” काळीज विकल्याची गोष्ट ” या कथांच्या संग्रहात ज्येष्ठ कथाकार आसाराम लोमटे यांनी मल्पृष्ठावर लिहिले प्रमाणे अस्सल ग्रामजीवन शब्दांकित झाले आहे. हा कथासंग्रह खेड्यातल्या कष्टाळू स्त्रियांची कणव करतो. तसेच शेतकऱ्याला नाडणाऱ्या, फसवणाऱ्या व्यवस्थेचा धिक्कार ही करतो. नात्या गोत्यात निर्माण होणारे ताण तणाव सामंज्यस्याने सोडवण्याचा अनुभवी सल्ला देतो. घराचे घरपण राखण्यासाठी समजूतदार वागणारी पात्रे या संग्रहातल्या पानापानावर तुम्हाला सापडतील.
रमजान मुल्ला, मो.9372540985.
ramjanmulla6505@gmail.com.
कोणताही कथालेखक घडत असताना त्या कथा लेखकाचा सभोवताल आधी त्याच्याशी अधिक बोलका झालेला असतो. याचं उदाहरणच द्यायचं झाल्यास शंकर पाटील यांची वळीव, ऊन या कथा, दमा मिरासदार यांच्या कथेतली सर्वच पात्रे, व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही अख्खी कादंबरी, व त्यातली पात्रे, त्यांची माणदेशी माणसं मधली सगळीच व्यक्तिचित्रणं आधी अभ्यासायला हवीत. अलीकडच्या पिढीतील सदानंद देशमुख, किरण गुरव, आसाराम लोमटे, कृष्णात खोत, हिम्मत पाटील, बालाजी सुतार, आदी लोकांचं साहित्य देखील अभ्यासायला हवेच. त्याशिवाय तुम्ही चांगली कथा अथवा एकंदर साहित्य लिहू शकणार नाही असं माझे वैयक्तिक मत आहे. आता हे सर्व लेखक हे खेड्याशी संबंधित आहेत. त्यांच्या लेखनात गाव, शिवार, पीक पाणी, झाडे झुडे, पक्षी प्राणी व ग्रामसंस्कृती मधले इतर अनेकविध घटक येतात. त्याच्याच दुसऱ्या बाजूला समांतर चालणारं प्रायोगिक रीतीने आपले लेखन वाचकांच्या पुढ्यात आणणारे लेखक रंगनाथ पठारे, प्रतीक पुरी, बाळासाहेब लबडे, मनोहर सोनवणे यांचंही साहित्य उभं आहे. कोणी काय वाचावं हा वाचकांचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण भारत हा खेड्यांचा देश आहे, त्यामुळे ग्रामीण अधिक वाचले जात असावे.
तर मित्रहो.आप्पासाहेब खोत हे पन्हाळ्या जवळचे जाखले गावचे एक चांगले लेखक आहेत. त्यांच्या एकूण लेखनात गाव – गावकी, देव -देवस्की, श्रद्धा – अंधश्रद्धा, नाती- गोती लोकांचे स्वभाव, संस्कार, मूल्यांची जपणूक, वगैरे गोष्टी ते शिक्षक असल्यामुळे प्रकर्षाने जाणवतात. मुळात ग्रामसंस्कृतीशी आपली नाळ जोडून घेतलेले निवृत्त शिक्षक म्हणून त्यांचा व त्यांच्या साहित्याचा विचार व्हायला हवा. ते कथाकथन करतात.त्यामुळे त्यांच्या शब्दकळेवर आपसूकच व्यासपीठावरील संस्कार झाले आहेत पण ते अनवधानाने. त्यामुळे प्रायोगिक लेखनाची अपेक्षा त्यांच्याकडून करणे हे दुरापास्त आहे. पण ते ज्याच्यात मास्टर आहेत ते लेखन त्यांनी उंचीवर नेलेच आहे. त्यांचं लेखन वाचायला प्रायोगिक वाचक नाही. कारण तो वाचक मुळात अल्प आहे. पण त्यांना बहुसंख्य वाचक आहे हे सत्यच.
त्यांचं नुकतंच आलेलं “काळीज विकल्याची गोष्ट” या शीर्षकाचा संग्रह एकटाकी वाचून काढला. परंपरेच्या चौकटीत राहून विझत निघालेल्या ग्राम संस्कृतीचे दर्शन त्यांच्या कथांमधून होते. शीर्षक कथा ही जीवापाड जपलेल्या व दुष्काळा मुळे पर्याय नसल्यामुळे नाईलाज होवून विकाव्या लागणाऱ्या बैलजोडीची कथा आहे. माझी बैलं खात्या पित्या चांगल्या घरात देईन, पण खाटकाला विकणार नाही हे या कथेतले अंतिम सूत्र आहे. परिस्थितीने हतबल झालेला कथेचा नायक खोत यांनी चांगला रेखाटला आहे. जनावरांच्या बाजारातले अस्सल चित्रण आले आहे. कांहीं तपशील टाकून ही कथा एका वेगळ्या उंचीवर देखील नेता आली असती असे वाटले.पण जोडकाम करणे बहुदा लेखकाला मान्य नसावे त्यामुळे साधा सरळ आलेला अनुभव त्यानी छान पद्धतीने रेखाटला आहे..
“वडाची पारंबी” ही कथा मंगलच्या मनाची उद्विग्न अवस्था टिपते. एक अर्भक सोडून निवर्तलेल्या तिच्या बहिणीची पोकळी भरून काढणे, त्यासाठी तिने जन्म दिलेले अर्भक सांभाळणे हे आपले कर्तव्य आहे असे ती मानते. त्यासाठी ती आपले ठरलेले लग्न मोडून आपल्या दाजी बरोबर लग्न करून घ्यायला देखील तयार होते. बाळाचे रडू थांबवण्यासाठी आपला कोरडा स्तन ती बाळाच्या तोंडात देते. त्याच वेळी चांगल्या ठिकाणी ठरलेले आपले लग्न मोडावेच यासाठी ती येणाऱ्या प्रसंगाना धैर्याने सामोरे जाते. एकाचवेळी ममत्व, धैर्य, व त्याग यांचा तिहेरी संगम या कथेत झालेला जाणवतो.
“दूध आणि फॅट” ही कथा गावात दुधसंस्थेत सुरू असलेला भ्रष्टाचार उघडा करते. दूध संस्था चालक दूध उत्पादकांची कशा रीतीने पिळवणूक करतात ते सदर कथा दर्शवते. त्यातून दुग्ध उत्पादक किती अगतिक होतो, व नागवला जातो याचं जिवंत चित्रण या कथेतून आलेलं आहे. यावर उपाय नाही. जसा एड्स व कॅन्सर वर उपाय नसतो तसाच हा तळापर्यंत फैलावलेला भ्रष्टाचार असल्याचा प्रश्न ही कथा व्यवस्थेला विचारते.
“लोकरी मावा” ही कथा ऊस शेतकऱ्याचा गंभीर प्रश्न मांडते. सरदार कदम या पदवीधर शेतकऱ्याची व्यथा ही कथा उलगडत नेते. चारी बाजूंनी संकटांनी वेढलेला शेतकरी हतबल होताना आत्महत्येचा विचार करतो तसा तो विचारही सत्यात उतरण्याचा प्रयत्न करतो. पण त्याची बायको रत्ना त्याला धीर देते. व त्याला संकटाला न भिता सामोरे जायचे असते, लढायचे असते हे निक्षून सांगते.
“गावपांढरीची नाळ” ही कथा आयुष्य खेड्यात गेलेल्या सोनामावशीची आहे. जिचा जीव गावा शिवारात, तिथल्या माणसात, रीती रीवाजात अडकला आहे. पण पतीच्या निधना नंतर सून व मुलगा तिला पुण्याला फ्लॅट संस्कृतीत नेतात. त्यावेळी तिला गावाकडचा गोतावळा आठवत राहतो. सूनेने व मुलाने कितीही सेवा केली तरी तिचा जीव तिथे रमत नाही. कारण तिची नाळ गावाकडच्या मातीशी जोडलेली आहे. तिची होणारी कुचंबणा ती बोलूही शकत नाही अन् पुढे चालुही शकत नाही अशी तिची अवस्था झाली आहे.
ग्राम संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली शेती करणे, अन् पिकवणे किती जिकिरीचे काम झाले आहे याचं चित्रण “पेरणी” या कथेत आले आहे. पट्टीचा पेरक्या असलेला हंबीर वासनांध आहे. त्याची नजर लक्ष्मी बाबत चांगली नाही. पेरणीच्या निमित्ताने तो तिच्या घराकडे चकरा मारतो. अन् लक्ष्मी आपल्या जाळ्यात सापडते का ते पाहतो. पण त्यालाही बिलंदर लक्ष्मी भेटते. अन् त्याच्या होरा हाणून पाडते. पेरणीला तो येणार नाही याची खात्री झाल्याने तिने स्वतःच त्यासाठीची तयारी केली. असे साधारण या कथेचे कथानक आहे. पण” घातींन पेरा व्हायचा असेल तर शेताला बांधाचा अन् बाईला कुंकवाचा आधार पाहिजे” हे कथेतले वाक्य खूप स्पर्शून जाते.
“समज” ही कथा समाजाचं स्वास्थ्य बिघडू नये म्हणून आपली इमानेइतभारे पोलिसाची ड्युटी करणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्याविषयी आहे. डोंगरात, घाटात शिरून प्रेमी युगुलं प्रेमिक चाळे करत असतात. त्यांच्यावर वचक ठेवणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. पण ही प्रकरणं व्यवस्थित हाताळली गेली नाहीत तर गावात भांडण तंटा वाढून प्रकरणं हाणामारी व खून करण्यापर्यंत जाऊ शकतात. त्यासाठी वेळीच त्यावर समज देवून सोडण्याचा, व भविष्याविषयीची जाणिव करुन देण्याचा प्रयत्न कांहीं मोजके अधिकारी करतात. अशा अधिकाऱ्यांची संख्या वाढायला हवी. यासाठी ही कथा महत्त्वाची आहे.
“बांधावरचं झाड” ही कथा दोन भावांच्या शेतीतिढ्या विषयी आहे. यातला एक भाऊ समंजस तर दुसरा कुरापती काढून त्रास देणारा आहे. बबनने आईला पोटगी न दिल्याने आनंदा समजुतीने आईला सांभाळतो. आपण एकटाच मुलगा असतो तर आपण तिला सांभाळले असतेच की.. या न्यायाने तो मोडता घेतो. पण शेतात एक कुरीभर अलीकडे आनंदाच्या हिश्यात बबनने बांध घातलाय. पण वाद नको म्हणून आपल्या हिश्शात आनंदाने आंब्याचे झाड लावून ते वाढवले. पण झाडाला आंबे लगडलेले बघून बबन ची पोरं दांडगावा करतात. ती देखील त्याच्याच वळणाची निघालेली बघून आनंदा व्यथित होतो. कांहीं लोकांचा सुंभ जळतो पण पिळ तसाच राहतो. यापुढे चांगले लोक हतबल होतात असे ही कथा निदर्शनास आणून देते.
“न जुळलेली लग्नपत्रिका” ही नव्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाची कथा आहे. एका विशिष्ट वर्गाने समाज आपल्या अधिपत्याखाली रहावा यासाठी लग्नात पत्रिका बघून गुण जुळवण्याचे फॅड आणले. मंगळ, शनीची पिडा वगैरे भाकड गोष्टींची भीती घालून त्यापाठीमागे मोठ्या आर्थिक उलाढाली देखील होतात. खरंतर समाजाने आता बदलायला हवे. सगळे गुण व्यवस्थित जुळून देखील लग्नाची प्रकरणं घटस्फोट घेण्यापर्यंत गेली आहेत. वा अपघात होवून दोघेही संपले आहेत. मग पत्रिका जुळून फायदा काय? वगैरे वगैरे प्रश्न या कथेतून उपस्थित केले गेले आहेत. त्यासाठी संतोष ने पुढाकार घेवून आपली बाजू मांडली. व त्यावरचा उपाय सांगितला. जो सगळ्या समाजाचे डोळे उघडणारा उपाय आहे.
“घुसमट” ही कथा जुन्या व नव्या पिढीतल्या व्यवहारी संघर्षाची कथा आहे. एकाच घरात राहून आपलीच मुलं किती परक्यासारखे असतात याचं प्रत्यंतर या कथेत आले आहे. आयुष्यभर हाडाची काडं करून आईबाप मुलांना वाढवतात. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करतात. पण मुलं आपल्या विश्वात मश्गूल होऊन नव्या भयाण काळाचा भाग होऊन जातात. यात भरडून निघतो तो घरातला वृद्ध. त्याची आतल्या आत होणारी घुसमट खूपच भयानक असते हे वास्तव या कथेत आले आहे.
“तडजोड” ही कथा शेतात तणनाशक फवारणाऱ्या प्रामाणिक अर्जुन कापसे या तरुणाची आहे. तीस रुपये पंप या दराने स्वतः औषध फवारणी करून तो आपली गुजराण करत असताना अचानक गावात भाड्याने चार्जिंग पंप मिळण्याची व्यवस्था सुरू होते. व अर्जुनाच्या धंद्याला खीळ बसते. त्यातून तो खचून जातो. पण त्याला उभारी देणारी त्याची बायको नंदा ही या कथेची नायिका आहे. डॉक्टरांनी नवीन पंप घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे वचन देताच तिला झालेला आनंद सांगताना खोत यांनी “चहा न घेताच तिच्या तोंडी जिभेवर चहाची चव रेंगाळत होती”अशी सूचकता आणली आहे.
“खुशाली” ही कथा बळीराम या ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्याची आहे. उसाचे अतिरिक्त उत्पादन झाल्यावर कारखाना, चिटबॉय, तोडणी मजूर, ट्रॅक्टर ड्रायव्हर हे लोक शेतकऱ्याला खुशाली च्या नावाखाली किती अन् कसे भरडतात ते या कथेत आले आहे. सांगता येत नाही असे अवघड जाग्याचे दुखणे शेतकऱ्याला होऊन बसते. खरंच शेती करणे किती अवघड आहे त्याचे प्रत्यंतर या कथेत येते. आपणच पिकविलेला ऊस पेटवून द्यायचा अन् मगच तोडणी करायची अशी जगावेगळी पद्धती कशी अस्तित्वात येते याचं चित्रण कथेत सुरसपणे आले आहे.
“घरपण” ही या संग्रहातली एक वेगळी कथा आहे. केवळ आई बाप अन् मुलगा या तिघांचं संभाषण, व त्यातूनच उलगडत जाणारे कथानक असा भन्नाट प्रयोग या कथेत केला गेला आहे. शिक्षिका असलेल्या सुनेचे माहेरी रुसून जाणे व घराचे घरपण फुटू नये म्हणून आपल्या मुलाला समजावून सांगत, सुनेला घरला परत घेऊन ये असे म्हणणारे सासू सासरे या कथेत दिसतात. तर घराची प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी शिक्षण हीच अत्यंत गरजेची गोष्ट आहे असे या कथेतून ठासून सांगितले आहे.
“सोपा मार्ग” ही या कथा संग्रहातली अखेरची कथा. पावसाळ्याच्या दिवसात नदीला महापूर येऊन व एम आय डी सी मधून दूषित पाणी नदीत सोडल्यामुळे गावागावात रोगराई पसरते. अशा वेळी हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गाचे खूप हाल होतात. दिनकर मांगलंकर आजारी पडतो. त्याची बायको विमल त्याला घेऊन डॉ उत्तम महापुरे यांच्या दवाखान्यात जाते. तिथे दिनकरवर उपचार होतात. तो बरा होतो. पण दवाखान्याचे झालेले बिल भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात. अशावेळी धूर्त असलेला दत्तू सेक्रेटरी हा विमल ला घरची व्यायला झालेली म्हैस थोडक्या पैशात द्यायला सांगतो. अडचणीत सापडलेल्या विमल पुढे पर्याय नसतो. जीवावर दगड ठेवून त्याला म्हैशीचे दावे सोपवतानाचा भावनिक प्रसंग कथेत आला आहे.
एकंदरीत ” काळीज विकल्याची गोष्ट ” या कथांच्या संग्रहात ज्येष्ठ कथाकार आसाराम लोमटे यांनी मल्पृष्ठावर लिहिले प्रमाणे अस्सल ग्रामजीवन शब्दांकित झाले आहे. हा कथासंग्रह खेड्यातल्या कष्टाळू स्त्रियांची कणव करतो. तसेच शेतकऱ्याला नाडणाऱ्या, फसवणाऱ्या व्यवस्थेचा धिक्कार ही करतो. नात्या गोत्यात निर्माण होणारे ताण तणाव सामंज्यस्याने सोडवण्याचा अनुभवी सल्ला देतो. घराचे घरपण राखण्यासाठी समजूतदार वागणारी पात्रे या संग्रहातल्या पानापानावर तुम्हाला सापडतील. खरंतर समाज एकसंघ रहावा यासाठी आधी घरं एकसंघ असायला हवीत, अडाणी न राहता शिक्षणाने आपण आपली प्रगती करू शकतो. असे आपल्या मनावर बिंबवण्यासाठीची ही लेखकाची धडपड आहे.
एक गोष्ट मात्र मनापासून जाणवते. की आप्पासाहेब खोत हे एक सजग लेखक आहेत. त्यांच्याकडे लिहिण्याचा भयानक झपाटा आहे. त्यासाठी आवश्यक असणारा शब्दांचा झरा अजूनही त्यांच्यातून खळखळ करत वाहत आहे. ही मोलाची गोष्ट आहे. नव्या पिढीत व त्यांच्या वयात बरेच अंतर आहे. पण ते नव्या पिढीशी एकरूप होऊ पाहतात. समाजाशी एकरूप होतात. काळ झपाट्याने बदलतोय. उद्या आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे माहित नाही. पण त्यासाठी आज आपण करत असलेले कार्य नेटाने पुढे नेण्यातच आपला उत्कर्ष आहे हे लिहित्या हाताचे कर्तव्यगमक त्यांना कळले आहे.
पुस्तकाचे नावः “काळीज विकल्याची गोष्ट.” (कथासंग्रह.)
लेखकः आप्पासाहेब खोत
प्रकाशकः ललित पब्लिकेशन. मुंबई.
पृष्ठेः160, किंमत 250 रुपये