November 21, 2024
Book Review of Sandeep Tapkir wata Durgbrmhanacha
Home » वाटा दुर्गभ्रमणाच्या… मध्ये साताऱ्यातील २५ किल्ल्यांचे इतिहासासह वर्णन
पर्यटन

वाटा दुर्गभ्रमणाच्या… मध्ये साताऱ्यातील २५ किल्ल्यांचे इतिहासासह वर्णन

सातारा जिल्ह्यात एक नाही, दोन नाही, तर तब्बल 25 किल्ले वसलेले आहेत. या 25 किल्ल्यांच्या वर्णनावर आधारित संदीप तापकीरांचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे एक प्रमुख बलस्थान आहे, ते म्हणजे सर्वच गडांचा खणखणीत इतिहास. माझ्या माहितीप्रमाणे प्रथमच इतका सविस्तर इतिहास कोणत्या दुर्गलेखकाने लिहिला असेल.

भगवान पांडुरंग चिले
दुर्गअभ्यासक
9890973437

‘संदीप भानुदास तापकीर’ हे नाव महाराष्ट्रातील दुर्गप्रेमींना सुपरिचित आहे. त्यांचे ‘महाराजांच्या जहागिरीतून…’ हे पुणे जिल्ह्यातील 29 किल्ल्यांवरील पुस्तक आपणा सर्वांना परिचयाचे आहे. खरेतर एक जिल्हा धरून त्या जिल्ह्यातील झाडून साऱ्या किल्ल्यांवर लिहून एक पुस्तक प्रसिद्ध करणे ही बाब सोपी नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यांतील प्रसिद्ध किल्ल्यांची एकत्रित लिहिलेली पुस्तके दुर्गरसिकांना वाचावयास आवडतात. त्यामुळे सर्वच दुर्गलेखकांचा कल अशा लोकप्रिय किल्ल्यांवर एकत्रित पुस्तक काढण्याकडेच असतो; पण अभ्यासकाच्या दृष्टीने पाहिले तर एका जिल्ह्यावर एकत्रित लिहिलेले पुस्तक हे जास्त महत्त्वाचे ठरते. शासकीय गॅझेटिअरसुद्धा याच दृष्टीने व भौगोलिकतेच्या दृष्टीने एकाच जिल्ह्याची काढली जातात. संदीप तापकीरांनी हाच आदर्श डोळ्यांसमोर धरून त्यांचे पहिले पुस्तक हिंदवी स्वराज्याचा गाभा असणाऱ्या पुणे जिल्ह्यावर लिहिले. पुणे जिल्हा म्हणजे शिवरायांच्या स्वराज्याची कर्मभूमी. इथल्याच बारा मावळातल्या काटक, लढवय्या मावळ्यांनी मनोभावे शिवरायांना साथ दिली. त्यामुळे ‘हिंदवी स्वराज्य’ खऱ्या अर्थाने उभे राहिले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बाजी, तानाजी, येसाजी हे शिवरायांचे संगेसाथी याच मावळातल्या मुशीत घडलेले. अशा या पुणे जिह्यातील किल्ल्यांचे आकर्षण भल्याभल्यांना वाटते.

‘वाटा दुर्गभ्रमणाच्या… सातारा जिल्ह्यातील किल्ले. हे संदीप तापकीर यांचे दुसरे पुस्तक. सातारा जिल्हा ‘इतिहासप्रसिद्ध’ जिल्हा होय. मराठ्यांच्या इतिहासात ज्या डोंगररांगेचे अमूल्य योगदान आहे, ती महादेव डोंगररांग साताऱ्याच्याच पश्चिमेला आहे. सातारा जिल्ह्यात एक नाही, दोन नाही, तर तब्बल 25 किल्ले वसलेले आहेत. या 25 किल्ल्यांच्या वर्णनावर आधारित संदीप तापकीरांचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे एक प्रमुख बलस्थान आहे, ते म्हणजे सर्वच गडांचा खणखणीत इतिहास. माझ्या माहितीप्रमाणे प्रथमच इतका सविस्तर इतिहास कोणत्या दुर्गलेखकाने लिहिला असेल.

लेखकांच्या नजरेने दुर्गअवशेष बघता-बघता एखाद्याने त्या गडाचा सविस्तर इतिहास सांगितला की, गड पाहणाऱ्याची अवस्था ‘दुधात-साखर’ अशीच होते. व्यक्तिश: मीसुद्धा संदीप तापकीरांच्या सुसंगतवार इतिहासकथन करण्याच्या हातोटीबद्दल त्यांच्या लेखणीवर बेहद्द खूश आहे. इतिहासलेखनात आख्यायिका, दंतकथा यांना एक वेगळे स्थान असते. या कथा पिढ्यान्पिढ्यांनी मौखिकरीत्या जपलेल्या असतात. त्यामुळे गडपरिसरातल्या राहाळात या पुरस्कार कथांबद्दल एक वेगळ्या प्रकारचे प्रेम-जिव्हाळा असतो. संदीपने या पुस्तकात तळबीडजवळच्या वसंतगडावरील चंदोबाची कथा, शूर्पणखेची कथा फार विस्ताराने दिली आहे. ती वाचताना आपले मन थेट रामायणकाळात अलवारपणे जाते. अशीच काहीशी वर्धनगडावरील उघड्या मारुतीची कथा. अशा या पुस्तकातील एक ना अनेक कथा हे पुस्तक अभ्यासत असताना आपली मती गुंग करून सोडतात.

या पुस्तकात सुसंगतवार इतिहासकथनाबरोबरच प्रत्येक गडावरील एक अन् एक दुर्गअवशेषांची माहिती लेखकाने दिली आहे. त्याचबरोबर लेखक किल्ल्याशेजारच्या छोटेखानी, पण महत्त्वाच्या ठिकाणांबद्दल माहिती देण्यासही विसरलेला नाही. उदा. पांडवगडाशेजारची धावडशी लेणी, वारूगडाशेजारचा सीताबाईचा डोंगर, वसंतगडाच्या नाईकबा दरवाजाच्या बाजूची चंद्रगिरी घळ, महिमानगडाच्या पायथ्याचे बाणेश्वराचे जुने मंदिर इ. लेखकाने किल्याबरोबर ही जवळची ठिकाणेही अभ्यासपूर्ण नजरेने पाहिल्याने व त्यांच्यापर्यंत कसे जायचे हे त्या त्या लेखात सुस्पष्टपणे लिहिल्याने दुर्गवाचकाला किल्ल्याबरोबर ही जुनी ठिकाणे बोनसमध्ये पाहायला मिळणार आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सातारा जिल्ह्यातील साताऱ्याचा किल्ला ऊर्फ अजिंक्यतारा, प्रतापगड हे किल्ले प्रतापसिंह महाराजांच्या दूरदृष्टीमुळे इंग्रजांच्या पडझडीतून वाचले आहेत. या प्रतापसिंहांची कारकीर्द फारशी कोणास माहीत नाही. इतिहासप्रेमींनी त्यांच्याबद्दल जास्तीची माहिती वाचली पाहिजे, हे या पुस्तकातील लेख वाचताना कळून येते. खासकरून पुस्तकातील प्रतापगडचा लेख प्रदीर्घ व अभ्यासनीय झाला आहे. या पुस्तकात सातारा जिल्ह्यातील गिरिदुर्ग, वनदुर्ग, स्थलदुर्ग या तीन प्रकारचे गड असल्याने दुर्गअभ्यासकांना हे वर्णन अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

वास्तूंच्या अतिशय सूक्ष्म निरीक्षणातून दुर्गांचे वर्णन - डॉ. सदाशिव शिवदे

‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकला देश, परचक्र येताच निराश्रय प्रजा भग्न होऊन देश उध्वस होतो. देश उध्वस जाल्यावरी राज्य यैसे कोण्हास म्हणावे? याकरिता पूर्वी 
जे जे राजे आले, त्यांणी आधी देशामध्ये दुर्गे बांधून देश शाश्वत करून घेतला. आले परचक्र संकट दुर्गाश्रमी परिहार केले. ते राज्यतरी तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशासनवस्य न होय, त्या त्या देशी स्थलविशेष पाहून गड बांधिले.’

रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रामध्ये वर उल्लेखलेल्या किल्ल्यांच्या महतीबद्दल कुणाचेही दुमत होऊ शकणार नाही. शिवाजी महाराजांनी किल्ल्याला कोणत्या प्रकारे गौरविले होते, त्याचे ज्वलंत उदाहरण रायगडावर आपणास लिखित स्वरूपात आजही पाहावयास मिळेल. गडावरील वाडेश्वराच्या मंदिराच्या दक्षिण अंगाच्या भिंतीवर एक संस्कृत शिलालेख आपणास वाचावयास मिळतो. आठ ओळींच्या या शिलालेखातील सातवी ओळ अशी आहे की, 
‘र्मंडिते श्रीमद्रायगिरवगिरामविषयेहीराजिनानिर्मिताे।’
याचा अर्थ असा आहे की, हिराजी इंदलकर या स्थपतीने स्थपित केलेल्या या श्रीमान श्रीमंत रायगड किल्ल्याचे वर्णन हा विषय वाणीचा होऊ शकत नाही. यातील रायगडास ‘श्रीमद्’ हे विशेषण जणू काही रायगड नावाची महान व्यक्ती किंवा तीर्थक्षेत्र असावे, असा भाव व्यक्त केला आहे. किंबहुना रायगड ही जिवंत वास्तू असल्याचा यातून क्षणभर प्रत्यय 
आल्यावाचून राहत नाही. ‘श्रीमद्’ हे विशेषण या देशातील, किंबहुना जगातील दुसऱ्या कोणत्या गडाच्या वाट्याला आले असेल, याचा शोध घ्यावा लागेल. अशा तऱ्हेच्या गडांच्या वाटा बिकट असल्या, तरी त्यांचे सामर्थ्य प्रत्यक्ष तेथे जाऊन आजमावे, तेथे घडलेल्या अनेक वास्तूंचा वास्तुरंग अंत:करणामध्ये साठवावा, क्षणभर आत्मचिंतन करावे आणि या वास्तूमध्ये घडलेला इतिहास आठवावा यासाठी गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील अनेक तरुण मंडळी किल्ल्यांच्या सहवासासाठी आसुसलेली आहेत. अतिशय प्रसन्न मनाने आणि आपल्या इतिहासावरील श्रद्धेने, इतिहासपुरुषाच्या स्मरणाने अंतर्मुख झालेले जे तरुण आहेत, त्यांचे किती कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. त्यातील एका ऐतिहासिक घराण्यात जन्मास आलेले, अत्यंत अभ्यासू, शालीन आणि परिश्रमांची पराकाष्ठा करणारे संदीप तापकीर यांनी महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये उभे असलेले किल्ले पाहून त्यांचे वर्णन, त्यांच्यावरील वास्तूंचे अतिशय सूक्ष्म निरीक्षण, त्यांच्यावर निर्माण आशीर्वाद झालेला इतिहास या साऱ्यांचा परिचय अभ्यासकांना, जाणकारांना व्हावा या एकाच नि:स्पृह भावनेतून हे काम हाती घेतले आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यापासून या कामास प्रारंभ केला. 

पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ल्यांना भेटी देऊन सर्व प्रकारे अभ्यास करून ग्रंथरचना केली. आता पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराजांच्या राजधानी परिसरात त्यांचा वावर सुरू झाला. स्वराज्याची दुसरी राजधानी सातारचा किल्ला ऊर्फ आजमतारा ऊर्फ अजिंक्यतारा या किल्ल्यापासून त्यांनी सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांच्या अभ्यासाला प्रारंभ केला. 

सातारा जिल्ह्याच्या इतिहासावर चार-दोन पुस्तके निश्चित झाली आहेत. दास बासू या नावाच्या बंगाली इतिहाससंशोधकाने साताऱ्यावर स्वतंत्र ग्रंथही लिहिला आहे. सातारा जिह्याच्या 
गॅझेटिअरमध्ये जिल्ह्यातील किल्ल्यांची त्रोटक माहिती देण्यात आली आहे; परंतु सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांवर स्वतंत्र ग्रंथरचना झाली नाही. जिल्ह्यातील पंचवीस किल्ल्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील चिरा अन् चिरा, दगडधोंडा- सारे काही श्रद्धापूर्वक पाहिल्यानंतरच लेखक खऱ्या अर्थाने आपल्या लेखणीला आवाहन करू शकतो. लेखकाने आपल्या प्रत्येक प्रकरणाला म्हणजेच प्रत्येक किल्ल्याला एक विशिष्ट असे शीर्षक दिले आहे. उदा. साताऱ्याच्या अस्मितेचा केंद्रबिंदू- अजिंक्यतारा, शिवछत्रपतींचा आठवावा प्रताप- प्रतापगड, रघुवीर घाटाचा सखासोबती- महीमंडणगड, असीम निसर्गसौंदर्याने नटलेला वनदुर्ग- वासोटा, वाईचा मुकुटमणी- पांडवगड, सातारचा चौकीदार- वैराटगड, दुर्गअवशेषांना वंदन करावा असा वंदन, दुर्गरचनेतील कल्पकतेने संतोष देणारा- संतोषगड इत्यादी.

लेखकाने किल्ल्यांच्या उपयुक्ततेबद्दल काही ठिकाणी खुलासा केला आहे. त्यात थोडी भर घालायची असल्यास काही गोष्टींचे सारांशाने मी येथे मार्गदर्शन करतो. शिशुनाग हे 
ऐतिहासिक राजघराण्यांचे साधारणपणे आदिवंशज मानले जातात. त्यांची राजधानी गिरिव्रज अशी होती. त्यानंतर ती रायगड येथे हलवली गेली. आजसुद्धा त्याचे अवशेष आपणांस 
पाहावयास मिळतात. स्मृतिकारांनी किल्ल्यांचे सहा प्रकार वर्णिले आहेत. 1) वनदुर्ग, 2) महिदुर्ग, 3) अबदुर्ग किंवा जंजिरा, 4) वृक्षदुर्ग, 5) नुदुर्ग, 6) गिरिदुर्ग. हे सर्व लिहिताना त्याने शेवटी असे म्हटले आहे की, एका किल्ल्यास एक सेनानी आपली समशेर घेऊन उभा असेल, तर बाहेरील हजार सेनानींशी तो लढा देऊ शकतो. 

महाभारतात असे म्हटले आहे की, एक स्त्रीसुद्धा किल्ल्याच्या आश्रयाने शत्रूशी लढू शकते. भीष्माचार्य भारताला म्हणतात, ‘मला हे समजावून सांग की, एका किल्ल्यामध्ये त्याच्या 
स्त्रिया, त्याचे भाऊ, नातलग कसे राहतात?’ त्यावर भारताने उत्तर दिले की, ‘सहा प्रकारच्या किल्ल्यांमध्ये राजाने आपल्या राजधान्या निर्माण कराव्यात. त्याला भक्कम तटबंदी करावी, खंदक असावा, फार मोठा धान्यसाठा असावा, पाणी असावे, हत्ती, घोडे, शूर सैनिक, बुद्धिमान स्थपती - शिल्पकार, खजिना, धार्मिक व्यक्ती, तलाव, विहिरी, झाडे, शस्त्रे, 
लोखंड, कोळसा इत्यादी असावे. खंदकात मगरी आणि मोठे मासे असावेत. अधिकारी वर्गास निवासस्थाने बांधावीत. अश्वशाळा, शिलखाने असावेत.’ आपण वरील गोष्टींचा विचार 
केला, तर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो श्रीमद् रायगड. यावरून शिवछत्रपतींचा त्यांच्या प्रभावळीचा किती सूक्ष्म अभ्यास असेल, याची कल्पना करवत नाही.

किल्ले बांधण्याचे ठिकाण आणि उद्देश याचाही विचार आपल्या पूर्वजांनी केला आहे.  त्यातील मुख्य गोष्टी अशा की, किल्ला म्हणजे1) संरक्षित तळ 2) युद्धोपयोगी साहित्य 3) रसद, दारूगोळा, पाणी, धान्य इत्यादी 4) पुरवठा वाहिनी 5) संपर्क बिंदू या सर्व बाबींचा विचार सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांच्या बाबतीत केला गेला आहे आणि लेखकाने ही गोष्ट प्रकर्षाने वाचकांना दाखवून दिली आहे.

किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठीसुद्धा शिवाजी महाराजांनी काही रकमांची तरतूद केल्याचेही उल्लेख आढळतात. किल्ले हे नेहमी भक्कमच हवेत आणि त्याची योजना भक्कम असावयासच हवी. महाराजांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ‘मुगल बादशाहा औरंगजेब याने जर ठरविले की, प्रतिवर्षी एक एक किल्ला घ्यावा, तर त्याला 360 वर्षे जगावे लागेल.’ आणि म्हणूनच जेव्हा ‘ज्वलज्ज्वलनतेजस’ संभाजीराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब महाराष्ट्रात सर्वशक्तिनिशी उतरला, तेव्हा त्याला सव्वीस वर्षे सह्याद्रीशी झुंजावे लागले. कारण, सह्याद्री हा कालपुरुष होता. शेवटी ह्या कालपुरुषाच्या भूमीतच त्याला अखेरचा श्वास घ्यावा लागला. समकालीन दखनी हिंदीतील एक कवी मुल्लानुश्रुफी याने शिवछत्रपतींची सह्यगिरीबद्दल काय भावना होती, ह्याचे बहारदार वर्णन केले आहे.
‘मेरी जीव का आस घर का है आड
कि लश्कर मेरा है यो रन, बन, पहाड। 
जहा लग बी ऐसी जमी है जिती
वहा लग बी मुंज गड है झडती इती...’
(माझ्या प्राणाच्या अगदी जवळचा असा हा भाग आहे. माझ्या संरक्षणाचं ते घर आहे आणि माझं लष्कर म्हणजे हे जंगल, हे डोंगर आणि हे किल्ले हेच आहेत. ते माझे टेहळणीचे 
केंद्रबिंदू आहेत.)
‘अगर यो है जुल्मत मै आम्रित हजार
सिकंदर बी पैठ्या तो ना आय भार।’
अर्थ असा आहे की, सिकंदरासारखा कोणीही (मोठा) माझ्या प्रदेशात आला, तर तोपरत जाऊ शकणार नाही. ह्या सर्व बाबींचा अभ्यास करून संदीप तापकीर यांनी किल्ल्यांचे वर्णन आणि त्यांचा वास्तुरंग आपल्या लेखनात उतरविले आहे. ते तरुण आहेत, अभ्यासू आहेत, संशोधक वृत्तीचे आहेत. 

डॉ. सदाशिव शिवदे

पुस्तकाचे नाव – ‘वाटा दुर्गभ्रमणाच्या… सातारा जिल्ह्यातील किल्ले.
लेखक – संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक – विश्वकर्मा प्रकाशन, पुणे
किंमत – ३०० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 9850179421


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading