July 19, 2024
Honey Production in Patgaon special article
Home » पाटगावचे मधाचे वैभव पुन्हा बहरले
विशेष संपादकीय

पाटगावचे मधाचे वैभव पुन्हा बहरले

पाटगाव परिसरात सेल्फी पॉईंट, मधमाशीवर आधारित आकर्षक चित्रकाम, दिशादर्शक फलक व माहिती व प्रशिक्षण दालन तयार केले आहे. मधपाळांना प्रशिक्षण, त्यांना मधपेट्यांचे वाटप, शास्त्रशुद्ध पद्धतीने मध निर्मिती व विक्रीला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर मधमाशी पालन उद्योगाला पूरक असे वृक्षारोपण करण्यात येत आहे. याभागात आतापर्यंत 5 हजार रोपे लावली आहेत. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने पाटगाव मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळेच ‘मधाचे गाव पाटगाव’ हे राष्ट्रीय पातळीवर कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते राज्यातील एकमेव गाव ठरले आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

पाटगाव या गावाला ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु मौनी महाराज यांच्या समाधीमुळे पाटगाव हे श्रीक्षेत्र आहे. सारस्वतांचे कुलदैवत भद्रकालीचे ऐतिहासिक मंदिरही इथे आहे. याच मंदिरात महाराणी ताराबाई आणि सातारचे शाहू यांच्यात ऐतिहासिक करार झाला होता. अशा महान विभूतींनी पावन झालेला हा गाव पूर्वीपासूनच मधासाठीही प्रसिद्ध आहे. येथील मधाची गोडी अन् औषधी वनस्पती तसेच नटलेल्या जैवविविधतेमुळे पर्यटकांनाही या निसर्गाची ओढ कायमच राहीली आहे. आता या गावाची निवड मधाचे गाव या प्रकल्पासाठी झाल्याने पुन्हा येथील वैभव फुलणार आहे. पण हे वैभव जोपासता का आले नाही ? पूर्वी झालेल्या चुका आता पुन्हा होऊ नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

मधाची परंपरा जुनीच…

महाराष्ट्रात महाबळेश्वर नंतर पाटगाव येथे मधमाशापालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असे. या व्यवसायाला चालना मिळावी यासाठी १९५९ मध्ये येथे मध उत्पादक सहकारी सोसायटी सुरु केली होती. या सोसायटीमध्ये भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागातील पाटगाव, हनमंते, तांब्याचीवाडी, आडे, तळी, धुरेवाडी, शिवडाव, मठगाव, सुक्याचीवाडी, धरमवाडी, झितरेवाडी, आंतुर्ली, तांबाळे, अतिवडे आदी गावातील सुमारे ५२५ सभासद होते. १९९० ते १९९३ च्या दरम्यान ही सोसायटी दरवर्षी जवळपास १२ ते १४ हजार किलो मध गोळा करत होती. सोसायटीमार्फत प्रति किलो ४४ रुपये प्रमाणे मधाची खरेदी होत असे तर ४९ रुपये दराने मधाची विक्री केली जात असे. या व्यवसायासाठी खादी ग्रामोद्योग मार्फत ३३ टक्के अनुदान मिळत असे. १९९३ मध्ये मधुकर शंकर वर्धम हे सोसायटीचे चेअरमन म्हणून काम पाहात होते तर गोपाळ देसाई हे सेक्रेटरी होते. पावसाळ्यातील भात शेतीनंतर नोव्हेंबर ते मेपर्यंत येथील शेतकरी मध संकलनाचे काम करत असत. एका पेटीतून साधारण नऊ किलो ९०० ग्रॅम इतका मध मिळत होता. शेतीला जोडधंदा म्हणून येथील शेतकरी मोठ्या उत्साहाने हा व्यवसाय करत असत. पण नंतरच्या काळात तुमसाड या माशांच्या प्रादुर्भावामुळे मधाचे संकलन कमी होत गेले. अन् या व्यवसायाला उतरती कळा लागली. १९९४ मध्ये २८ हजार किलो मध या सोसायटीने संकलित केला होता पण नंतरच्या काळात थायी सॅक ब्रुड या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर हा व्यवसाय पूर्णता कोलमडला.

मधाच्या व्यवसायास उभारी देण्याचे प्रयत्न

नैसर्गिक मध निर्मिती असल्याने व अन्य कोणते रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने या व्यवसायाकडे येथील ग्रामस्थांचा कल नेहमीच राहीला आहे. तसेच हा मध जंगलातून गोळा केला जात असल्याने याचे औषधी उपयोगही खूप आहेत. असे फायदे विचारात घेऊन लोकांनी या व्यवसाय जोपासण्याचा कायमच निर्धार ठेवला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत खादी ग्रामोद्योगमार्फत या व्यवसायाला उभारी देण्याचे प्रयत्न नेहमीच सुरु असतात. येथील इच्छुक शेतकऱ्यांना प्रशिक्षण व अनुदानावर पेट्यांचे वाटप करून या व्यवसायाला चालना देण्याचे काम केले जाते. यातूनच हा व्यवसाय आता पुन्हा नव्याने उभारी घेऊ लागला आहे.

मधाच्या गावासाठी निधी

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेतलेल्या `सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘पाटगाव’हे कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते महाराष्ट्रातील एकमेव गाव ठरले आहे. नाबार्ड, जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी स्थापन करुन इथल्या मध उद्योगाला चालना देण्यात येत आहे. पाटगाव परिसरात मध निर्मिती आणि विक्री उद्योगाला प्रोत्साहन देवून पाटगावचा मध जगभरात पोहचवण्यासाठी राज्य शासन आणि प्रशासनाच्यावतीने प्रयत्न होत आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीने 226.71 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आतापर्यंत 149.82 लाख निधी वितरीत केला असून यातील 31.71 लाख रुपये निधीतून मधाचे गाव पाटगाव उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून मध उद्योगाबरोबरच पर्यटन पूरक व्यवसायांना चालना देवून पाटगाव परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे.

वर्षभरात ८ ते १० टन मध उत्पादन

सध्यस्थितीत पाटगाव अंतर्गत शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, भारमलवाडी, डेळे, चांदमवाडी, मानी, तळी, भटवाडी या परिसरात मधमाशा पालन उद्योग केला जातो. पाटगाव परिसरात वर्षभरात साधारण ८ ते १० टन मध उत्पादन होते. पाटगाव परिसरातील 250 मधपाळांना कौशल्यांचे राष्ट्रीय प्रमाणीकरण व सुलभ पतपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच 100 मधपाळांना बी-ब्रीडिंगचे प्रशिक्षण देवून पेटी वाटपातून उत्पन्नाची संधी देण्यात येणार आहे. मध उत्पादक शेतकरी कंपनीमध्ये सहभागी पाटगाव व आजूबाजूच्या पाच ग्रामपंचायतीतील मधपाळांकडून मध उत्पादन करण्यात येत आहे. या मधपाळांना मंडळामार्फत प्रशिक्षण देऊन सेंद्रिय मध संकलन करण्यासाठी स्टेनलेस स्टील भांडी पुरविण्यात येणार आहेत. हा उद्योग शास्त्रशुद्ध पद्धतीने करुन येथील मध जगभर पोहोचवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या योजनेतून 2 कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून मध उद्योग व पर्यटनाला चालना देण्यासाठी पाटगाव येथे भव्य हनी पार्क व सामुहिक सुविधा केंद्र तयार करण्यात येणार आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावतेय का ?

सोनी समूह – झी एंटरटेनमेंटचा  विलीनीकरणा आधीच  काडीमोड !

शिवरायांचे ग्रंथ अन् साहित्याशी जिव्हाळ्याचे नाते

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading