January 2, 2026
Cover of ‘Candy Crush’ Marathi short story collection by Neerja published by Rohan Prakashan
Home » कँडी क्रश : कथेच्या कथापणाला पुरेपूर पुरून उरणारी कथा
मुक्त संवाद

कँडी क्रश : कथेच्या कथापणाला पुरेपूर पुरून उरणारी कथा

कल्पित- अकल्पित कथा रचायला कथाकाराकडे निराळा श्वास हवा तरच इतक्या दीर्घ दमसासाची कथा लिहून होईल कादंबरी लिहिताना जसा तिचा ताल आणि तोल सांभाळावा लागतो तसेच्या या कथेच्या बाबतीत झाले आहे. नीरजा यांच्या या निराळ्या लेखन शैलीनं चकित करून टाकतात.

ऐश्वर्य पाटेकर

ही कथा वर्तमान वास्तवावर नुसती बोलते नाही तर त्या वर्तमान वास्तवाची उलट तपासणी घेऊन त्याचा योग्य अन्वयार्थ लावते. ही कथा वाचून संपली असे न म्हणता त्या कथेनं आपले चांगलेच झापड उघडते. हे या कथांचे आणि लेखिका नीरजा यांचे यश म्हणता येईल. लेखिका नीरजा यांची भाषेवर मजबूत पकड तर आहेच, शिवाय त्यांनी त्यांची म्हणून भाषा घडवली आहे. म्हणून या दहाही कथा भाषेच्या घडणीवर उत्तम उभ्या राहिल्या आहेत. वर्तमान वास्तवाचा सारासार विवेकबुद्धीनं काढलेला सार, यासाठी वर्तमानाचं आकलन असणं फार गरजेचं आहे. लेखिकेचं अनुभव विश्व एकारलेलं नसल्यामुळे की काय दर कथेत अनुभवाचं स्वतंत्र ऐवज उभा ठाकला आहे. नात्याच्या मध्यभागी उभं राहून सामाजिक वास्तवाचं अन नात्यांच्या गुंतावळीचं जगड्व्याळ रूप समोर ठेवलं आहे.

आजकाल कथेच्या नावाखाली गद्याची भोकाडी बळजोरीने बोकांडी बसतेय किंवा बसवली जातेय; तिला चोख उत्तर देणारी ‘कँडी क्रश’ मधली कथा आहे. हे मी म्हणतो यास कारणे अनेक आहेत त्यातल एकच की अलीकडच्या कथेमधलं कथापण हरवलं आहे. प्रयोगाच्या आणि गीमिकाच्या नावाखाली जे उभं राहिलं ते कथेची नासाडी करणारं आहे. नीरजा यांच्यातला कथालेखक म्हणूनच महत्वाचा का आहे तर त्यांचा कथापणावर विलक्षण जीव आहे. हे त्यांच्या लिखाणाचं बलस्थान म्हणावं लागेल. ‘वास्तव वास्तव कुठे नसतं!’ पण लेखकाला हे टक्कं भान हवं की मी लेखक आहे! हे भान कथा लिहिताना गेलं की कथा फसते. म्हणून या या लेखिकेचं अप्रूप मला आहे.

मुळात या दहा कथांमधली कथावस्तू त्यांची ठिकाणं एकाहून वेगळी आहेत. सामाजिक भानाच्या गोधडीचा एकही टाका ढिला न होऊ देता लेखिका ज्या पद्धतीने मांडणी करते, ‘मनी आणि विटी’मधली ‘मनी’ चाळीतली तर ‘कल्पित अकल्पित’ मधली शर्मिष्ठा कॉलेजमध्ये शिकवणारी प्राध्यापिका जी जगभरच्या साहित्याचा नवा अर्थ समकालाशी पडताळून पहाते. म्हणूनच की काय लेखिकेच्या अनुभवाचा पैस एकारला न जाता तो आणखी फांद्या फुटून बहरतो.

‘स्वातंत्र्याच्या नव्वदीत सईदाआपाला पडलेले प्रश्न’ या कथेची सुरुवातच इतकी साधी आहे की वाटतंच नाही त्या कथेच्या पोटात दंगलीची भीषण कथा सामावलेली असेल. कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मेंदूला झिणझिण्या आणणारी ही कथा आहे.

‘कँडी क्रश’ ही शीर्षक कथा तर नितांत सुंदर उतरली आहे. स्त्री-पुरुष समानतेचा ढिढिम नुसताच पिटला गेला म्हणावा की काय खरच स्त्री स्वतंत्र झाली का ? आज ज्या काही घटना आणि सामाजिक वास्तव समोर येतं आहे त्यातून एकच उत्तर मिळतं की स्त्री स्वतंत्र झाली नाही. ‘कँडी क्रश’ स्त्रीच्या आत्मभानाची कथा आहे. एकूणच मराठी कथेत ही कथा स्वत:ची जागा निर्माण करणारी आहे. तिचा काव्यात्म शेवट तर कथेला योग्य उंचीवर घेऊन जातो. कवितेला जसे अर्थाचे अनेक पदर असतात तसे या कथेला आहे. ‘कँडी क्रश’ हा नुसताच खेळ नाही; तर तो स्त्री स्वातंत्र्याचा द्योतक ठरावा. जगण्याच्या रहाटगाडग्यात आपल्या पुरतं मिळवलेलं सुख, आपल्या पुरता आनंद, आपल्या पुरती मोकळीक, म्हटलं तर विद्रोह; आपल्या आतून आपल्याशी घेतलेली भूमिका ‘ब्र’ उच्चारून नात्याचा इस्कोट करण्यापेक्षा हे माध्यम खूप महत्त्वाचे आहे.

कल्पित- अकल्पित कथा रचायला कथाकाराकडे निराळा श्वास हवा तरच इतक्या दीर्घ दमसासाची कथा लिहून होईल कादंबरी लिहिताना जसा तिचा ताल आणि तोल सांभाळावा लागतो तसेच्या या कथेच्या बाबतीत झाले आहे. नीरजा यांच्या या निराळ्या लेखन शैलीनं चकित करून टाकतात. तिचे कथानक मी इथे सांगत नाही ती कथा मुद्दामच मुळातून वाचायाला हवी आहे.

कथेच्या संविधानकाच्या विषयाची पत आणि पोत ज्या लेखकाला सांभाळता येतो तोच आपली कथा सक्षमपणे उभी करू शकतो लेखिका नीरजा यांच्या दहा कथांच्या अनुषंगाने हे ठामपणे म्हणता येते की दहाही कथांचा पोत आणि पत जराही ढळू दिली नाही म्हणून हा कथासंग्रह महत्वाचा साहजिकच नीरजा यांच्यातली कथा लेखिकाही. चित्रकार अन्वर हुसेन यांचं मुखपृष्ठ कथेच्या आशयाला ठसठशीत करतं. या कथासंग्रहाच्या संपादिका अनुजा जगताप यांचेही कौतुक अतिशय मनलावून देखणा संग्रह रोहन प्रकाशनाच्या मार्गदर्शनाखाली समोर ठेवला आहे.

पुस्तकाचे नाव: ‘कँडी क्रश’ (कथासंग्रह)
लेखकाचे नाव: नीरजा
प्रकाशक: रोहन प्रकाशन
पृष्ठे: १५०
मूल्य: २५० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

संपन्न जीवनाचा मार्ग—आनंदाच्या वाटेवर

शूलपाणीचे अद्भुत विश्व…

उज्ज्वला पुजारी यांना अहिल्यादेवी पुरस्कार

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading