भाई मंत्री, निलम माणगावे, दीपक जोशी यांना निमशिरगाव साहित्य संमेलनाचे पुरस्कार
१९ नोव्हेबरला साहित्य संमेलनात होणार वितरण
जयसिंगपूर – निमशिरगाव ग्रामस्थ, साहित्य सुधा मंचच्यावतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची येथे घोषणा करण्यात आली. भाई मंत्री (शिरोडा), निलम माणगावे (जयसिंगपूर) आणि दीपक जोशी (पैठण, जि. औरंगाबद) यांना यावर्षी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. येत्या १९ नोव्हेंबर, २०२३ रोजी होणाऱ्या २६ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे. ही माहिती साहित्यासुधा कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी येथे दिली.
गेली २१ वर्षे सामाजिक कार्य, साहित्य, शेती, पाणी, पर्यावरण क्षेत्रातील तीन कार्यकर्त्यांना हे पुरस्कार देण्याची परंपरा आहे. यंदाचा पद्मश्री रत्नाप्पाण्णा कुंभार समाजरत्न पुरस्कार वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि वि. स. खांडेकर यांच्या स्मारकासाठी विशेष योगदान देणारे रघुवीर सिताराम तथा भाई मंत्री यांना देण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक पी. बी. पाटील साहित्यरत्न पुरस्कार जयसिंगपूर येथील ७० हून अधिक पुस्तिकाच्या लेखिका नीलम माणगावे यांना देण्यात येणार आहे. तर कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा शेतकरी राजा पुरस्कार यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील देगांव येथील दीपक जोशी यांना देण्यात येणार आहे. श्री. जोशी यांनी शून्य मशागत तंत्राने कमी खर्चाची शेती विकसित केली आहेत. तसेच आपले तंत्रज्ञान मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले आहे.
येत्या १९ नोव्हेंबर, २०२३ रोजी निमशिरगाव येथे होणाऱ्या २६ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये या पुरस्कारांचे वितरण संमेलनाध्यक्ष वात्रटिकाकार रामदास फुटणे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील, वैभवकाका नायकवडी, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे, एसआयटीचे संचालक अनिलराव बागणे, अशोकराव माने (बापू) आदिच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोल्हापूर येथील धन्वंतरी डा. विश्वनाथ मगदूम आहेत. एकूण चार सत्रात हे संमेलन होत असून उदघाटन सोहळा, परिसंवाद, कथाकथन आणि नव्या-जुन्या कविंची काव्यमैफल होणार आहे.असेही पद्माकर पाटील यांनी सांगितले. यावेळी पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्रा. शांताराम कांबळे, रावसाहेब पुजारी, विजयकुमार बेळंके, अजित सुतार व गोमटेश पाटील उपस्थित होते.