July 20, 2024
A scene of day and night warfare
Home » रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग
मुक्त संवाद

रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग

रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जन आणि मन ।
जीवाही अगोज पडती आघात । तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे ।
अवघीयांचे काळे केले तोंड ॥
(४०९१)

समाजामध्ये विषमतेच्या दोषाबरोबरच उच्च-नीच भेद कायम होता. या भेदनीतीमुळे सबंध समाज आतून सडल्यासारखा झाला होता. उच्चवर्णीयांचे सर्वच क्षेत्रात वर्चस्व होते. ज्ञानाच्या पोकळ प्रतिष्ठेचा त्यांना अभिमान होता. अडाणी व दरिद्री, क्षूद्र आणि स्त्रिया अशा लोकांना वेठीस धरणे होत असे. बौद्धिक गुलामगिरी फैलावलेली होती. भौतिक गुलामी आणि भौतिक दुरवस्था यामुळे सर्वसामान्य जनता अगतिक बनली होती. या अगतिकतेतून तिची सोडवणूक कशी होईल ही चिंता तुकारामांना त्रस्त संचित करीत राहिलेली.

दुसरे म्हणजे कर्मकांड आणि अनेक देवदेवता यांचा जाणीवपूर्वक प्रचार, प्रसार करणारे उच्चवर्णीय आणि या धार्मिक दहशतवादास बळी पडणारे सर्वसामान्य अशी ही स्थिती होती. पूजा, पोथी, पुराण, श्रवण, यज्ञयाग, नवस-सायास, उपास-तापास यालाच भक्तीसाधना मानले जात होते. ही स्थिती तुकारामांना कधी कधी इतकी उदासीनता आणत असे की त्यांचे मन हे एकाकी व भावना अनावर होत असत. अशा भावभावनांचे प्रतिबिंब या अभंगात जाणवते. असह्य दु:खभार सहन करणारे, अपमानाची वेदना लीलया पचवणारे तुकारामांचे मन एकाएकी पूर्णत: निवले नाही. कधी कधी ते अनावर होतात. बाह्य जगाबद्दल चीड उफाळून येते. क्वचित संतापही अनावर होतो. संत असले तरी तुकाराम हे माणूसच. शिवाय मानवी मन तसे गुंतागुंतीचे असते. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ अशीही अवस्था व्हायची. ‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर, किती आवरा आवरा, फिरून येतं पिकावर’ या बहिणाबाईंच्या म्हणीची प्रचिती तुकारामांनाही येत असावी.

तुकारामांना मनाचा तळ गाठणे शक्य होत नसे. भावना दाबून ठेवता येत नसत. त्यामुळे संघर्ष निर्माण होत असे. बाह्य विश्वातील भौतिक घडामोडी आणि अंतर्मनातील विचार यामध्ये सातत्याने संघर्ष चाललेला. त्यासच तुकाराम रात्रं-दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणतात.

आणखी एक सततची चिंता म्हणजे समाजातील उच्चवर्णीयांकडून शूद्रातिशूद्र यांचा होणारा छळ आणि तो निमूटपणे सहन करण्याची त्यांची मानसिकता याचीही मानसिक त्रस्तता तुकारामांना येत असे. शिवाय संत तुकारामही त्या छळापासून सुटका करून घेऊ शकले नव्हते. त्याचाही संताप त्यांना येत असे.

शिवाय आपल्याला मन अजून कसे जिंकता आले नाही ही तुकारामांना चिंता लागून राहात असण्याच्या भावविश्वाचा अनुभव येत असे. त्यातून उद्विग्नता येत असे. बाहेरच्या जगाची प्रतिकूलता आणि त्याची झळ तुकारामांना लागू नाही. मनाचा गुंता सोडविण्यासाठी हवी असलेली स्वस्थता मिळू न देण्यात बाहेरच्या जगातील स्थितीचा अडसर आहे. तुकारामांची अंतर्बाह्य संघर्षावस्था ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या ओळीतून नेमकेपणाने आणि अत्यंत उचित शब्दात व्यक्त झाली आहे.

तुकाराम बाह्य परिस्थितीच्या आघातामुळे अर्थात हार मानणारे नव्हते. त्यांनी अभंगातल्या ओळीतून आपण या संघर्षावर कशी मात केली हे सांगितले आहे. ‘विठ्ठलाच्या नामस्मरणाच्या बळावर मी आघात करणाऱ्या सगळ्यांचे तोंड काळे केले आहे’ अशा शब्दात त्यांनी आपल्या ताकदीची प्रचिती व्यक्त केली आहे. पांडुरंगाच्या नामस्मरणाच्या बळावर संघर्षाच्या अवस्थेवर नियंत्रण आणण्याची खात्रीही तुकारामांना वाटते. तशी तर विठ्ठलभक्ती हीच आपली शक्ती आहे हे ओळखून ते स्वस्थ होत राहतात.

तुकारामांची संघर्षवृत्तीच त्यांना जीवनाची ऊर्जा पुरवते. ‘त्रास देणाऱ्या अवघियांचे काळे तोंड करू’ हा दुर्दम्य आशावाद निर्माण करते. संघर्ष हे आव्हान म्हणून स्वीकारणारे तुकाराम खरोखरच वंदनीय, पूजनीय म्हणावे लागेल. मुख्य म्हणजे आपल्या मनात चाललेल्या संघर्षाची मुळे बाह्य संघर्षात आहेत हे त्यांनी ओळखले होते. बाह्य जगाबरोबर संघर्ष त्यांना अभिप्रेत होता म्हणून मी सर्वांचे तोंड काळे केले अशा अर्थाचे उद्गार त्यांनी काढले.

आपल्या मानसिक अस्वस्थतेचे कारण नेमकेपणाने हेरण्याची तुकारामांची क्षमता अनुकरणीय आहे. आजच्या पिढीला तर प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. करिअरसाठी घ्यावे लागणारे परिश्रम आणि कट थ्रोट कॉम्पिटिशनमुळे येणारा ताण हा येत आहे. अशावेळी संघर्षाचे कारण अचूकपणे शोधण्याची दिशा तुकारामांचे विचार सहाय्यभूत ठरावेत. संघर्षामुळे असहाय होणं, खचून जाणं हे तुकारामांकडून घडले नाही. आघात करणाऱ्यांचे तोंड काळे करण्यासाठी उसळून उफाळून येणे घडले. त्याच धर्तीवर आव्हाने पेलत राहणे व त्यावर मात करणे हाच संदेश तुकारामांनी दिला.

संघर्षामागील कारणे न शोधता चीड, संताप, मनःस्ताप करून घेणे इष्ट नाही. उदासीनता, उद्विग्नता व नैराश्य ही तात्पुरती अवस्था आहे. त्यातून बाहेर येऊन बाह्य जगाबरोबरचा संघर्ष करण्यास सिद्ध व्हावे हेच तुकारामांनी जाणवून दिले. संघर्ष वृत्ती हीच मुळी जगण्याची प्रेरणा, लढण्यासाठी ऊर्जा, महत्त्वाकांक्षा उंचावण्यासाठीचे बळ देणारी आहे. तुकारामांचा दुष्टांचे निर्दालन करण्याचा निर्धार आणि निर्धारित कामगिरीपासून तसूभरही न ढळण्याची जिद्द खचितच आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल.

मात्र आजची पिढी संघर्षावर मात करण्याचे बळ अंगी आणण्यापेक्षा, ताण-तणावाचा मुकाबला करण्यासाठी मनाची एकाग्रता व धारिष्ट्य याचा आधार घेण्याऐवजी ड्रिंक, ड्रग्ज, पब, पार्ट्या यामध्ये स्वत:ला बुडवून घेतात. तुकारामांसाठी नामस्मरण व विठ्ठल भक्ती हा मार्ग परिणामकारक ठरला. त्याचप्रमाणे कामावर श्रद्धा, उद्दिष्टावर निष्ठा, मानसिक कणखरपणा आणि पलायन वृत्तीवर मात करून धारिष्ट्याने संघर्षाला सामोरे जावे ही तरुण पिढीकडून अपेक्षा आहे.

डॉ. लीला पाटील, कोल्हापूर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मराठीची एक प्रगत बोली – मालवणी

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गोव्यात गोलमेज

ज्येष्ठ इतिहासकार उपिंदरसिंग यांना संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading