खरंतर हे पुस्तक केवळ पुस्तक नाही तर ग्रामीण संस्कृतीचा एक दस्तऐवज आहे. खेड्यापाड्याची भाषा, शेळ्या मेंढ्यांच्या कळपाचे दिवस, रविवारची सुट्टी आली की मनाला होणारा आनंद ,शालेय दिवसाच्या गोड आठवणी ,गुरुजींनी दिलेला मार आणि आपल्याकडून करून घेतलेला अभ्यास याची सांगड घालताना पुन्हा एकदा ते बालपण यावे असे वाटते. असे वाटणे हीच या ग्रंथाची यशस्वीतता होय.
डॉ.चंद्रकांत पोतदार,
मराठी विभाग ,
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ,हलकर्णी , ता. चंदगड ,जि. कोल्हापूर
संवाद : ९४ २३ २८ ६४ १९
ग्रामीण भागातल्या आपण जगत असलेल्या एकूण जीवनप्रणालीचे वास्तव दर्शन घडते. या पुस्तकात अनेक अंगांनी ग्रामसंस्कृतीला आणि ग्रामीण जीवनाला अधोरेखित केले आहे. बालपणीचा गाव, परंपरा, भूमिका, विचार अशा कितीतरी गोष्टी या ग्रंथात भेटतात. खरंतर विजयकुमार मिठे हे आपल्या ग्रामीण भागातून आलेले आणि असंख्य पद्धतीने जीवन जगणाऱ्या कौटुंबिकतेचे सण -समारंभाचे ,गावातल्या जत्रायात्रांचे ,यानिमित्ताने होणाऱ्या लोककलेचे आणि काबाडकष्ट करून जीवनाला घडवणाऱ्या -जगणाऱ्या शेतीच्या परंपरेचे कितीतरी व्यापक अंगाने दर्शन घडवतात. हे दर्शन केवळ विचारातून घडत नाही तर त्याआधी गावात जगावे लागते.
आजच्या धकाधकीच्या आणि शहरी आकर्षणाच्या धबडग्यात जगणाऱ्या माणसाला आपल्या हरवलेल्या गावाचा आठव खूप व्यापक अंगाने दिसतो. गावात प्रवेश करतानाच दिसणारी गावच्या मंदिराची शिखरे गावाबरोबर अंतर्मनाला भुरळ घालतात, एवढेच नाही तर गावच्या असंख्य पद्धतीने पसरलेल्या वाटा, गावातली दिवाबत्ती, संध्याकाळच्या वेळेला लागणारे दिवे आणि गावाचा होणारा कायापालट पूर्ण उजेड आणतो. खूप वेगळा दिसतो.
गावातल्या वयस्कर माणसांचा आशीर्वादाचा हात आजच्या जमान्यात हरवत निघाला आहे, अशा काळात वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वादाचा हात महत्त्वाचा वाटतो. गावाच्या बाहेर पण गावाला लागूनच असलेला गावचा ओढा कितीतरी काळापासून आपल्या अंतकरणात रुंजी घालत असतो. ज्या मातीत आपण खेळलो बागडलो ती माती आठवताच डोळे भिजतात.
गाव म्हटलं की गावात असणारे पूर्वीच्या काळातले खळे जणू सोने पांघरल्याचे दिसते. लेखकाच्या नजरेसमोर राहणारे घर, घराचे अंगण, घराच्या मागे गोठ्यात असणारी बैलजोडी, गावात गावच्या पाटलाचा असणारा वचक, गावाची सणावाराच्या निमित्ताने असणारी करमणूक, गावातले सगळे सण समारंभ, गावची जत्रा, गावातल्या एखाद्याचे असणारे लग्न आणि त्यानिमित्ताने संपूर्ण गावाला दिलेलं निमंत्रण , किंवा गावात अनेक प्रकारच्या अडीअडचणीला धावून जाणारे लोक असतील, गावची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे, या सगळ्यांचा खूप चांगला उल्लेख विजयकुमार मिठे यांनी आपल्या गाव कवेत घेताना या पुस्तकात केला आहे .
