पणजी : गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी तर्फे गोमंतकीय आणि राज्याबाहेरील साहित्यिकांसाठी देण्यात येणारे स्वर्गीय ब्रह्मराज गजानन देसाई स्मृती पुरस्कार २०२४-२५ ची घोषणा करण्यात आली आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
गोव्या बाहेरील साहित्यिकांसाठीच्या पुरस्कारासाठी सांगली येथील धनाजी घोरपडे ( बहादुरवाडी, ता. वाळवा) यांच्या जामिनावर सुटलेला काळा घोडा या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. तर गोमंतकीयांमध्ये रजनी रायकर (पालखी-कथासंग्रह), सुप्रिया नाईक (अंतरंग- वैचारिक लेखसंग्रह), मंजिरी वाटवे (प्राजक्त सडा-कवितासंग्रह), चंद्रशेखर गावस ( माझी भावस्पदने- ललित संग्रह), किरण सिनाय तळावलीकर (स्त्री होण्याचा अभिमान) यांची निवड करण्यात आला आहे.
२७ रोजी पुरस्कार वितरण
हा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दि. २७ रोजी संध्याकाळी ४.३० वा. पणजी येथील गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात होणार आहे. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय तंत्रनिकेतनचे ग्रंथपाल डॉ. सुशांत तांडेल उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून राधानगरी कोल्हापूर येथील व्याख्याते प्रा. डॉ. चंद्रशेखर कांबळे हे उपस्थित राहणार आहेत. या समारंभाला साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आली आहे.
प्रदीर्घ परंपरा आणि वाड्मयीन क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी गोमंतक साहित्य सेवक मंडळ संस्था आठ्याण्णव वर्षे जुनी असून आजअखेर तिचं काम अविरतपणे सुरु आहे. संस्था दरवर्षी उत्कृष्ट साहित्य कलाकृतींचा पुरस्कार देऊन गौरव करते. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातून कवी लेखकांच्याकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. तज्ञ परीक्षक समितीने महाराष्ट्रातील कवी धनाजी धोंडीराम घोरपडे यांच्या जामिनावर सुटलेला काळा घोडा या कवितासंग्रहाची पुरस्कारासाठी निवड केली असून गोव्यातून महाराष्ट्रात जाणारा हा पहिलाच पुरस्कार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी दिली.
साहित्यात वर्तुळात सध्या चर्चेत असलेले कवी व समीक्षक धनाजी यांचा ‘गाऱ्हाणं’ नंतरचा जामिनावर सुटलेला काळा घोडा हा दुसरा कवितासंग्रह असून तो लक्षवेधी ठरला आहे. सदरच्या कवितासंग्रहास पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा पुरस्कार, लोकनेते राजारामबापू उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार, कवयित्री शैला सायनाकर साहित्य पुरस्कार, शिवांजली साहित्यपीठ उत्कृष्ट साहित्य पुरस्कार सन्मान मिळाले आहेत. यापूर्वी त्यांच्या ‘गाऱ्हाणं’ संग्रहाला पद्मश्री नारायण सुर्वे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार,शांता शेळके उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, महाकवी कालिदास साहित्य पुरस्कार,तापी- पुर्णा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार,दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्कार इत्यादी साहित्य पुरस्कार मिळाले आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.