आयुष्यातील वळणे कधीकधी आपल्याला कोणत्या वाटेवर आणतील, हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे स्वप्नांचे मोरपीस डोळ्यांत जपून ठेवणाऱ्या एका कोवळ्या मनाच्या तरुणाचे अख्खे आयुष्य काट्यांनी भरून जाते. अचानक अपघात होतो आणि तिथून पुढे सुरू होतो जीवघेणा संघर्ष… लेखक सचिन पाटील, यांनी हे स्वतः भोगले पण त्यांनी जिद्द हरली नाही .मनाला खचू दिले नाही. फिनिक्स पक्षाचे पंख मनाला लावून आज ते खंबीरपणे उभे आहेत.
सौ. मनीषा पाटील-हरोलीकर,
देशिंग-हरोली
मोबा. 9730483032
शब्दांना चिरंजीव करण्याची किमया लेखक करतच असतो. शब्दांची पुरचुंडी ज्याला जपता येते त्याला समृद्धीचे अवकाश निश्चितच गवसते. लेखणीची जादू ज्याला ओळखता आली त्याला क्षितिजापल्याड पाहण्याची दृष्टी मिळाली. अशा लेखकाचे लेखन पुस्तकरुपाने वाचकाच्या ओंजळीत पडणे, यापेक्षा हार्दीक आनंद कोणता असू शकेल? तृप्तीचा विलोभनीय आनंद जसा वाचकाला असतो तसा लेखकालाही असतोच असतो. लेखन प्रकार कोणताही असो त्यातून मिळणारा निकोप, निर्भेळ आनंद महत्त्वाचा असतो. कथाकार सचिन वसंत पाटील यांनी लिहिलेला ‘पाय आणि वाटा’ हा ललितसंग्रह वेदनेची किनार घेऊन समृद्ध, प्रगल्भ साहित्य वाचनाचा आनंद वाचकाला देतो.
या पूर्वी सचिन वसंत पाटील, यांचे तीन कथासंग्रह मराठी साहित्यात मानाने विराजमान झाले आहेत. ‘सांगावा’, ‘अवकाळी विळखा’, ‘गावठी गिच्चा’, हे कथासंग्रह गावमातीतल्या माणसांचा जिव्हाळा आणि शेतकऱ्यांचा भोगवटा, दुःख, वेदना वाचकांच्या काळजापर्यंत अलगद पोहोचवतात. त्यांच्या प्रत्येक कथासूत्रातील गावगाड्याचे सूक्ष्म बारकावे वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. भोवतालाच्या कोलाहलातही त्यांचे लेखन जगण्याला जीव लावणारे आहे. त्याची प्रचिती ‘पाय आणि वाटा’ हा त्यांचा हर्मिस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेला ललितलेख संग्रह वाचताना येते.
लेखक सचिन पाटील, यांचे आयुष्य एखाद्या कादंबरीपेक्षा कमी नाही. वीस वर्षे स्वतःच्या पायाने चाललेला माणूस एका अपघाताने पाय गमावून बसतो. हे दुःख सोसण्यापलीकडचे आहे. म्हणूनच ‘पाय नसलेल्या माणसानं वाटांबद्दल काय लिहावं? का लिहावं? हा त्यांच्या मनोगताच्या सुरुवातीचा प्रश्न काळीज पिळवटून टाकतो.
मराठी साहित्यात ललित लेखनाची परंपरा मोठी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गो. वि. करंदीकर, श्रीनिवास कुलकर्णी, शांता शेळके, ना. सी. फडके, व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली, ग्रेस, अनिल अवचट, यांच्या लेखनीने ललित वाचकांना सदैव आकर्षित केले. गेल्या तीनेक दशकांपासून मराठी साहित्यात ग्रामीण संस्कृतीविषयीचे ललितलेखन मोठ्या प्रमाणात झाले आहे. चंद्रकुमार नलगे, भास्कर चंदनशिव, द.ता.भोसले, इंद्रजित भालेराव, श्रीकांत देशमुख, प्रतिमा इंगोले, कृष्णात खोत, प्रविण बांदेकर यांनी ग्रामीण संवेदनेचे ललितलेखन केले आहे. या यादीत समाविष्ट करण्यासाठी सचिन पाटील हे नाव आता अधिक आश्वासक वाटते आहे.
समकालीन मराठी ललितलेखनात वैचारिकता व व्यापक समाजसंस्कृतीच्या खुणा उमटत आहेत. तसेच स्मरणरमणीयता हा कलाविशेष नजरेत भरणारा आहे. ‘पाय आणि वाटा’ हा ललितसंग्रह वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे लेखकाने भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांचे विलक्षण मूल्यभान लेखनात सांभाळले आहे. त्यामुळे भूतकाळाच्या नावा वल्हवताना आपण कधी वर्तमानाच्या काठावर पोहोचतो, ते समजतही नाही. इतकी भाषेची सहजता या लेखनामध्ये आलेली आहे.
पंधरा भावस्पर्शी ललितलेख या संग्रहामध्ये आहेत. हे लेख ग्रामीण सामाजिक पर्यावरण अधिक ठळकपणे अधोरेखित करतात. ‘राखण’ या पहिल्या लेखात लेखक सचिन पाटील यांनी ‘फ्लॅशबॅक’ लेखनशैली वापरली आहे. कणसं बाहेर पडलेल्या पिकाची राखण करताना माळकरी शेतकरी, अडाणी बाया आणि आगाऊ पोरं कशी पाखरं हाकायची, त्यांच्या नाना तऱ्हा लेखकाने खुबीने सांगितल्या आहेत. आजच्या सारखे मोबाईलला चिकटलेले लेखकाचे बालपण नव्हते. त्यामुळे सुट्टीत राना-मळ्यात हुंदडणारी पोरं कशी रसरशीत, सकस आयुष्य जगत होती, हे या लेखात आपण प्रत्यक्ष वाचायलाच हवे.
‘करड्याची भाजी’ हा लेख लेखकाच्या आयुष्यातील संघर्षाचा पट मांडतो. शाळेची फी भरण्यासाठी लेखकाला करावी लागलेली यातायात वाचताना आपले पायही त्या लहान वयातील मुलासोबत चालू लागतात. आज आपल्यासारखी भाजी विकायची वेळ कुठल्या शाळकरी मुलांवर यायला नको, म्हणून लेखकाचा जीव आज वर्तमानातही कळवळतो… कुठल्याही लेखकाची संवेदना ही मूळातच तुकोबांच्या वंशाची असते, हे त्याच्या लेखनातून उतरते ते असे! ‘
ती बैलगाडी’ हा लेख सचिन पाटील यांनी अत्यंत बारकाव्यांनी लिहिला आहे. त्यामुळे या ललितलेखाकडे संदर्भलेख म्हणूनही पाहता येईल. आपले सामाजिक पर्यावरण शालेय मुलांना कळण्यासाठी खरे तर अशा लेखांचा पाठ्यपुस्तकात समावेश व्हायला हवा. बैलगाडीचे प्रकार किती? बंदा रुपया गाडी, सोळा आणे गाडी, बारा आणे गाडी, आठ आणे गाडी… म्हणजे काय? हे आजच्या मुलांपर्यंत पोहोचायला हवे. बैलगाडीने चिंचणीला जाण्याचा प्रवास किती आनंददायी होता, ते लिहिताना सचिन पाटील यांनी शब्दांमधून साजिवंत चित्र उभे केले आहे. शेतकऱ्याचे कुटुंब गोठ्यातील गुराढोरांशिवाय कसे पूर्ण होणार? पोटच्या मुलांप्रमाणे लेखकाचे वडील बैलांची काळजी घेतात. त्यामुळे दावणीला बैलं उपाशी ठेवून आपला मुलगा जेवायला बसला आहे, हे त्यांना सहन होत नाही .म्हणूनच आज बदललेल्या वातावरणात रिकामी दावण बघून लेखकाला बैलांची आणि वडिलांची आठवण अस्वस्थ करते.
‘पाठीराखा’ हा लालित्यपूर्ण लेख तर नात्याचे मांगल्य गाणारे सुरेख काव्य आहे. आजपर्यंत बहीण-भावाच्या नात्याची महती सांगणारी अनेक कवणं आपण वाचली असतील. पण ‘सख्खा भाऊ, पक्का वैरी’ हेच आपण वाचत आणि पहात आलो आहे. किंबहुना समाजाने बालवयापासून आपल्या मनावर तसे बिंबवलेले असते. वास्तवातील हा भावकीवाद कुणाला चुकला नाही. पण एका श्वासाने दोन भाऊ जगले तर हिमालयाएवढी मोठी संकटेही हतबल होऊन माघारी फिरतात. हा अख्खा लेख म्हणजे सचिन पाटील यांनी आपल्या भावासाठी लिहिलेले पसायदान आहे. कृष्ण-बलरामाची ही जोडी अशीच चिरंजीव राहो, असे हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाला मनोमन वाटेल. ‘माझ्याजवळ माझा भाऊ असतो’ हा विश्वासच लेखकाच्या जगण्याची उर्मी आहे.
‘तुका म्हणे होय, मनाशी संवाद
आपुलाच वाद, आपणाशी…
मन ही खूप अद्भुत गोष्ट आहे. तिचा तळ कसा शोधावा? या मनाच्या तळघरात आठवणींच्या अनेक कळ्या तशाच पडून असतात. फुलता-फुलता फुलायच्या राहून गेलेल्या! कधीतरी एकांतात आपल्यालाच त्या भेटतात. मग आपणच बोलू लागतो त्यांच्याशी. हा संवाद खुलवत जातो मनाच्या तळघरातील या कळ्यांना आणि आपले शब्दच गंधाळतात. ‘स्पर्श…एक संवेदना’ हा लेख वाचताना ही अनुभूती येत राहील. कारण हा लेख म्हणजे सुगंधी शब्दकळ्यांचे सुंदर स्वगत आहे. स्वगत हा लेखनविशेष येथे वाचकाचे लक्ष वेधून घेतो.
माणसांसारखेच प्राण्यांचे मनोविश्व मराठी साहित्यात अनेक लेखकांनी खूप ताकदीने उभे केले आहे. लेखक चारुतासागर यांच्या अनेक कथांमध्ये हे प्राणीविश्व वाचकाला कथेशी घट्ट जखडून ठेवते. ही अनुभूती ‘घोडी’ हा ललितलेख वाचताना येते. ‘पोष्टाचं पत्र हरवलं’ या लेखातून सचिन पाटील यांनी ई-मेलच्या जमान्यात जीव गुदमरलेल्या, अंग चोरून उभ्या असलेल्या पत्रव्यवहाराची कैफियत मांडली आहे. पत्रातून भेटणारी मायेची ओल आता व्हाट्सअपच्या स्क्रीनवर दिसत नाही, असे जेव्हा लेखक सांगतो तेव्हा ती खंत वैश्विक बनते कारण आजचे वास्तव यापेक्षा वेगळे नाही.
‘झुकझुक झुकझुक आगीनगाडी’ हा लेख शीर्षकाप्रमाणेच आपल्याला मामाच्या गावात पोहोचवतो. वाचक वाचताना कुरूंदवाड हे फक्त लेखकाचे मामाचे गाव राहत नाही तर एखाद्या नदीकाठचे संपन्न, समृद्ध ग्रामजीवन कसे होते, हेही आपल्या लक्षात येते. तेथील ग्रामसंस्कृती समजते. खरेतर गावपण जपणारे कुरूंदवाड हे गाव लेखकाने आपल्या शब्दांनी चिरंजीव केले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा लेख त्यातील चपखल शब्दसौंदर्यामुळे अत्यंत वाचनीय बनला आहे.
‘कोरडे डोळे ‘ हे ललितगद्य वाचताना डोळे पाणावतात. खोपटी जळाली, त्यात पुस्तकही! अशा अवस्थेत कंजारभाट या भटक्या, विमुक्त जमातीतल्या वस्तीवरचा एक मुलगा शाळेत येऊन बसतो. शिक्षणाची ही ओढ कुठल्याच बाजारात विकत मिळणार नाही. परिस्थितीला शरण जावे लागलेले असे कितीतरी डोळे शिक्षणापासून वंचित रहात असणार आहेत. ही खंत मन अस्वस्थ करते.
‘झाड आणि वाट’ मध्ये आंब्याच्या झाडाला, रानाला जिवापाड जपणारा म्हातारा आपल्याला भेटतो. वाटेने जाणारे वाटसरू आंब्याखाली घडीभर विसावा घेतात, हेच त्या म्हाताऱ्याला संचित वाटते. अशी संत मनाची माणसे आता कुठं भेटतील? कदाचित नाहीच. म्हणून सचिन पाटील इथे म्हणतात, ‘कालौघात सगळंच हरवलंय… बदललंय… माणसं आणि माणसांची मनंही..!’ जगण्यावरचा विश्वास उडून जावा, अशा काळात आपण रहात आहोत. जिथं माणूसच माणसाला रक्तबंबाळ करत आहे. कधी शस्त्रांनी तर कधी शब्दांनी… संत कबीर म्हणतात,
शब्द शब्द सबको साहे, शब्द के हाथ ना पाँव,
एक शब्द औषध करे, एक शब्द करे घाँव…
हे बऱ्याच अंशी खरे आहे. माणूस पहिल्यांदा मनाने खचतो आणि नंतर शरीराने. त्यामुळे आजारी माणसाला भेटायला जाणाऱ्याने निदान पेशंटसमोर काय बोलावे आणि काय बोलू नये, याचे भान ठेवायला हवे. लेखक सचिन पाटील यांनी स्वतः प्रदीर्घ आजारपणात हे बोचरे शब्द सोसले आहेत. त्यामुळे विखारी बोलांच्या वेदना काय असतात, हे त्यांच्याइतके कोण सांगू शकेल? ‘चिमणीचे पिल्लू’ या लेखात त्यांनी माणसांचे बदलणारे रंग टिपले आहेत. ‘खरं प्रेम’ शीर्षकाइतकीच प्रेमाची गोड, हळवी लिपी प्रत्येकाच्या काळजात घर करून असते. प्रेमाला विशिष्ट चौकटीत अडकवू नका, असे लेखक म्हणतात. त्यांनी प्रेमाच्या विविध नात्यांचे पदर तितक्याच अलवारपणे उलगडून दाखवले आहेत. ‘बदललेलं गाव’ या ललितलेखामध्ये लेखकाने स्वतःच्या गावाचे चित्र उभे केले आहे. खरे तर ते प्रत्येक गावाचे पर्यावरण आहे. त्यामुळे पूर्वीचे गाव आणि आत्ताचे गाव यात जमीन आस्मानाचा फरक आहे. या लेखामध्ये लेखकाची सूक्ष्म निरीक्षणक्षमता दिसून येते. ‘पतंगाचे दिवस ‘ हा वाचनीय लेख पतंगांच्या दुनियेत आपल्याला घेऊन फेरफटका मारून आणतो.
या ललितसंग्रहातील शेवटचा लेख म्हणजे या संग्रहाचे शीर्षक ‘पाय आणि वाटा’. आयुष्यातील वळणे कधीकधी आपल्याला कोणत्या वाटेवर आणतील, हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे स्वप्नांचे मोरपीस डोळ्यांत जपून ठेवणाऱ्या एका कोवळ्या मनाच्या तरुणाचे अख्खे आयुष्य काट्यांनी भरून जाते. अचानक अपघात होतो आणि तिथून पुढे सुरू होतो जीवघेणा संघर्ष… लेखक सचिन पाटील, यांनी हे स्वतः भोगले पण त्यांनी जिद्द हरली नाही .मनाला खचू दिले नाही. फिनिक्स पक्षाचे पंख मनाला लावून आज ते खंबीरपणे उभे आहेत. तरुणाई सोबतच मनाने हरलेल्या प्रत्येकाचे ते प्रेरणास्थान आहेत. म्हणूनच ‘पाय आणि वाटा’ हे पुस्तक फक्त ललितसंग्रह न राहता उमेद हरलेल्या जिवांचे पाय बनते, हेच या संग्रहाचे यश आहे.
या संग्रहाची लालित्यपूर्ण भाषा मनोवेधक आहे. पाल्हाळिक वाक्य रचना लेखकाने टाळली आहे. छोटी वाक्ये, लेखांची गोळीबंद मांडणी ही लेखनाची वैशिष्ट्ये महत्त्वाची वाटतात. हा ललितसंग्रह पुणे येथील आघाडीच्या हर्मिस प्रकाशनाने प्रकाशित केला असून ख्यातनाम चित्रकार अन्वर हुसेन यांचे आशयसंपन्न मुखपृष्ठ लाभले आहे.
‘ज्यांना पाय नाहीत
अशा समदुःखी जीवांना…’
ललितसंग्रहः पाय आणि वाटा
लेखकः सचिन वसंत पाटील (मोबा. 8275377049)
प्रकाशन: हर्मिस प्रकाशन, पुणे (मोबा. 9822266939)
मुखपृष्ठः अन्वर हुसेन
पृष्ठे: १००/-, मूल्य: १५०/-