खरंतर हे पुस्तक केवळ पुस्तक नाही तर ग्रामीण संस्कृतीचा एक दस्तऐवज आहे. खेड्यापाड्याची भाषा, शेळ्या मेंढ्यांच्या कळपाचे दिवस, रविवारची सुट्टी आली की मनाला होणारा आनंद ,शालेय दिवसाच्या गोड आठवणी ,गुरुजींनी दिलेला मार आणि आपल्याकडून करून घेतलेला अभ्यास याची सांगड घालताना पुन्हा एकदा ते बालपण यावे असे वाटते. असे वाटणे हीच या ग्रंथाची यशस्वीतता होय. गावातली अनेक माणसं काळीज भर पसरून राहतात. अंबादास सुताराचा नेहा किंवा चावडीवरचा संपूर्ण गावाला सूचना देणारा रेडिओ हा एका विशिष्ट प्रकारच्या बदलाचे संकेत देतो .
पूर्वी दवंडी होती. दवंडी देणारा म्हातारा गृहस्थ आपल्या गुजरानीसाठी आणि गाव विकासाचे स्वप्न उरात घेऊन लोकांना सेवा देणारा, निरपेक्ष भावनेने बोलणारा असा ग्रहस्थ काम करत होता. आता ती जागा गावाच्या ग्रामपंचायतीच्या उंच असलेल्या इमारतीवरच्या स्पीकरने घेतली आणि दवंडीवाला गायब झाला. खरंतर या सगळ्यात ज्या भाषेत लेखकाने ग्रामीण समाज जीवन उभे केले आहे ते समाज जीवन फार महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक माणसाचा जगण्याचा एक धर्म असतो. गावाकडची माणसं, गाव खेड्यातली माणसं या सगळ्यात आपल्या परीने जीव ओतून काम करत असतात. अशावेळी लेखकाला गावाकडच्या कितीतरी घटना घालमेल करतात. लग्नातली भटजीची मंगलाष्टकाची पद्धत, गावाकडचे सोने पांघरलेले खळे, चिमण्या पाखरांचा चिवचिवाट ,रानाकडे जाताना किंवा येताना भेटणारी माणसं, शिवारात असणारी अनेक प्रकारची झाडे, मारुतीच्या देवळात बसून मारलेल्या गप्पा, याशिवाय जोत्यावर बसून, गावच्या घराच्या कट्ट्यावर बसून जुन्या माणसांनी मारलेल्या गप्पा, या सगळ्यात एक निश्चित अशी ग्रामसंस्कृती उभी असते.
या ग्रामसंस्कृतीचे बदलत जाणारे विदारक वास्तव काळाला आव्हानात्मक असेच आहे , मात्र याही परिस्थितीत लेखकाने आपला मूळ पिंडधर्म ,खेड्यातली जिवंतपणाची साक्ष हरवू न देता आपल्या परीने रेखाटली आहे. म्हणूनच ‘ गाव कवेत घेताना ‘ हा ग्रंथ मोठ्या व्यापक अंगाने आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात फार महत्त्वाचा आहे.
जुना गाव – जुनी माणसं – जुना विषय – गावातले जुने वाडे – गावातली संवेदनशील माणसं – एकमेकांसाठी जिवापाड प्रेम करणारी आणि एकमेकाला मदत करणारी सगळी माणसं यांच्यात एक ओलावा होता, जो आता अलिकडच्या काळात नाहीसा होत निघाला आहे .खरे तर अशा वेळेला गाव एका कडेलोटाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि आपण शहरीकरणाला स्वीकारून गावची संस्कृती जपायला हवी हा संदेश देणारा हा ग्रंथ अनेक अर्थाने महत्वाचा आहे. काळाची अचूक नोंद घेणारा हा ग्रंथ त्यातल्या भाषिक अंगासह, संवेदनशील घटनांसह, जत्रा-यात्रांसह, अनेक पद्धतीने प्रत्येक वाचकाला गावच्या मातीकडे खेचून नेतो, ही या ग्रंथाची यशाची बाजू आहे.
पुस्तकाचे नाव – गाव कवेत घेताना
लेखक – विजयकुमार मिठे(ललित)
प्रकाशन – अक्षर वाङमय प्रकाशन, पुणे
प्रथमावृत्ती: मे,२०२१
पृष्ठ:२२४ मूल्य:२५०/-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.