‘सांजड ‘ सुचिता घोरपडे यांचा नवा कथासंग्रह..
विनोदाची राणी आणि अभिनयाची सुपर फास्टर ट्रेन प्राजक्ता हनमघर या सुचिता घोरपडे यांच्या लाडक्या मैत्रीणीने ‘सांजड’ या कथासंग्रहावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया..
सांजड या कथासंग्रहाबद्दल लेखिका सुचिता घोरपडे यांनी व्यक्त केलेले मनोगत
ग्रामीण जीवन आणि शेतीसंस्कृतीबद्दल माझ्या मनात एक हळवा कोपरा आहे. लहानपणापासूनच मला माझ्या आत्या-मावशीकडे जायला विशेष आवडायचं. त्यांच्या गावातील समाजजीवन वेगळं असायचं. आणि कदाचित त्याचमुळे मला ते वेगळेपण टिपताना निसर्गासोबत गुंतलेल्या मानवी भावनांची सोनेरी किनारपण स्पर्शून गेली. गावगाड्यातील अनेक कथा-व्यथा यांना जवळून अनुभवता आलं. सरणावर चढेपर्यंत भोगवटा न चुकेलेल्या ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांची स्थिती पाहून मन विचलित व्हायचं. त्या बायकांचे मनोविश्व टिपताना मनाचा तळ पार ढवळून निघायचा. मनाला डागण्या देणाऱ्या त्यांच्या मूक हुरद्याला मी कथेच्या रूपातून वाहू दिलं. गावातील अनेक गोष्टींनी मला लिहितं केलं. रांझणडोहाचं नितळ गहिरं पाणी, वाघदरीची वेडीवाकडे वळणे, गैबीचा पसरलेला भुंडा माळ, मसणवाट, आंबीरड्यावरलं भूत अशी अनेक ठिकाणे मनात घर करून बसली. पण मनात राहूनही ती माणसे, तो भवताल मला स्वस्थ बसू देईना.. मला लिहायला उद्युक्त करू लागला. आणि मग लिहिता लिहिता अनेक आठवणींच्या खकाण्यातील गोष्टी शब्दरूप घेऊ लागल्या. त्याचाच हा सांजड कथासंग्रह
सुचिता घोरपडे, लेखिका सांजड कथासंग्रह
या दशकातील कथालेखकांकडे चोखंदळ दृष्टीने पाहिले तर नव्या पिढीतील सुचिता घोरपडे या कथालेखिकेचे नाव अपेक्षा वाढविणारे आहे. आजच्या कथा लेखकांच्या कथा विश्वाचा विचार केला तर तिची कथा लक्षणीय वाटत जाते. आशयाचं सुप्त सामर्थ्य, माणसा-माणसातील प्रेम-दुभंग आणि सामाजिक व्यवहाराला तिची लेखणी वाचकांना गुंतवून ठेवते. नव्या वळणानं जन्माला घातलेल्या ग्रामीण संस्कृतीतील सहजगत्या बदलत्या मानसशास्त्राची ओळख करून देते. हा संदर्भ घेऊन सुचिताच्या कथा वाचल्या तर प्रत्येक दिवसाचा उषःकाल समाजाची जीवनमूल्ये बदलताना दिसतो. हा मानवी स्वभावाच्या रूपांतराचा प्रवास आहे. माणूस उकलून दाखवणं , मनात रुजत ठेवणं, तसेच सद्य स्थितीत चाललेल्या जगाचं चित्र तिची कथा नकळत सांगत जाते. अन्याय , अत्याचाराचा केलेला पंचनामा म्हणजे या कथा. माणूस आपल्या अस्तित्वासाठी वाट्याला येणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार करतो. जीवनाची वेगळी अनुभूती म्हणून तिच्या ‘सांजड’ कथासंग्रहाकडे पाहता येईल.
– महावीर जोंधळे
पुस्तकाचे नावः सांजड । कथासंग्रह
लेखक : सुचिता घोरपडे
प्रकाशक: सॅम पब्लिकेशन्स
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
पृष्ठे : १३६ | किंमत : १८० ₹
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.