डॉ. सुनील सावंत यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
मुंबई: डॉ. सुनील सावंत यांच्या ” सूर्य दिसत राहील तोपर्यंत…..” काव्य संग्रहाची तिसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होणार आहे. ह्या काव्य संग्रहात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील वर्तमानाच्या भेदक कविता आणि विश्वातील व महानगरातील भयंकर वास्तवाच्या मानवतावादी कविता समस्त मानव जातीला अंतर्मुख करतील, अशी प्रस्तावना कविवर्य मंगेश पाडगांवकर व कविवर्य नारायण सुर्वे यांनी २००१ मध्ये दिली आहे.
कविवर्य मंगेश पाडगावकर यांची प्रस्तावना
सुनील सावंत यांच्या या कवितासंग्रहातील कविता विचार करायला लावणाऱ्या, अंतर्मुख करणाऱ्या आहेत. आपल्या भोवतीचे सामाजिक – राजकीय जीवन ते संवेदनशील मनाने न्याहाळतात. या जीवनात माणसाच्या हिताची बीजे आहेत की अहिताची याचा खोल विचार करतात. सभोवतालची ही परिस्थिती भीतिदायक आहे.
सुनिल सावंत या वास्तवाकडे डोळे उघडे ठेवून बघतात.
तू नोकरी करशील तिथे भ्रष्टाचार शिकवतील,
तू हे सोडून हिमालय गाठण्यासाठी जाशील
तर तुलाच मारून रक्त पितील
एक थेंब मिळालं तरी ! न्यायाने वागणाऱ्यांना क्षुल्लक ठरवतील,
अन्यायाविरूध्द लढणाऱ्यांना नष्ट करतील !
सावंत यांचे चिंतनशील मन हे वास्तव पाहून सवंग घोषणा देत नाही, कुठल्याही इझमचे झेंडे मिरवत नाही, हे मन स्वतःकडे पाहायला लावते, अंतर्मुख करते :
पण वाटसरूंना नको मारू या,
जातीयतेला ठार करू या,
मगच सर्वांचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल
आणि समस्त जनतेचा वनवासही संपेल,
तेव्हा आधी अंगावरील घाण
स्वतःच्या हाताने स्वच्छ करू या !
सावंत यांची ही अंतर्मुखता क्रांतीच्या सवंग घोषणा देणाऱ्यांना रूचणारी नसली, तरी तिची अर्थपूर्णता विचारी मनाला जाणवते. सावंत यांच्या कवितेतून व्यक्त होणारी स्त्री नटवी, सुखासीन बाहुली नाही. समतेच्या नव्या युगाची ती प्रतिनिधी आहे. तशी नटवी, सुखासीन बाहुली असणे, पुरुषाला हवे आहे, याची तिला जाणीव असल्यामुळेच, “मी तुला आवडते म्हणजे माझं हेच काय आवडतं?” असा स्पष्ट प्रश्न ती विचारते. आपल्या व्यक्तिमत्त्वाची प्रखर जाणीव ही स्त्री व्यक्त करते.
तुझा हात हवा, तुझी साथ हवी,
पण मला अबला समजू नकोस,
मी सुध्दा तुझ्या खांद्याला खांदा लावून चालतेय !
सुनील सावंत यांची नव्या युगाची जाणीव या उद्गारांतून प्रकट होते. या जाणिवेमुळे ते अवतीभवतीचे कठोर वास्तव पाहून निराश होत नाहीत.
भावनेचा एक अंकुर जपणाऱ्या बालकाच्या बंद मुठीला सलाम !
सुनील सावंत यांची भाषा सरळ साधी आहे. शाब्दिक युक्त्यांवर तिचा भर नाही. तिचे बळ तिच्या आशयात ती शोधते. कविता आपल्या विकासाच्या वाटचालीतून आपल्या भाषेचे रूप शोधीत जाते. सुनील सावंत यांच्या कवितेची भाषाही भविष्यात नवी नवी सर्जनशील रूपे शोधील असा मला विश्वास वाटतो. असा विश्वास वाटावा अशीच त्यांची आजची कविता आहे.
मंगेश पाडगांवकर, दि. १४ नोव्हेंबर २००१, मुंबई
कविवर्य नारायण सुर्वे यांची प्रस्तावना
कवीमित्र सुनील सावंत यांच्या या कविता म्हणजे त्यांच्या आजवरच्या काव्यलेखनाचा अधिक वैविध्यपूर्ण असलेला आणि आजच्या कालखंडातील संमिश्र ताणतणावांनी व्यापलेल्या संवेदनाक्षम मनाचा शोधच आहे.
तसे या अफाट मुंबई महानगरीचे आजचे जीवन अधिकच भीषण, नीरस व कमालीचे जीवघेणे होत चाललेले आहे. दिसायला मात्र या शहराला आधुनिकतेनं पूर्ण वेढलेलं वाटेल, परंतु डौलदार व अनुकरणशील कृत्रिम किरटेपण किंबहुना करंटेपणाही जाणवेल. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या शहरातील नागरिकांच्या पाठीवरचे विसाव्या शतकाचे जुनाट ओझेही कायमच आहे. माणुसकीचे दर्शन, त्यातील एकमेकांना सोबत करीत, विकसित होणारे सांस्कृतिक मन हे सर्व नष्टच होणार की काय ? असे तीव्रतेने वाटणारे आजच भयाकुल वातावरण आहे हे खरेच. या सर्वाचे चित्रण अधिक सक्षमतेने ही कविता जशी करते, तितकीच ती याही संघर्षशील व जीवघेण्या लढाईत स्वअस्मितेचा, माणसातील आंतरिक आत्मीयतेचा ओलावा टिकवून धरणारा, म्हणजे कवी सोहीरोबा अंबियेच्या शब्दात सांगायचे तर 'अंतरीचा दिवा मालवू नको रे' हा उच्चारही टिकवून धरते. हा उद्गार माणसाला आतून टणक करणारा, बळ वाढवणारा आणि पोलादी हिंमत देणारा आहे.
परंतु या कवितेत इतकेच चित्रण आहे असेही नाही. या रचनांमधील विविध दर्शने फारच विलोभनीयही आहेत. कौटुंबिक ताणतणाव, पालक आणि बालक यांचा प्रेमळ संवाद, सामाजिक आक्रोश, स्त्रीविषयीची अतिशय नाजूक व रेखीव वर्णने, आजच्या राजकीय घडामोडीवरची अर्थपूर्ण शब्दात केलेली टीका-टिप्पणी, मते व मतांतरे, असे कितीतरी सादपडसाद काव्यसंग्रहात आहेत. आधुनिकता न सोडताही आपले भारतीयत्व टिकवले पाहिजे हा आग्रह, तरल संवेदना व स्पष्ट मतांना दिलेले काव्यरूप मुळातूनच वाचण्यासारखे आहे.
आणखी एक, हा कवी आपले ग्राम जीवनही विसरत नाही. गावातील निसर्गमय वातावरण, जुन्या आठवणी, खेडूत जीवनातील नाट्य व विविध व्यक्ती या सर्वांचा स्वरमेळही या रचनांमध्ये आहे. ग्रामीण बोलीतील दोनचार कविता मोठ्या खुमासदार ढंगात व्यक्त झाल्या आहेत. कवी आता नगर वृत्तीचा झाला तरी त्याचे ग्रामीण जीवनातील संस्कार त्याला टळत नाहीत, हेच खरे. हे एक प्रकारचे काव्यसत्वच आहे. कवितेची सर्वांगाने घडण म्हणतात ती ही अशी प्रकट होते.
आजच्या काळात जगतांना जाणवलेले संवेदनांचे सर्व स्पर्श या संग्रहात शब्दांकित झालेले आहेत. असा एक सुरेख शब्दमेळ, किंवा स्वरमेळ जमून आलेला आहे. माझ्या शुभेच्छा.
दि. १४ ऑक्टोबर २००१, मुंबई
- नारायण सुर्वे
डॉ. सुनील सावंत यांची एकूण २१ पुस्तके आजपर्यंत प्रकाशित असून त्यात ५ मराठी काव्य संग्रह, २ मराठी कथा संग्रह, १ मराठी अनुवादित ललित लेख संग्रह, १ मराठी आध्यात्मिक पुस्तक, ४ मराठी संपादित काव्यसंग्रह, १ मराठी संपादित चरित्रात्मक पुस्तक, त्यांच्या ५ काव्य संग्रह्यातील मराठी कवितांवर आधारित १ समीक्षा ग्रंथ, १ मराठी अनुवादित आध्यात्मिक ग्रंथ, १ हिंदी काव्य संग्रह, १ हिंदी आध्यात्मिक पुस्तक, १ हिंदी शोध ग्रंथ, १ इंग्लिश संपादित ललित पुस्तक व १ मराठी कादंबरीचा इंग्लिश भावानुवाद अशी पुस्तके आहेत.
डॉ. सुनील सावंत यांच्या ” सूर्य दिसत राहील तोपर्यंत…..” काव्य संग्रहाची तिसरी आवृत्ती शनिवार, ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ३.३० वाजता दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, वा. वा. गोखले सभागृह, पहिला मजला, यशवंत नाट्यमंदिरा जवळ, जे.के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई – ४०० ०१६ येथे प्रकाशित होणार आहे.
समारंभाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे, राजीव श्रीखंडे यांच्या उपस्थितीत ह्या काव्य संग्रहाचे प्रकाशन होणार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
