देह वयस्कर होतो. तेव्हा मात्र मृत्यूचे भय वाटू लागते. मग या जीवनाला आपण इतके का घाबरतो ? देहाचे सौंदर्य जपण्यापेक्षा जीवन सुंदर करण्याचा विचार आपण का करत नाही ? यासाठी जन्माचा अर्थ समजून घ्यायला हवा ? आपला खरा धर्म विचारात घेण्याची गरज आहे.
– राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल 9011087406
म्हणोनि माझां स्वरुपी । मनबुद्धि इये निक्षेपीं ।
येतुलेंनि सर्वव्यापी । मीचि होसी ।। 102 ।। अध्याय १२ वा
ओवीचा अर्थ – म्हणून माझ्या स्वरुपी मन व बुद्धी ही दोन्ही ठेव. एवढ्यानें सर्वव्यापी जो मी, तोच तूं होशील.
मनुष्य मेल्यानंतर काय होते ? आपण जन्माला येतो पण आपला जन्म कशासाठी आहे याचा विचार आपण कधी करतच नाही. यावर चिंतन मनन केले तर जीवनातील सर्व समस्या दूर होतात. यासाठीच आपण कोण आहोत याचा अभ्यास आपण करायला हवा. यातूनच अध्यात्माचा खरा अर्थ समजू शकेल. मनुष्य अवतारच यासाठी अभ्यासायला हवा.
जन्माला येतो ते देहाच्या रुपात. या देहात आत्मा येतो. श्वास सुरु होतो. इंद्रियांच्या माध्यमातून देहाची जाणिव होते. मनाला आणि बुद्धीला देह म्हणजे आपण असेच वाटू लागते. जगात ओळख व्हावी यासाठी देहाला नाव मिळते. मग आपण त्याच नावाने ओळखलो जातो. यातून आपण आपली खरी ओळख विसरून जातो. आपल्यात मी पणा येतो. मी अमुक एक इतका प्रसिद्ध, सामर्थ्यवान असे समजून आपल्यात अहंकार बळावतो. यातून आपण देह म्हणजे आपण असेच समजू लागतो. देहाचे सौंदर्य जपण्यावर आपला भर असतो. नाशवंत अशा या शरीराचे विविध पद्धतीने सौंदर्य कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो.
देह वयस्कर होतो. तेव्हा मात्र मृत्यूचे भय वाटू लागते. मग या जीवनाला आपण इतके का घाबरतो ? देहाचे सौंदर्य जपण्यापेक्षा जीवन सुंदर करण्याचा विचार आपण का करत नाही ? यासाठी जन्माचा अर्थ समजून घ्यायला हवा ? आपला खरा धर्म विचारात घेण्याची गरज आहे. मी कोण आहे ? याची ओळख करून घेणे हे प्रत्येक मानवाचा स्वधर्म आहे. त्याचे पालन हे त्याने करायलाच हवे. आपण जन्माला येतो. मृत्यू पावतो म्हणजे नेमके काय होते हे जाणणे यासाठीच गरजेचे आहे. जीवनाचे खरे सौंदर्य जाणून घेऊन ते जोपासायला हवे.
सूर्य उगवतो व मावळतो असे आपण समजतो. पण प्रत्यक्षात सूर्य उगवतो का ? सूर्य मावळतो का ? सूर्य तर स्थिर आहे. तो सदैव प्रकाशमान आहे. हे केव्हा लक्षात येईल. जेव्हा आपण पृथ्वीच्या बाहेर जाऊन पाहू तेव्हा आपणाला खरे काय ते कळेल. तेव्हाच लक्षात येईल की सूर्य स्थिर आहे. पृथ्वी सूर्याभोवती व स्वतः भोवती फिरत आहे. त्यामुळे सूर्य आपणास उगवला व मावळल्यासारखा भासतो आहे. हे पृथ्वीच्या बाहेर जाऊन विचार केल्याने लक्षात आले.
तसेच देहाच्या बाहेर जाऊन आपण विचार करायला हवा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की देह आणि आत्मा हा वेगळा आहे. देहात आत्मा आल्याने तो देहाचा वाटत आहे. प्रत्यक्षात हे दोन्ही वेगळे आहेत. शरीरातून प्राण जातो तेव्हा आत्मा त्या देहातून निघून जातो. त्याच्याबरोबर इंद्रियेही निघून जातात. तशाच प्रकारे मन आणि बुद्धी जिथे जातील तेथे त्यांच्यासोबत अंहकार जातो. मग अंहकार येऊ नये यासाठी काय करायला हवे ? यासाठी स्वतःची ओळख करून घ्यायला हवी व त्या ठिकाणी मन आणि बुद्धी स्थिर करायला हवी. मग अहंकार जाऊन सर्वव्यापी असा जो आत्मा आहे तो आपण आहोत अशी अनुभुती येईल. ही अनुभुती कायम राहील तेव्हा आपण आत्मज्ञानी होऊ.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.