November 12, 2024
Even though Swadharma practice is difficult it is right to accept it
Home » स्वधर्म आचरण कठीण असले तरी तेच स्विकारणे योग्य
विश्वाचे आर्त

स्वधर्म आचरण कठीण असले तरी तेच स्विकारणे योग्य

जगात राहायचे तर जगातील बदल हे स्वीकारावे लागतात. पण हे बदल किती योग्य आहेत ? हे पाहाणे गरजेचे आहे. ते अयोग्य असेल तर ते स्वीकारण्यात काहीच अर्थ नाही. अशी कठीण परिस्थिती आज ओढवली आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणी जरी विषमु ।
परी पहावा तो परिणामु । फळेल जेणे ।। ९२३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – अरे अर्जुना, आपला धर्म आचरण करण्याच्या बाबतीत जरी कठीण असला तरी ज्या परिणामाने तो फलद्रुप होईल, त्या परिणामाकडे दृष्टि ठेवावी.

सध्या बदलत्या संस्कृतीच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीत धर्मानुसार आचरण ठेवण्यात अडचणी येत आहेत. बदलत्या काळानुसार वागणे हे गरजेचे असते. अशावेळी धर्मानुसार व्यवहार करणे कठीण होते. काही गोष्टींना मुरड घालावी लागते. प्रत्यक्षात धर्म काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. सध्या धर्माच्या नावावर दुसऱ्याच गोष्टी जास्त चालत आहेत. अशावेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने चुकाही होण्याची अधिक शक्यता असते. स्वतःचा अहंकार आणि मीपणा हा बदलत्या काळात सोडवत नाही. मीच करतो ते बरोबर इतरांचे चुकीचे असा अहंकार बळावतो आहे. हा अहंकारच मुळात मानवाला संपवू पाहात आहे. माणूसकी ही राहीलेलीच नाही. हा बदल अनेक समस्या उभ्या करत आहे. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. तसे प्रत्येक माणसाचा स्वभाव हा सारखा नसतो. व्यक्ती तितक्या प्रकृती हे विचारात घ्यायला हवे. पण स्वतःमध्ये आपण प्रथम बदल घडवू शकलो, तर आपल्या सोबत असणारेही आपोआपच बदलतात. समोरची व्यक्तीही आपल्यामुळे बदलते असा सकारात्मक विचार करून आपण कार्य करायला हवे. अशाप्रकारे स्वधर्माचे पालन करू लागलो तर निश्चितच बदल हा घडू शकतो. त्यातून चांगले परिणाम हे निश्चितच समोर येऊ शकतात.

बदलत्या जीवनशैलीत मनुष्य अधिक व्यस्त झाला आहे. त्याच्यावर जन्मापासूनच विविध विचारांचा मारा सातत्याने होत आहे. विचार, विकार अन् विषयांच्या माऱ्यामुळे तो अधिकच चिडचिडा होऊ लागला आहे. शांत बसून विचार करण्याची, चिंतन, मनन करण्याची वृत्तीच त्याच्यात राहीलेली नाही. समोरचे बरोबर आहे की चुक, चांगले आहे की वाईट हे न पाहाताच तो आहे ते स्वीकारून स्वतःमध्ये बदल घडवू पाहात आहे. अशाने त्याच्या मनाची स्थिरता ढळली आहे. अशांत मानसिकतेमुळे तो विद्रोही होऊ पाहात आहे. मायेच्या या नगरीत तो गुरफुटून गेला आहे. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी तो बाहेर यायला तयार नाही. कारण स्वधर्म समजून घेण्याची त्याची मानसिकताच नाही. मग स्वधर्माचे आचरण तरी तो कसा करेल ?

जगात राहायचे तर जगातील बदल हे स्वीकारावे लागतात. पण हे बदल किती योग्य आहेत ? हे पाहाणे गरजेचे आहे. ते अयोग्य असेल तर ते स्वीकारण्यात काहीच अर्थ नाही. अशी कठीण परिस्थिती आज ओढवली आहे. धंदा करायचा तर सेवा म्हणून कसा करून चालेल ? पूर्वीच्या काळी ठिक होते, पण आता हे अशक्य आहे. सेवा म्हणून करू लागलो, तर लाभ उजलणारेच अधिक आहेत. अशाने आपण आपला धंदा गमावून बसू अशी मानसिकता झाली आहे. यातूनच मग अयोग्य मुद्दे स्वीकारून सेवावृत्ती सोडून धंद्याच्या भाषेतच सर्व व्यवहार होऊ लागले आहेत. धंद्याच्या भाषेने सुरुवातीला भरभराट होताना दिसत आहे, पण त्याबरोबर अनेकजण आपले असणारे आपणास सोडून गेल्याचेही पाहायला मिळते. अन् केवळ धंद्याची भाषा बोलणारेच आपल्या आसपास वावरताना दिसत आहेत. यात नफा होण्याऐवजी तोटाच पदरी पडत आहे. यासाठी स्वधर्माचा मार्ग स्वीकारून धंदा करायला हवा. सेवा हा धर्म आहे, याची जोड देऊन व्यवसाय वाढवायला हवा. असा व्यवसायच अधिक काळ तग धरू शकतो. मोठी प्रगती करू शकतो. पण बदलत्या संस्कृतीत असे आचरण ठेवणे कठीण झाले आहे. पण याचा स्वीकार करूनच आपणास शाश्वत विकास साधता येतो हे लक्षात घ्यायला हवे.

अध्यात्मामध्ये स्वःची ओळख करून घेणे हा स्वधर्म आहे. स्वतःला जाणून तसे आचरण ठेवणे यातच प्रगती आहे. हा मार्ग जरी कठीण असला तरी तोच स्वीकारायला हवा. कारण तोच फलद्रुप होणारा आहे. आत्मज्ञानाची संपन्नता आणणारा आहे. सकारात्मक विचारातूनच स्वतःचा विकास घडवायचा आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading