July 27, 2024
Book Review of Sunil Pande Gost Eka Ritayarmentchee
Home » “गोष्ट एका रिटायरमेंटची” एक भावस्पर्शी गोष्ट
मुक्त संवाद

“गोष्ट एका रिटायरमेंटची” एक भावस्पर्शी गोष्ट

पुणे जिल्ह्यातील नीरा ह्या गावचे रहिवासी असणारे सुप्रसिद्ध लेखक सुनील पांडे यांनी त्यांची “गोष्ट एका रिटायरमेंटची” ही “स्नेहवर्धन प्रकाशन”ने प्रकशित केलेली ‘एक दिवसीय कादंबरी’ माझ्या वाचनात आली व तिने मला माझा हा अभिप्राय लिहिण्यास भाग पाडले. त्यात ही कादंबरी पुण्यातले ज्येष्ठ साहित्यिक नागेश शेवाळकर यांना अर्पण केली आहे हे वाचल्यावर तर मला सुनील पांडे यांच्याबद्दल प्रंचड आदर वाटला. माणूस इतका विनयशील असू शकतो ह्यावर माझा विश्वास दृढ झाला.

रवींद्र कामठे
९४२१२ १८५२८
ravindrakamthe@gmail.com

वाचकहो, “गोष्ट एका रिटायरमेंटची” ही काही फक्त सुनील पांडे यांच्याच आयुष्यात घडणारी गोष्ट नव्हे तर ती तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात घडणारी, तसेच आपल्या आसपास घडणारी व आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग वाटणारी अशीच वाटते. मी ही गोष्ट वाचायला घेतली आणि तिच्यात इतका हरवून गेलो की काही विचारू नका. तीन वर्षांपूर्वी मी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती व त्यावेळेस माझाही असाच निरोप समारंभ आयोजित केला होता त्याची आठवण ताजी झाली आणि माझ्याही कळतनकळत ही गोष्ट वाचताना पदोपदी माझे डोळे पाणावले व हीच ह्या कादंबरीची फार मोठी जमेची बाजू आहे.

सुनील पांडे यांनी ह्या गोष्टीतून ज्या काही व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभ्या केल्या आहेत त्या वाचताना आपण त्या व्यक्तिरेखांशी समरस होऊन जातो व काळीज हेलावून जाते. एका सरकारी कार्यालयातील शिपाई आणि त्याचे वरिष्ठ साहेब एकाच दिवशी निवृत्त होतात आणि त्यांच्या निरोप समारंभाच्या दिवशी ह्या कादंबरीचे नायक गजानन साठे आपल्या नोकरीतील व आयुष्यातील ४० वर्षांचा जो काही भावस्पर्शी धांडोळा घेतात त्या संकल्पनेलाच मला नमन करावेसे वाटते.

सुनील पांडे यांनी ही, अतिशय छोटी म्हणजे, एक दिवसाच्या गोष्टीतून आपल्या वैयक्तिक आयुष्याचा तसेच नोकरीतील, प्रवासातील नात्यांचा ज्या सुबकतेने उलगडा केला आहे त्याला तोड नाही. ह्या कादंबरीचा नायक एक शिपाई जरी असला तरी तो भावनेने, त्याच्या वागण्याने व त्याच्या चांगुलपणाने वाचकांच्या मनात घर करतो व हुद्दा अथवा पैशाने माणूस श्रीमंत होत नाही तर तो त्याच्या वर्तनाने व चांगुलपणाने श्रीमंत ठरतो हेच सिद्ध करतो हे ह्या कादंबरीचे बलस्थान आहे.

नात्यांमधील ताणतणाव, चढउतार, भावभावना, हेवेदावे, गरजा, द्वेष, एककल्लीपणा ह्या सर्व गोष्टींची गुंफण ज्या पद्धतीने लेखकाने केली आहे त्यात वाहवत जाण्यासाठी भरपूर वाव असूनही लेखकाने अतिशय मर्यादेत राहून ही वरवर अगदी छोटीशी वाटणारी गोष्ट कुठेही भरकटू दिलेली नाही हे वैशिष्ट्य आहे. काही काही प्रसंग व त्यात घातलेली नात्यांची सांगड इतकी विलक्षण जमली आहे की, वाचताना कंटाळा तर येतच नाही परंतु उगाचच फार समाज प्रबोधन केल्याचा आवही वाटत नाही.

सर्वात शेवटी त्यांच्याच बरोबर निवृत्त होणाऱ्या वाघमारे यांनी त्यांचाशी विश्वासाने साधलेला संवाद तर ह्या गोष्टीचा कळस आहे. कादंबरी वाचताना डोक्यात जाणारे व खलनायक वाटणारे हेच ते वाघमारे कादंबरीच्या शेवटाला आपल्याला नायक वाटायला लागतात हे तर ह्या गोष्टीचे फार मोठे फलित आहे असे मला वाटते. अगदी सहज सोपी वाटणारी परंतु तितकीच मोठी व अवघड गोष्ट इतक्या सोप्या पद्धतीने मांडण्याची कला सुनील पांडे यांना खूप आधीपासून अवगत असावी हे त्यांच्या ह्या २२ व्या साहित्य संपदेवरून सिद्ध होते.

ह्या कादंबरीत पांडे यांनी सर्वसामान्य नोकरदार माणसाच्या आयुष्यात एकदा येणार निवृत्तीचा दिवस व त्याच्या मनाची होणारी घालमेल त्यात गतकाळातील चांगल्या वाईट स्मृतींना दिलेला उजाळा ज्या सहजतेने मांडला आहे की, ज्याने तो क्षण अनुभवला आहे तोही भावविवश होतोच होतो, पण ज्यांच्या भविष्यात तो क्षण येणार आहे त्यांनाही ही हुरहूर लावून जातो. माझ्या सवयीप्रमाणे मी ह्या गोष्टीचा फारसा उलगडा करत नाही, उलट रसिक वाचकांना नम्र विनंती करतो की तुम्ही ही कादंबरी विकत घेऊन नक्की वाचा. तुमच्या मनातील खूप साऱ्या भाव भावनांना मोकळी वाट करून द्या. हीच तर खरी सुनील पांडे सरांसारख्या लेखकांच्या साहित्य संपदेची ताकद आहे.

संतोष घोंगडे यांनी साकारलेले मुखपृष्ठ तर नेहमीप्रमाणे गोष्टीतील विषयाला अनुरूप असेच आहे त्यात काही वादच नाही. स्नेहवर्धन प्रकाशनच्या डॉ. स्नेहल तावरे यांनी अतिशय दर्जात्मक निर्मिती केली आहे असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल.

पुस्तक – “गोष्ट एका रिटायरमेंटची”
लेखक – सुनील पांडे (नीरा)
प्रकाशक – डॉ. स्नेहल तावरे, स्नेहवर्धन प्रकाशन
पृष्ठे – १००
मूल्य – र १५०/-


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अनुभुतीचा विस्तार करणारी आजची कविता

आनंदी राहा, आनंदी जगा अन् इतरांनाही आनंदी करा

भावनांच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला चंद्रनागरीचा शब्द

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading