June 19, 2024
the-size-of-the-birds-is-decreasing-but-the-length-of-the-wings-is-increasing
Home » पक्ष्यांचे आकारमान घटतेय, मात्र पंखांची लांबी वाढतेय…
संशोधन आणि तंत्रज्ञान

पक्ष्यांचे आकारमान घटतेय, मात्र पंखांची लांबी वाढतेय…

जैवविविधतेला धोका

विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती, मानवाचा श्वास आणि ध्यास बनली. आपले जीवन अधिक सुखकर व्हावे, यासाठी सारा अट्टाहास. या अट्टाहासापोटी मानवाने निसर्गाला ओरबाडणे सुरू केले. यातून आजचे विश्व निर्माण झाले. एकच उदाहरण पाहू. पर्वी प्रत्यक्ष दूत पाठवून संदेश पाठवला जाई. पुढे लिखित पत्र पाठले जाऊ लागले. त्यानंतर पक्ष्यांचा वापर सुरू झाला. पुढे संदेश पाठवण्यासाठी पोस्टाची निर्मिती झाली. पोस्ट खाते अजूनही अस्तित्वात आहे. मात्र मध्येच तारेचे तंत्र विकसीत झाले. काही वर्षांपूर्वी हे तंत्रज्ञान इतिहास जमा झाले. त्यासोबतच तारा वापरून दूरध्वनीचे तंत्र विकसीत झाले. ते ही शेवटच्या घटका मोजत आहे. मध्येच पेजर आले आणि उल्केसारखे चमकून हे तंत्र लुप्त झाले. त्यानंतर भ्रमणध्वनीचे युग अवतरले आणि मग टू-जी, थ्री-जी असे करत आता फाईव्ह-जी तंत्रज्ञान वापरात आले. दुसरीकडे इ-मेलचे तंत्रज्ञान आंतरजालाबरोबर आले आणि संदेशवहन एका क्षणाचे काम झाले आहे. इंस्टाग्राम, टेलिग्राम, एक्स, फेसबुक अशी अनेक आयुधे आली आणि आपण कोठे आहोत, काय करतो, हे सर्व जग जाणू लागले. सर्वच क्षेत्रात असे अनेक बदल झालेत आणि होत आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीने ऊर्जेची गरज वाढवली. वाढती ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अर्थातच इंधनाची गरज वाढली. इंधन जाळून ऊर्जा मिळवली जाऊ लागली. ऊर्जा मिळवताना जे इंधन जाळले जाते, त्यातून कर्ब वायू आणि हरित गृह वायू तयार होऊ लागले. त्यातून पृथ्वीचे तापमान वाढू लागले. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे पावसाच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल झाला. त्याचे वागणे बदलले. कोठे महापूर तर कोठे दुष्काळ, कोठे ढगफुटी तर कोठे पिकांवर रिमझीम पाऊस पडल्याने रोगांची भीती. याचा परिणाम शेतीवर झाला. पाऊस अनियमीत झाला आणि पीक काढणीला आले की मात्र नियमीत पडू लागला. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले जाते. जवळपास दरवर्षी पीक काढणीच्या वेळी हमखास पाऊस पडून पिकलेल्या पिकाला आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील, मनातील स्वप्नांना तो मातीत मिसळतो. मात्र जागतिक तापमान वाढीचा परिणाम केवळ मानवी जीवनावर होतो असे नाही. मानवाच्या कृतीची, स्वार्थाची फळे इतर जीवानांही चाखावी लागत आहेत. इतर सजीवांच्या त्यातही पक्षी आणि प्राण्यांच्या जीवनावरही मोठा परिणाम होऊ लागला आहे. संशोधकांच्या तीक्ष्ण नजरेने हे टिपले आहे.

जागतिक तापमान वाढ झाल्याने जगभर पाण्याची उपलब्धता कमी झाली. १४ एप्रिलला, दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहराला पाणी मिळणे बंद झाले आहे. पाऊस पडल्यानंतरच पाणी पुरवठा पुन्हा नियमीत होणार आहे. या शहरात आंघोळ करण्यास बंदी घालण्यात आली होती. पाणी न मिळण्याचा परिणाम अर्थातच पक्षी, प्राणी आणि वनस्पतींवर होत आहे. वनस्पतींची वाढ आणि एकूणच अस्तित्व पाण्यावर अवलंबून असते. त्यातही वनस्पतींना स्थलांतरही करता येत नाही. त्यामुळे पाणी नाही मिळाले तर अकाली बीजनिर्मिती करून अनेक वनस्पती मरून जातात. पक्षी आणि प्राण्यांना मात्र स्थलांतर करता येते. त्यांना जेथे पाणी असेल त्या भागात जाता येते. मात्र आता जगातील कोणताच भाग जलसंपन्न राहिला नाही. अगदी सर्वात घनदाट मानले जाणारे ॲमेझॉन जंगलही याला आपवाद राहिले नाही. मानवाने शेकडो वर्षांपासून मृत प्राणी आणि पक्ष्यांचे अभ्यासासाठी जतन करायला सुरुवात केली. त्यामुळे पूर्वी विविध पक्ष्यांचे आकार काय होते, हे आपणास ज्ञात आहे. मागील काही वर्षांपासून मृत पक्ष्यांचे जतन करणाऱ्या प्राणीशास्त्राच्या अभ्यासकांच्या ही बाब लक्षात आली.

एकिकडे पक्ष्यांचे आकारमान दिवसेंदिवस कमी होत आहे, तर दुसरीकडे पक्ष्यांच्या पंखांची लांबी वाढत आहे. ही गंभीर बाब आहे. तसेच असे घडण्यामागचे कारण ही जागतीक तापमान वाढ असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. शिकागो विद्यापीठातील संशोधकांनी नॅशनल ॲकेडमी ऑफ सायन्सेसच्या नियतकालिकात प्रसिद्ध केलेल्या निबंधात ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. या निष्कर्षाप्रत येण्यासाठी त्यांनी शिकागो शहरामध्ये उंच इमारतींना धडकून मृत झालेल्या ८६००० पक्ष्यांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आकाराने लहान असलेल्या पक्ष्यांमध्ये हा बदल झपाट्याने होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोठ्या आकारांचे पक्षी मात्र हा बदल कमी दाखवतात. मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी ॲमेझॉन जंगलातील मृत होणाऱ्या पक्ष्यांचा असाच अभ्यास केला. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील भिन्न वातावरणात स्वतंत्र अभ्यास केल्यानंतर आलेले निष्कर्ष सारखेच निघाले. दुसऱ्या अभ्यासात ५२ प्रजातींच्या ७०,७१६ पक्ष्यांचा अभ्यास केला. यामध्ये स्थलांतर न करणाऱ्या पक्ष्यांचा प्रामुख्याने अभ्यास करण्यात आला. त्यानंतरच हा शोधनिबंध या संशोधकांनी प्रसिद्ध केला आहे. यासंदर्भात आणखी संशोधन करण्याची गरजही हे संशोधक व्यक्त करतात.

जर्मन संशोधक कार्ल बर्गमन यांनी १८४७ मध्ये एक सिद्धांत मांडला. त्यानुसार एकाच प्रजातीच्या उष्ण कटिबंधातील पक्षांचा आकार हा त्याच प्रजातीच्या शीत कटिबंधातील पक्ष्यांच्या आकारापेक्षा लहान असतो. तर थंड प्रदेशातील त्याच प्रजातीच्या पक्षांचा आकार हा मोठा असतो. याच सिद्धांताचा आधार या संशोधकांनी घेतला आहे. सध्याच्या अभ्यासातील पक्षांचे वजन सरासरी २.३ टक्क्यांनी घटले आहे, तर पंखांची लांबी ही १.३ टक्के इतकी वाढली आहे. वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी हे बदल घडत असल्याचे संशोधकांनी निष्कर्ष काढले आहेत.

त्याचबरोबर प्राण्यांच्या आकाराबाबत तेल अविव विद्यापीठातील आणि ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी संशोधन केले आहे. त्यांचेही मनुष्य वगळता अन्य प्राण्यांच्या रचनांमध्ये जागतिक तापमानवाढीमुळे फरक होत असल्याचे आढळून आले आहे. सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. गेल्या ४० वर्षात कॅनडातील पक्ष्यांची संख्या २९ टक्क्यांनी कमी झाली आहे. वातावरणातील बदलांना पक्षी सर्वाधिक संवेदनशील असतात. त्यांच्यावरील परिणाम हे लगेच दिसून येतात. व्यापक परिणाम इतर प्रजातीमध्येही दिसून येत आहेत. मानव विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सुखी असल्याचा आभास निर्माण करत आहे. मात्र त्याच्या सुखासाठी इतरांचे जीवन आजच धोक्यात आले आहे.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

Related posts

लम्पी स्किन आजार: प्रसार व नियंत्रण

अवयवदानातून २०२२ मध्ये १५ हजाराहून अधिक जणांचे पुण्यकर्म

संशोधकांच्या मते दीर्घायुष्यामागचे रहस्य…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406