November 21, 2024
Borewell technology that ends life
Home » कुपनलिका… जीवसृष्टीला संपवणारे तंत्रज्ञान
विशेष संपादकीय

कुपनलिका… जीवसृष्टीला संपवणारे तंत्रज्ञान

कुपनलिका…घातक तंत्रज्ञान!

पावसाने ओढ दिली किंवा उन्हाळा सुरू झाला की गावागावात कुपनलिका खोदणाऱ्या यंत्राचा सुळसुळाट होतो. शेतीसाठी पाणी, घरांसाठी पाणी, बांधकामांसाठी पाणी, उद्योगांसाठी पाणी… प्रत्येक गोष्टीसाठी पाणी आवश्यक असते. मात्र हे पाणी कमी पडू लागले, आणि ते मिळवण्यासाठी भूगर्भातील पाणी मिळवण्यासाठी कुपनलिका खोदल्या जाऊ लागल्या.

कुपनलिका, आज भारतातील पाण्याचा महत्त्वाच स्रोत आहे. भारतात आजमितीला नोंदणी झालेल्या कुपनलिकांची संख्या तीन कोटीपेक्षा जास्त आहे. प्रत्यक्षात ही संख्या पाच ते सहा पट आहे. विहिरीच्या तुलनेत कुपनलिका खोदण्यासाठी खर्च कमी येतो. विहीर खोदायला वर्ष, दोन वर्षे लागत, कुपनलिका एका दिवसात खोदली जाते. कुपनलिकेसाठी जागाही कमी लागते. त्यामुळे शेतीचे उत्पादक क्षेत्र कमी होत नाही. त्यामुळे पाणी लागेपर्यंत कुपनलिका खोदण्याचा आग्रह धरला जातो. त्यातून हजारो फूट खोल कुपनलिका खोदल्या जातात. अशाच प्रयत्नात, मराठवाड्यात बाराशे फुट खोली गाठल्यानंतर जमिनीतून पाण्याऐवजी गरम वाफा आणि काही प्रमाणात पाणी आले. त्यांने खुदाई करणाऱ्या यंत्राला आग लागली. आज मराठवाड्यामध्ये कितीही खोल कुपनलिका खोदली तरी पाणी मिळानेसे झाले आहे. असं का घडत?

पृथ्वी अत्यंत सुंदर ग्रह आहे. पृथ्वीवर भरपूर पाणी आहे. प्रत्यक्षात ७१ टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला आहे. या पाण्याची उष्णतेने वाफ होते. ती आकाशात जाते आणि पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते. पावसाचे पाणी हा मानवासाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत. हा स्रोत पूर्वी होता तितकाच आहे. पृथ्वीवरील पावसाचे सरासरी प्रमाण ४१ इंच आहे. भारतात सरासरी ४३ इंच पाऊस पडतो. तर महाराष्ट्रात पावसाचे सरासरी प्रमाण हे ४८ इंच आहे. तरीही आज पाण्यामुळे यादवी निर्माण होण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांना वाटते. पावसाचे पाणी जमिनीवर आल्यानंतर त्यातील १० टक्के पाणी जमिनीत मुरते. सरासरी १७ टक्के पाण्याची वाफ होते. सहा टक्के पाणी तलाव आणि धरणांमध्ये साठते. उरलेले म्हणजे ६७ टक्के पाणी समुद्राला जाऊन मिळते. समुद्राला मिळणारे जास्तीत जास्त पाणी कसे अडवता येईल, याचा आज पाणी टंचाई टाळण्यासाठीचा प्रयत्न म्हणून प्रामुख्याने पाहतात. त्यासाठी शक्य तेथे धरणे बांधली जात आहेत. मात्र त्यामुळे समुद्राला मिळणारे पाणी मोठ्या प्रमाणात अडवले जाते, असे नाही.

जमिनीत मुरणारे पाणी केवळ दहा टक्के असताना, मानव आपल्या उपयोगासाठी जे पाणी वापरतो त्यातील सत्तर टक्के पाणी हे जमिनीतून उपसत आहे. याचा परिणाम भूस्तरावर मोठ्या प्रमाणात होत आहे. जमिनीतून पाणी मिळवण्यासाठी जमिनीची चाळण केली जात आहे. मराठवाड्यासारख्या भागात तर एका एकरामध्ये चार-पाच कुपनलिका खोदल्या जात आहेत. पूर्वी जमिनीतील पाणी मिळवण्यासाठी मानवी प्रयत्नातून, भूसुरुंग लावून विहीर खोदण्यात येत असे. कठीण पाषाण फोडून त्यात पाणी मिळाले की ते टिकाऊ मानले जायचे. मात्र १९७० साली भारतात कुपनलिका खोदण्याचे तंत्रज्ञान आले. विशेष हे की हे तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी युनिसेफने पुढाकार घेतला. हे तंत्रज्ञान आले आणि जणू माकडाच्या हातात कोलित मिळाले. आपले स्वत:चे पाणी असावे, यासाठी पैसे असणाऱ्या प्रत्येकांने कुपनलिका खोदायला सुरुवात केली. कुपनलिका खोदून अधिक स्वच्छ आणि चांगले पाणी मिळते, असा सर्वांचा समज होता. अनेक दिवस कुपनलिकांचे पाणी पिणाऱ्या लोकांना मूतखड्याचा त्रास होऊ लागला आणि या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्याचे आणि आहे तसे कुपनलिकांचे पाणी वापरणे धोकादायक असल्याचे मानले जाऊ लागले.

कुपनलिकातून उपसले जाणारे पाणी, तेथे पोहोचण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागतो, हे ही मानवाच्या उशिरांने लक्षात आले. तोपर्यंत कुपनलिकांचे तंत्रज्ञान सर्वदूर पसरले. या तंत्राचा प्रचार आणि प्रसार इतका झाला होता की, यावर नियंत्रण ठेवणे सरकारच्या हाती राहिले नव्हते. शासनाचा नियम २०० फुटापर्यंत कुपनलिका खोदावी, असा असताना जास्तीत जास्त १८०० फूट खोल कुपनलिका खोदल्याचे एका अहवालात दिसून येते. एकट्या बेंगलोर शहरात शासनाने कडक धोरण अवलंबल्यानंतर नोंदणी झालेल्या कुपनलिकांची संख्या २०१६ मध्ये ३,१९,२११ इतकी आढळून आली. आज हा भूभाग भूजलाच्या अतिरेकी वापराने शुष्क झाला आहे. जगातील पाण्याचे सर्वाधिक दुर्भिक्ष झालेला भाग, केपटाऊन शहराचा आहे. १४ एप्रिल पासून या शहराला पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याचे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेने जाहीर केले आहे. भारतातील बेंगलोर, मद्रास, पुणे ही शहरे याच मार्गावर आहेत.

पृथ्वीच्या भूगर्भात असणारे पाणी प्रामुख्याने भारत आणि उत्तर अमेरिकेत मोठ्या प्रमाणात उपसले गेले. भूगर्भातून जितके पाणी उपसले जाते, तितकेच पाणी तेथे पोहोचणे आवश्यक आहे. मात्र असे घडत नाही. त्यामुळे ८.३ गिगाटन इतके वस्तुमान कमी झाले. त्यासाठी कुपनलिकांचे पुनर्भरण करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार कुपनलिकेभोवती आवश्यक बदल करून कुपनलिका पुनर्भरण सुरू झाले. मात्र प्रत्येक कुपनलिकेबाबत हे यशस्वी होत नाही. त्याचे कारण म्हणजे ज्या ठिकाणी कुपनलिका खोदण्यात आलेली असते, त्याठिकाणी असणारी भूस्तराची रचना वेगवेगळी असते. एकच पद्धती सर्व कुपनलिकांना लागू होत नाही. तसेच या प्रयत्नांतून वाहून जाणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात भरीव घटही होत नाही.

जमिनीतील पाणी मोठ्या प्रमाणात खेचल्याने जमिनीत पोकळी निर्माण होते. जमिनीत शुष्कता वाढत जाते. त्यातून मोठ्या वृक्षांना झळ बसते. जमिनीत पाणी असताना ते भूऊर्जा साठवून ठेवण्याचे कार्य करते. जमिनीतील शुष्कता वाढल्याने, पाणीच नसल्याने ती ऊर्जा जमिनीच्या पृष्ठभागाकडे सरकत आहे. त्यातून पृथ्वीचा अक्ष बदलण्याबरोबर पृथ्वीचे तापमानही वाढत आहे. मात्र या परिणामासंदर्भात आजही गांभिर्याने चर्चा होत नाही. पाणी केवळ अडवून उपयोग नाही. वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करायला हवा. स्वच्छ पाण्याचे साठे जपले पाहिजेत आणि जमिनीतील पाण्याचे साठेही जपले पाहिजेत. नाहीतर कुपनलिकांचे तंत्रज्ञान जीवसृष्टीला संपवणारे घातक तंत्रज्ञान बनणार यात शंका नाही!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading