ती विचारते. बुद्ध गांधी आणि भगतसिंग यांचा योग्य क्रम लावायला ती सुचविते. तेही यामुळेच. या कवितेला नव सृजनाची, विज्ञानवादी जीवन शैलीची आस आहे. अन् त्यासोबतच माणसा माणसातला दुरावा व जगण्या मरण्याचे त्यांचे बिकट होत असलेले प्रश्न हा तिच्या चिंतेचा विषय आहे.” तुमचा नातू मात्र तेंव्हा अंतराळातून धावत येणाऱ्या घोड्याची वाट बघत उपाशी झोपला असेल ” अशी भविष्यवाणी ती या चींतेपोटीच करते. माणसाच्या अती भौतिकतेमुळे त्याची आत्मिक उन्नती थांबली आहे. असा एक सूर अधून मधून निघतो. पण रमजान मुल्ला यांना माणसाच्या आत्मिक उन्नती इतकीच माणसांच्या भुकेची चिंता आहे. अन् हे मानवतेच्या अधिकाधिक जवळ जाणारे आहे. मानवतेचे वहन करणारे आहे.

अस्वस्थ काळारात्रीचे दृष्टांत या काव्य संग्राचे कवी रमजान मुल्ला हे नुसते “एक तुतारी द्या मज आणून ” असे म्हणणारे बोलघेवडे कवी नाहीत. किंबहुना ते नुसते कवी नाहीत तर माणूस कवी आहेत. मानवतावादी कवी असण्यापेक्षा ही माणूस कवी असणे हे माझ्या दृष्टीने अधिक मोलाचं आहे. बरेचजण कवी माणूस असतात. म्हणजे नुसत्याच कविता लिहिणारे माणूस. लिहितात. वाचतात. पाठवतात. छापतात. चर्चा घडवून आणतात. त्या विद्यापीठात लावून घेतात. पुरस्कार मिळवून घेतात, आणि संपतात. पण रमजान मुल्ला आणि त्यांच्या जात कुळीचे कवी अस्सल जीवन जगणारे कवी असल्यामुळे त्यांची कविताही इरसाल असते. ती पुरस्कार वा त्यासाठी जन्मालाच आलेली नसते. उत्स्फूर्तपणे मिळालेले पुरस्कार हा त्यांना मिळालेला तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. परंतु पुरस्कार हे त्या कवितांचं भाग ध्येय नसते.

मानवतेची पुनर्स्थापना मानवाचे उज्ज्वल भवितव्य व सर्व जीवांचे कल्याण हा या अशा अस्सल कवितांचा जीवित भाग असतो. आणि त्यांची पूर्तता हाच त्या कवितांचा सन्मान असतो. कारण या असतात अस्सल जगणाऱ्या अस्सल मनांच्या अस्सल कविता. मानव जातीला सुखी करण्यासाठी व तिला योग्य जीवन मार्ग दाखवण्यासाठी अशा कविता जन्माला आलेल्या असतात. माणसाला सुधरणाऱ्या लोकांना ” माणसांचे” हे जग वेडन ठरवतं. त्या अर्थाने रमजान मुल्ला यांची कविता वेड्या माणसाची कविता म्हणता येईल. पण हा कवीचं नुसता वेडा नाही तर त्याची कविता ही वेडी आहे. माणुसकीच्या अभावाने तिला वेड लागले आहे ते मानवतेच्या रहासणे वाढत्या अमानुष तेन धर्मांध शक्ती च्या उन्मादाने पराकोटीच्या स्वार्थांध प्रवृत्तीला. ” मला सुधारण्याचा ते चांग बांधतात” असं ती म्हणते ते यामुळेच.” ईश्वराच्या घराचा लॉज सारखा वापर करणाऱ्यांचा म्हणूनच तिला राग येतो.” इन्सानियात साठी खरा जिहाद होण्याची म्हणूनच तिला आस लागते.” धर्मापेक्षा भूक मोठी असते हे कटू वास्तव म्हणूनच ती न भिता सांगते. सगळेच मागतात भीक हे प्रखर सत्यही ती अत्यंत बेदरपणे मांडते. व्यवस्थेला रोग म्हणायला ही म्हणूनच ती डरत नाही.

खरंतरं मनव्याच्या अनंत आकाशाला गवसणी घालणारी रमजान मुल्ला यांची कविता म्हणजे बुद्ध, बसवेश्वर, कबीर, तुकाराम, तुकडोजी, कुसुमाग्रज व पैगंबर, येशूच्या कार्य कर्तृत्वाला व काव्य कर्तृत्वाला पुढे नेणारी महान कविता आहे. रमजान मुल्ला यांच्यास्टख्या कवींच्या कविता ह्या काल पुरुषाने आपल्या पोतडीतून काढलेलं मानवी रोगा वरचं दिव्य औषध असते. तो मानवाला जागृत करण्यासाठी कांही मानवता प्रेमी महापुरुषांनी केलेला महा जागर असतो.” कवीने च कावितेवर अत्याचार केल्याची – ती ओढून ताणून ची कथित कविता नसते. ”

पुतळ्याच्या हातात बंदुकीचा आकार कोरण्याचा आत्म ध्यास बाळगणारे हे असे महाकवी अशी कथित कविता प्रसवू शकत नाहीत. तो असतो येरागाबल्यांचा प्रांत. त्यामुळेच ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे सर रमजान मुल्ला यांची प्रस्तावनेत शेख महंमद यांच्याशी बरोबरी दाखवतात. ती पूर्णपणे योग्य वाटते. या प्रस्तावनेत रमजान मुल्ला यांच्या कवितेच्या बाबतील कहाणी हा शब्द उपयोजिला आहे. तो ही तंतोतंत बसतो. कारण रमजान मुल्ला आपल्या कवितेतून – सामाजिक प्रश्नांचा, सामाजिक विकृतीचा, व मानवीय दुःखाचा नुसता उल्लेख करून थांबत नाहीत. त्याविषयीचा आपला अभिप्राय नोंदवून ही ते स्वस्थ बसत नाहीत. तर सामाजिक व्यथा वेदनांना कारणीभूत असलेल्या मानवी प्रवृत्ती वा त्यासंबंधीचे प्रसंगच ते मुळापासून मांडतात. हे असे असेल काय? असा प्रश्नच वाचकांच्या मनात उभा राहण्यासाठी ते जागाच ठेवत नाहीत.

विकृतीचा वा वाईट वर्तनाचा ते प्रत्यक्ष पुरावाच देतात. कारुण्याची कहाणी मांडणारी अनेक कविता असतात. पण विकृतीच्या सक्षिभुत कथा सांगणारी मुल्ला यांची कविता म्हणूनच अगाल वेगळी वाटते. मानवी दुःखांचा उल्लेख करून कवीने त्यावर काव्यमय भाष्य करणे हा पारंपरिक प्रकारच मुल्ला यांनी नाकारला आहे. मुल्ला दुःखांना दाखवत नाहीत. तर त्यांना शरीर देवून वाचकांच्या समोर उभे करतात. मानवी प्रवृत्ती दाखवणाऱ्या प्रसंगाना ते मुळापासून मांडतात. सामाजिक विकृतीचा पार उघडे नागडे करून तिची यथायोग्य चिरफाड करतात. आणि त्यातून वाचकांच्या मनात परिवर्तनाची प्रेरणा निर्माण करतात. क्रूर अमानवी कणव नव्हे तर किळस ते वाचकांच्या मनात निर्माण करतात. आपल्या अनेक कहाण्यातून वाचकांना मानवते कडे झुकवण्याचे काम ते बेमालूमपणे साधतात. त्यामुळेच विकल्या गेलेल्या विचारवंत असोत वा असहाय्यपणे वाट्याला आलेली वेदना सोसत जगणारी शालू असो रमजान मुल्ला त्यांना त्यांच्या जीवन कहाणी सोबत मांडतात. त्यामुळे रमजान मुल्ला यांची कविता ही सामाजिक प्रश्नांची कोरडी काव्य भाष्ये वाटत नाही. तर मानवी वेदनांच्या व त्या वेदनांना कारणीभूत असणाऱ्या प्रवृत्तीच्या काव्य कहाण्या वाटतात. एकाच वेळी वाचकांना कविता आणि कथा यांचा दिव्य अनुभव देण्याचं विलक्षण सामर्थ्य रमजान मुल्ला यांच्या कवितेत आहे. हेच रमजान मुल्ला यांचं वेगळेपण आहे.

मुल्ला आपल्या बहुतेक कविता काहाण्यांच्या रुपात मांडतात. तरीही त्या शब्दबंबाळ होत नाहीत. हे आणखी एक विलक्षण वेगळेपण. अत्यंत कमी, मोजक्या शब्दात आपल्या मनातली सल वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं कसब रमजान मुल्ला यांच्याकडे आहे.”हा खाकी लखोटा राहुद्या तुमच्याजवळ..” तुमचे अस्तित्व संपवणारी शेवटची ओळ मीच लिहीन,” पूर म्हणजे स्वाभिमानाच्या पायातली लाचारी” , विकायला उरते लेकीची मांडी, त्यांच्यामते मी काफिर असावा,” देवांच्या संख्येत एका अंकाने आणखी भर पडेल”- ही आणि आणखी बरीचशी याची ठसठशीत उदाहरणे. आपल्या मनातल्या ज्वाला हा महाकवी अशा लयदार व धारधार शब्द समूहातून वाचकांपुढे ठेवतो. त्यामुळे वाचता वाचता वाचकांची मने पेटतात. निदान नाही तरी त्याला कुणीतरी आपल्याला खडसावतो आहे, कांहीतरी भयानक दाखवतोय असं वाटून त्याला आपल्या यथा तथा जगण्याची जाणीव होते.

खरंतर रमजान मुल्लांच्या कवितांमधून आलेले असले विलक्षण तडफदार शब्दसमुह म्हणजे त्यांच्या अंतःकरणात उसळी मारणाऱ्या अमानुषतेवरच्या रागाचा लाव्हाच. त्यामुळे ही कविता वाचकांच्या मुखात, मेंदूत केवळ न राहता ती थेट मनात जावून वस्ती करते. त्यांच्या मनाचा तळ ढवळून काढते. आपल्या सोसलेपणाची अन् साचलेपणाची त्याला शरम वाटावी असे हे धारधार काव्य आहे.
“माझ्या कवितेतल्या आक्रोशाचा समुद्र होईल अन् तुमच्या गलबताना धडका देईल ” असे कवी म्हणतो ते उगीच नाही. हा प्रचंड आशावाद, ही विजयाची मोठी अभिलाषा, निर्भिडता, निर्धार ओढाताण करून ते लिहिण्यामुळे येतच नसतो. त्यासाठी मन भाजून घ्यावं लागतं. जीवन जळावं लागते. पोळावं लागतं. आणि स्व चा परीघ सोडून समाज जीवनाकडे प्रेरकपणे वळावं लागतं. असेच कवी मग महाकवी होतात. एकूणच रमजान मुल्ला यांचा अस्वस्थ काळ रात्रीं चे दृष्टांत हा काव्य संग्रह म्हणजे – परिवर्तनाच्या लढाईचा बिगुल आहे. साऱ्याच सामाजिक प्रश्नांना , विकृतीना, असामाजिक विष तत्वा ना, अघोरी जुलूम पंथाना आणि स्वयंघोषित सम्राटांना मुळातून उखडून नष्ट करण्याची तीव्र अभिलाषा बाळगणाऱ्या एका सजग कार्यकर्ता कवीच्या या काळजातल्या कविता आहे. या कविता मानवतेच्या शत्रूंना परस्त करून , मानवतेची पुनर्स्थापना करण्यासाठी जन्माला आलेल्या आहेत. माती उकरून सत्य शोधून लेखाजोखा मांडन्याची या कवितांची तयारी आहे.”

मंदिरात रक्त सांडते, आणि धर्मामधून विष पसरते हे भीषण वास्तव बेडरपणे मांडणारी ही योद्धा कवीची लढावू कविता आहे. पाप पुण्याच्या फेऱ्यात अडकवून लोकांमधल्या वाघाची शेळी करण्याचं व्यवस्थेचं षडयंत्र या कवितेने ओळखले आहे. म्हणूनच ती ” हीच क्रांती तुम्ही समजून घ्या ” या शब्दात जनसामान्यांना सावध करते. या कवितेला माकडांचे नव्हे तर माणसांचे राज्य आणायचे आहे. म्हणूनच ती रंजल्या गांजल्या शोषित पीडितांची बाजू घेवून लढते.” कुनबिकीच्या जीवावरच तुम्ही उभारल्या गुढ्या ” अस ती व्यवस्थेला ठणकावून सांगते.” वठल्या झाडावर घरटे बांधत नाहीत पाखरे हे सत्य सांगण्याची तिची तळमळ, मातीने फास घेतल्याचे तिचे दुःख, मातीचा तमाशा झाला, हे सांगण्यातील तिची झळ आणि ” गव्हासोबत किडा रगडला जावू नये हे सुचवण्याची तिची हातोटी – या साऱ्याच बाबी सामान्यतः कवितेत अभावाने आढळणाऱ्या आहेत.

या कवितेला भोगलेपणाचा पाया आहे, जागलेपणाच्या भिंती आहेत. कळकळयुक्त कार्य कर्तुत्वाचे छप्पर आहे. आणि मानवतेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या महा मानवांच्या आशा आकांक्षांचा कळस आहे. त्यामुळे रमजान मुल्ला यांची कविता म्हणजे मानवतेचे मंदिर आहे. दुधा तुपा चं भरपेट खावून ढेकरा देत मांड्या खाजवत केलेले हे कुटाळ कीर्तन नाही. साऱ्या सुखांना आपल्या पायी लोलवत आदर्शच्या गोड गोष्टी सांगण्याचा हा कमावू उद्योग नाही. लोक भुलवणी साठी लुटू पुटीची तलवार हातात घेवून केलेली ही नाटकी लढाई नाही. तर या जगातला प्रत्येक जीव सुखी , समाधानी , सावध सजग व समजदार व्हावा या तीव्र अभिलाशे पोटी मांडलेला हा आकांत आहे. रमजान मुल्ला यांचे हे दृष्टांत काळरात्रींचे आहे. सोनेरी पहाटेचे नक्कीच नाही. मात्र तिच्यात सोनेरी पहाट उगवण्याची ताकत निश्चित आहे.

Related posts

नानायण…

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

झोडपा – झाडीबोलीतील कथासंग्रहातून

Leave a Comment